Salaam-a-ishq - 9 in Marathi Love Stories by Harshada books and stories PDF | सलाम-ए-इश्क़ - भाग- ९

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

सलाम-ए-इश्क़ - भाग- ९




रात्रीचं जेवण बळेबळेच उरकून घरातले सगळे ओसरीत बसले होते.
आतल्या खोलीच्या दरवाज्यालगत बायका बसल्या होत्या.उंबरठ्याला टेकून आशु,सीमा आणि तिच्या आणि काही दुसऱ्या चुलत बहिणी बसल्या होत्या.
सर्वांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट जाणवत होता.दिनुकाका एका कोपऱ्यात डोक्याला हात लाऊन सुन्न बसले होते.
भाऊकाकांनी आपल्या भेदक नजरेने एकदा सगळ्यांकडे पहिले आणि एक गंभीर आवाज गरजला.-
“आज पर्यंत ह्या शितोळे घराण्यात झाली नाही ती गोष्ट ह्या वर्षाला झाली.घरातल्या पोरी शहराकडल शिक्शन घेऊन बिघडायला लागल्याय.पोरींना बी पोर्रांसारख शिक्षण घेऊ द्या त्या हुशार आहेत आस तुम्ही सगळ्यांनी विनवणी केली म्हणून मी परवानगी दिली होती,तर गप गुमान शिक्षण घ्यायचं सोडून ह्या पोरी परस्पर पिरेम काय ..लग्न काय करताय....गुड्डी चांगली शिकली म्हणून तिला नोकरीची बी परवानगी दिली आमी,तिने चांगले पांग फेडले...किवढी मात्तबर पाहुणे चालून येत होती पोरीला....शान्या व्हायला लागल्या त्या शिकून...आता मात्र बंद.... गुड्डीच्या दुसऱ्या लग्नाचं आम्ही पाहू...चांगल घर..चांगला पोरगा...दिन्या आता मधी पडायचं काम नाही.”
कोपऱ्यात बसलेला दिन्याकाका आता मात्र धीर सुटल्यावर चवताळून बोलला-“ ...केलं हुतं..पोरीन लगीन..चूक झाली होती तिची,पण पोरगा जातीचा होता,मराठा होता, चांगला इंजेनेर होता मंबईत...भाऊ पोरीन बघितलय ट्रक सरळ अंगावर घुसला तो....काय चूक व्हती हो त्याची,एकुलता एक होता आईबापाला....तिच्या संग नात तोडलं व्हतच ना आपुन,हे काय राजकारण,समाजकारण नव्हत भाऊ तिचं आयुष्य होत्याचं नव्हतं करायला..
आम्ही तुम्हाला चुलत्याचे म्हणून आमच्यावरच ही दशा...हेच जर तुमच्या तायडीने केलं असतं तर..असा ट्रक चढवला असता का... ?”
जागेवर संतापाने थरारात भाऊ जणू कडाडलेच –
“दिन्या तोंड सांभाळ...आम्ही ट्रक चढवला नाहीये...पण या पुढे चढवायला मागे फुढ बघणार न्हाईत....आणि हा भाऊबंदकीचा सवाल नाहीये....तू चुलत्याचा, हा सख्खा....हे प्रकार शितोळेवाड्यात होत न्हाईत..शितोळे जपतात ते पोरींची न घराण्याची अब्रू....कासेगावचे शितोळे म्हटल्यावरच लोकं डोळे झाकून पोरांची सोयरिक करायचे...इथल्या पोरी वळणाच्या म्हणून सासरी नाव निघायचं..अश्या शिकलेल्या पोरी पळून जायला लागल्यावर काय आब्रू राहिली वाड्याची..बाकीच्या पोरींची,
अन राहिला प्रश्न आमच्या तायडीचा माझ्याच घरात नासक फळ आहे म्हटल्यावर कापून फेकून दिलं आसतं.... वाड्याच्या आब्रू येशिला टांगणारी अवलाद काय कामाची.........”

भाऊंच्या आवाजाने भयाण शांतता पसरली,बसलेल्या पोरी मुसमुसायला लागल्या.
अश्विनी दगड होऊन फक्त ऐकत होती.
तांब्या मधून घश्यात पाणी ओतल्यावर जरा वेळाने भाऊकाका मग निर्णायक बोलले.
“आता समद्यांनी लक्षात घ्या..वाड्यातली कुनतीच पोरगी बाहेर शिकायला धाडायची न्हाई..ज्या पोरींचे शिक्शन होत आले त्यांचे अगुदर लगीन ठरवून टाका,तायडीसाठी जसं आपलं ठरलं हुत की अक्काच्या पोराला तिला द्यायचं तस मी अक्काला न पाहुण्यांना सांगावा धाडला आहे. विक्रमशी बी बोलणं झालय पाहुण्यांचं.तो चार दिसांनी येणार दिल्लीवरून मंग सरळ लग्नच...घरात झालेला परसंग बघता तायडीच जास्त गाजावाजा न करता उरकून टाका.”

अश्विनीच्या कानांत शिसं ओतलं जात होतं..एक एक शब्दाने तिच्या आयुष्याचे धागे तुटत होते.
जवळ बसलेल्या पोरींच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या.
सीमा,नीलिमा,ज्योती,मीनल..सगळ्या हुशार होत्या...
डॉक्टर,इंजिनिअर..सीए बनायचं स्वप्न बघत होत्या आणि भाऊकाकांनी दरवाजेच बंद करून टाकले.अश्विनीने एकवेळ पोरींकडे पाहिलं...किती जबाबदारी असते अश्या घरातल्या मोठ्या पोरींवर...गुड्डीचा एक निर्णय सगळ्यांच्या आयुष्याची धूळधाण करणारा ठरला.

आशुच्या हृदयात कालवाकालव सुरु झाली....
“फाटलेलं आभाळ शिवायची ही गोष्ट..कुठं कुठं ठिगळ लावायचं.........कुणाचं दुखः मोठं?...प्रेम डोळ्यासमोर गमावलेल्या गुड्डीताईचं? ह्या शेजारी बसलेल्या पोरींच? की..माझं न आदीच्या आयुष्याचं... ? कधीकधी नियती श्वास ही घ्यायला फुरसत देत नाही..सरळ आपले फासे टाकून मोकळे होते...आता कुठल्या तोंडाने सांगू आई,दादांना...मला अजून लग्न करायचं नाहीये...मी माझ्या आयुष्याचा निर्णय घेतलाय...पण मग सीमाचं,इतर हुशार पोरींचं काय? त्यांची काय चूक? प्रेम करून तर आम्ही गुन्हा केलाय त्यांना त्याची शिक्षा का?आम्हाला शिक्षण भेटलं..प्रेम भेटलं....पण त्यांचा दोष काय?त्याचं भावविश्व तर अजूनही पुस्तकांच्या पानांत आहे त्याची राखरांगोळी करून आपल्या न आदीच्या संसारची बाग फुलवायची?काय करायचं?..काय करायचं?”

डोळे पुसून ती हिमतीने भाऊ काकांसमोर उभी राहिली आणि हात जोडून म्हणाली-

“भाऊ...वाड्यातल्या हुशार पोरींना ही शिक्षा नका देऊ..भले त्यांच्याकडून वचन घ्या की असलं काही करणार नाही पण शिक्षण थांबवू नका....तुम्ही म्हणाल तिथं मी डोळे मिटून लग्नाला तयार आहे, ह्या पोरी पण घरातल्यांच्या विचाराबाहेर जाणार नाही पण त्याचं शिक्षण बंद करू नका खूप हुशार आहेत सगळ्या .......”

एवढा वेळ निग्रहाने थांबवलेला अश्रूंचा बांध आता फुटला होता.
घरातली पुरुष मंडळीपण पोरींच्या शिक्षणासाठी बोलू लागल्यावर भाऊ शांत झाले.लाकडी खुर्चीवर बसत मोठ्या जरबेने ते म्हणाले-

“वाड्यातल्या पोरींच्या चांगल्या वर्तनाची जबाबदारी आईबापाने घ्यायची,खानदानाला शोभल असंच वागलं पाहिजे न शिकून इथूनच मानाने सासरी गेलं पाहिजे...या नंतर ह्या पोरींच्या संस्कारांवर कुणी शंका घेणार नाही असं वागून दाखवायला पाहिजे एक बी नासकं फळ निघालं तर.. जग कितीबी पुढं जाऊदे शितोळेच्या पोरी यानंतर शिकणार नाही ”

बऱ्याच चर्चेनंतर सगळ्यांनी तो प्रस्ताव मान्य केला आणि पोरींच्या शिक्षणाची दारे उघडी झाली होती,पण आता दोन गुंतलेले विश्व पूर्णपणे उध्वस्त होणार होते.
रात्री आईच्या कुशीत दोघी बहिणी कितीतरी वेळ रडत होत्या.मेडिकलला प्रवेश मिळणार म्हणून सीमाचे आनंदाश्रू थांबत नव्हते..तो तिचा निरागस कोवळा आनंद पाहून आशुला गलबलून आलं.
आशुने रात्री उशिरा फोन बघितला,आदीचे खूप सारे miscall न मेसेज दिसले.

“आशु का इतक्या घाईत निघून गेली? किती फोन केले...पिल्या आज एकदाही बोलणं झालं नाही....आठवण येतेय ना तुझी ! प्लीज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कॉल कर मी वाट बघतोय......”

मेसेज वाचून तिला भरून आलं.आदीचा चेहरा डोळ्यासमोर फिरायला लागला.डोक्यात विचारांचं काहूर माजलं..

“नियती खरचं इतकी कठोर का असते? कालपर्यंत मी फक्त आदीची होते आणि आज ..आज मला सांगितलं जातं की कुण्या दुसर्यासोबत तुला आयुष्य काढायचंय ..हे कुणाचं उसनं नशीब आहे..महाभारतातल्या कुंतीपुत्राचं की आयुष्यभर भळभळती जखम घेऊन हिंडणाऱ्या अश्वथाम्याच? माझा आदि अगदी अनभिज्ञपणे झोपला असेल,येणारे दिवस काय घेऊन येणार हे त्याच्या गावीही नसेल! कसा जगेल तो तरी माझ्याशिवाय?
वेडाय तो.मी एक दिवस जरी दिसली नाही तर अस्वस्थ होतो.हे असं त्याच्या आयुष्यातून अचानक निघून जाणं म्हणजे...? भाऊकाकांना वचन तर दिलंय पण ..आदि शिवाय आयुष्य?..दुसऱ्या कुणाच्यातरी सहवासात जीवन घालवायचं..?मी कसं जगायचं? आदि माझा श्वास आहे...”

कितीतरी वेळ डोळे पाझरत होते.कुणीतरी रक्ताळलेल्या हातांनी गळा घोटतय आणि जीव गुदमरतोय ह्या ...भावनेने ती अस्वस्थ झाली आणि ती उठून बसली.तिने हळूच खिडकी उघडली.थंड हवेच्या स्पर्शाने तिच्या रडून थकलेल्या डोळ्यांना आराम वाटला.

बाहेरची सामसूम,रातकिड्यांचे आवाज,पानांची सळसळ तिचं मन अधिकच अलवार करत होतं.
थोडं दूर एक बल्बच्या दुबळ्या प्रकाशात दिव्याची विहीर अधिकच गूढ वाटत होती.तिचं विहिरीकडे लक्ष गेलं आणि एक अभद्र विचार तिच्या मनात डोकावला,खिडकी बंद करून ती बेडवर पडली आणि भयंकर विचारांची जंत्री सुरु झाली-

“दिव्याची विहीर!...खोल खोल तळ असणारी दिव्याची विहीर..लहानपणापासून दिवा लावतोय आपण तिच्या कोनाड्यात. त्या लावलेल्या दिव्याच्या बद्दल काहीतरी मागायची वेळ आता आलीय..आई म्हणते-‘ विहिरीत “पाणमाय” राहते आणि तिच्यासाठी जो नेमाने दिवा उजळवतो त्याच्या सगळ्या इच्छा ती पूर्ण करते’ ,मग मी तर नेमाने लावलाय दिवा...माझी इच्छा ती पूर्ण करेल?..पण काय आहे माझी इच्छा?..माझी इच्छा आहे आई वडील शरमेने झुकले नाही पाहिजे आणि माझी ही पण इच्छा आहे की मी फक्त न फक्त माझ्या आदीची होणार...कसं साध्य होणार ते?..एक पर्याय आहे......विहिरीच्या तळाशी राहणाऱ्या पाणमायच्या कुशीत शिरायचं.....कायमच..पण आत्महत्या न दाखवता अपघात दाखवून...सर्वांसमोर हसत हसत नाटक करत चुकीने पाय घसरून विहिरीत पडायचं...आणि हा न सुटणारा गुंता अलगद सोडवायचा.कुणालाच काही कळणार नाही,पोरींच शिक्षण थांबणार नाही आणि माझा आदि सोडून मी कुणाच्या वाट्याला जाणार नाही,पण मग आई दादाचं काय...इतकं लाडाने मोठं केलं,शिकवलं...मी तर त्यांच्या जीव की प्राण..कुणाच्या प्रेमाला कौल द्यावा? मी ज्यांच्या काळजाचा तुकडा आहे त्यांच्या की जो माझा काळजाचा तुकडा आहे त्याच्या?..बाप्पा माफ करशील का मला आदिच्या प्रेमाला झुकतं माप दिल्या बद्दल?.तर ठरलं...हा गुंता प्रोजेक्ट ओरल झाल्यावर लगेच सोडवायचा.आदि आणि शलूला इथं झालेलं सगळं सांगायचं आणि आपण लग्न करतोय एवढंच सांगायचं ...बाकीच कळेल तर कळेल. नाहीतर विश्वासघातकी म्हणून माझा दुस्वास करून ते मला विसरूनही जातील ......सोन्या फक्त ह्या जन्मी मला माफ कर..तू एका मूर्ख मुलीवर प्रेम केलंस..मी फक्त तुझ्यासाठी ह्या जगाचा निरोप घेतेय..तुझ्याशिवाय आयुष्य मी आयुष्य धरत नाही..तुला वजा करून ह्या आयुष्यात काहीचं तर उरत नाही...लव्ह यु शोना...”

मनाचा निर्धार करून ती शांत झोपी गेली.दोन दिवस पुढची सगळी आखणी करण्यातच गेले...आणि ती पुण्याला निघाली.

****************

प्रोजेक्ट ओरल सुरु झाली होती.आदि,सुज्या,शलाका सगळ्यांची गडबड चालली होती.प्रोजेक्टला चांगले मार्क्स मिळणार ह्या बाबतीत त्याचं दुमत नव्हत,पण आशु...ती मात्र हरवल्यासारखी वाटत होती.कासेगावला नक्की काहीतरी झालाय हे आदिने हेरलं होतं पण ओरल संपेपर्यंत तो गप्प बसणार होता. ओरल संपली तेव्हा दुपार झाली होती.
इंजिनिअरिंग खऱ्या अर्थाने संपल होतं.प्रत्येकाच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार होती.
कॅन्टीनमध्ये मुलांचा जल्लोष चालू होता..कुणाच्या डोळ्यात आसूं..कुणाच्या चेहऱ्यावर हसू होतं.युनिफोर्मवर मित्र-मैत्रिणींच्या सह्या घेतल्या जात होत्या...कॉलेज लाइफचा शेवटचा दिवस..प्रत्येकजण मनाप्रमाणे हृदयावर कोरत होता.

कॉलेजगेट बाहेर आल्यावर शलाकाने आशुला घट्ट मिठी मारली.आता मात्र आशुचा आसवांचा बंध फुटला.
तिचे डोळे पुसत शलाका म्हणाली-
‘ये वेडाबाई....कुठे पळून जाणार नाहीये मी...आपण रोज भेटणार आहोत..मी फक्त १० दिवस मामाकडे जातेय कायमची नाही.’
आशुने एक गिफ्टबॉक्स शलाकाच्या हातात देत म्हटलं-

“जाडे...हे तुझ्यासाठी पण एकच अट आहे हे परवा उघड..आज लगेच उघडू नको..तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे...दे मला LIC प्रॉमिस....जिंदगीके साथ भी..जिंदगीके बाद भी...!”

“ओके....मिसेस शिर्के....!’ शलाकाने तिला पुन्हा मिठी मारत म्हटलं.आशु हुंदके देऊन रडत होती.
तिला शांत करत तिचा निरोप घेऊन शलाका निघाली.आशुच हे वागणं कोड्यात टाकणारं होतं.
ही त्यांची शेवटची भेट होती का ?

आदिने तिला शांत केलं आणि तिच मन वळवण्यासाठी तो म्हटला-

“ये पिल्ल्या मी रागावलोय तुझ्यावर...दोन दिवस माझा फोन उचलला नाहीस...मेसेजही असेच तुटक तुटक...तुला माहित आहे ना मी नाही राहू शकत असं न बोलता...”

“आदि प्लिज.....सारसबागेत जाऊया? मला तुझ्या सोबत एकदा बाप्पाचं दर्शन घ्यायचंय..”
तिच्या अश्रूंना खंड पडत नव्हता.

“ये वेड्या पिल्ल्या का रडतोय एवढा? काय झालाय तुला...घरी काहीतरी झालय नक्की! चल सांग काय झालं ते..”

तिला जवळ घेत तिचे डोळे पुसत तो म्हणाला.

“ आदि प्लिज अगोदर जाऊया का दर्शनाला?”

“ओके” म्हणत त्याने गाडी काढली आणि ते दर्शनाला निघाले.
आभाळ भरून आल्याने वातावरण अंधारलेले वाटत होते.

बाप्पाच्या समोर हात जोडून दोघं उभे होते.आशुने आदिकडे बघितलं...शांत डोळे मिटून,समाधानाने आदि बाप्पासमोर उभा होता.
तिला आता थांबणं शक्य वाटत नव्हतं.ती पायात चप्पल सरकवत धडपडत पाहिऱ्या उतरत त्यांच्या नेहमीच्या जागेकडे निघाली.आदि गोंधळला.
घाईने हातात शूज उचलून तिच्या पाठोपाठ धावला.आशुला रडतांना बघून आता मात्र त्याचा तोल सुटला.
तिच्या शेजारी बसत तो जवळपास ओरडलाच-

"काय लावलय आशु काही दिवसांपासून?..नीट बोलत नाहीये..काही सांगत नाहीये..दर्शन घ्यायचं म्हटलीस पण नीट दर्शन ही घेतलं नाही..वेड्यासारखी पळून आलीस..काय झालंय सांगणार आहेस का?”

त्याला घट्ट मिठी मारत ती अजूनच रडायला लागली.आदि पुरता गोंधळला होता.तिच्या केसातून हात फिरवत तो म्हणाला.

‘पिल्ल्या बागेत आहोत आपण...लोकं बघताय...निट बस आणि सांग...’

त्याच्या मिठीतून हळूच बाजूला होत,डोळे पुसत..खोटं,खोटं...हसत ती म्हणाली...

‘काही झालेलं नाहीये..कॉलेज संपल,एन्जॉयमेंट संपली..जबाबदारी वाढणार म्हणून थोडं टेन्शन आलंय...आणि दूर होते ना आता तीन चार दिवस म्हणून जरा प्रेम आलं तुझ्यावर बाकी काही नाही...’

तिला एक हलकी टपली मारत तो म्हणाला...
‘ ...तू खरंच एक वेडं पिल्लू आहे...मूर्ख..घाबरलो ना मी..काय झालं असेल म्हणून....’

पुहा डोळ्यात जमा होणाऱ्या पाण्याला हलकेच टिपत ती म्हणाली-

‘चल जाऊया...घरी सांगितलंय लवकर निघेल म्हणून...’

वातावरणात मळभ दाटलं होत, चांगलच अंधारून आलं होतं..खांद्याला बॅग अडकवत आदि म्हणाला-

‘ओके चल तुला लवकर घरी जायला हवं घरचे काळजी करतील...तुला नासिक फाट्याला सोडतो.’

आदि उठला अश्विनी बसूनच होती.त्याने वळून तिच्या समोर हात पुढे करत म्हटलं-

‘पिल्ल्या चल....’

अश्विनी त्याच्या डोळ्यात पहातच राहिली...लाईट ग्रे ट्राउझर,व्हाईट,ब्लू बारीक लायनिंग चा फोल्डेड स्लीव फोर्मल शर्ट...एका हाताने केस मागे टाकून सावरणारा...राजबिंडा आदि....
ती मंत्र मुग्ध झाल्यासारखी उठली आणि त्याच्या जवळ त्याच्या डोळ्यांमध्ये बघत म्हणाली-
‘मी जातेय....तू तुझी काळजी निट घेशील ना?

‘अग हो बाई...तू काय कायमची सोडून निघालीस का?..चल लवकर.. रात्री गप्पा मारु..गुपचूप फोन वर फुल नाईट...टाटा टू टाटा फ्री...काय?

डोळ्यातून पाणी येण्या अगोदर पटकन त्याच्या ओठांवर किस करत ती म्हणाली-
‘आदि इथं पुढच्या क्षणाचा भरवसा नाही म्हणून हे किस...’

‘वा..वा...आज चांगला दिवस आहे वाटतं...I am getting hugs n kisses ….good!..पण यार रडू नको सारखं बघ डोळे सुजलेत..आणि तुला त्रास होईल’

त्याचा हात हातात घट्ट पकडत ती निघाली.

बसमध्ये बसेपर्यंत आशु हरवल्यासारखी वाटत होती.आदि मात्र अनभिज्ञ होता...ही कदाचित त्यांची शेवटची भेट होती हे त्याच्या गावीही नव्हतं.
बस निघाली.....पुणे,आदि.... हळूहळू मागे पडलं... दिसेनासं झालं.

केव्हांचा बरसणार म्हणणारा पाऊस आता धोधो बरसत होता...

*******************************

रात्रीचे दहा वाजले होते.आदि त्याच्या आवडत्या खिडकीत बसून गिटार वाजवत होता.पारिजातकाचा मंद सुगंध..त्याला अजूनच धुंद करत होता.तेवढ्यात शेजारी ठेवलेल्या मोबाईलची मेसेज टोन वाजली म्हणून त्याने नाईलाजाने गिटार बाजूला करून मोबाईल बघितला... आशुचा मेसेज होता.-
‘ तुझ्या बॅगेत जी फाईल आहे त्यात एक लेटर आहे प्लीज वाच...गुड बाय शोना...लव्ह यु फोरेवर.......”

तो गोंधळला..धड्पडत जाऊन त्याने बॅग शोधली.पावसाने बॅग भिजली होती.त्या थंडगार स्पर्शानेही तो क्षणभर दचकला...

‘लेटर ?...फोन वर काही सांगायचं सोडून लेटर?

त्याने बॅग चाचपडली.थरथरत्या हातांनी त्याने फाईलची चेन उघडली.वरच घडी केलेले नोटबुकचे पेजेस होते.तो बेडवर बसला.घडी उघडली...त्याने वाचायला सुरुवात केली.

‘.......आदित्य ’

...गोंधळलास का रे?फोनवर बोलायचं सोडून ही लेटर काय लिहितेय?आणि वर हे काय लिहिलंय?..फक्त आदित्य..?
काय करू काही सुचलंच नाही.
हे जे मी काही तुला सांगणार आहे त्यांनंतर तुला हाक मारायचाही हक्क तू मला देशील की नाही माहित नाही...

किती सहज सुंदर चालू होतं रे आयुष्य कालपरवापर्यंत! प्रेमाच्या जगात जणू हरवून गेलो होतो.
खूप काही जास्त विचार केला नाही की सगळं किती सहज,सोप्प असतं नाही?
दोन क्षणही लागले नाही रे आपल्याला प्रेमात पडायला..कुठल्या जन्माचे ऋणानुबंध होते जे एका क्षणांत बांधले गेले होते?
त्याचं क्षणी मी तुझी झाले..मला माहित नाही हे कसं झालं...थोडी वास्तवाची जाणीव होतीच की हे दिवास्वप्न तर ठरणार नाही?..पण मग तुझं प्रेम आश्वासक वाटायचं...तुझ्यात झालेला बदल, चांगल कुटुंब,जातीपातीचा कुठला अडसर नाही..हे सगळं हिम्मत द्यायचं..आणि मी अधिकच तुझ्यात गुंतत गेले...आणि आता इतकी गुंतलेय ना आदित्य की मी माझी मलाच सापडत नाहीये रे!

तू म्हणशील ‘पिल्लू मग हे गुंतण वाईट आहे का?’..तर हो रे ते वाईट आहे कारण हा गुंता सोडवायला मला वेळ ही न देता नियतीने क्रूर चेष्टा केलीय आपल्याशी.
आदित्य...आपलं हे प्रेम आपण माझ्या घरच्यांसमोर उघड करू शकणार नाहीय रे...प्रश्न फक्त आपल्या प्रेमाचा असता ना तर कुणाशीही भांडले असते पण प्रश्न वाड्यातल्या हुशार मुलींच्या शिक्षणाचा आहे,सीमाच्या स्वप्नांचा आहे,आई दादांच्या मानाचा आहे,माझं एक तुझ्याकडे सरकणार पाउल..त्या पोरींना त्यांच्या स्वप्नांपासून दूर नेईल.आदित्य कदाचित माझ्या हातावर प्रेमाची रेषाच नव्हती..पण ह्यात तुझा तो दोष काय?

....आदित्य उद्याच मला दुसऱ्या कुणाच्यातरी आयुष्याचा भाग होण्यास नियतीने भाग पडलाय रे!...

पण कसं सांगू ह्या क्रूर नियतीला..की त्या दोन डोळ्यांशिवाय मला काही सुचत नाही,फक्त त्याच आश्वासक स्पर्शाची भाषा मला कळते.तुझ्यापासून मला असं माझ्याच संमतीने तोडतांना ह्या नियतीला काहीच वेदना होत नसतील का रे?
तुझ्याशिवाय जगण्याचा हा गुन्हा ,ह्याची शिक्षा ती काय असेल?...तुझ्याशिवाय घेतलेला प्रत्येक श्वास श्रापित आहे.तुझ्या व्यतिरिक्त होणारा कुठलाही स्पर्श दुषित आहे...आदित्यशिवाय अश्विनीच स्वतंत्र अस्तित्व ते काय....?

पण तरीही ह्या प्रेमाला त्यागाची एक जोड देऊन आयुष्याचं निर्माल्य करायचं...कदाचित अजून काही वर्षांनी गावाकडचाही समाज सुधारेल...स्वतः जोडीदार निवडण्याचा हक्क पुढे ह्या मुलींना मिळेल..! ह्या मुली शिकतील...काहीतरी सकारात्मक बदल गावात होईल....आजच आपल्या एका स्वार्थी निर्णयामुळे हे आशेचे दिवे इथंच मालवून जातील आणि मग फक्त भयंकर अंधार उरेल........

आदित्य मला माफ करशील? तुझ्या बदल्यात वाड्यातल्या मुलींचं शिक्षण स्वीकारण्यासाठी? मला माफ करशील आई दादांच्या सन्मानाला तुझ्या प्रेमाहून मोठं समजण्यासाठी..असे आई दादा की मुलगा नाही म्हणून ज्यांना नेहमी कमी लेखलं गेलं,’पोरी शिकून बघा काय काय दिवे लावतील’ हे नेहमी ऐकवलं गेलं.
आदित्य ह्यात भाऊकाका,समाज..कुणाचाही दोष नाही.
दोष आहे फक्त माझा सर्वस्वी माझा.
मी ह्या परिणामांचा कधी विचारच केला नाही.काकांचा स्वभाव,वाड्याचं वळण सगळ सगळ माहित होत मला पण का कुणास ठावूक..तुझ्या प्रेमात पडल्या पासून आयुष्याच्या सप्तपदीमध्ये फक्त तुझ्याच हातात हात बघितलाय....
आदित्य आपल्या प्रेमाच्या एक एक क्षणांची शपथ आहे तुला इतकच कर माझ्यासाठी........मला कायमचं आयुष्यातून पुसून टाक..आज आता ह्या क्षणापासून...माझा शोध घ्यायचा प्रयत्न करू नको की माझ्याशी संपर्क साधायचा.माझ्यासाठी ही परीक्षा अजून कठीण करू नकोस...एका मोठ्या त्यागकुंडात तुझी अश्विनी समिधा झालीय एवढं समज आणि त्या आठवणींना राख बनून हवेत मिसळून जाऊ दे.....माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर तीन वर्ष मला भेट दिल्याबद्दल..हे आयुष्य तुझ्यावरून ओवाळून टाकते.
अजून एक हक्काचं मागते....जमलं तर ह्या समाजासाठी काहीतरी कर....
तुझ्या आयुष्याचाही भाग कुणीतरी होईल ह्या विचाराने सुद्धा माझा श्वास गुदमरतोय...............पण इतकं स्वार्थी होऊन कसं चालेल.....तुझ्याकडे न पाह्ण्याचा चंद्राकडे हट्ट धरणारी मी.......अजून दुसरा काय विचार करणार?..
अजून काय आणि किती लिहू?...तुझा चेहरा डोळ्यात साठवून एका न संपणाऱ्या प्रवासाला मी निघतेय......मला तुझ्या आयुष्यातून निरोप दे आदी........अगदी कायमचा!

तुझीच असूनही.......नसणारी

अश्विनी

आदित्य त्या कागदाकडे निर्बुद्धसारखा बघत राहिला.......त्याला दरदरून घाम फुटला होता.पूर्ण रूम गोल फिरतेय ह्या विचाराने त्याने डोकं गच्च पकडलं...आणि तो धाडकन पलंगावर कोसळला.

क्रमशः

©हर्षदा