Samarpan - 22 in Marathi Fiction Stories by अनु... books and stories PDF | समर्पण - २२

Featured Books
  • The Omniverse - Part 6

    அடோனாயின் கடந்த காலம்அடோனா திரும்பி தனது தோற்றத்தின் ஒரு மறை...

  • The Omniverse - Part 5

    (Destruction Cube) அழித்த பிறகு,ஆதியன் (Aethion) பேய்கள் மற்...

  • The Omniverse - Part 4

    தீமையின் எழுச்சி – படையெடுப்பு தொடங்குகிறதுதற்போது, டீமன்களு...

  • அக்னியை ஆளும் மலரவள் - 12

     மலரியின் அக்கா, ஸ்வேதா வருவதைப் பார்த்து, “நீயே வந்துட்ட, எ...

  • அக்னியை ஆளும் மலரவள் - 11

    “நீ கோபப்படுற அளவுக்கு இந்த ஃபைலில் அப்படி என்ன இருக்கு?” என...

Categories
Share

समर्पण - २२

तेरे इंम्तेहान की हद
अभी बाकी है जिंदगी।
रुठने की अदा तुझमे है,
हम इस खुबी से रूब़रु नहीं।


आयुष्य आपल्या साठी कितीही खडतर झालं तरी ते असहनिय नक्कीच होत नसत.... आणि तो खडतर प्रवास ही नेहमीसाठी नसतोच... जस सुख टिकत नाही तशी दुःखाची ही वेळ ठरलेलीच असते, फक्त गरज असते स्वतःला सांभाळण्याची आणि संयमाची....पण हे सगळं सांगणं जितकं सोप्प असत ना, तेवढच महत्त्वाच असत त्या कठीण वेळेत याची अंमलबजावणी करणं...आणि ज्याला हे जमलं त्याची आयुष्याची नाव कधीच दुःखाच्या महापुरात बुडू शकणार नाही.... मला हे जमवायला खूप वेळ लागला. आणि मला हा वेळ यासाठी लागला कारण मी अपेक्षा करत होती की कोणीतरी येईल आणि माझं दुःख समजून घेईल...माझ्यावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा माझं ऐकून घेईल.....विक्रम बोलायचा अपेक्षा करणं चुकीचं आहे...,पण मला वाटतं अपेक्षा चुकीच्या माणसाकडून करणं चुकीचं आहे...खर सांगायचं तर विक्रम कडूनही खूप काही अपेक्षा केल्या होत्या मी पण त्या कधीच पूर्ण नाही झाल्या...मग विक्रम चुकीचा असावा का??? या प्रश्नाचं उत्तर मी आज ही 'नाही' हेच देणार....विक्रम चुकीचा नव्हता, माझी त्याच्याकडून अपेक्षा करण्याची वेळ चुकीची होती...,बहुतेक.....

अभय कडूनही खूप अपेक्षा होत्या मला...अगदी लग्नाच्या पहिल्या दिवसापासून.... पण त्या अपेक्षांचा भंग अश्या रीतीने झाला की पुन्हा त्याच्याकडून काही अपेक्षाच करू वाटल्या नाही.... आज तो माझ्यासाठी सगळं काही करायला तयार आहे पण आता मला काहीच नको...खूप प्रयत्न करते की सगळं विसरून जाऊ...अगदी मनापासून आयुष्य जगू अभयसोबत.... आणि मग ती रात्र आठवते...

माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या निर्णयाची रात्र....खर तर निर्णय घेऊन झाला होता की मी नाहीच राहणार अभय सोबत...पण त्यानंतर काय झालं मला काहीच कळाल नाही, डोळ्यांसमोर अंधारी आली.... आणि जेंव्हा डोळे उघडले तेंव्हा मी हॉस्पिटलमध्ये होती आणि माझ्यासमोर नम्रता बसलेली होती...

"नम्रता...तू इथे?? अभय... अभय कुठे आहे?"

माझं डोकं खूप जड झाल्यासारखं वाटत होतं, कदाचित मी काही खाल्लं नव्हतं आणि खूप रडल्यामुळे ते होत असावं...आणि त्यामुळेच मला भान नव्हतं की मीच नम्रताला बोलावलं आहे,

"नैना...तूच बोलावलस ना मला आणि अभय आहे इथेच बाहेर... डॉक्टर सोबत बोलतोय..."

"डॉक्टर?? काय झालंय मला? आणि काही झालं जरी असेल तरी मला नाही थांबायचं इथे, तू प्लिज मला घेऊन चल..."

"अग हो राणी जाऊयात आपण, पण सध्या तू आराम कर, बघ किती थकलेली वाटत आहेस...आणि डॉक्टर बोलतील तेंव्हा नक्कीच जाऊ आपण.."

"मग तू जा अन बोल डॉक्टर सोबत आणि आवर पटकन, मला नाही थांबायचं आहे इथे..."

"नैना तू शांत हो बर आधी, अभय बोलत आहे ना....तो आला की जाऊ मग आपण.."

" हे बघ नम्रता, ना मला अभयला बोलायचं आहे ना इथे थांबयच आहे, आणि जर तुला माझा कंटाळा येत असेल तर तस सांग, मी माझं मॅनेज करेल काहीतरी..."

"आपण बालवाडी पासून सोबत आहोत नैना, आणि मी तुला कंटाळेल का?? पण सध्या तरी तुला पुर्णपणे आराम सांगितलाय डॉक्टर ने, त्यामुळे तू कुठेच नाही जाणार आता लगेच.."

"तुला कळत नाहिये ग, माझ्या आणि अभयमध्ये काय झालंय ते, तू घरी चल मी सांगते सगळं तुला..."

"मला सांगितलं अभयने, पण तरीही मी तुझ्याकडूनच ऐकून घेईल सगळं, पण आता तुला खरच आराम करायचा आहे..."

"मला नाही करायचा आराम वैगरे, जायच आहे मला, तू नर्स ला बोलावं आणि हे सलाईन काढायला लाव आधी...."

मला अजिबात तिथे थांबायची इच्छा नव्हती आणि अभयला तर पहायचीही मनस्थिती नव्हती माझी....मला अस वाटतं एक स्त्री तिच्या नवऱ्याकडून केला जाणारा दुर्लक्ष सहन करू शकते, तो रागावलेल हि सहन करू शकते पण त्याच्याकडुन मिळणारा अपमान नाही सहन करू शकत...कमीतकमी मी तरी सहन करणार नव्हती...पण नम्रताचे पुढचे शब्द मला निरुत्तर करून गेले...

"ठीक आहे तुला जिथे जायचं तिथे जा पण एक ऐकून जा की तू आई होणार आहेस..यु आर प्रेग्नंट...."

माझ्यासाठी खूप मोठा अनपेक्षित धक्का होता हा....खर सांगायचं तर हे ऐकताना मला थोडा ही आनंद नाही झाला...कदाचित या दुनियेतील मी पाहिली स्त्री असावी जीला या गोष्टीच आनंदापेक्षा टेन्शन च जास्त आलं... मला काहिच कळत नव्हतं काय घडत आहे माझ्यासोबत...आता अजून काय नवीन परीक्षा द्यायची होती मला ज्यासाठी माझा कान्हा असे खेळ खेळत होता माझ्यासोबत...

"काय बोलली तू नम्रता? मी काय परिस्थिती मध्ये आहे आणि तुला मजाक सुचत आहे..."

"हा मजाक नाही आहे ग...आणि तुला इथेच थांबायचं आहे, किती अशक्तपणा आलाय तुला... काही खाता येत नाही का तूला?"

नम्रता पुढे काय बोलत होती मला काहीच ऐकायला येत नव्हतं.... डोकं सुन्न झालं होतं...आणि माझ्या डोळ्यासमोर आला अभय..त्याला माहित असेल का हे आणि माहीत झालं असेल तर तो काय रिऍक्ट करेल...आणि तेवढ्यात अभय येऊन उभा झाला माझ्यासमोर...रागात आम्ही एकमेकांना खूप काही बोलुन गेलो होतो...आम्ही अश्या परिस्थिती मधून जात होतो जिथे आमचंच भविष्य काय आहे हे आम्हाला माहीत नव्हतं आणि या नवीन येणाऱ्या जीवाला आम्ही काय भविष्य देणार होतो...

नम्रताला येऊन कदाचित खूप वेळ झाला असावा त्यामुळे अभय तिला बोलला,

"नम्रता तुला खुप वेळ झाला येऊन, तुझ्या घरी वाट पाहत असतील..मी तुला घरी सोडून देतो..."

मला नम्रता ला जाऊ द्यायचं नव्हतं... आणि त्याच कारण हे होतं की मला अभय सोबत एकटीला राहायचं नव्हतं... मला त्याच्या तोंडून आता कोणतेच अपशब्द ऐकून घ्यायची इच्छा नव्हती आणि नम्रताला कदाचित माझी ही चलबिचल कळली असावी...

"मी घरी सांगून आली आहे अभय आणि तस पण नैना ला गरज आहे माझी, मी थांबते आजची रात्र...तोपर्यंत तू पण आराम करून घे..."

"ठीक आहे, तुम्ही दोघीही उपाशी आहेत, मी काहीतरी आणतो खायला...."

आणि अस बोलून अभय निघून गेला...मात्र जाताना माझ्यावर एक कटाक्ष टाकून गेला...मी नाही समजू शकली की अभयला काय बोलायचं आहे...कदाचित त्यावेळी जी काही परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे असावं...एका सुखी संसारासाठी काय हवं??प्रेम...??? नाही नक्कीच नाही......माझ्या अनुभवातुन मी हेच सांगू शकेल की सुखी संसारासाठी एकमेकांना समजून घेणं जास्त महत्त्वाच आहे...एकमेकांच्या विचारांना, भावनांना महत्त्व देणं, एकमेकांना सम्मान देणं ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत....त्यावेळेला आमच्यामध्ये अस काहीच नव्हतं... आणि जे काही शिल्लक राहील होत त्याचीही शाश्वती नव्हती की ते किती दिवस टिकून राहील....

"आता मला सांगशील प्लिज की नक्की काय झालंय तुझ्या आणि अभयमध्ये...आणि हा विक्रम का तुझं आयुष्य बरबाद करायला निघाला आहे....?"

नम्रताचा हा प्रश्न ऐकून मात्र मला दुःख झाल...विक्रम...आणि माझं आयुष्य बरबाद करणार?? मला विक्रम बद्दल काहीच चुकीचं ऐकून घ्यायचं नव्हतं...विक्रम ने अस काहीच केलं नव्हतं की ज्यामुळे माझं आयुष्य बरबाद व्हावं...हे तर माझं नशीब होतं जे मला इथपर्यंत घेऊन आलं होतं... पण यात नम्रताची तरी काय चूक होती...तिला तर कुठे सगळं माहीत होतं....

"हे बघ नम्रता तुला काही माहीत नाही तर अस कोणाबद्दल चुकीचं कस बोलू शकते तू? तुला माहीत आहे का विक्रम कोण आहे, कसा आहे?"

"नाही माहीत, पण मला तू आणि अभय माहीत आहे, त्यामुळे कोण्या तिसऱ्या मुळे तुमच्यात प्रॉब्लेम व्हावे हे मला रुचत नाही आहे...आणि नैना मला माहीत आहे की तुझं लग्न झाल्यापासून तुझं आणि अभयच नातं कस आहे ...पण आज तू अभयचा इतका द्वेष करत आहे, तुला खरच वाटत तो इतका वाईट आहे....तुला त्याच्या चांगल्या गोष्टी कधीच दिसल्या नाहीत का?? तो तुला रागात बोलला असेल काहितरी पण म्हणून तू एका नवीन मिळालेल्या मित्रासाठी अभयला सोडायला निघालीस...तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती..."

आता मात्र माझी खरच दमछाक झाली होती...कस समजवायचं सगळ्यांना... माझं आणि विक्रमच नातं खरंच एवढं गुंतागुंतीचं आहे का, की कोणी हे समजूच नये... आणि मी विक्रमसाठी अभयला सोडायला निघाली नव्हती...आणि अभय किती चांगला आहे हेही माहीत होतं मला... पण मला अभयची कोणती वागणूक एवढं दुःख देऊन गेली ज्यामुळे मी असा निर्णय घेतला हे कदाचित नम्रताला माहीत नसावं त्यामुळे मी तिला सुरुवातीपासून तर आजपर्यंत सगळं काही सांगितलं...

" मला नाही कळत आहे नैना मी काय बोलू यावर, तू म्हणतेस की विक्रम तुझा मित्र आहे, पण तुझं त्याच्यावर प्रेमही आहे, आणि तुला अभय सोबत ही राहायचं आहे, विक्रमला ही दिशाला सोडायच नाही आहे....अस कस आहे हे नातं आणि हे शक्य तरी आहे का? मला नाही कळत आहे काहीच...."

"मला एक सांग नम्रता तू तुझ्या घरच्यांवर...बर घरचे सोड, मी मैत्रीण आहे तुझी, माझ्यावर तुझं प्रेम नाही?? मग आपण सोबतच राहतो का नेहमी? किंवा तू काही मोठमोठ्या अपेक्षा करते का माझ्याकडुन. ...नाही ना? पण तरीही जेंव्हा तू काही अडचणीत असते किंवा तुला एक मानसिक आधार लागतो, बोलते ना मला तू....असचं आहे ग आमचं पण...या सगळ्यामध्ये एक चूक आहे की तो पुरुष आहे अन मी स्त्री आणि त्यात दोघेही लग्न झालेले...तुला खरं सांगू, आम्ही जर लग्नाच्या आधी भेटलो असतो तर आमचं भविष्य काय असतं नाही सांगू शकत मी...पण आम्ही अश्या वळणावर भेटलो जिथे आम्ही आधीपासूनच कोणाचे तरी झालो होतो... आमचं प्रेम आहे वैगेरे हे सगळं ठीक आहे पण मग या सगळ्यांमध्ये अभय आणि दिशा ची काय चूक....मला मनापासून वाटतं की विक्रम त्याच्या संसारात खुश राहिला पाहिजे आणि त्यालाही हेच वाटतं माझ्याबद्दल... प्रेम मैत्रितूनच निर्माण होतं नम्रता आणि जर आपण मैत्रीत काही अपेक्षा नाही करत तर मग प्रेमात का करायची.... आणि मला हे अभयला खुप आधीपासूनच सांगायचं होत ग पण नाही जुळली तशी परिस्थिती आणि हे सगळं झालं... आणि त्यात अभय मला जे काही बोलला ते मी नाही सहन करू शकत...मी पण सफियाच्या वेळी समजून घेतले ना त्याला...."

"ते सगळं ठीक आहे ग..मला एक सांग तू आणि विक्रम....म्हणजे...कधी तुमच्यात अशी जवळीक..."

नम्रता ने खूप चाचरतच हा प्रश्न विचारला पण माझ्या मनाला खूप लागला...

"वेडी आहे का तू? प्रेम म्हणजे काय फक्त सेक्स असतं का ग? हिच... हीच गोष्ट मला अभयकडून खूप दुःख देऊन गेली आणि त्यासाठीच मी सगळं सोडून जायला निघाली...मी तर कधी अभय आणि सफियाबद्दल हा प्रश्न नाही केला मग मलाच का हे प्रश्न विचारल्या जातात..."

"शांत हो नैना, माफ कर मला, पण आपण ज्या समाजात राहतो इथे सगळ्यात आधी याच गोष्टी येतात ग डोक्यात....तू शांत हो, या अवस्थेत तू टेन्शन नाही घेतलं पाहिजे..."

'या अवस्थेत' आता मला आठवलं मी कोणत्या 'अवस्थेत' आहे ते....अरे देवा! यामुळेच अभय मला असा न बोलता निघून गेला का? म्हणजे अभयच्या डोक्यात ही असचं काही चालू असेल का? खूप सोप्प असतं एक स्त्री म्हणून हे बोलणं की, का नेहमी मीच अग्निपरीक्षा द्यायची, मी माझा आत्मसन्मान सांभाळेल वैगरे वैगरे... पण त्या कठीण परीक्षेसाठी उतरणं किती जीवघेण असतं याची अनुभूती मला येत होती...एक मन सांगत होत की काही गरज नाही अभयला कोणतीच स्पष्टीकरण द्यायची आणि दुसरं मन सांगत होत की एवढी मोठी गोष्ट घरी तर सांगावीच लागेल आणि त्यासाठी अभयला बोलणं गरजेचं आहे....पुन्हा एकदा नियतीच्या कात्रीत सापडली होती मी...

ती रात्रही सरली...दोन दिवसांनी मी हॉस्पिटलमधुन घरी ही आली पण अभय मात्र काहिच बोलत नव्हता माझ्याशी....मला पुन्हा त्याच गप्प राहणं टोचत होतं.....अस वाटायला लागलं होतं मी का घरी आली पुन्हा...त्याच वातावरणात मी नाही राहू शकत...नम्रता मला भेटायला आली, तिला मी माझी मनस्थिती बोलून दाखवली...तीच म्हणणं होतं की जर एवढं सगळं होऊन अभय मला घरी घेऊन आला आहे तर मी त्याच्याबद्दल नकारात्मक विचार नाही करायला पाहिजे...कदाचित त्याला ही थोडा वेळ द्यायला पाहीजे..... मला तिची गोष्ट पटली आणि मीही शांत राहण्याचा निर्णय घेतला....आणि अचानक आठवलं की त्या दिवशी विक्रम चिंतेत दिसत होता पण मी काही त्याला विचारलं नाही....माझ्याच सोबत एवढं सगळं झालं तर मग आता मी त्याला कस पुन्हा फ़ोन करू....नम्रताने माझी अवस्था ओळखली..,

"नैना तू नको बोलूस विक्रमला, तू फक्त अभयवर लक्ष दे, मी विचारून बघते त्याला नेमकं काय झालंय?"

नम्रताने त्याला फोन केला तर विक्रमचा फोन बंद आला...आणि एकदा नाही दिवसभर त्याचा फोन बंद येत होता... माझी चिंता मात्र वाढत होती...सलग दोन दिवस त्याचा फोन बंद येत होता, काय कारण असावे काहीच कळायला मार्ग नव्हता..नम्रता मला बोलली,

"एक काम करू आपण त्याच्या ऑफिस च्या नंबर वर फोन करून पाहू, दे मला नंबर..."

"ऑफिस चा नंबर तर नाही माहीत ग मला त्याचा.."

"ठीक आहे दुसरा एखादा कॉन्टॅक्ट काही?"

"नाही माहीत काहीच"

"नाही माहीत म्हणजे? तू ओळखतेस ना त्याला चांगलं? काही तर माहीत असेल, मेल आयडी, घरचा पत्ता , ऑफिस चा पत्ता?"

"मला काहिच नाही माहीत ग, हा एकच नंबर आहे माझ्याकडे.."

"वेडी...वेडी आहेस का तू नैना? त्याला तुझ्याबद्दल सगळं माहीत आहे... अगदी तुझ्या घरापासून तर ऑफिस पर्यंत सगळंच....आणि तुला काहिच कस माहीत नाही"

"नाही गरज वाटली ग कधी...."

"पागल आहेस तू...अग किती गोड बोलून त्याने तुझी सगळीच माहीती काढली आणि तुला मात्र काहीच माहीत नाही... सॉरी टू से, पण मला हा विक्रम काही बरोबर वाटत नाही..."

"अस काय बोलतेस तू नम्रता... तो तसा नाही आहे...तो तर अभयला बोलायला पण तयार होता.... तो नक्कीच काहीतरी अडचणीत असेल, माझं मन नाही मानत तो चुकीचा आहे.."

"कस कळत नाही आहे तुला नैना... त्याला जस कळलं की अभयला हे सगळं कळाल आहे त्याने फोन बंद करून ठेवला, तुला त्याच्याबद्दल दुसरा काहीच कॉन्टॅक्ट नाही दिला...त्याने फक्त तुझ्या आणि अभयच्या दुराव्याचा फायदा घेतला आहे, त्याच चांगलं बोलणं, तुला अभयबद्दल चांगल्या गोष्टी सांगणं हा सगळा त्याचा प्लॅन असावा....मुलं असेच फसवतात मुलींना...आणि जर एवढि काळजी होती त्याला तुझी तर खरच का नाही आला तो अभयला भेटायला?? तूच बोलते ना तो कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा नाही करत मग असा फोन बंद ठेऊन कामं होत असतील का त्याची?"

"नाही ग, मी नाही मान्य करत हे, त्याने कधीच चुकीच्या नजरेने नाही बघितलं ग माझ्याकडे.... तो काहीतरी अडचणीत आहे नक्कीच.."

"तू आंधळी झाली आहेस नैना...त्याचा विचार सोड आणि अभयवर लक्ष दे आणि नशीब समज तुझं की तू सुटली विक्रम मधून...अभयने वाचवलं तुला..."

'सुटली' म्हणजे? विक्रम खरच माझ्या भावनांशी खेळला का? त्याने खरंच मला फसवलं का ? काय काय विचार येत होते माझ्या डोक्यात...आधीच अभय मला काही बोलत नव्हता , तो एक वेगळाच गुंता तयार झाला होता आणि आता हे विक्रमच असं... मी तर किती शुद्ध भावनेने विक्रमला चांगला मित्र मानलं होतं...पण नाही विक्रम नाही वागू शकत असा...माझं मन नाही मानत...कोणाला काहीही बोलू देत, मी विश्वास ठेवणार त्याच्यावर... खूप विचार येत होते मनात...माझा विक्रम वरचा विश्वास माझा 'अंधविश्वास' तर ठरणार नव्हता ना...आमच्या होणाऱ्या बाळाबद्दल अभयची काहीच प्रतिक्रिया नव्हती अजून...मला अस वाटायला लागलं होतं मी फसत चालली आहे या चक्रव्यूहात जिथून बाहेर पडण्याचा मला काहीच मार्ग सापडत नव्हता....विक्रमने खरच मला फसवलं होत का? अभयच चूप राहण्याचं कारण काय होतं?? या सगळ्या गोष्टीवर माझं भविष्य अवलंबून होत.... आणि कदाचित माझ्या होणाऱ्या बाळाचं ही....

--------------------------------------------------------------

क्रमशः