ek patra maaybhumis in Marathi Letter by Nagesh S Shewalkar books and stories PDF | एक पत्र मायभूमीस

Featured Books
  • अपराध ही अपराध - भाग 24

    अध्याय 24   धना के ‘अपार्टमेंट’ के अंदर ड्र...

  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

Categories
Share

एक पत्र मायभूमीस

* एक पत्र मायभूमीस !*
प्रिय मायभूमीस,
शि. सा. न.
माय म्हणजे माता! तू खरेच आमची माता आहेस. प्रत्येक भारतीयाची तू माता आहेस. आम्हा प्रत्येक भारतीयाची जन्मदात्री जरी वेगवेगळी असली तरीही हे माते, तू आमच्यासाठी माता आहेसच. एक कुटुंब या नात्याने तू आम्हा सर्वधर्मीय जनतेला एकत्र गुंफून ठेवले आहेस.एक क्षणही तू आम्हाला स्वतःपासून दूर करीत नाहीस. तुझे आबालवृद्धावर सारखेच प्रेम आहे. जन्म देणारी आमची आई असली तरीही तू आमची अनंत काळाची माता आहेस. जन्मदात्री जन्म देते, वाढवते, खेळवते, खाऊपिऊ घालते, सुसंस्कृत करते. तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तिचे अनंत उपकार आहेत. परंतु माते, तुझ्या ह्रदयावर सर्वांचीच पावले कायम थिरकतात. मग ती बालकांची इवलीशी पावले असोत की, तरुणाईची मदहोश- बेधुंदपणे थिरकणारी पावले असोत की, वार्धक्याने गती मंदावलेली पावले असोत तुला तेवढीच प्रिय आहेत. तू प्रत्येकालाच आधार देतेस, प्रत्येकाचा सांभाळ करतेस. जन्माला आलेले अपत्य जसजसे मोठे होत जाते तसतसे त्याचे जन्मदात्या आईसोबतचे मानसिक नाते घट्ट होत जाते परंतु ते शारीरिकदृष्ट्या आईपासून दुरावते. परंतु हे मातृभूमी, तुझ्यापासून मात्र आम्ही कधीच दुरावत नाही. जन्मसमयी आईसोबत असलेली नाळ तुटते परंतु ती नाळ तुझ्यासोबत आजन्म जुळते. महत्त्वाच्या प्रसंगी हे धरणीमाते, आम्ही तुला सोडून परदेशात गेलो तरी आईला सोडून मावशीच्या सान्निध्यात गेल्याप्रमाणे वाटते. तिथे जशी आम्हाला आईची सातत्याने आठवण येते तशी तुझीही पावलोपावली आठवण येते. परदेशातील मातीसोबत, धरित्रीसोबत ते ऋणानुबंध, ती जवळीक कधीच निर्माण होत नाही, होणार नाही. अनेकदा त्या परदेशस्थ भूमीवरील वास्तव्याने जीव नकोसा होतो. कधी एकदा आपल्या धरतीवर पाऊल टाकील अशी मनाची अवस्था होते. अशाच अस्वस्थतेतून, तळमळीतून, तगमगीतून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून एक अजरामर गीत निर्माण होते,
'ने मजसी परत मातृभूमीला,
सागरा प्राण तळमळला!'
परदेशात राहणाऱ्या तुझ्या अनेक पुत्रांची अवस्था ही अशीच होऊन जाते.
तुझे महात्म्य, तुझी थोरवी जन्मदात्या आईपेक्षा कणभरही कमी नाही. आम्ही भारतीय गावी जाताना,महत्त्वाच्या कामावर जाताना आईचे चरण स्पर्शून, तिचे आशीर्वाद घेऊन जातो. तसेच हे मातृभूमी, आपले खेळाडू मैदानावर उतरताना तुझ्या चरणी नतमस्तक होतात. आनंदाचा कोणताही क्षण साजरा करताना हे मायभू, ते तुझ्या चरणाचा टिळा कपाळी लावतात. सचिन तेंडुलकर हा विश्वविक्रमी खेळाडू, क्रिकेटप्रेमींसाठी देव! ज्यादिवशी तो स्वतःच्या जीवनातील शेवटचा सामना खेळून परततो त्यावेळी आपला सचिन धरणीमाते, तुझ्या चरणी लीन होताना खेळपट्टीची माती भाळी लावतो. माते, यापेक्षा तुझ्यावरील प्रेमाचे अजून कोणते ह्रदयस्पर्शी उदाहरण असू शकेल?
हे मायभू, तू आम्हा सर्वांची माता आहेस. सकाळी सकाळी उठून घरातून बाहेर आलो की, तुझे निसर्गाने सजविलेले, बहरलेले, फुललेले, मोहरलेले, मनमोहक, आकर्षक, बेभान करणारे रुप बघितले ना माते की सारा आळस, सारे कष्ट एका क्षणात दूर होतात. तुझ्या कायम कुशीत असताना तुझे नित्यदर्शन मनाला वेगळेच समाधान देते. शरीरात एक प्रकारची स्फूर्ती निर्माण होते, चैतन्य भरभरून वाहते. वाटते, सूर्यकिरणांनी चमचमणारे, उल्हासित करणारे तुझे रुप असेच कायम दृष्टीसमोर राहावे. तुझ्या त्या नयनरम्य रुपाकडे कितीही वेळ बघितले तरी कंटाळा येत नाही. जिथवर दृष्टी जाईल तिथपर्यंत तुझे रुप कसे न्यारेच भासते. तुझी वेगवेगळी रुपे कशी आल्हाददायक भासतात. सारे काही विसरून तुझ्याकडे बघतच राहावेसे वाटते.
माते, दुर्दैवाने तुझे हे हवेहवेसे रुप आम्हीच उद्ध्वस्त करीत आहोत. तुझ्या लेकरांमध्ये, जातीधर्माच्या आडून भांडणं लावली जातात. माते, ही भांडणं लावणारी लेकरंही तुझीच असतात. जी मुले एकमेकांच्या जीवावर उठतात, एकमेकांची डोकी फोडतात, हातपाय तोडतात त्यावेळी त्या तुझ्याच पोटच्या मुलांच्या रक्ताचा तुला अभिषेक होतो त्यावेळी त्यांना हेही समजत नाही की, आपण आपल्या भावाचे रक्त वाहवत आहोतच पण सोबतच प्रत्यक्ष आपल्या प्रिय मातृभूमीचा उर फोडत आहोत. धरणीमाते, आम्हा मानवांमध्ये तुला कदाचित सीमेवर लढणारी तुझी अपत्ये अधिक प्रिय असावीत आणि ते साहजिकच आहे कारण आमची ती भावंडं आम्हा देशवासियांचं रक्षण तर करतात प्रसंगी जखमी होतात. दिव्यांग होतानाही तुझे, आमचे रक्षण करतात. स्वतःच्या कुटुंबाची काळजी त्यांना नसतेच जणू. ज्यावेळी हा खंदा, शूरवीर जखमी होऊन तुझ्या कुशीत शिरतो ना त्यावेळी त्याच्या रक्ताने तुझी काया लालेलाल होते तो क्षण तुझ्यासाठीही प्रचंड दुःखाचा, वेदनादायी असला तरीही नक्कीच तुला त्याचा अभिमान वाटत असणार.
माते, तुझे सुजलाम सुफलाम आणि जगातील नंदनवन अशी ख्यातीप्राप्त असलेले रुप आम्ही तुझीच लेकरे पार उद्ध्वस्त करून टाकत आहोत. कधी असे एकमेकांचे जीव घेऊन तर कधी झाडे, पक्षी, प्राणी यांचा जीव घेऊन! माते, झाडी आणि वनस्पती ही तुझी सौंदर्य साधनं! या प्रसाधनांचा उपयोग करून सजलेले तुझे रुप नयनरम्य, चित्ताकर्षक असते परंतु आम्ही कपाळकरंटी माणसं या तुझ्या लेकरांना सर्रास नष्ट करीत आहोत. या सर्वांचा नायनाट करणे म्हणजे माते, तुझ्या शरीरापासून एक-एक अवयव तोडण्यासारखं आहे. किती वेदना, किती दुःख होत असेल तुला, पण हे त्या दुष्ट, दुःसाहसी लोकांना कुणी सांगावे?
हे मातृभूमी, तुझी कीर्ती, थोरवी, तुझी महती मी पामराने काय वर्णावी? प्रसिद्ध गीतकार इंदीवर यांंनी लिहिलेले आणि प्रचंड लोकप्रिय झालेले गीत म्हणजे,
'मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हिरामोती।'
माते,तुझ्या उदरात सोने आहे, हिरेमोती आहेत. ज्यामुळे आमचे सौंदर्य खुलते, फुलते. असे असले तरीही माते, खरे सौंदर्य, खरी श्रीमंती कोणती असेल तर माते, ती मनाची, सुदृढ शरीराची! मनाला आणि शरीराला बळकटी देण्यासाठी माते, तुझ्याच उदरातून असंख्य पिके, भाज्या, फळे यांची उत्पत्ती होते. ही सारी धान्ये, कडधान्ये, फळे, ताजा टवटवीत भाजीपाला आमची शारीरिक, मानसिक वाढ करतात, आमचा श्वास चालू ठेवतात. माते, या रुपात तू आम्हा मानवावर अगणित उपकार केले आहेत. आम्ही हे तुझे ऋण कसे आणि केव्हा फेडणार? यासोबत तुझ्याच उदरातून आम्हाला पाणी, इंधनही मिळते. पाणी आम्हाला सचेतन ठेवते तर इंधनाच्या माध्यमातून आमचा हरतऱ्हेचा विकास होतो.
माते, मानवाच्या मृत्यूनंतर काही देहाला तू तुझ्या उदरात सामावून घेतेस तर अनेक मृतदेहांना राखेच्या रुपात स्वतःच्या सान्निध्यात ठेवून घेतेस. मरणोपांतही तू आमची साथ सोडत नाहीस, दूर ढकलत नाहीस, आमच्यावरील माया तीळमात्र कमी करत नाहीस. जन्म झाल्याबरोबर अनेक नाती अस्तित्वात येतात, नंतर अनेक नाती नव्याने जोडली जातात, मोठा मित्रपरिवारही असतो परंतु या सर्वांची साथ ही चितेला अग्नी देईपर्यंत किंवा मूठमाती देईपर्यंत असते परंतु तू मात्र आमच्यासोबत जशी आमच्या जिवंतपणी असतेस तशीच मृत्यूनंतरही तुझीच कायम सोबत असते. असे म्हणतात की, आम्ही मानव आमच्या कर्माप्रमाणे मृत्यूनंतर एकतर स्वर्गात जातो किंवा नरकात जातो. हे सत्य की असत्य हा भाग निराळा परंतु शाश्वत सत्य, त्रिकालाबाधित सत्य असे की, मानव मृत्यूपश्चात निश्चितपणे धरणीमातेच्या ... तुझ्या विशाल ह्रदयात सामावल्या जातो. माते, तू त्यावेळी हा विचार करत नाहीस की, ही व्यक्ती पुण्यवान आहे की पापी आहे. तुला हाही विचार येत नाही की, मृतात्म्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता? ज्याप्रमाणे जन्मदात्या आईला भिन्न स्वभावाची मुले सारखीच असतात त्याप्रमाणेच तूही कोणताही विचार न करता निश्चल पडलेल्या, निष्प्राण झालेल्या तुझ्या लेकराला स्वतःच्या उदरात सामावून घेतेस म्हणून प्रसिद्ध गीतकार सुरेश भट तुला आळवताना म्हणतात,
'गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे,
आणीन आरतीला हे चंद्र-सूर्य तारे।'
माते, जे सूर्य-चंद्र, तारे आणि ग्रहमंडळ रोज तुझी त्रिकाल आरती करतात, अख्खी सृष्टी तुला नित्यनेमाने श्रुंगारित करते, ओवाळते त्या तुला आम्ही काय ओवाळावे?
मातृभूमी, हे माते, एवढेच म्हणेन...
"माते, थोर तुझे उपकार, नमन तुज चरणी!"
०००
नागेश सू. शेवाळकर