Hoy, mich to apradhi - 3 in Marathi Moral Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | होय, मीच तो अपराधी - 3

Featured Books
  • BTS Femily Forever - 9

    Next Ep,,,,  Suga उसके करीब गया तो काजल पीछे हट गई। Suga को...

  • तेरे मेरे दरमियान - 40

    जानवी हैरान थी के सुबह इतना कुछ होने के बाद भी आदित्य एक दम...

  • Salmon Demon - 5

    सुबह का उजाला गांव पर धीमे और थके हुए तरीके से उतरा. हवा में...

  • छठा कमरा

    नीहा को शहर में नई नौकरी मिल गई थी। कंपनी ने उसे एक सुंदर-सा...

  • एक खाली पन्ने की कहानी

    कहते हैं दुनिया की हर चीज कोई ना कोई कहानी होती है कुछ ऊंची...

Categories
Share

होय, मीच तो अपराधी - 3

३. होय, मीच तो अपराधी!
दुसऱ्या दिवशी न्यायालयाचे कामकाज सुरू होताच एक महिला वकील मा. न्यायालयाची रीतसर परवानगी घेऊन म्हणाल्या, "माफ करा मायलॉर्ड, मी कुणाचेही वकीलपत्र घेतलेले नाही. परंतु काल या मुलीने स्वतःच एक प्रश्न उपस्थित केला आहे. त्या प्रश्नाचे उत्तरही ही मुलगीच देऊ शकेल. शिवाय अजून एक प्रश्न डोकावतोय की, सायंकाळी बाहेर पडणाऱ्या या मुलीचा पोशाख एवढा तोकडा का असावा?"
"महोदय, वकिलीनबाईंना मुलगी आहे का नाही हे मला माहिती नाही. असेल आणि त्यातही तरुण असेल तर या बाईसाहेबांचे राहणीमान पाहता यांच्या मुलीचे राहणे, पोशाख कसा असेल याचा कुणीही अंदाज लावू शकेल. तेव्हा हाच प्रश्न ह्यांनी स्वतःच्या मुलीला विचारलेला बरा..." नलिनी बोलत असताना त्या वकीलबाई 'एक्सक्यूज मी..' असे म्हणत नलिनीकडे रागारागाने बघत दालनाच्या बाहेर पडल्या.
"महोदय, मला विचारला जाणारा प्रश्न या राक्षसाला का कुणी विचारत नाही? हा तिथे कशासाठी गेला होता?" नलिनीने विचारले.
"महोदय, ते एक सार्वजनिक ठिकाण आहे. मन रमविण्यासाठी मी तिथे रोजच जातो..."
"रोजच असा लाजीरवाणा प्रकार करतोस?"
"मुळीच नाही. तो एक सुंदर बगीचा आहे. मनमोहक झाडे, वेली, सुंदर फुले आणि..."
"अडखळलास का? सुंदर मुली पाहण्याची हौस भागविण्यासाठी तू तिथे नित्यनेमाने जातोस हे सांगायला जीभ रेटत नाही का?" नलिनीने धारदार आवाजात विचारले.
"होय! सुंदर मुली पाहण्यासाठी, मन रिझवण्यासाठी तिथे जातो. विनासायास सारे बघायला मिळत असेल, मंजूळ स्वरातील किणकिण ऐकायला मीच एकटा नाही तर अनेकजण जातात. आणि का जाऊ नये? महोदय, समोरची व्यक्ती हातचे काही राखून ठेवत नसेल तर पाहणारांचे का डोळे येतील? '...पाहणारांनी तरी लाजावे' या विचाराचा मी नाही... आणि समाजही नाही."
"व्वा! व्वा! समाजाच्या गोष्टी करतोस? स्वतःचा गुन्हा लपविण्यासाठी समाजाचा आधार घेतोस? समाजातील सारी माणसे तुझ्यासारखी वासनांकित, बलात्कारी आहेत असे तुला सुचवायचे आहे का? तू समाजाचा चक्क अपमान करतो आहेस? मायलॉर्ड, बरोबर आहे. याच्या वासनेने बरबटलेल्या आणि भरकटलेल्या नजरेला सारे पुरुष तसेच दिसत असणार." खूप वेळानंतर सरकारी वकील म्हणाले.
"वकिलसाहेब, मग का कुणी त्यावेळी हिच्या मदतीला आणि माझ्या विरोधात धावले नाही? कुठे बसली होती त्यावेळी तिथल्या व्यक्तिंमधील स्त्रीदाक्षिण्यतेची भावना? तिथल्या समाजाच्या नजरेत माझ्याबद्दल राग, चीड नव्हती. हिच्याबद्दल दया, कणव नव्हती तर नजरेत अधाशीपणा होता. पुढे काय होणार आणि काय दिसणार याबाबत औत्सुक्य होते. त्यावेळेसचे सोडा पण जिथे कुठे सार्वजनिक ठिकाणी... अगदी रेल्वे, बसमध्ये असे छेडछाडीचे प्रकार होतात. का कुणी तिथे स्त्रीच्या मदतीला येत नाही? विरोध करणारा मग तो स्त्रीचा पती असेल, प्रियकर असेल किंवा त्या कृत्याची चीड येणारी एखादी व्यक्ती असेल अशा व्यक्तींना चोप देताना, उचलून फेकताना कुठे असतो वकिलसाहेब तुमचा समाज? मी खोटे बोलतोय असे वाटत असेल तर आठवून बघा, याच वर्षी झालेल्या अशा घटना. किती ठिकाणी विरोध झाला? एखादा अपवाद तरी सांगा. उद्या ही.. हीच नलिनी किंवा एखादी अशीच महिला स्वतःवर झालेला अन्याय विसरून समाजात पुन्हा बस्तान बसवू पाहत असेल तेव्हा काय असेल तुमच्या समाजाचा दृष्टिकोन? तिच्या मदतीला अनेक हात धावतील परंतु तेच हात पुन्हा कशासाठी वळवळतील? जगू देईल हा समाज तिला? येईल एखादा बहादूर मर्द पुढे हिला कुंकू लावून मंगळसूत्र बांधण्यासाठी? गेली अनेक वर्षे ज्या -ज्या स्त्रीया कलंकित झाल्या आणि ज्या घटना पुढे आल्या, चर्चिल्या गेल्या, मोर्चे निघाले त्यापैकी किती घटनांमध्ये पाशवी कृत्यात बळी पडलेल्या स्त्रीयांचे, मुलींचे संसार या समाजाने उभे केले? कुठे आहेत त्या दुर्दैवी महिला? काय झाले त्यांचे? घटना घडली की, बेंबीच्या देठापासून आपले राजकारणी नेहमी ओरडतात, 'कडी से कडी सजा देंगे। गुन्हेगारांना कठोर शिक्षा देऊ?...' यांच्या हातात आहे काही? मायलॉर्ड, आमचे गृहमंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान आपणास असा आदेश देऊ शकतील का की, हा खटला न चालवता नरेश नामक नराधमाला फाशीवर लटकवा? आहे यांच्या हातात? म्हणे कठोर शिक्षा? कसाबसारख्या निर्दयी राक्षसाला फाशीवर लटकावण्यासाठी या सरकारलाच अनेक नाटके करावी लागतात. गुरु नावाच्या एका नीच माणसाला फाशीवर लटकवा असा आदेश देताना खुद्द महामहिम राष्ट्रपतींना प्रचंड विचार करावा लागतो. तिथे हे राजकारणी 'कठोर शिक्षा' देऊ अशा वल्गना करतात. शेकडो निरपराध लोकांचे बळी घेणाऱ्या आतंकवाद्याला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याला फासावर लटकविण्याचे धाडस या राजकारण्यांमध्ये नाही. उगाच बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी याप्रमाणे तोंडाची वाफ दडवतात. कठोर शिक्षा सुनावलेल्या अनेक गुन्हेगारांचे दयेचे अर्ज सरकारदरबारी पडून आहेत उलट त्यांना तुरुंगात एखाद्या व्हीआयपीप्रमाणे वागणूक दिली जाते आणि म्हणे कठोर शिक्षा? महोदय, मी जर याठिकाणी माझे लागेबांधे एखाद्या नेत्यासोबत आहेत असे सांगितले ना तर या खटल्यातील हवाच निघून जाईल. मला वाचविण्यासाठी सारी यंत्रणा ... अगदी वकिलसाहेब, तुम्हीसुद्धा सारी शक्ती पणाला लावून ..." नरेश बोलत असताना सरकारी मध्येच म्हणाले,
"मायलॉर्ड, एका गोष्टीचे नवल वाटते की, हा गुन्हेगार, स्वतः गुन्ह्याची कबुली देतोय याला कायद्याची भीती वाटत नाही का?"
"कोणत्या कायद्याची भीती वकिलसाहेब? जो कायदा तुम्ही वकिलमंडळी भर चौकात विकता त्या कायद्याची? याक्षणी मी जर एक वकील नेमला ना तर तो वकील मला या आरोपातून निश्चितपणे निर्दोष सोडवेल, हे तुम्हालाही माहिती आहे. माझ्या विरोधात कितीही मोर्चे निघो, कंठघोष करणाऱ्या, कानठाळ्या बसविणाऱ्या घोषणा निनादो त्या सर्वांपेक्षा माझा वकील जास्त तळमळीने माझी बाजू न्यायालयात पटवून देईल. मग बाहेर जमलेल्या प्रक्षुब्ध जमावापासून मला तुमचे हेच पोलीस संरक्षण देत सुखरूप बाहेर काढतील. मी माझा गुन्हा वारंवार कबूल करताना तुम्हाला एक विचारतो, समजा मी हा अक्षम्य अपराध नाकारला तर माझ्यावरील अपराध सिद्ध करण्यासाठी तुमच्याजवळ असा कोणता ठोस पुरावा आहे? सांगा... कशाच्या आधारावर तुम्ही ही केस उभी केली आहे?" असा जळजळीत प्रश्न विचारुन नरेश थांबला आणि न्यायमूर्तींनी काही वेळासाठी कामकाज तहकूब केले....
०००
नागेश सू. शेवाळकर