२१
वाजवा रे वाजवा!
केव्हातरी लागली असावी झोप.. सकाळी जाग आली कशीतरी. आज लग्न. उशीरा उठून चालायचे नाही. काकाच्या शिस्तीत सारे काही त्याच्या आॅर्डरप्रमाणेच व्हायला हवे. सारी जबाबदारी माझ्यावर. काकाचे काम ही कसे.. फुलवाल्याकडून सकाळी साडेसातास फुले घेऊन येणे.. गुलाबाची फुले शंभर मोजून घेणे.. नशीब प्रत्येक फुलाच्या पाकळ्या मोजून घेणे नाही लिहिले! वाजंत्रीवाल्यांना आठ वाजून वीस मिनिटानी फोन करून आठवण करून देणे .. सनई वादकांस कोणकोणते राग वाजवणे याची यादी देणे.. भटजीबुवांना सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांनी फोन करून आठवण करून देणे.. आणि नऊ पंचावन्नला घेऊन येणे.. भटजीबुवा मंत्र विसरले नाहीत याची खात्री निघण्यापूर्वी करून मगच त्यांना घेऊन येणे.. आचारी म्हणजे जेवणाच्या केटरर्सना फोन करून आठवण करून देणे.. त्यांना सगळ्या पाककृती नीट येतात याबद्दल त्यांची आधी तोंडी परीक्षा घेणे.. त्यांच्याकडील भाज्या नि बाकी सामानाची संपूर्ण तपासणी करणे.. फुलवाल्यांस फुलांची आरास करण्यासाठी वेळेवर येण्याची आठवण करून देणे.. त्यासाठी घड्याळात अलार्म लावून ठेवणे.. त्याचबरोबर फुले ताजी असण्याबद्दल फुलवाल्यास सज्जड दम भरणे.. असली कामाची यादी. त्यातल्या काही अर्थातच माझ्या ॲडिशन्स! त्यात चुकांना वाव नाही. त्याच्या शिस्तीस त्याच्याहून वयाने मोठे असलेले माझे बाबा पण घाबरून असतात. त्यामुळे कामात टंगळमंगळ नाही. आणि तसा अभ्यास नि कुठल्याही कामाच्या बाबतीत मी ही सिन्सियर मध्येच गणला जाणारा. म्हणूनच तर काकाने ही जबाबदारी माझ्यावर टाकलेली. पण इश्कने निकम्मा किया वरना हम भी हैं कुछ काम के! ही वै नसती तर इतका काही विचार नसता केला मी. पण गेल्या चार एक दिवसांत दुनिया बदल गई हे खरे!
सकाळी सकाळी तयार व्हायला घरी आलो. नवरीचा भाऊ, तो ही एकुलता एक म्हणून माझी डिमांड असणार आज. नवऱ्याचा कान पिळायचे काम असणार मला. हे एक मस्त आहे.. जोवर मी पिळणार दुसऱ्याचे कान तोवर. पण मला धोका नाही कारण वै ला भाऊ नाहीच कोणी, माझा कान पिळायला. किती पुढचा विचार माझ्या डोक्यात यावा? अजून कशाचा नाही पत्ता आणि मी विचार करतोय माझ्याच लग्न सोहळ्याचा. पण उम्मीद पर ही जीती है दुनिया! आशा इज होप! अशा विचारात चाललो असताना काकाने पकडले नि सगळ्या कामाचा हिशेब घेतला माझ्याकडून. काका बोलतोय माझ्याशी नि तिकडूम वै घाईत चाललेली. मला हात केला तिने नि नंतर जवळ येत म्हणाली, “हाय! ऑलवेज इन अ हरी मोदक?”
मी कसनुसा हसलो. काका काही सोडत नव्हता मला.
"या, टू मच टू डू.. टू लिट्ल टाईम .." माझ्या बोलण्याला दोन्ही अर्थ होते एकाच वेळी. म्हटले ना, बोलण्यात मी हार नाही जात कुणाला, फक्त ही वै समोर आली की जीभ एका जागी घट्ट चिकटून राहते!
"ओ. के. सी यू ॲट द व्हेन्यू." म्हणत ती निघून गेली.
या काकाला मला खलनायक ही म्हणता येईना .. त्याच्याच घरी तर मला ही भेटली. आणि आता त्याच्याच मुळे मला तिच्याशी बोलता येत नाहीये.
"लवकर तयार होऊन जा. आम्ही आलोच. यू आर डुईंग गुड वर्क. दादा म्हणालेला मला, तुझ्यावर जबाबदारी टाकली की परत बघायला लागत नाही."
पहिल्यांदा मला माझ्या जबाबदार असण्याचा पश्चात्ताप झाला! पण आता रूबाबदार बनून जायलाच हवे हाॅलवर. जमेल तेवढे वै शी बोलायला हवे दिवसभरात.
हाॅलवर आलो नि लागलो कामाला. सगळीकडे लक्ष देत होतो. त्यात मी म्हटले ना तशी भटजीबुवांपासून फुलं नि पानं नि जेवणावळ.. सारी जबाबदारी माझ्यावर. वै चे काय होणार हा एकच प्रश्न सतावीत असताना हा कामाचा डोंगर..खरा तर सह्याद्रीतील एखाद्या शिखरासारखा. पण येता जाता तिच्या विचारामुळे वाटतोय एव्हरेस्ट सारखा.
साडेनऊच्या सुमारास सारे हॉलवर आले. त्यात रागिणीच्या बरोबरीने साऱ्या मैत्रिणी. त्यात वै पण. लाल साडीत.. वॉव. सुंदरच दिसत होती ती.
'यू लुक सो ब्युटिफुल' म्हणून तिला सांगायला हरकत नव्हती पण नेहमीप्रमाणे नाही बोललो. नुसताच 'हाय' म्हणून पुढे कामाला लागलो. हॉलमध्ये एक झाले.. ती वारंवार दृष्टीस पडत होती. जाता येता भेटत होती. बोलायला वेळ नव्हता तरी काहीतरी बोलणे होत होते. त्यात मला खरोखरीच घाई होती.. त्यामुळे माझे आधीच जुजबी बोलणे अजूनच जुजबी होत होते. लग्न लागले. यथासांग. डोक्यावर अक्षता पडण्याची वेळ झाली रागिणीच्या. त्यातल्यात्यात संधी साधून मी वै ला गाठले..
"रागिणी इज लुकिंग सो गुड नो?"
"या.. द ब्लशिंग ब्राईड.."
"अँड द डॅशिंग ग्रूम!" मी म्हणालो तर ती हसली.
"तुला सात फेरे माहिती आहेत ना?" मी विचारले.
"आॅफकोर्स. मी इंडियन वेडिंगची इन्फो काढून ठेवलीय."
"ओह! सो यू आर वेल इन्फाॅर्म्ड हां.."
"काइंड आॅफ आय गेस.. सी हाऊ रागिणी इज ब्लशिंग.."
"आय नो. नथिंग मोअर ब्युटिफूल द्यान अ ब्लशिंग ब्राईड.. एक्सेप्ट.." मी बोलता बोलता थांबलो.. एक्सेप्ट यू म्हणणार होतो मी.
"एक्सेप्ट व्हाॅट मोदक?"
“नथिंग.. सी, नाऊ व्हॉट दे सिंग आर कॉल्ड मंगलाष्टकास.."
"ओह. वाॅव.."
"धिस इज टिपिकल वे दे सिंग देम.."
"ओह! आय सी!"
"ॲंड देन इट विल बी वाजवा रे वाजवा..”
“मीन्स?”
“मीन्स दे विल देन एक्सचेंज गारलॅंड्स..”
“आय नो .. सीन हिंदी मूव्हीज..”
“ॲंड थ्रो धिस राईस ऑन हेडस ऑफ ब्राईड ॲंड ग्रूम!”
"ओके.. वाॅव! बट व्हाय?"
"हाऊ डू आय नो.. इट्स रिच्युअल.."
“वॉव.. थ्यांक्स .. रिच्युअल आॅर ॲक्च्युअल.. आय वुड ऑल्सो लाइक मॅरेज धिस वे डियर..”
मी ताडकन उडालो. तिच्या या इंग्लिश वाक्याचा नक्की अर्थ काय? ऑल्सो? म्हणजे ती स्वतःबद्दल सांगतेय? मग मला का सांगतेय? की आयॅम ओव्हररीडिंग इट? काही असो पण तो शेवटचा डिअर शब्द मला सुखावून गेला. पण साहेबी भाषेत या डियर ला तसा अर्थ नसतो हे मला माहिती होतेच. त्यामुळे त्यातून जास्त काही अर्थ न काढणेच श्रेयस्कर होते. काय असेल ते असो. मी बिझी होतोच. जास्त विचार न करता कामाला लागावेच लागले. पण डीड शी एक्सपेक्ट माय रिस्पॉन्स?
"आय थिंक आय विल हॅव टू गो. मला जेवणाची तयारी बघायला लागेल.."
"यस. टू बिझी हां. बट आय टेल यू. नव्रा नव्री ची पोझिशन बेस्ट. त्यांना काय बगायला नाय लागत."
"हो ना.."
यावर 'विश वुई वेअर इन देअर प्लेस' असं काही अजून काही छान डायरेक्ट बोलता आलं असतं पण नेहमीप्रमाणे नाही बोललो.
लग्न लागले. पंगती बसल्या. सारे पाहुणे एका मागोमाग एक बसले. आमचे अमेरिकन पाहुणे ही बसले पण वै चा पत्ता नव्हता त्यात. सगळ्यांना आग्रह करून वाढणे झाले.
नवरीच्या घरचे काही थोडे मागे राहिले नि नवरा नवरी. आम्ही सारे शेवटी पंगतीला बसलो. रागिणी नि तिचा नवीन नवरा दोघे बसले. क्षणभर रागिणीच्या जागी वैदेही आणि नवऱ्या मुलाच्या जागी मी अशी कल्पना केली मी. माझ्या बाजूला एक खुर्ची रिकामी होती.. आणि त्यावर वै येऊन बसली. पंगतीला आग्रह करून वाढत होते काही. नाव घेणे झाले.. घास भरवणे झाले..
"हे.. व्हाॅट इज धिस?"
नाव घेण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते कळेना.
तरीही घोडे दामटले पुढे ..
"नाव घेतात दोघे, उखाण्यात. यू नो टू आॅर थ्री लाईन्स इन पोएट्री फाॅर्म. अँड ॲड नेम आॅफ युवर हजबंड आॅर वाईफ इन इट!"
"सो दे हॅव रिहर्स्ड इट?"
"आय डोन्ट नो. बट इट्स डिफिकल्ट नो?"
"कम आॅन. डोन्ट टेल मी तू तुझ्या लग्नात नाय बोलणार हे!"
मी काय बोलणार होतो यावर? नुसताच हसलो. मनात म्हटले हिचे नाव घालून उखाणा बनवून ठेवला पाहिजे आताच.
"यू लाइक्ड इट?"
"येस्स. लव्ह एव्हरी मोमेंट हियर.. आय टोल्ड यू.. आय लाइक इंडिया.."
मी तिला हा इंडियन आवडतो की नाही हे विचारता आले असते आता. पण संधी आलेली हातातून घालवत राहिलो. पंगत उठली. मी निघून गेलो. ती देखील मैत्रिणींच्या घोळक्यात रमली. संध्याकाळपर्यंत हे असेच चालले. म्हणजे कामामुळे मी देखील हॉल बाहेरच जास्त वेळ होतो.
रागिणीच्या सासरी जाण्याची वेळ आली. मला काही कारण नसतानाही ह्या प्रसंगात रडू आवरत नाही. एका मित्राच्या लग्नात तर त्याची ती बायको रडत नव्हती पण माझ्याच डोळ्यात पाणी येत होते! त्यामुळे मी शक्यतो मागे राहतो अशा प्रसंगी. आणि तिथे नेमकी वै माझ्या बाजूला येऊन उभी राहिली. तिला काही बोलायचे असावे.. पण तिला माझ्या डोळ्यातले पाणी दिसू नये म्हणून मी हळूच सटकलो काही न बोलता.
नंतर सारे निपटता निपटता काका, बाबा नि मी घरी येईपर्यंत रात्रीचे दोन वाजले. घर सामसूम होती. फक्त रमाकाकू आणि आई जाग्या होत्या. बाबा नि काका त्यांच्याशी काही बोलत बसले. मी हळूच बुरकुल्यांच्या खोलीकडे पाहिले. झोपले असणार गाढ. हॉलमध्येच एक सोफ्यावर मी पडलो.
मला जाग आली तर आजूबाजूला उजेड पडलेला. मी उठून बसलो. दुपारचे दोन वाजलेले. म्हणजे मी इतका वेळ झोपून काढला? कालचा थकवा असावा. वै कुठे असेल? घरात सामसूम होती. बहुतेक आलेले पाहुणे परत गेले असावेत. बुरकुल्यांची खोली उघडी दिसत होती पण त्यात हालचाल जाणवत नव्हती.. मी आळोखे पिळोखे देत उठलो तर समोर कृत्तिका उभी होती..