Ek hota raja - 8 in Marathi Love Stories by Vinit Rajaram Dhanawade books and stories PDF | एक होता राजा…. (भाग ८)

Featured Books
Categories
Share

एक होता राजा…. (भाग ८)

निलम मुंबई ब्रांचला जाऊ लागली. त्यासाठीच तर आली होती ना ती. २ दिवस झालेले, पुन्हा कामात गुंतली निलम. उशिराच निघायची ती ऑफिसमधून. त्यादिवशी काम लवकर संपलं, खूपच लवकर…. निघाली घरी कारमधून.बाहेर मुख्य रस्त्यावर आली. जरासं ट्राफिक लागलं. गाडीतूनच आजूबाजूला पाहू लागली. अचानक तिला आठवलं, राजेश आणि मंगेशचं ऑफिस जवळच होतं ना. जाऊया का तिथे… कदाचित भेट झाली तर. निलमने गाडी तिकडे वळवली. किती वर्षांनी आली होती तिथे. अनोळखी सगळं. निलम कार मधून उतरली. काहीच ओळखीच नाही. ती पुढे आली. राजेश-मंगेशचं ऑफिस होतं, तिथे आता अर्धवट बांधकाम सुरु होतं. मग तिथे उभ्या असलेल्या watchman ला विचारलं तिने… " ते ऑफिस….ते तर कधीच बंद झालं, ते पाडून हि नवीन इमारत बांधत आहेत.","मग त्या ऑफिस मधले कर्मचारी… ते कूठे गेले, माहित आहे का तुम्हाला… " त्याने नाही म्हणून मान हलवली. निलम नाखुशीने निघाली. गाडी सुरु केली. आता ट्राफिक थोडं कमी झालेलं. त्या bus stop जवळ आली. राजेशची आठवण एकदम उफाळून आली तिच्या मनात.… मुद्दाम थांबून रहायची मी… त्या दोघांची वाट बघत… मग एकत्र जायचो घरी. गप्पा मारत मारत कधी घरी पोहोचायचो, कळायचे नाही. काय दिवस होते ते. निलमला सगळं जुनं आठवत होतं. या २ दिवसात वेगळ्या रस्त्याने घरी आलेली ती. आज तिला "त्या" रस्त्याने जावसं वाटलं. त्याच जुन्या रस्त्याने कार घेऊन गेली ती. त्यावेळी कसा होता हा area… आणि आता,… एका मागोमाग एक चाळी होत्या इथे… आता तर इमारतीच दिसत आहेत. निलम हळू हळू कार चालवत होती, बाहेर बघत बघत. एका ठिकाणी गाडी थांबवली तिने. उतरली गाडीतून. छानपैकी बाग होती तिथे. निलम तिथेच घुटमळत होती. इकडेच तर ती चहाची टपरी होती ना.… एवढी वर्ष इकडेच चहा घेयाला यायची मी. तोडली वाटते ती टपरी. अडचण होत असेल ना त्या सोसायटीवाल्यांना…आपण सुद्धा सोसायटी मध्ये राहतो ना… निलम स्वतःशीच हसली. थोडावेळ थांबली अजून. आणि गाडीत बसून पुढे आली. काही मिनिटांवर चाळ होती ती, राजेश-मंगेश रहायचे ती… लांबूनच बघितलं तिने. ती चाळ मात्र तशीच होती. निलमला हायसं वाटलं. गाडीतून उतरून जाऊया असं क्षणभरासाठी तिच्या मनात आलं. पण मनातच ठेवलं तिने. गाडी start केली, गेली निघून घरी तिच्या.


पुढचे २-३ दिवस, निलमचा तोच उपक्रम.… ऑफिस मधून निघाली कि मुद्दाम त्या रस्त्याने यायची. क्षणभर का होईना… थांबायची चाळीकडे बघत… तशीच निघून जायची.आता तर मुंबईतले काम सुद्धा होतं आलेले. एकदातरी भेटायला हवे राजाला… खूप वेळा मनात आलं, तसंच राहिलं मनात. अशीच एकदा तिने गाडी थांबवली आणि चाळीकडे बघू लागली. त्याक्षणी, अचानक कोणीतरी गाडी समोर येऊन उभं राहिलं. बघते तर मंगेश,… मंगेशला सुद्धा निलमला बघून आश्चर्य वाटलं. "अरे तू… " मंगेश बोलला. तशी निलम गाडीच्या बाहेर आली.
" अरे… निलम, कशी आहेस… किती वर्षांनी बघतो आहे तुला…", मंगेश उत्साहात विचारात होता अगदी. निलमला सुद्धा आनंद झाला मंगेशला बघून.
"पण… तुला कसं कळलं, गाडीत मी आहे ते. ",
"मला कसं कळणार ते… ",
"मग गाडीच्या समोर आलास ते… ",
"ते होय… अगं, तुझी गाडी बघतो आहे, गेले ४-५ दिवस… गाडी थांबायची, कोणी बाहेर यायचे नाही, आणि ५ मिनिटांनी निघून जायची. म्हणून आज बोललो, बघू कोण आहे ते. तर तू निघालीस." मंगेश हसत हसत म्हणाला.
" अगं… मग यायचे ना वर घरी… का आली नाहीस." निलम त्यावर काही बोलली नाही. "चल… आता येतेस का…",
"न… नको, आज नको… काम आहे घरी… नंतर येईन कधीतरी." मंगेश त्यावर हसला.
" का रे हसलास… ",
"असंच…. तुला आवडत नसेल आता… चाळीत कशी येणार तू… ते जाऊदे… इकडे कशी…",
"मुंबईला काम होतं… actually, दोनच आठवडे झाले… पहिली दिल्लीला होते… आता मुंबई ब्रांचला काम होतं. म्हणून आली इंडिया मध्ये.",
"अच्च्चा… आनंद आहे… मला वाटलं,भेटायला आलीस… " निलम खोटंखोटं हसली. थोडावेळ असाच गेला. कोणीच बोललं नाही.
निलम बोलली मग, " काय चाललंय मग… ",
"माझं… मजेत चालू आहे… ",
"लग्न केलंस… ",
"हो मग… तुला mail केली होती लग्नपत्रिका… तुला भेटली का माहित नाही… नाहीतरी तू कूठे आली असतीस…" पुन्हा गप्प निलम." आणि एकटीच आलीस का इंडियात… कि मिस्टर आहेत सोबत.एकदा ये घेऊन गरीबाकडे… त्यांनी तर अशी चाळ पण बघितली नसेल ना कधी… " मंगेश हसत म्हणाला. निलम शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती.

"अरे हा… तुझी पोस्ट पण वाढली असेल ना आता. ",
"हो… manager आहे आता. " ,
" Wow !! ग्रेट यार… ".
"आणि तुमचं ऑफिस…. बंद झालं ना… " ,
"अरे व्वा !! तिथे पण जाऊन आलीस.पण इथे यायचे नाही ,अस सांगून ठेवलं आहे वाटते नवऱ्याने… "मंगेश तिला चिडवत म्हणाला.
" मंगेश प्लीज… " निलम रागात म्हणाली.
"राग आला का…. त्यांना बोललो म्हणून… राहिलं मग… मस्करी करत होतो… खूप वर्षांनी भेटलीस ना म्हणून मस्करी केली.",
"तसं नाही रे पण…. "निलम थांबली बोलता बोलता. "चल,मी निघते… घरी पोहोचायला उशीर होईल मग… " मंगेशला कळलं ते.
"sorry यार… प्लीज रागावू नकोस… खरंच मस्करी केली मी. तेवढातरी अधिकार आहे ना या मित्राला… बरं… त्यांची माफी मागतो मी… झालं का समाधान, मला फक्त विचारायचे होते कि ते पण आले आहेत का… " निलम गप्पच.
"बोलं गं… sorry बोललो ना आता… ",
"तो नाही आला… ",
"ok, ठीक आहे… कामातून वेळ मिळत नसेल, कसे आहेत ते… ",
"मला माहित नाही." मंगेश अचंबित.
"म्हणजे… ? ",
"नाही माहित… ",
"अरे… माहित नाही म्हणजे काय… ",
"आम्ही नाही राहत एकत्र…तो कूठे असतो ते मला माहित नाही.",
"काय चाललंय… निलम,काय झालं."निलम शांत. मंगेशला कळत नव्हतं काय ते.
" निलम… एक काम करू… तुला वेळ असेल तर… इकडे पुढे एक छोटंसं हॉटेल आहे. मी तिथे जातो आहे चहा घेयाला. तू पण चल… असं रस्त्य्यात नको बोलणं… " निलम तयार झाली. गाडीत बसून दोघे पोहोचले हॉटेलमध्ये.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: