Ojascha Wadhdiwas in Marathi Children Stories by Uddhav Bhaiwal books and stories PDF | ओजसचा वाढदिवस

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

ओजसचा वाढदिवस

उद्धव भयवाळ

औरंगाबाद

ओजसचा वाढदिवस

आज सकाळपासून ओजस खूपच खुशीत होता. त्याला कारणही तसंच होतं. आज ओजसचा वाढदिवस होता. कालच ओजसने त्याच्या बाबांसोबत जाऊन वाढदिवसासाठी आवश्यक त्या साऱ्या वस्तू मार्केटमधून आणल्या होत्या. त्या वस्तूंची यादी ओजस मागील चार दिवसांपासून करीत होता. समोरच्या हॉलमध्ये लावण्यासाठी फुगे, त्यात टाकण्यासाठी चॉकलेट्स, वाढदिवसाला येणाऱ्या त्याच्या मित्रांना देण्यासाठी रिटर्न गिफ्ट्स इत्यादी वस्तूंची यादी त्याने परवाच बाबांकडे दिली होती. कालच सगळ्या वस्तू आणून झाल्या होत्या. वाढदिवसासाठी ओजसच्या आवडीच्या गुलाबी रंगाच्या केकची ऑर्डरही देऊन झाली होती. आज सायंकाळी सात वाजता ओजसचा वाढदिवस साजरा होणार होता. त्याच्या अर्धा तास अगोदर केक आणण्यासाठी ओजस आणि त्याचे बाबा जाणार होते. ओजसच्या वर्गातील आणि कॉलनीमधील दोस्तमंडळीला वाढदिवसाचे निमंत्रण स्वत: ओजस आधीच देऊन आला होता.

ओजसच्या घरात आज सकाळपासून प्रत्येकजण कामात गर्क होता. ओजसच्या बाबांनी आज मुद्दाम ऑफिसमध्ये सांगून रजा घेतली होती. ओजसनेही कालच शाळेतील सरांना वाढदिवसाची कल्पना देऊन आजची सुट्टी घेतली होती. ओजसचे बाबा समोरच्या हॉलमध्ये फुगे फुगवून लावण्यात मग्न होते. त्यांना ओजस त्यांच्या कामात मदत करीत होता. तर ओजसची आई ओजसच्या आवडीची बासुंदी आणि कांद्याचे पकोडे करण्यात स्वयंपाकघरात मग्न होती.

चार महिन्यांपूर्वीच ओजसच्या बाबांची नागपूरहून औरंगाबादला बदली झाली होती. ओजस नागपूरला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तिसऱ्या इयत्तेत होता. त्याला औरंगाबादलाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ताबडतोब प्रवेश मिळाला. ओजसच्या मनमिळावू स्वभावामुळे त्याला वर्गामध्ये आणि कॉलनीमध्ये खूप मित्र मिळाले. त्याचे सर्व मित्र आज वाढदिवसासाठी येणार होते.

ओजसच्या आईने कामवाल्या गंगूबाईंना आज सायंकाळी पाच वाजताच मदतीला बोलावले होते. त्यानुसार त्या आल्या. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा मदन हासुद्धा आला. कारण त्यालाही ओजसने वाढदिवसाचे निमंत्रण दिले होते. अधूनमधून मदन ओजसच्या घरी येत असे. म्हणून ओजसची त्याच्याशीही मैत्री झाली होती. मदन हा महापालिकेच्या शाळेत तिसऱ्या इयत्तेत शिकत होता. चार वर्षांपूर्वीच त्याचे वडील एका गंभीर आजाराने वारले होते. तेव्हापासून गंगूबाईच चार घरची धुणीभांडी करून त्याला वाढवीत होत्या.

मदन आल्याचे पाहून ओजसला खूप आनंद झाला. त्याने मदनला हाताला धरून हॉलमध्ये आणले आणि वाढदिवसानिमित्त केलेली पूर्ण सजावट दाखविली. मदनलाही खूप आनंद झाला. नंतर मदन ओजसला म्हणाला,

"ओजस, तुला एक गोष्ट सांगू का?"

"सांग ना, कोणती गोष्ट सांगणार आहेस?" ओजसने विचारले.

तेव्हा मदन म्हणाला, " मला जेव्हा तू तुझ्या आजच्या वाढदिवसाविषयी काल सांगितलेस, तेव्हाच मी तुला ही गोष्ट सांगणार होतो."

"अरे, पण आता सांग ना. संकोच करू नकोस." ओजस म्हणाला.

तेव्हा मदन म्हणाला, "जाऊ दे, मी नाही सांगत."

"अरे, असे नको करू. मी तुझा मित्र ना? मग मला सांगणार नाहीस का?" ओजस म्हणाला.

"तसं काही नाही. पण सांगू का नको असं झालंय मला. पण सांगूनच टाकतो." मदन म्हणाला.

"सांग बघू पटकन्‌," ओजस म्हणाला.

" अरे, आज माझासुद्धा वाढदिवस आहे. म्हणजे तुझा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी आहे." मदन म्हणाला.

"अरे वा, हे तर फारच छान आहे. मग तू तुझा वाढदिवस साजरा करतोस की नाही?" ओजसने विचारले.

" नाही. मी माझा वाढदिवस साजरा करीत नाही. पण दर वाढदिवसाला सकाळीच स्नान झाल्यावर आई मला ओवाळते; आणि काहीतरी गोड करून खायला देते. आजही सकाळी माझ्या वाढदिवसानिमित्त आईने गुळाची पोळी केली होती." मदन म्हणाला.

हे ऐकताच ओजस म्हणाला, "मदन तू इथेच थांब. मी आत्ता आलो."

ओजस पळतच आत गेला आणि बाबांना म्हणाला, "बाबा तुम्हाला माहित आहे का? गंगूमावशीच्या मदनचाही वाढदिवस आजच आहे."

"अरे वा, हे तर छानच झालं." बाबा म्हणाले.

तेव्हा ओजस म्हणाला, "बाबा, माझ्या वाढदिवसासोबत आज आपण मदनचाही वाढदिवस साजरा करू या ना?"

"वा! वा! काहीच हरकत नाही." बाबा म्हणाले.

"चला तर मग. आपल्याला केक आणायला जायचेच आहे. तर आणखी एक केक मदनसाठीसुद्धा आणू या." ओजस म्हणाला. बाबांनी लगेच आवरले. ओजस आणि बाबा केक आणण्यासाठी निघाले. त्यावेळी ही आनंदाची बातमी ओजसने मदनलाही सांगितली.

ओजस म्हणाला, "मदन, तुझाही वाढदिवस आपण इथे साजरा करणार आहोत. आम्ही तुझ्यासाठीही केक आणत आहोत. तू इथेच बसून रहा."

या साऱ्या गोष्टी मदनची आई काम करता करता ऐकत होती. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले.

सायंकाळी सर्व बच्चेकंपनी आल्यानंतर ओजससोबत मदननेही केक कापला आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यावेळी सर्वजण एकदम म्हणाले, "हॅपी बर्थडे टू ओजस अँड मदन." मदनला खूपच आनंद झाला. त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याच्याकडे बघून गंगूबाई हळूच पदराने आपल्या डोळ्यातील आनंदाश्रू पुसू लागल्या.

*************

उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी

गादिया विहार रोड

शहानूरवाडी

औरंगाबाद ४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८