८
देवाची करणी आणि बागेत पाणी
कविता करणे संपवून मी उठलो नि काहीतरी करावे म्हणून फिरू लागलो इकडे तिकडे. पण आज किंवा आजवर जे झालंय त्याचा विचार काही मनातून जाईना. एक दोन दिवसात एवढा बदल होऊ शकतो? दुनिया बदल गई वगैरे गाणे गातात ना, त्याचा अनुभव घेत होतो. पण एकूण माझा विश्वास बसणार नाही असेच घडत होते आतापर्यंत. त्यात
लग्नघरात लाडवांची कमतरता नसते. हवे तितके खा बुंदीचे लाडू. आजवर जे झाले त्यामुळे माझ्या मनातही असेच खूप सारे लाडू फुटत होते. सारे संकेत इथे अनुकूल दिसत होते. शेवटी काय योग म्हणावा! मी इथे येतो काय आणि ही वै भेटते काय. आणि तिला इथेच भारतात अमेरिका सोडून यायचे आहे काय! आणि वर तिला अगदी भारतीय वर हवा आहे काय! योगायोग पण असे योगायोगानेच घडतात! म्हणजे एकूण हे जमायला हवे!
आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यादिवशी बागेत संध्याकाळी वै भेटली मला!
म्हणजे संध्याकाळपर्यंत अजून पाहुणे येऊन पोहोचले. त्यांची गडबड होती. इकडतिकडच्या गप्पा मारत होते सारे. आता घर भरलेले होते. पण माझे लक्ष लागेल तर ना? मनात वै चे विचार. उगाच कुणाशी बोलण्याचा कंटाळा आला मला. त्यात सकाळच्या हुकलेल्या संधीबद्दल अजून मी चुकचुकत होतो. थोडा बोलण्यातला शब्द क्रम बदलला असता तर दिवसाचे चित्र बदलले असते. अर्थात त्या इंडियन ग्रूम बद्दलची अनमोल माहिती या वेळात मला मिळाली हा एक फायदा! सकाळी गेलेला काका दुपारी केव्हा तरी आलेला परत. वै आली, पण वर तिच्या खोलीत निघून गेली. तिला पाहिले मी, पण बोलणे काहीच झाले नाही माझे. त्याची हुरहूर आणखी ॲड झाली. तेव्हा या सर्वांवर उतारा म्हणून मी बागेत निघून आलो. तेही मागच्या बाजूस.. जिथे वर्दळ नसेल.. एकट्यानेच विचार करण्यासाठी. पण त्या बाजूलाच वै च्या खोलीची खिडकी असेल असा मात्र अंदाज नव्हता मला..
मी झाडाच्या पानांकडे पाहात होतो. फुलांकडे पाहता पाहता उगाच बागेतल्या फुलांवरची हिंदी सिनेमातली प्रेमगाणी आठवत होतो. फूल आणि फुलपाखरू जुन्या सिनेमावाल्यांचे लाडके. ते एक एक आठवत, बागेतली झाडे पाहत फिरता फिरता मला आयडिया सुचली. जवळच नळी होती. बागेतील नळाला ती लावून मी झाडांना पाणी घालू लागलो. आमच्या घरी असली बाग नाही नि असे पाणी घालणेही नाही. नळीने बागेतील झाडांना पाणी घालता घालता ती झाडे एकदम ताजीतवानी झाल्यासारखी दिसत होती. नळीने पाण्याचे फवारे उडवत होतो नि थोड्याच वेळात वरून आवाज आला.. तिचा.. होय वै चाच!
“मोडक, यू देअर? आयॅम कमिंग..”
तिच्या तोंडी मी मोदकाचा मोडक झालो! माझ्या छातीची धडधड वाढली. तिच्याशी काय बोलावे याचा विचार करेपर्यत ती पाठच्या जिन्याने धावत पोहोचली देखील. पण ती पोहोचेपर्यंत तेवढ्यातल्या तेवढ्यात माझ्या मनात विचार आला.. सिनेमा असता तर हा.. मग ही या पाण्यात भिजली असती चिंब.. मग एखादे गाणे.. मग.. जाऊ देत.. असले स्वप्नरंजन त्या सिनेमावाल्यांनाच परवडते. तोवर ती पोहोचलीच. काही असो, पण ती स्वतःहून आली हे ही काही स्वप्नाहून वेगळे नव्हते.
येता येता म्हणाली, “वॉव.. आय लाइक वॉटरिंग द प्लांट्स..”
माझ्या हातून नळी घेत ती पाणी घालू लागली..
मी काही न सुचून उभा होतो. बोलण्यासारखे खूप होते पण तोंडून शब्द फुटेल तर.. मी तिच्याकडे पाहात होतो नि ती लहान मुलीसारख्या उत्साहाने झाडांना पाणी घालत होती. ती हिरवीगार पाने अजून हिरवी नि ताजी दिसत होती. पाणी घालता घालता अचानक ती म्हणाली..
“मोडक टेल मी वन थिंग, व्हाय डिड यू अव्हॉइड मी?”
तिच्या या प्रश्नाची अपेक्षा नव्हती मला. मी मारे स्वतःला गुगली टाकणारा समजत होतो.. हिने पहिल्याच वाक्यात बाऊन्सर टाकला..
“मी?”
काय गंमत आहे ना? हा मी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत एकाच अर्थाने येतो!
“यस्स.. यू रॅन अवे इन द इव्हिनिंग यस्टरडे.. ॲंड टुडे मॉर्निंग..”
“नो .. नो..”
मला इंग्लिश येत नाही असे नाही पण आता बोलायला माझी जीभ अडखळत होती. काहीतरी बोलावे म्हणून मी म्हणालो.. “काही नाही गं.. जरा गबाळग्रंथी कारभार सुधारायला गेलो घाईघाईत.”
तिला एवढे मराठी पचणार नाही माहिती असल्याने मी बिनधास्त बोलून गेलो.. मग भाषांतर केल्यासारखे म्हणालो.. “यू नो आय वॉज इन अ हरी.. इफ आय डोण्ट मेक इट इन टाइम यू पीपल विल फिनिश द होल ब्रेकफास्ट अँड आय विल हॅव टू फास्ट.. सो हॅड टू कम फास्ट!”
माझ्या उत्तरावर मीच खूष झालो. म्हणजे मला हे लगेच सुचले म्हणून. त्यात मूळ प्रश्नाला बगल मिळत होती नि थोडेफार विनोदीही होते ते उत्तर. म्हणून मी हसत हसत बोललो तशी ती पण हसू लागली. तिचे हसणे, दात खरेतर सगळेच फार सुंदर होते.. खरेतर ती इतकी छान दिसत होती ना की तिला माझीच नजर लागण्याची भीती वाटत होती मलाच.
ते काही क्षण मंतरलेले असल्यासारखे वाटत होते मला. मी भारावून गप्प होतो. खरेतर देवाने छप्पर फाडके संधी दिलेली. तोंडी परिक्षेस तोंड देणे मला नेहमीच अवघड जाई.. तेव्हा हे माझ्यासाठी अनपेक्षित नव्हते. फक्त मला भीती होती.. ‘व्हाय ॲम आय अव्हॉयडिंग’ सारखे मी न बोलल्याने तिचे गैरसमज तर नाही होणार..
एकाएकी काही सुचून मी म्हणालो, “सो हाऊ डू यू फाइण्ड इंडिया..”
“नाईस.. यू नो आय लाईक इट हिअर.. देअर इज रियल लाईफ आऊट हिअर.. पीपल आर सो कॉर्डियल ॲंड नो फॉर्मल रिलेशन्स.. सो गुड..”
“या.. आय नो.. इव्हन आय ॲम फॉंड ऑफ धिस..”
अजून असेच काहीबाही बोलत राहिलो आम्ही. ती खरेच हुशार होती आणि बोलण्यात चतुर. पण मी श्रोता म्हणून तसा हुशारच होतो!