* मोहमयी माया * डॉ रश्मी! नावाजलेल्या स्त्री रोग तज्ज्ञ! त्या मोठ्या शहरात मध्यवती ठिकाणी त्यांचा भव्य असा दवाखाना होता. दुरवरून अनेक स्त्रिया त्यांच्या दवाखान्यात येत असत. अत्यंत हुशार डॉक्टर अशी त्यांची सर्वदूर ख्याती होती. त्यादिवशीही डॉ रश्मी दवाखान्यात नेहमीप्रमाणे येणाऱ्या आजारी व्यक्तींना तपासत होत्या, योग्य मार्गदर्शन करीत होत्या, औषधोपचार लिहून देताना योग्य त्या सूचना करीत असताना साधारण पंचवीस वर्षे वयाचे जोडपे आत आले. दोघेही लाजत, बुजत आत आले. डॉक्टरांनी त्यांचे नेहमीप्रमाणे हसून स्वागत केले. ते जोडपे खुर्चीवर बसेपर्यंत डॉक्टरांनी त्यांचे निरीक्षण केले. जोडपे ग्रामीण भागातील होते. मुलाने पांढरी ट्रॉझर, त्यावर तसाच पांढरा शर्ट, डोक्यावर पांढरी टोपी असा पोशाख केला होता तर तरुणीने लालसर छटा असलेली सुती साडी नेसली होती. दोघांच्याही चेहऱ्यावर ते कष्टकरी असल्याची छटा दिसत होती. डॉ. रश्मीने हलक्या, मधुर आवाजात मुलाकडे पाहून विचारले,
"काय नाव तुझे?"
"जी.. जी.. गणपत..." गणपत चाचरत म्हणाला.
"ही तुझी बायको का?"
"हो.. हो..जी.."
"काय नाव तुझे?" त्या मुलीकडे बघत डॉक्टरांनी विचारले.
"जी रखमा.." रखमा हळूच म्हणाली
"बरे, काय त्रास होतोय?" डॉक्टरांनी विचारले. तशी रखमा गणपतकडे बघत मान खाली घालून गणपतला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाली,
"सांगा ना जी तुम्ही..." तसा गणपत खाकरत, डॉक्टरांकडे बघत सांगू की नको, काय सांगू, कशी सुरुवात करू अशा विचारत असताना डॉक्टर म्हणाल्या,
"हे बघा. काय ते संकोच न करता स्पष्ट सांगा. बरे, मला एक सांगा, लग्नाला किती वर्षे झाली तुमच्या?"
"जी चार वर्से झाली..." गणपत सांगत असताना त्याला कोपऱ्याने डिवचत रखमा म्हणाली,
"न्हाई व्हो. चार साल व्हायला दोन महिने बाकी हाईत..." रखमा तसे सांगत असताना डॉक्टर मंद हसत कौतुकाने रखमाकडे बघत म्हणाल्या,
"काही हरकत नाही. रखमा, तुला दिवस गेलेत का?"
"न्हाई.. न्हाई. त्यो गर्भ..."
"गर्भ राहात नाही का?"
"बाईसाब, आम्हाला लेकरू नको हाय..." गणपत म्हणाला
"अरे, आधीच लग्नाला चार वर्षे झाली आहेत अजून किती दिवस लेकरू नको आहे?"
"अं..अं.. नकोच आहे... म्हणजे कधीच नको आहे."
"काय? मुल होऊच द्यायचेच नाही.. कधीच नाही? का? तुम्हाला कुणाला कोणता आजार आहे का?"
"तस काही न्हाई. पण..."
"हे बघ. तुम्ही मुल का नको ह्याचे खरे खरे कारण सांगितल्याशिवाय मी काही करू शकणार नाही."
"त्याच काय हाय म्याडम, आमी दोगबी ऊस तोडणीला जात आसतो. कमी जास्त सात-आठ महिने गावाबाहेर आसतो. बरं तिकडं गेलो तरी बी आमचा काय बी ठावठिकाणा नसतो. एका वावरातली ऊस तोडणी झाली की, दुसऱ्या वावरात जावे लागते. आज एका गावात तर दोन दिसांनी दुसऱ्या गावात. रात न्हाई की दिस न्हाई. तोडणी होवून गाडी भरली की, कारखान्याकडं जावं लागत्ये.."
"हं असे आहे काय? मग बायकोला दिवस गेले की, ती बाळंत होऊन लेकरु वर्षाचे होईपर्यंत बायकोला गावीच ठेवून तू एकटा कामावर जा ना..."
"त्येच तर जमत न्हाई म्याडम. पाचसे रुपये एका दिसाची मजुरी मिळते. तुम्ही म्हणता तस येक ऊस तोडणीचा सीझन रखमीला संग नेल न्हाई तर तुमीच हिसाब करा, किती नुकसान होईल ते. आणि येकदा का ग्याप पडला तर मुकारदम दुसऱ्या सिझनला काम देयाला टाळाटाळ करतो. न्हाई तर आर्धीच मजुरी देतो. "
"तसे का? कामात तर कमी नसते ना?" डॉक्टरांनी विचारले.
"मुकारदमाचं म्हणणं आसत की, लेकरु झालं की, बाई कमजोर होते, तिच्यामधी पैल्यावाणी ताकद ऱ्हात न्हाई. येक प्रकारे बाई लै सुस्त व्हती या. बाईचं सम्द ध्यान लेकराकडे ऱ्हायते. पैल्यावाणी बाया जीव लावून काम करीत न्हाईत. लेकराला बार बार पदराखाली घेत्यात."
"अरे, पण तुमच्या सोबतचे सगळेच मजूर म्हणजे सगळ्या बायका काय करतात?"
"तेच तर आम्हालाबी करायच हाय. म्याडम लेकराची कटकट नको, काम बंद पडू नये म्हणून बाया गर्भ..."
"गर्भपात करतात? हे बघा, मी असा सल्ला मुळीच देणार नाही आणि गर्भपात तर करणारच नाही."
"तसं न्हाई म्याडम, त्ये काय म्हणत्यात त्ये बाया गर्भाची थैलीच काढून टाकत्यात..."
"का ss य? कमाई करण्यासाठी चक्क गर्भाशय काढून टाकतात. किती भयानक आहे हे? अरे, पण अशाने तुमचा वंश कसा वाढणार?"
"ते वंश बिंश सोडा इथं बायलीचं प्वाट वाढू नये हे सम्देजण बघायलेत.."
"रखमा, हा गणपत काय म्हणतोय?" डॉक्टरांनी रखमाकडे बघत विचारले.
"खर हाय त्येंच. हातात पैकाच नसल तर पोरांना वाढवावं कसं? सात-आठ म्हैने काम केले तर कसबसं सालभर खायला मिळतं, वरीसभराचे कपडेलत्ते घेऊ शकतो. एक सिझन काम केलं न्हाई तर त्या सिझनचं नुसकान तर व्हतेच व्हते पर अगल्या सिझनला बी कमी पैका घिऊन काम करावे लागते. डबल नुसकान सोसावे लागते. आम्ही काय म्हणून नुसकान सोसावं? ऊसाचा हंगाम आन् लगिनाचा हंगाम येकच आस्तो की न्हाई पर लै जवळचं कुणाचं लगीन आसल तरच मुकारदम कशीबशी दोन दिस सुट्टी देत्यो."
"अग,पण आई होणं हा तुझा हक्क आहे. संतती झाल्याशिवाय बाईला आणि संसाराला पूर्णत्व लाभत नाही. शिवाय मुल होऊ दिले नाही तर भविष्यात म्हातारपणी बाईला त्रास होतो. मुल म्हणजे आईबापाची म्हातारपणाची काठी असते, आधार असतो..."
"म्याडम, कशाचा आधार आन् कहाची काठी आलीय. मायबापाचे हातपाय चालना गेले की, पोटचं पोर काठीनं बडवते. त्यापरीस हातपाय चालतील तव्हर काम करायच. न्हाईच चालले तर मग कुठेही.. एखांद्या मंदिरात बसून भिक मागून पोट भरायचं."
"म्हणून म्हटलं ती पोटातली थैली येकदा काडून टाका. समदी किरकिरच मिटल बघा. त्ये काय म्हणत्यात 'साप तर मरल पर काठी बी तुटायची न्हाई' आस कराव म्हणलं..." गणपत बोलत असताना डॉक्टरांनी घंटी वाजवली. तशी एक नर्स आत आली. तिला पाहताच डॉक्टर म्हणाले,
"मला या केसमध्ये जरा जास्त लक्ष घालावे लागणार आहे. परगावचे पेशंट थांबवून ठेव. इतरांना संध्याकाळी यायला सांग. सायंकाळी नवीन पेशंट घेऊ नको."
"ठिक आहे..." असे म्हणत नर्स निघून गेली. डॉक्टर गणपतला म्हणाल्या,
"गणपत, थोडं बाहेर बसतोस काय? मला रखमाला तपासायचे आहे." ते ऐकून गणपत बाहेर निघाला. त्याला वाटले, बाई रखमीला तपासायल्यात म्हणजे आपलं काम व्हणार. डॉक्टरांनी आपली केस हातात घेतली. आता काय बी काळजी करायचं कारण न्हाई...
गणपत बाहेर जाताच डॉ रश्मी रखमाजवळच्या खुर्चीवर बसल्या. रखमाचा हात हातात घेऊन त्यांनी विचारले, "रखमा, एक सांग, तुझ्या मनात नसताना गणपत किंवा घरी कुणी हे कृत्य करायला तुला भाग पाडतय का? जबरदस्ती करतेय का?"
"न्हाई. न्हाई. तसं काही न्हाई. ह्यो मझाच ईच्चार हाय."
"बर. तसे नसेल तर चांगलेच आहे. एक सांग, तुमच्या कुटुंबात अजून कुणी कुणी गर्भाशयाची पिशवी काढून टाकली आहे?"
"अं.. अं.. माझी भावजय. माझी दूरची बहीण..."
"तुझ्याच वयाच्या असतील ना? तू त्यांच्याशी बोललीस का? पिशवी काढून टाकल्यावर काय त्रास होतो हे तू विचारलेस का?"
"न्हाई बा. म्हणजे तशी भेटच व्हत न्हाई. म्हणजे आम्ही कोणत्या ना कोणत्या फडावर आसतो. त्या बी कामासाठी मुंबईला आसत्यात. पर येकदा भेटल्या व्हत्या, जास्ती काय बोलणं झालं न्हाई पर भावजय म्हणली की, जास्ती काय बी तरास व्हत न्हाई म्हणून."
"असे. बर, तू कधी मारोतीच्या मंदिरात गेली व्हतीस का?"
"जायची की. माझ्या माहेरी मंदिराच्यासमोर झोपडीत मी ऱ्हायाचे. तव्हा दुपारी मंदिरात कुणीबी नसायचं मंग आम्ही दुपारी मंदिरात खेळायचो. एके दिशी भारीच गंमत घडली..."
"काय झालं ग?" रखमाला बोलतं करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय हे पाहून डॉक्टरांनी उत्साहाने विचारले.
"काय न्हाई जी मझा ल्हाना भाऊ एके दिशी मंदिरात मारोतीपुढे जाऊन उभा राहिला. मारोतीची मूरत लय मोठी हाय. त्याने मारोतीमहाराजांच्या बेंबीत बोट घातलं आणि जोरात ओरडला पण लगुलग हसतच बाहीर येऊन म्हन्ला की, काय गारेगार वाटतय..." रखमा सांगत असताना डॉक्टर स्मित हास्य करत मनाशीच म्हणाल्या, 'प्रयोग यशस्वी होत आहे तर..'
"पुढे काय झाले?"
"ते ऐकून दुसरा पोरगा बी आत गेला आन पैल्यांदा बोंब मारत आन् हसत पाठीमागे फिरला.."
"असे का झाले? तिथे असे काय व्हते की, बोट घातल्याबरोबर ओरडायचे आणि पाठीमागे फिरले की हसायचे?" डॉक्टरांनी विचारले.
"अव्हो, म्याडम, तिथं बसला व्हता इच्चू! बोट घातलं की, त्यो डख मारायचा म्हणून ते ओरडायचे पर बाहीर सांगावं तर अपमान व्हईल म्हणून मंग हसायचे."
"रखमा, हेच तुझ्यासोबत होते आहे. तुझी भावजय, बहीण किंवा अजून कुणी तुला पिशवी काढून टाकली की काय त्रास होतो ते सांगतच न्हाई. मला सांग, तुला माहिती आहे का, गर्भाशयाची पिशवी काढून की, आयुष्यभर तुला पाळी येत नाही ते."
"मग ती पाळीच तर येऊ देयाची न्हाई. पाळी येणार म्हणजे लेकरु व्हणारच की. मुळावर घाव घातला म्हंजी कोणतीबी कटकट ऱ्हात न्हाई. दुसरं कसं हाय बगा, पाळी आली की, पोट, कंबर, हातपाय, डोस्क समद लय लय दुखते आन मंग आसं दुखरं आंग घिऊनशानी काय बी काम व्हत न्हाई. कव्हा कव्हा म्हैन्यातून दोन दोन बाऱ्या पाळी येते. म्हंजी मंग आठ दिस कामावर पाणी पडते. आठ दिवस काम व्हत न्हाई. ऊस तोड कमी झाली की, मंग मुकारदम लै डाफरतो. कव्हा कव्हा रोजी बी काटतो. म्हणूनशानी ते कोन्त बी दुखणं ठिवायचच न्हाई."
"तुमच्या संघटना नाहीत का?"
"हाईत की पर आमचं ऐकते कोण? सम्दे लीड्र त्या मुकारदमाचे कानकोंडे. आमच्यासमुर मुकारदमाला थोड रागानं बोलत्यात आन् मुकाट निघून जात्यात. त्येंचं काय मुकारदमाकडून राईट हप्ता गेला की झालं सम्द! संघटनेकडं काय बोललं की मंग काय खर न्हाई. बाई न्हाई की माणूस न्हाई मुकारदम फोडून काढत्यो. बायकांच्या पदराला हात घालतो, इज्जतीशी खेळतो..."
"माय गॉड! हे सगळं खरं आहे?" डॉक्टरांनी विचारले.
"मी कहाला खोटं बोलू. अव्हो, ऊसाच्या फडावर काम करणाऱ्या बायावर मुकारदम, कारखान्याचे लोक, गावातले लोक यांची लै बुरी नजर ऱ्हाते. येक बी बाय सुटत न्हाई. दोन साल झाले ह्येंच्यासंग ऊस तोडाय जाते. लै बाऱ्या अंगझटीला आलता पर म्या काय त्येची डाळ शिजू देली न्हाई."
"फडात तुझ्यासोबत काम करणाऱ्या बाया उठाव करत नाहीत का?"
"म्याडम, काय सांगाव तुमास्नी पैक्याफुडं काय बी नसते व्हो. मझ्यासारख्या धा-पाच बाया सोडल्या तर सम्द्या... जाऊ देत. म्हणूनशानी मला या सिझनची भीती वाटाय लागलीय की या वक्ती मी सोत्ताला न्हाई त्या लांडग्याच्या तावडीतून वाचवू शकणार. तुमास्नी हातपाय जोडून ईनंती करत्ये की, काय बी करा पण मला मोकळी करा. तुमची वाट्टलं ती फी म्या देईन."
"मुकादम बदलून बघ ना..."
"बायजी, कोठयबी, पळसाला पानं तिनच की. येक म्हंजे येका मुकरदमाची संगत सोडली तर दुसरा मुकारदम घेत न्हाई. घेतल तर मजुरी लयच कमी देत्यो. पण बायसाब, सम्दे मुकारदम आसे न्हाईत. लय चांगले बी मुकारदम हाईत पण त्ये अशा दुसऱ्या मुकारदमाकडून आलेल्या कामगारांना ठेवून घेत न्हाईत. हे मुकारदम बाळंतपणासाठी सुटी तर देतातच पण पैक्याची मदत बी करतात. जव्हा आपण पैल्यांदा कामावर जातो का न्हाई तव्हा आपल्याला कोठ ठाव असत्ये कोण चांगला, कोण वाईट त्ये. जो कुणी नोकरी देईल आपून ती पकडून ठेवतो. तव्हा आम्हास्नी हे ठाव नसते की, आम्ही येका ऊसाच्या फडात जात न्हाईत तर एका चक्रव्यूहात चाल्लो हाय. तिथनं बाहीर पडणं लै आवघड आसते."
"तुला मुलच होऊ द्यायचे नाही ना? मग पिशवी कशाला काढायची. हे बघ, हे असे करणे तुझ्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. बाईची पाळी गेल्यावर काय त्रास होतो हे तुला माहिती आहे का? पिशवी पोटात जरी असली तरीही ती आपल्या शरीराचा एक भाग आहे. समजा काही कारणास्तव किंवा एखाद्या अपघातात तुझा पाय तुटला तर?"
"मंग तर झालं. सम्दं मुसळ केरात. बाईसाब, मझे कामच बंद व्हईल की व्हो."
"आता कसं बोललीस? तसेच या गर्भाशयाच्या पिशवीचे असते. कुणाचे वजन वाढते, कुणाचे वजन कमी होते. लठ्ठपणा येतो मग काम करायला अडचण येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कँसरसारखा आजार होण्याची शक्यता असते."
"खर सांगता ताई, कैंसर भी व्हतो व्हय..."
"होय. कँसरची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. ही शस्त्रक्रिया करताना अनस्थेशिया म्हणजे भूल द्यावी लागते त्यामुळे शस्त्रक्रिया सोपी होते परंतु काही महिलांना यामुळे श्वासासंदर्भात त्रास होतो. त्याचप्रमाणे अन्य काही आजाराचे विषाणू शरीरात प्रवेश करु शकतात. शिवाय हे ऑपरेशन करताना आजूबाजूच्या काही अवयवांना दुखापत होऊ शकते. प्रकृती मूळ पदावर यायला खूप वेळ लागतो. अशक्तपणा खूप दिवस लागू शकतो. यामुळे तुला फडावरल्या कामावर जायला वेळ लागू शकतो."
"याचा अर्थ बाळंतपणच बरे म्हणायचे की."
"अगदी बरोबर आहे. हाडेसुद्धा ठिसूळ, कमजोर होतात. कधी कधी शरीरावर अनावश्यक चरबी वाढल्यामुळे लठ्ठपणा येतो."
"आसं झालं बघा खरच. मझ्या आत्याची पाळी गेली तव्हा ती अशी हत्तीवाणी फुगली. ऊस तोडाय तर यायची पर तिला कामच व्हयाचं न्हाई. सारखी दमायची. मंग मुकारदम तिच्यावर खेकसायचा. पगार कापायचा आन् येकेदिशी त्येन आत्तीला कामावरुन काढून टाकलं."
"अगदी बरोबर आहे. आत्याचे वय झाले होते पण असाच त्रास तुलाही होऊ शकतो. चिडचिड होते, थकवा तर भयंकर येतो. उदासीनता येते. कुणाला बोलावे वाटत नाही. कधी कधी आपला माणुसही नकोसा होतो. हातापायाची आगआग होते. शरीर गरम होते. पिशवी काढताना कुणाला जास्त रक्तस्त्राव झाला तर रक्त द्यावे लागते. कुणाची मान दुखते, कंबरदुखी डोकं वर काढते. गुडघेदुखी मागे लागू शकते. एकटेपणाची जाणीव होते, बेचैन, अस्थिर वाटणे... अशा आजारांची नाही पण लक्षणांची गर्दी होते."
"हां बाईसाब, मझ्या मावशीची पिशवी काढली ना तर तिला हे तर सम्द होऊच लागल पर तिच्या पायाच्या टाचा दिवसभर दुखायच्या. पहाटे उठून फायलं तर हात सुजून पाय टंब झालेले असायचे. हात येवढे सुजून यायचे ना की, हातातल्या बांगड्या पार फसून बसायच्या आन् मनगट रक्तबंबाळ व्हायचं... तुम्हाला सांगते बायजी, मझी मावशी खात्यापित्या घरची व्हती. हातात सोन्याच्या बांगड्या व्हत्या. येकदा तर त्या बांगड्या अशा फसल्या म्हण्ता. काय बी केलं तरी निघतच नव्हत्या. अखेरीस तिला लोहाराकडं नेऊन त्या बांगड्या कापून काढल्या. "
"एवढे सारे माहिती असूनही तू गर्भाशयाची पिशवी काढायचा हट्ट धरतेस?"
"ईलाज न्हाई बायजी..."
"असे का म्हणतेस?दुसरेही उपाय आहेत. जोपर्यंत तुला मुल नको तोवर थांबता येते. चार दोन वर्षांनी जेव्हा मुल हवे असेल तेव्हा किंवा गणपतची नसबंदी केली तर गरज वाटल्यास पुन्हा त्याची शस्त्रक्रिया करून..."
"नग. नग. येक तर त्येस्नी कोन्ताबी तरास नग. कारण माणसाची नसबंदी लै आवगड आसती म्हणत्यात आन मंग तो गडी माणसात ऱ्हात न्हाई म्हणत्यात. आन् म्हत्वाचे म्हणजे आता तुमास्नी कसं सांगू.."
"काय ते स्पष्ट सांग. काहीही आडपडदा ठेवू नकोस." डॉक्टर रखमाच्या पाठीवर हात फिरवत म्हणाल्या.
"मी अगुदरच सांगलं की, दोन साल झाले म्या कोणाची डाळ शिजू देली न्हाई पर औंदा का कोणास ठाऊक पर मला काय तरी ईपरीत घडल, म्या सोत्ताला न्हाई वाचवू शकणार आसं वाटत हाय. तसं घडलं आन् त्या ईखारी संबंधातून म्या पोटुशी ऱ्हायले तर? तव्हा ह्येंची नसबंदी केलेली आसली तर काय वाटल ह्यांना? लै इस्वास हाय येंचा...मझं शील गेलं तरी चालल पर ह्येंचा इस्वास न्हाई तुटला फायजेत."
"माय गॉड! रखमा, तू किती बारीक विचार करतेस ग?"
"व्हय जी, करावाच लागतो."
"रखमा, गर्भाशयाची पिशवी काढणं म्हणजे काय इंजेक्शन दिल्याप्रमाणे स्वस्त वाटतय का? खूप खर्च येतो ग."
"ठाव हाय.पर थैली काढून टाकायला मुकारदम पैसा लावतो आंन् मंग काटून घेतो... हप्त्यानं!"
"रखमा, हे सगळं खरं असलं तरीही मी तुला असे करायला परवानगी देणार नाही. मी स्वतः आजपर्यंत असे काम केले नाही आणि यापुढेही अशा पापाच्या कामात सहभागी होणार नाही. मला माहिती आहे की, मी नकार दिला तर तुझे अडणार नाही. तुझ्या इच्छेनुसार इलाज करणारे डॉक्टर आहेत. जाता जाता तुला अजून एक सांगते, गर्भाशयाची पिशवी केवळ मुलंच वाढवत नाही तर कात टाकल्यावर नाग जसा पूर्वीपेक्षा अधिक चपळ होतो, सतेज होतो त्याप्रमाणे बाळंतपण झाले की ही पिशवी जणू कात टाकते आणि बाईचे आयुष्य पुन्हा उभारण्यात महत्त्वाचे काम करते. म्हणतात ना, बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म! यावेळी गर्भाशय महत्त्वाची भूमिका बजावते."
"बाईसाब, मला सम्दे पटते व्हो पर काय करु काय बी समजत न्हाई बघा..."
"रखमा, शांतपणे विचार करा. घाईघाईने निर्णय घेऊ नका. तुझ्या प्रकृतीचा, तुमच्या म्हातारपणाचा विचार करा. अग, असे लांडगे प्रत्येक क्षेत्रात आहेत पण म्हणून काही कुणी स्वतःचे आयुष्य पणाला लावत नाही. दोन वर्षे तू त्याला टक्कर देऊन जिंकलीस ना मग भविष्यातही तुझा विजयच होईल कारण तू सच्ची, प्रामाणिक आहेस, चारित्र्यवान आहेस. दोन वर्षे तू तुझ्याही एक नकळत एक गोष्ट सिद्ध केलीस की, स्त्रीची इच्छा असल्याशिवाय कुणीही तिच्याकडे डोळा वाकडा करून पाहू शकत नाही. मला एक खर खर सांग, तुला खरेच मनापासून मुल नको आहे का?"
"ताईसाब, अस कोण्या बाईला वाटल व्हो पर परस्थिती माणसाला कशी बनवते..."
"अग, तुला एक उपाय सांगते बघ, तुम्ही ही नोकरी सोडून द्या. दोघेही हुशार, बलवान आहात. कष्ट करण्याची दोघांचीही तयारी आहे तर मग दुसरीकडे नोकरी बघा..."
"आम्हाला कोण नोकरी देईल? दोघबी ठार आडाणी हावोत. आजकाल शिक्शणाबगर कुणीबी जवळ उभं राहू देत न्हाई की. शिक्शान घेतलेले पोऱ्हं बेक्कार हिंडायलेत जी."
"समजा तुमची नोकरीची समस्या दूर झाली तर तुम्ही ती ऊस तोडणीची नोकरी सोडून द्यायला..."
"एका पायावर तयार होऊ ताईसाब, त्या नरकातून बाहेर पडायला !..."
"तुम्ही हा थैली काढून टाकायचा विचार मनातून काढून टाकाल?" थैली शब्दावर जोर देत डॉक्टर हसत म्हणाल्या.
"व्हय. ताई, तसा सबुत देत्ये तुम्हाला." रखमा आनंदाने म्हणाली. तसे डॉ रश्मी यांनी घंटी वाजवली आणि काही क्षणात गणपत आत आला.
"या. बसा. गणपत. काय मग ऐकले का आमचे बोलणे?" डॉक्टरांनी विचारले. तसे आश्चर्याने रखमाने विचारले,
"म्हंजी? हे सम्द ऐकत होते? ताईसाब, तुम्ही बी ना, मी ह्येंच्याबद्दल कायबाय बोलले असती तर?"
"नाही. मला विश्वास होता. तू नवऱ्याबद्दल काही बोलणार नाही ते. मग गणपत, तयार आहेस का, ऊसाच्या फडातून बाहेर पडायला?"
"का न्हाई म्याडम? अव्हो, तिथं राहणं कोणला आवडते? जीव मुठीत धरून ऱ्हाव लागते. राहायला झोपडी कशाची तर पाचोट्याची! पहाटे पहाटे उठून ऊस तोडणी करायला जाव लागते. कधी कोणतं जनावर कुठून येईल आणि पिंडरीला पकडल याचा नेम न्हाई..."
"माझ्या या दवाखान्यात काम करता काय?"
"बाईसाब, या स्वर्गात राहायला कुणाला आवडणार नाही हो. तुमचे लई लई उपकार होतील बघा.." असे म्हणत रखमा डॉ रश्मी यांच्या पायाशी वाकली. तिला मध्येच उठवून रश्मी म्हणाल्या,
"पण एका अटीवर... नोकरीवर आल्यानंतर एका वर्षात याच दवाखान्यात तुझं बाळंतपण झाले पाहिजे..." डॉक्टरांचे बोल ऐकणाऱ्या रखमाने पदराआड चेहरा लपवला तर गणपतने डॉक्टरांकडे बघत आदराने हात जोडले...