Ek din oushdhavin in Marathi Moral Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | एक दिन औषधाविन

Featured Books
Categories
Share

एक दिन औषधाविन


*एक दिन औषधाविन !*
नेहमीप्रमाणे बबनराव टीव्ही लावून बसले होते. चोवीस तास ताज्या टवटवीत बातम्या देणाऱ्या एका वाहिनीवरून दुसऱ्या वाहिनीवर उड्या मारताना ते स्वतःशीच पुटपुटत होते,
'काहीही विशेष बातमी नाही. दुपारपासून प्रत्येक वाहिनीने जणू एकच एक बातमीचे रवंथ करण्याचा ठेका घेतलाय. आम्हाला तेच तेच ऐकून कंटाळा येतोत रे पण तुम्हाला तेच तेच शंभरवेळा ऐकवताना मळमळत नाही का? सेवानिवृत्त लोकांना... ज्येष्ठांना बातम्यांचा आधार यादृष्टीने टीव्हीसमोर बसावे तर तीच तीच क्षणचित्रे पाहावी लागतात. काय करणार? दुसरा इलाजही नाही आणि पर्यायही नाही...' तितक्यात एका वाहिनीवर एक ब्रेकिंग न्यूज झळकली. त्याप्रमाणे काही क्षणातच पंतप्रधान जनतेशी संवाद साधणार होते. बबनरावांनी पुन्हा एकामागोमाग एक वाहिन्यांवर बातमीची वाहिनीवाले जसे एखाद्या घटनेची 'सत्यता' पडताळून पाहतात त्याप्रमाणे खात्री, खातरजमा करून घेतली. साऱ्याच वाहिन्या ती बातमी छातीठोकपणे दाखवत होते.
'अरेच्चा! आता पंतप्रधान काय बोलणार बुवा? आज काही कुठे दंगा, मॉब ब्लिचिंग, बलात्कार, खून वगैरे काही झाले नाही. सीमेवरही शांतता आहे. कालच 'मन की बात' बोलून झाली. अधिवेशनही सुरू नाही की, एखादे विधेयक संमत झाल्यानंतर पंतप्रधानांनी जनतेला माहिती द्यावी. असे काय घडले म्हणावे...' तितक्यात त्यांच्या धर्मपत्नीने तिथे येत विचारले,
"अहो, काय करता?..."
"काय करणार पेंशनर? टीव्ही लावून बसलोय..."
"आयुष्यात दुसरे केलेच काय? नोकरी, पेपर, कॉमेंट्री, बातम्या आणि सिनेमा. कधी देव देव..."
"अग, देव देव करून काय मिळवायचे? जे हवे होते ते देवाने आधीच न मागता दिले ते म्हणजे बायको!"
"बोलणे तर असे. अहो, रिटायर्ड झालात. आता तरी थोडे भक्तीमार्गाला लागा..."
"तू त्या मार्गावर केवढा प्रवास केलाय, अजूनही तू भक्तीपथावर भ्रमण करते आहेसच त्यामुळे मला काही करायची गरज नाही. तुझ्या कमावलेल्या पुण्याच्या आधारावर मला सारे काही आपोआप मिळते आहे. थोडे थांब. पंतप्रधान बोलणार आहेत..."
"पंतप्रधान बोलणार आणि तुमच्यासारखे रिकामटेकडे ऐकणार. छान जोडी जमलीय. जर ते भाषण ऐकून वेळ मिळाला आणि इच्छा झाली तर माझ्या रक्तदाबाच्या गोळ्या तेवढ्या आणल्या तर बरे होईल. सकाळी घ्यायला गोळी नाही बरे का..."
"बरे. बरे..." असे म्हणताना टीव्हीवर पंतप्रधानांची छबी दिसताच बबनरावांनी आवाज टीव्हीचा वाढवला,
पंतप्रधानांचा चिरपरिचित आवाज कानावर पडला,
'मित्रांनो, कसे आहात? निरोगी आहात ना? निरोगीच असायला हवे. पण आजकाल हे प्रदुषण, हे संकरित अन्न, ही धावपळ इत्यादी अनेक कारणांमुळे इच्छा असूनही आपण निरोगी राहू शकत नाहीत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपणास कोणते ना कोणते औषध, गोळी घ्यावीच लागते. अन्न कमी आणि औषधी जास्त अशी आपली अवस्था झाली आहे. घरातून बाहेर पडताना एक वेळ जेवणाचा डबा घरी विसरला तरी चालेल पण औषधी विसरता कामा नये असे झाले आहे. म्हणून आम्ही एक ठरवले आहे, काळजी करू नका. टेंशन घेऊ नका. कोणतीही नवीन योजना, नवीन करप्रणाली आणत नाही किंवा कुणावर बोजा टाकत नाहीये. फक्त एक दिवस तुम्ही मला द्या.. ऐकून घ्या. एक दिवस द्या म्हणजे काही तुम्हाला काही काम लावणार नाही. एक दिवस आपण सारे दवाखाना, औषधी यापासून दूर राहूया. त्यासाठी आम्ही एक योजना आणली आहे. 'एक दिन औषधाविना' असे त्या योजनेचे नाव आहे. त्यासाठी आम्ही एक दिवस मुक्रर केला आहे. दर महिन्याची एक तारीख! उद्या एक तारीख आहे. आपण उद्याच या योजनेची धुमधडाक्यात सुरुवात करूया. यादिवशी सर्वांनी कोणतीही औषधी घ्यायची नाही. पथ्यं पाळायचे नाही. फार मोठा आजार असेल आणि जीवनमरणाचा प्रश्न असेल तरच दवाखान्यात जायचे. दवाखाने, औषधीदुकाने यादिवशी बंद असतील. नागरिकांनी फक्त एकच करायचे आहे, एक दिवस औषधाविना व्यतीत करायचा आहे..." पंतप्रधान बोलत असताना बबनराव स्वयंपाक घराकडे बघत म्हणाले,
"अग, लवकर बाहेर ये. एक महत्त्वाचे काम आहे. आलीस का?"
"काय झाले? असे कोणते आभाळ कोसळले आहे?"
"अग, आभाळच कोसळले आहे. ऐक तर पंतप्रधान काय म्हणत आहेत..."
"आई ग्ग माय! त्यासाठी तुम्ही मला बोलावले? मला भरपूर कामे आहेत हो. रिकामी नाही मी."
"अग, पंतप्रधान म्हणतात की, उद्या कुणीही औषधी घ्यायची नाही."
"काय? औषधी बंद करून कसे काय जगता येईल? या पंतप्रधानांचे ना काही सांगता येत नाही. कधी काय घोषणा करतील..."
"अग, चांगलेच आहे की. आपल्या दोघांचे मिळून दीडशे रुपयापेक्षा अधिक खर्च होतात औषधीवर तेही दररोज. ते तर वाचतील. शिवाय अपथ्य ते सारे मनसोक्त खाता येईल..."
"म्हणजे? औषधीसह पथ्यही बंद. अहो, अशाने एक नाही तर कैक जीव जातील... एका दिवसात.."
"काही जाणार नाहीत. पंतप्रधानांना आजारी व्यक्तींमध्ये या योजनेद्वारे एक आत्मविश्वास निर्माण करायचा असावा की, माणूस विनाऔषधी राहू शकतो..."
"डोंबल्याचा आलाय आत्मविश्वास. अहो, आत्मविश्वास निर्माण व्हायला आजाराने बिघडलेली मानसिकता तर जागेवर असायला पाहिजेत ना? जशी अन्नाची अत्यंत गरज असते ना तशीच किंबहुना अन्नापेक्षाही आज शरीराला औषधीची आवश्यकता आहे. पाण्याविना माणूस काही काळ राहू शकेल पण..."
"हेच औषधीचे भूत आपल्या मानगुटीवर बसले आहे ना, तेच पंतप्रधानांना उतरावयाचे आहे. मला तर आवडला हा निर्णय..."
"तुम्हाला आवडणारच की. पथ्य करायचे नाहीत ना? तुमच्या पथ्यावरच पडले असणार. आता उद्या मनसोक्त हादडाल तेलकट, तुपकट, खमंग! काही म्हणायची सोय नाही... पंतप्रधानांच्या योजनेला साथ द्यायची आहे ना? "
"काय हरकत आहे? एक दिवस मनमानेल तसे वागायला..."
"वागा. वागा. मनाला वागेल तसे वागा. मला मात्र तसे करता येणार नाही. मला औषधी लागते म्हणजे लागते. उगीच पंतप्रधानांचे ऐकून जीव गमवायचा नाही मला."
"अशी ग कशी तू दुटप्पी? एरव्ही तर दुखणे असह्य झाले की, 'उचल रे बाबा, उचल लवकर!' असा धावा करतेस आणि आता तुझ्या बोलण्यानुसार औषध न खाण्यामुळे जीव गमावण्याची संधी दारात चालून आली आहे तर माघारी फिरतेस?"
"तुम्हाला मला मारायचे असेल तर मग करूया, 'एक दिन औषधाविना!'... उद्यापासून कशाला? आज आत्ता ताबडतोब औषधी बंद करूया... कायमची! झाले समाधान?"
"अंह, चुकतेस तू. ही योजना मरण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. एक वेगळा अनुभव घ्यायला हवा. पूर्वीचे साधू, संत, महात्मे कित्येक दिवस अन्नपाण्यावाचून राहात होते आणि आपण एक दिवस विना औषधी राहू शकत नाहीत म्हणजे काय? मी तर बाबा उद्या विना औषधी, विना पथ्य राहणार..."
"रहा. बाप्पा रहा..." त्या त्राग्याने बोलत असताना त्यांच्या शेजारी राहणारे गुलाबराव तिथे येत म्हणाले,
"काय चालले आहे, बबनराव? ऐकल्या का बातम्या?"
"हो ना. योजना क्रांतिकारी आहे हो. मी तर तयार आहे बुवा एक दिवस दिव्य करायला. तुम्ही?"
"मनाची इच्छा आहे पण तन कुठवर साथ देते ते बघूया."
"म्हणजे मी नाही समजलो?"
"कसे आहे बबनराव, मला पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत छोटेमोठे आजार चालूच असतात. आज हे दुखले, उद्या ते दुखले म्हणण्यापेक्षा सकाळी उठल्यावर एक अवयव दुखतोय म्हणून गोळी घ्यावी आणि ती गोळी त्या दुखऱ्या अवयवापर्यंत पोहोचतही नाही तर दुसऱ्या अवयवाची कुरकुर सुरू होते. बरे, बरेचसे आजार एवढे लागट आहेत की, ते जायचे नावच घेत नाहीत उलट स्वतःसोबत इतर आजारांना वसतीला घेऊन येतात मग औषधी घ्यावीच लागते. पण मी सकाळी सुरुवात तर नक्कीच करणार आहे. जोपर्यंत होईल तोपर्यंत धावायचे नाहीच सहन झाले, अगदी जीव जायची वेळ आलीच तर घ्यायची औषधी."
"तुमची मनाची तयारी आहे ना, मग हरकत नाही. तन आपोआप साथ देते. पण गुलाबराव, मला एक शंका येते ती म्हणजे डॉक्टर, औषधी दुकानदार कसे गप्प बसतील? एक दिवस व्यवहार बंद ठेवायचा म्हणजे प्रत्येकाचे खूप मोठे नुकसान होणार आहे की."
"मला वाटते बबनराव, तुम्ही पंतप्रधानांचे भाषण पूर्ण ऐकले नाही. सरकार पन्नास टक्के नुकसानभरपाई द्यायला तयार आहे..."
"पण ते समजणार कसे? समजा मी दुकानदार आहे, माझी दररोजची कमाई एक हजार रुपये असेल तर अर्धी नुकसानभरपाई मिळते म्हणून मी माझी कमाई दोन हजार आहे असे दाखवले तर मला शंभर टक्के नुकसानभरपाई मिळेल की."
"नाही. तसे होणार नाही. कारण एक तर एका महिन्याचा व्यापार लक्षात घेऊन एका दिवसाची सरासरी कमाई काढून त्याप्रमाणे हिशोब होईल. दुसऱ्या बाजूने विचार केला तर अर्ध्या दिवसाची कमाई नुकसानभरपाई मिळवण्यासाठी दुकानदाराला महिन्याची कमाई 'पांढरी' करावी लागेल. म्हणजे त्याला त्यावर कर भरावा लागेल..."
"म्हणजे सरकारच्या खजिन्यात भरपूर कर जमा होईल..."
"अगदी बरोबर! ज्याला कर भरायचा नसेल तो गुपचूप महिन्यातून एक दिवस दुकान बंद ठेवेल. ज्याला काळ्या पैशाचे डर नसेल, जो नियमितपणे योग्य कर भरत असेल तो या योजनेचे स्वागत करेल. नाही तर उद्या सर्वांसोबत रस्त्यावर येईल..."
"म्हणजे? मी नाही समजलो?"
"बबनराव, पंतप्रधानांचे भाषण संपल्याबरोबर औषध विक्रेता संघटनांनी आणि सोबतच डॉक्टरांच्या संघटनांनीही या निर्णयाचा तात्काळ निषेध केला असून संपावर जाण्याची धमकी दिली आहे."
"सरकार सारे संप बिंप मोडून काढते. कुणाचे काही चालू देत नाही. पंतप्रधान ना कुणाच्या रागालोभाला भीक घालतात ना कोणत्या वोटबँकेची चिंता करतात."
"चला. येतो. म्हटले पहावे तुम्ही पंतप्रधानांचे आवाहन ऐकले का नाही? ऐकले असल्यास काय ठरवले ते? संध्याकाळ होतेय बाजारात जायचे आहे. अत्यावश्यक औषधी आणून तर ठेवावी. घ्यायची का नाही ते उद्या तब्येत पाहून ठरवता येईल."
"गुलाबराव, मी काय म्हणतो, उद्या सकाळी बरोबर सात वाजता या. दोघांनाही साखर वर्ज्य आहे. उद्या तिकडे पंतप्रधान स्वतः या योजनेचा शुभारंभ तर करतीलच पण मी छानपैकी साखरेचा गोडचिट्ट चहा करतो. आपणही या महत्त्वाकांक्षी योजनेचा श्रीगणेशा गोडचिट्ट चहा पिऊन करुया. कसे?"
"तुम्ही म्हणाल तसे..."असे म्हणत दिलखुलास हसत गुलाबराव निघाले...
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून बबनरावांनी गुलाबरावांना बरोबर सकाळी साडेसहा वाजता फोन करून 'एक दिन औषधाविना' या योजनेचा श्रीगणेशा करायची आठवण करून दिली. दररोजच्याप्रमाणे प्रातःविधी आटोपले. तितक्यात त्यांच्या सौभाग्यवती उठल्या.
"चहा ठेवताय?"
"हो. त्यात नवल ते काय? दररोज मीच करतो ना चहा?..." बबनराव बोलत असताना बाहेरून गुलाबरावांचा आवाज आला,
"बबनराव, चहा झाला का?" त्यांचे स्वागत करण्यासाठी बबनराव बाहेर आले. पाहतात तर गुलाबराव पत्नीसह हजर झाले होते.
"या. या. गुलाबराव, या. वहिनी तुम्हीपण आलात? छान झाले..." बबनराव स्वागत करीत असताना त्यांच्या मागोमाग आलेली पत्नी म्हणाली,
"मीच बोलावले त्यांना. तुम्ही आम्हाला चोरून ह्या योजनेची सुरुवात करणार होतात ना? पण मी कालच तुमची बोलणी ऐकली आणि वहिनींना निमंत्रण दिले."
"व्वा। खूप छान केलेस तू. म्हणजे 'औषधाविना एक दिन यास तुमचाही पाठिंबा आहे तर!"
"ते तर आहेच पण आता लवकर तुमचा तो गोडचिट्ट चहा पाजा सर्वांना..." बबनरावांची पत्नी म्हणाली आणि हास्याच्या गजरात बबनराव स्वयंपाकघराकडे निघाले...
काही क्षणात बबनरावांनी आणलेल्या चहाचा घोट घेत गुलाबराव डोळे मिटत म्हणाले,
"व्वा! व्वा! गुलाबराव, साखरेचा कडू आजार जडल्यापासून कधीतरी थोडासा गोड चहा मिळायचा पण आज मात्र पांग फिटले हो. गोडाचा चहा तोही बायकोच्या साक्षीने आणि तिच्या शेजारी बसून बहुत मजा आया।"
"खरेच खूप छान वाटते.पथ्य.. औषधपाणी करता करता जन्म चाललाय. बाहेर कुणाकडे गेले तरी तिथेही पथ्य-पथ्य सांगताना लाज वाटते हो." बबनरावांची पत्नी म्हणाली
"घरोघरी मातीच्या चुली तसे घरोघरी दुखणकरी! काय करणार? बरे, मी काय म्हणते, आता साडेसात होत आहेत. आपल्या दोन्ही घरची फराळाची वेळ नऊच्या आसपास आहे. तर दोघेही आमच्याकडे फराळाला या. मस्तपैकी गरमागरम भजी करते..." गुलाबरावांची पत्नी बोलत असताना बबन आणि गुलाब या रावांनी एकमेकांकडे पाहिले आणि टाळी दिली...
गरमागरम भज्यावर मनसोक्त ताव मारून आणि पुन्हा एकदा साखरेचा चहा घेऊन बबनराव पत्नीसह घरी परतले. त्यांनी टीव्ही लावला. सर्वत्र त्याच योजनेच्या बातम्या होत्या. नागरिक मोठ्या संख्येने आणि प्रचंड उत्साहात सहभागी होत होते. दवाखाने, औषधी दुकाने बंद होती. ना संप होता, ना बंद होता, ना निषेध मोर्चा होता. बारा वाजता बबनरावांच्या पत्नीने 'अपथ्याचे हितकारी' जेवण तयार केले. बबनरावांनी त्यावर ताव मारला. शतपावली करून ते नेहमीप्रमाणे पलंगावर आडवे झाले. काही क्षणातच त्यांना दरदरून घाम फुटला, मळमळ होत असल्याची जाणीव झाली. ते घाईघाईने न्हाणीघराकडे निघाले. पोहोचता क्षणी त्यांनी भडभडून उलटी केली. सारी स्वच्छता करून ते बाहेर आले परंतु त्यांना सारखे गरगरल्यासारखे होत होते. ते अस्वस्थपणे सोफ्यावर बसले असताना त्यांची चाहूल लागून बाहेर आलेल्या पत्नीने विचारले,
"काय झाले? फिटली का हौस क्रांतिकारी होण्याची? गोळी घेता काय? आणू?"
बबनरावांना धड बोलताही येत नव्हते त्यांनी हाताच्या इशाऱ्याने 'नको' असे खुणावले. पत्नी आत गेली. पाणी घेऊन बाहेर आली. बबनरावांच्या हातात प्याला दिला पण बबनरावांना तो भारही सहन होत नसल्याचे पाहून पत्नी तो प्याला त्यांच्या ओठाजवळ नेत म्हणाली,
"ग्लासभर पाणी प्या. पडून रहा. बरे वाटेल..."
बबनरावांनी कसे तरी तेवढे पाणी पिले. पत्नीने त्यांना व्यवस्थित झोपवले. अंगावर पांघरूण टाकले. काही क्षणातच बबनराव झोपी गेल्याचे पाहून पत्नी पुटपुटली,
"सहन काही होईना अन पराक्रम केल्याशिवाय राहवेना. मला माहिती होते तुम्हाला पित्ताचा त्रास होणार आणि हट्टीपणाने आज औषधी घेणार नाहीत म्हणून पाण्यात पित्त कमी होण्याची पॉवरफुल गोळी आधीच विरघळून ठेवली होती. आता झोपाल संध्याकाळपर्यंत शांत आणि उठल्यावर व्हाल फ्रेश..." असे म्हणत ती बबनरावांच्या पलंगाशेजारी खुर्चीत काहीशा चिंतातूर अवस्थेत बसून राहिली...
नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका, फेज ०१,
क्रांतिवीरनगर, लेन०२,
हॉटेल जय मल्हारच्या जवळ,
थेरगाव, पुणे ४११०३३
९४२३१३९०७१