राहिल्या त्या आठवणी...
अण्णासाहेब त्यांच्या दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचत बसले होते. नुकताच फराळ झाला होता. त्यांच्या सौभाग्यवती आत चहा करीत असताना आवाज आला,
"काय चालले आहे, अण्णासाहेब?" आवाज ओळखून अण्णासाहेब म्हणाले,
"या. या. तात्यासाहेब, या..." पाठोपाठ स्वयंपाक घराच्या दिशेने पाहून म्हणाले,
"तात्यासाहेब आलेत आहेत बरे का? त्यांचाही चहा टाक..."
"बरे..." आतून प्रत्युत्तर आले.
"आज कुठे जाणार तर नाहीत ना?"
"तात्या, कुठे जाणार? खरे तर मस्त पावसाळी वातावरण आहे. मस्तपैकी..."
"गरमागरम भजे खावेसे वाटतात ना? मलाही खूप इच्छा होतेय हो पण आहाराचे बाबतीत कडक असणाऱ्या गृहमंत्री दाद देत नाहीत..."
"अगदी मनातील बोललात तात्या. 'घरोघरी गॅसच्या चुली' तसेच 'घरोघरीच्या गृहमंत्र्यांची आहारावर करडी नजर' अहो, दुपारी गृहमंत्री गाफील आहेत म्हणजे झोपलेले आहेत हे पाहून साखर म्हणा, निमित्ताने आणलेल्या पेढे म्हणा किंवा सणाच्या निमित्ताने झालेल्या भज्यावर सर्जिकल स्ट्राइक करावी म्हटलं तर लगेच गृहमंत्र्यांची तोफ धडाडते..."
"तोफ धडाडते काय?..." चहा घेऊन येणाऱ्या अण्णासाहेबांच्या पत्नीने हसत विचारले.
"तसे नाही हो, वहिनी. वातावरण झकास आहे म्हणून अण्णांना म्हणत होतो, आमच्याकडे या जेवायला. मस्तपैकी बासुंदी-खीर, पुरी आणि खमंग भज्यांचा बेत करणार आहोत.दोघेही या. गप्पांचाही फड रंगवू या."
"तात्या, गप्पांचा फड काय कुठेही रंगवता येतो. त्यासाठी जेवायला कशाला बोलवता?"
"ते बरोबर आहे. पण कसे आहे, दररोज तुम्ही दोघेच इकडे आणि आम्ही दोघे तिकडे. नवरा-बायकोंमध्ये या वयात चर्चा तरी कोणत्या तर कुणाचे ना कुणाचे गाऱ्हाणे..."
"अगदी बरोबर आहे. एक तर त्याच त्याच विषयावर रवंथ नाही तर रोगायण..."
"रोगायण? अच्छा! अच्छा! आले लक्षात, तुम्ही आजारांबद्दल म्हणता काय?"
"मग दुसरे काय? सकाळी उठल्यापासून बायकोला भुणभुण लावायची. माझे हे दुखतय,माझे ते दुखतय..."
"आणि नवऱ्याच्या आजाराची चौकशी करायची सोडून आम्ही बायका आपलेच गाऱ्हाणे घेऊन बसतो. शिवाय हे खाऊ का ते खाऊ? अशी चर्चा सुरू असते..."
"वहिनी, म्हणूनच म्हटलं की, मस्तपैकी जेवणाचा साधासुधा थाट करूया, मनसोक्त गप्पा मारूया."
"तात्यासाहेब, ठीक आहे. आप की आज्ञा सर आँखोंपर! पण एक अट आहे, आग्रह नको. गप्पांना भरती येऊ देत पण खाण्यावर बंधन आणि नियंत्रण नक्कीच असू देत."
"चालेल. आम्हाला तरी कुठे आग्रह सहन होतोय अण्णासाहेब? गए ओ दिन... काय ते दिवस होते, काय तो जेवणाचा थाट असायचा, रांगोळ्यांची सजावट असायची, उदबत्त्यांचा घमघमाट असायचा, हास्यांची कारंजी असायची, आग्रहाची फोडणी असायची, तृप्तीचे ढेकर असायचे, समाधानाची लकेर असायची व्वा! बरे, अण्णा, गुलाबजाम बोलावू का? नंतर ओवनमध्ये गरम करून ताव मारूया..."
"भाऊजी, कशाला ती गुलाबजामुनची आठवण काढता? गुलाबजामूनचे नुसते नाव काढले तरी यांची शुगर गरगर करीत तीनशेपार होते."
"वहिनी, 'अब की बार, तीन सौ पार..' या नाऱ्याचा बराच परिणाम झालेला दिसतोय."
"कशाचा नारा नि कशाचा पारा..."
"तात्यासाहेब, तुम्हाला सांगू का, गुलाबजामून म्हणजे जीव की प्राण हो. दर रविवारी गुलाबजामून ताटात असायचेच. शिवाय कामानिमित्त कुठे बाहेरगावी गेले की, हमखास गुलाबजामूनवर ताव मारायचाच. तुम्हाला सांगतो, एकदा आमच्या शाळेत शिक्षण विस्तार अधिकारी आले. तसा तो मला ज्युनिअर पण शिक्षण जास्त असल्यामुळे आणि परीक्षा देत राहिल्यामुळे गेला बढतीवर. तो माझ्या शाळेवर असताना आम्ही नेहमीच गुलाबजामूनवर तुटून पडायचो. तो तरुण होता पण नेहमीच माझ्यासोबत हरायचा. तर साहेब झाल्यावर आला माझ्या शाळेवर. तपासणी झाली. चहापाणी झाले. तो निघाला. मला हलकेच म्हणाला की, अण्णासाहेब, गुलाबजामून नाही का खाऊ घालणार?"
"मग?" तात्यांनी विचारले
"मग काय? दोन-तीन शिक्षकांसह आम्ही गेलो आमच्या नेहमीच्या हॉटेलमध्ये म्हणजे साहेब माझ्या सोबत काम करत असताना आम्ही जिथे जात असू तिथेच गेलो. त्या हॉटेलमालकाने त्यांना ओळखले. आम्ही तिथे पोहोचलो आणि क्षणार्धात साहेब वगैरे सारे विसरून गप्पा तर रंगल्याच पण एका मागोमाग एक गुलाबजामून फस्त करीत गेलो. तुम्हाला सांगतो तात्यासाहेब किती गुलाबजामून आम्ही रिचवले असतील ते समजलेच नाही. गुलाबजामून संपले. तसे आम्हाला काहीही न सांगता त्या हॉटेलमालकाने शेजारच्या हॉटेलमधून गुलाबजामून बोलावले..."
"काय सांगता अण्णासाहेब?..."
"खरेच सांगताहेत आणि मग दोन दिवस सपशेल उपास! अन्न खाणे तर सोडा पण अन्नाचे नाव जरी काढले तरी ढेकरामागे ढेकर!..."
"खूप दिवसांनी एक जीवाभावाचा मित्र भेटला होता. तोही साहेबपण विसरून वागत होता..."
"होते असे. आपण तरुण असताना अशा शर्यती हमखास लागायच्या विशेषतः लग्नात, सासुरवाडीला गेले की तर शंभर टक्के अशा गमतीजमती होत असत. अण्णासाहेब, मी सासरी गेलो ना म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत आंब्याचा रस तोही दररोज ठरलेला असायचा. त्यातही एक गंमत असायची..."
"गंमत? ती कोणती?"
"आमचे सासर म्हणजे एकत्र कुटुंब! उन्हाळ्याच्या सुट्टीत जवळपास लहानमोठी मिळून पन्नास माणसे जमायची. सासरच्या शेतात मोठ्ठी आमराई होती. एका खोलीत आंबा पिकू घातलेला असायचा. त्याचा दरवळ घरभर पसरलेला असायचा. त्यामुळे आली लहर की, माचून खाल्ला आंबा अशी परिस्थिती! "
"खरे आहे. घरची आमराई म्हटल्यावर काय? घर का आम दाल बराबर! आमच्या घरी किंवा सासरी आमराई नव्हती पण दररोज आंबा विकत आणून रस मात्र होत असे. त्याकाळी आंबा किलोने मिळत नसायचा तर शेकड्याने भाव असायचा. शंभर आंब्याचा भाव असायचा पण एकशे तेहतीस आंबे मिळायचे."
"तसे आंबे विकत घेऊन पोटभर खाऊन रस उरला की, आम्ही बायका त्याच्या पोळ्या करुन त्या वाळवून मग खायची मजा काही निराळीच असे." अण्णासाहेबांची पत्नी म्हणाली
"तर काय? तर आमचा मुक्काम सासुरवाडीला असला की, आंब्याचा रस करण्याची कामगिरी माझी असायची..."
"काय सांगता? तुम्ही जावई असूनही रस करायचे?" अण्णांनी आश्चर्याने विचारले.
"हो तर. अगदी आंबे निवडणे, ते धुऊन पुसून घेणे, आंबे माचण्यापासून ते शेवटी साली-कोयी फेकून देईपर्यंत सारी कामे मी आनंदाने, आवडीने करत असे. तो आंब्याचा, नंतर रसाचा घमघमाट, सोबत स्वयंपाक घरातून येणारा कुरुडी-पापडी, भज्यांचा वास म्हणजे अवर्णनीय क्षण असायचे."
"अगदी बरोबर बोललात तात्या..."
"अहो, ताट,वाटी, तांबे, प्याले, रांगोळी, उदबत्त्या या आनंदमयी वातावरणात मेहुणे, साडूभाऊ आणि समवयस्क चुलत सासरे यांच्यासोबत जेवणाचा तो थाट असायचा ना तो अगदी अविस्मरणीय असाच. जेवणे संपली आता हात धुवायची वेळ आली म्हणताच कुणाला तरी लहर यायची आणि मग एक-एक वाटी पासून आग्रहाची आणि नंतर शर्यतीची जी घोडदौड सुरु होत असे ती लाजबाब अशीच. अण्णा, अहो, भजे, कुरुडी, पापडी तोंडी लावत एकामागोमाग एक किती रसाच्या वाट्या पोटात जायच्या त्याचा हिशोब नसे..."
"तात्या, लग्नसमारंभ म्हटला की, अशा शर्यती ठरलेल्याच. तुम्ही म्हणता तसे पंगत उठणार म्हटलं की, बुंदीचे लाडू म्हणा, जिलेबी म्हणा किंवा खास केलेला पदार्थ खाण्याची शर्यत लागायची. कुणातरी चार-दोघात शर्यत लागायची आणि इतर माणसे बिचारी हात धरून त्यांच्याकडे बघत, जिभल्या चाटत बसायचे."
"मीही अशा खाण्याच्या शर्यतीत अनेकदा भाग घेतलाय. ती मजा, ती नशा काही निराळीच असायची. आता लग्नकार्यात काय तर तो बफे! चौघांची तोंडं चार दिशेला. ओळखीचे असूनही कुणी कुणाला आग्रह करीत नाही. 'मी आग्रह केल्यासारखे करतो, तू खाल्ल्यासारखे कर."
"बरोबर! जो तो स्वतःचे ताट स्वतःच वाढून घेतो पण तरीही किती अन्न वाया जाते काही हिशोब असतो का?"
"मुळीच नाही. अण्णा, त्यावेळी एवढे आग्रह व्हायचे, शर्यती लागायच्या पण कुणाच्याही ताटात अन्नाचा कण शिल्लक राहात नाही. सगळे पान कसे स्वच्छ!"
"भाऊजी, तुम्हा पुरुषांच्या शर्यती होत असत पण त्याची झळ आम्हा बायकांना बसत असे. पहाटे लवकर उठून कामाला लागावे लागायचे. कामे करून करून पोटातले कावळे अक्षरशः थैमान घालायचे. झाले. आता पुरुषांची पंगत संपत आलीय. लवकरच जेवायला मिळेल ही आस उचंबळून येत असतानाच पुरुषांच्या खाण्याची शर्यत लागायची. तास-दोन तास त्यातच जायचे आणि म्हणतात ना 'हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेणे' अगदी तशी परिस्थिती होत असे. अनेकदा तर अशी परिस्थिती यायची की, आंब्याचा रस म्हणा किंवा मेजवानीसाठी केलेला मुख्य पदार्थ शर्यतीत संपून जायचा आणि आम्ही नुसत्या वासावर आणि पुरुषांच्या ढेकरावर समाधान मानत असू."
"खरे सांगू का वहिनी, ही बाब अनेकदा लक्षात यायची. नाही असे नाही किंवा आमची जेवणे झाली की, बायका ही गोष्ट लक्षात आणून द्यायच्या पण ती खुमखुमीच अशी असायची ना की, 'कळते पण वळत नाही' अशी परिस्थिती निर्माण होत असे. नाही म्हणायला, माघार घ्यायला जमायचे नाही."
"तात्या, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. पण त्याच आठवणी जगायची उमेद निर्माण करतात, एक स्फूर्ती देतात, जगण्याची इच्छाशक्ती निर्माण करतात. वयोमानानुसार, प्रकृतीमुळे आता काही खाता येत नाही आणि कुणी खाऊ देत नाही..." अण्णांचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बायको म्हणाली,
"आम्ही म्हाताऱ्या बायका म्हणजे नवऱ्यांसाठी, 'ना खाने दूंगी, ना खाऊंगी' असा प्रण, अशी व्रत अंगीकृत केलेल्या!"
"तुमच्या त्या व्रतामुळे तर आम्ही म्हातारे चार दिवस जास्त जगतो." तात्यासाहेब बोलत असताना त्यांच्या पत्नीचे आगमन झाले. तात्यांकडे बघत त्या म्हणाल्या,
"अहो, तुम्ही निमंत्रण द्यायला आलात की, अण्णांकडे जेवण करायला आलात? माणसाने समजावे तरी काय? नाही तर सरळ जेवायची वेळ झाली की अण्णांना घेऊन या आणि म्हणा, वाढ जेवायला."
"म्हणजे तू अजून स्वयंपाक सुरू केला नाहीस?" तात्यांनी उलट विचारले
"बघा आता हे. मला समजायला तर हवे ना की, अण्णा-वहिनी जेवायला येणार की नाही ते?"
"या. वहिनी, या. भाऊजींनी जेवायचेच निमंत्रण दिलेय. पण कसे आहे, 'जब मिले दो यार...' बरे. ते जाऊ द्या. नाही तरी तुम्ही स्वयंपाक केलाच नाही ना, तर मग इथेच दोघी मिळून करूया की." सौ. अण्णासाहेब बोलत असताना अण्णासाहेब ताडकन म्हणाले,
"व्वा! मस्त आयडिया आहे. तात्या, एक करा, सारा स्वयंपाक आमच्या घरी करू द्या. वाटल्यास तुम्ही स्विट बोलवा... होऊ देत गुलाबजामूनचा थाट..."
"लागली वाट!..." अण्णासाहेबांची पत्नी म्हणाली आणि सारे हसू लागले...
नागेश सू. शेवाळकर
थेरगाव, पुणे ४११०३३
९४२३१३९०७१