Me aek Ardhvatraav - 7 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | मी एक अर्धवटराव - 7

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

मी एक अर्धवटराव - 7

७) मी एक अर्धवटराव !
काही दिवसांपासून भर मे महिन्यात चक्क पावसाळा आहे की काय असे वातावरण निर्माण झाले होते. आभाळ गच्च भरून होते. थंडगार वारे वाहत होते. मुसळधार पावसाला सुरुवात होईल अशी लक्षणे दिसत होती परंतु पाऊस हुलकावणी देत होता. त्यादिवशी सायंकाळी चहा संपवून आम्ही दोघे नवराबायको दिवाणखान्यात बसलो होतो. बायको नेहमीप्रमाणे तिच्या कामात दंग होती तर मी रिकामटेकडा बिचारा भ्रमणध्वनीच्या खेळात अडकलो होतो. तितक्यात अचानक अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेला, वातावरण निर्मिती केलेला पाऊस सुरू झाला. तशी सौभाग्यवती मला म्हणाली,
"अहो..." कसे असते बायकोने आवाज दिला की, तिचा ध्वनी कानावर आदळतो न आदळतो तोच नवऱ्याचा प्रतिनिधी जायलाच पाहिजे, 'काय ग? आलो.. एक मिनिट...' नाही तर मग काही खैर नाही. तसे आम्ही हाकेच्या अंतरावर म्हणण्यापेक्षा शब्दाच्या अंतरावर होतो परंतु कसे आहे, एकदा का माणूस भ्रमणध्वनीच्या दलदलीत म्हणजे त्यावरील विविध ऑप्शन्समध्ये फसला ना की त्यातून बाहेर पडायला अवकाश लागतो. हे बायकांना कुणी सांगावे? सौभाग्यवतीने दिलेल्या पहिल्या आवाजाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे चिडलेली पत्नी खवळून म्हणाली,
"अहो, जरा त्या फोनच्या जंजाळातून बाहेर या. मी काय म्हणते ते कान देऊन ऐका. बाहेर वाळू घातलेले कपडे आणा जा..."
"हो. हो. अग, हो. जातोय..." असे, म्हणत मी अनिच्छेने उठलो आणि हातातील भ्रमणध्वनीवर लक्ष ठेवत आमच्या शयनगृहात गेलो. तिथे अस्ताव्यस्त पडलेले कपडे गोळा करून गॅलरीकडे निघालो. शयनगृहातून बाहेर पडायला आणि बायकोची नजर माझ्यावर पडायला एकच वेळ झाली.
"अ..हो, काय करताय? कुठे निघालात?"
"कुठे म्हणजे? तुच म्हणालीस ना की, कपडे वाळत घाला..."
"अहो, वेंधळेमहाराज, मी तुम्हाला घरातले कपडे बाहेर नेऊन वाळू घालायला सांगितले नाही हो. देवा रे देवा, काय ध्यान गळ्यात पडलय बाप्पा..."
"मग काय सांगितले होते?"
"अहो, आता प्रश्नावली थांबवा. आधी बाहेर जाऊन पावसाने भिजत असलेले कपडे घेऊन या. आता सारे भिजलेही असतील..."
"मग आणू का नको? कसेही भिजलेच आहेत तर अजून भिजले तर काय फरक पडणार आहे? ऐ, तुला आठवतो का ग आपण लग्नानंतर पहिल्या पावसात भाजलो..."
"भाजलो होतो... भिजलो होतो म्हणा. मला ते काही या क्षणी आठवत नाही. आधी कपडे आणा."
तिचे निर्वाणीचे बोल ऐकून मी हातातील कपडे तिथेच टाकले आणि बाहेर जाऊन पावसाने चिंब भिजलेले कपडे घेऊन आलो. आत आल्याबरोबर बायकोला विचारले,
"कुठे ठेवू ग?"
"ठेवा आतल्या कपाटात.." बायको म्हणाली आणि मी शयनगृहाकडे जाताना विचारले,
"कोणत्या कपाटात ठेवू ग? मोठ्या की छोट्या?"
"काय बाप्पा, तुम्हाला कोणते काम सांगणे म्हणजे डोक्याला ताप आहे नुसता. अहो, फरशी भिजतेय हो. ते कपडे आधी न्हाणीत टाका लवकर. दमाने जा. पाणी सांडलेय. घसरून पडाल. हातपाय मोडला तर मलाच सारे करावे लागेल."
'लवकर टाका, दमाने जा. हा मेळ कसा बसवावा.' असे पुटपुटत मी न्हाणीघरात गेलो. भिजलेले सारे कपडे आत टाकून आलो.
"टाकले बरे का.आता हे कपडे कुठे टाकू? बाहेर वाळत घालू का?" मी निर्विकारपणे विचारले
"मला ना कधी कधी वाटते, तुम्ही की नाही सारे समजून-उमजून मुद्दाम करता. असा वेंधळेपणा केला, कामात जाणूनबुजून चुका घडवून आणल्या की पुन्हा कुणी काही काम सांगणार नाही..." तिच्या तोंडाचा पट्टा सुरू असताना आमच्या शेजारणीचे आगमन झाले. तिचे येणे म्हणजे आधीच घरात पसरलेल्या वणव्यात तेल टाकण्याप्रमाणे झाले!
"काय झाले हो, तुमचा मुड ऑफ दिसतोय?" तिने विचारले
"काय सांगू तुम्हाला? प्रत्येक बाईला 'नवरेपणाचा' जो अभिशाप मिळतो ना तेच भोगतेय..." असे म्हणत सौभाग्यवतीने थोडावेळापूर्वी घडलेले कपडे पुराण ऐकवायला सुरुवात केली. मी मात्र 'रिकामटेकड्याला फेसबुकचा आधार' याप्रमाणे पुन्हा फेसबुकवर चेहरा अडकवला तरी कान मात्र त्या दोघींच्या बोलण्यावर, गाऱ्हाण्यावर ठेवून होतो. हिचे सांगून झाल्यावर शेजारीण सुरू झाली.
"अहो, याचसाठी नवऱ्याचा जन्म असतो. तुमच्याकडेच असे घडते असे नाही. सर्वच नवरे असेच वागतात. संसार तिथे नवरा आणि नवरा तिथे अर्धवटपणा, वेंधळेपणा हे गुण असतातच."
"म्हणजे तुमच्या घरीही..."
" माझाही नवरा याच मातीतला आहे. परदेशातून आणलेला नाही म्हटलं! अगदी असेच हो. सेम टू सेम! अहो, जास्त भूतकाळातील भूतं कशाला उकरून काढू. अगदी ताजे... आजचेच दोन प्रसंग सांगते. ऐका..." मला वाटले 'ऐका..' असे तालसुरात बोलणारी शेजारीण लावणी ऐकवते की काय म्हणून मी कान जास्तच टवकारले. शेजारीन सांगू लागली...
'त्याचे काय झाले? आज दुपारी बारा वाजता गावातच एका लग्नाला जायचे होते म्हणून मी तयार होत होते. हे तयार होऊन बसले होते. माझे आटोपले होते. शेवटचा हात फिरवावा म्हणजे शरीरावर डिओ फवारावा म्हणून स्प्रे शोधत होते. नेहमीच्या जागेवर बाटली नव्हती. इतरत्र कुठे दिसत नव्हती म्हणून ह्यांना आवाज दिला...'
"म्हणजे तुमचे मालकपण फवारणी करून घेतात..." हिने विचारले
"त्यांना काय त्याची चव..." शेजारीन ठसक्यात सांगत होती, जणू तिला म्हणायचे होते, 'गाढवाला गुळाची काय चव!' ती बोलत असताना मला वाटले की, स्प्रे फवारणीआधी तो टेस्ट करून म्हणजे चाखून पाहतात की काय? पण मी ती शंका गिळून टाकली.
मी आवाज देताच ह्यांनी नेहमीप्रमाणे त्रासलेल्या आवाजात बाहेरूनच विचारले, "काय ग?"
"बाहेर कुठे माझा स्प्रे असेल तर द्या ना प्लीज!"
"बरे बुवा, पाहतो..." ते म्हणाले पण त्या आवाजात मला त्रागा, कंटाळा जाणवत होता. सवयीप्रमाणे मी न पाहताही ओळखले की, ह्यांच्या कपाळावरील आठ्यांचे जाळे अधिकच घट्ट झाले असणार. काही वेळातच ह्यांनी अर्धवट उघडलेल्या दारातून 'घे' असे म्हणत बाटली आत सरकवली. मी ती घेतली. तुम्हाला सांगते, तो स्प्रे फवारणीसाठी मी हातात घेतला आणि बघताच एवढे दचकले म्हणता विचारू नका..."
"का हो, काय झाले?" माझ्या बायकोने विचारले
"काय होणार? अहो, यांनी मला चक्क 'हिट' ची बाटली दिली होती हो."
"काय? हिट? तुम्हाला दिले...तुम्हाला? म्हणजे तुम्ही काक्रोच असल्याप्रमाणे..." असे विचारता ना मी स्वतःला थांबवू शकलो नाही... हसायला लागलो.
"हसू नका. अगोदर स्वतःकडे आणि स्वतःच्या गुणांकडे पहा. तुम्ही काय दिवे लावता हे मला माहिती आहे. तुम्हाला सांगते वहिनी, एकेदिवशी ह्यांना म्हणाले की... म्हणजे स्नानासाठी न्हाणीघरात गेल्यावर मला आठवले की, दात घासायचे विसरूनच गेले म्हणून ह्यांना टुथपेस्ट आणायला सांगितले तर यांनी काय दिले असेल तर चक्क ह्यांचे दाढीचे क्रीम आणून माझ्या हातात थोपवले की हो..."
"अग, आई ग्ग! काय सांगता तुम्ही? घरोघरी वेंधळेच! तर कसेबसे आम्ही दुपारी लग्नाला जाऊन परतलो. सकाळी एवढे सारे घडल्यानंतर सायंकाळी पुन्हा तोच प्रकार म्हणजे ह्यांचा वेंधळेपणा! काय झाले, येताना आणलेल्या भाज्या निवडत बसले. भाज्या निवडून झाल्या. बसून बसून मांड्यांना कळ लागत होती म्हणून जरा मोकळे बसले. निवडलेल्या भाज्यांचा कचरा समोर पडला होता यांना म्हणाले की, अहो, जरा हा कचरा डब्यात टाका आणि निवडलेल्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवा. एकदाचे आमचे साहेब उठले. ते कचरा गोळा करताना आराम मिळेल यादृष्टीने मी मागे असलेल्या सोफ्याला टेकून बसले आणि डोळे मिटून घेतले. काही क्षणातच डोळे उघडले. समोर पाहिले तर सारे काही एकदम चकाचक होते ते पाहून मी म्हणाले की, अरे वा! किती छान हो. किती स्वच्छ केलेत तुम्ही. तर स्वारी म्हणते कशी, मग काय? तू कचरा करायचा आणि मी तो आवरायचा हे ठरलेलेच. साहेबांच्या अशा विनोदी लेबल लावून आलेल्या खोचक टिपणीमुळे मी हसत हसत उठले आणि स्वयंपाक घरात गेले. पाहते तर फ्रीजचे दार उघडे होते. फ्रीजसमोर भाज्यांचा कचराच कचरा पडला होता. मला वेगळीच शंका आली. मी फ्रीज उघडून पाहिले. त्यातली पिशवी बाहेर काढली. त्यात डोकावले. पळतच बाहेर आले. कचराकुंडी बघितली तर त्यात साऱ्या निवडलेल्या, निसलेल्या भाज्या जणू मला वाकडे दाखवत होत्या, खिजवत होत्या."
"मग?" आमच्या सौ.ने विचारले
"मग काय? हे तुला सांगावे लागेल का? तुझ्यासारखाच एकतर्फी शब्दास्त्रांचा वर्षाव झाला असेल." मी म्हणालो आणि आम्ही तिघेही हसू लागलो. एकसाथ दोन लालसर झालेले चेहरे पाहून मी तृप्त होत असताना हसतहसत सौभाग्यवती म्हणाली,
"आमचे हेही अस्सेच आहेत. अहो, विषय निघाला आहेच म्हणून काल दुपारचीच गोष्ट सांगते. यांनी सामान आणले होते. दुपारी मला जरा मळमळल्यासारखे वाटले म्हणून मी यांना म्हणाले की, तुम्ही आणलेल्या सामानात शितपेयाची बाटली आणली असेल तर जरा आणून द्याना. पेपर वाचण्यात गुंग असलेले आमचे नवरोबा एकदाचे उठले आणि चरफडत आत जाऊन बाटली आणली. यांची चाहूल लागली म्हणून मी हात पुढे केला. माझ्या हातात बाटली कोंबली आणि निघाले की. मी त्या बाटलीकडे पाहिले आणि एखादा बाँब पडावा अशी माझी अवस्था झाली हो. यांचा धांदरटपणा काय सांगू? यांनी माझ्या हातात हार्पिकची बाटली कोंबली होती हो..."
"काय? अहो, तुमच्या नवऱ्याने हार्पिकची बाटली देत तुमचे हार्दिक स्वागत केले असणार..." शेजारीन हसतहसत म्हणाली आणि घरी निघाली...
@ नागेश सू. शेवाळकर