Ek patra... Sankalpaas in Marathi Letter by Nagesh S Shewalkar books and stories PDF | एक पत्र... संकल्पास

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

एक पत्र... संकल्पास




** एक पत्र...संकल्पास !**
प्रती,
अतिप्रिय संकल्प,
स. न. वि. वि.
अनेक महिन्यांपासून तुला पत्र लिहावे असा 'संकल्प' केला होता. परंतु संकल्पपूर्तीचा योग साधला जात नव्हता. नेहमीप्रमाणे 'आता लिहू, थोड्या वेळाने लिहू, आज....उद्या लिहू...' असे करताना संकल्पपूर्तीसाठी आजचा दिवस उजाडला. लिहायला तर सुरुवात केली आहे पण पूर्तता कधी होईल, पूर्णत्वास जाईल का?, जाईल किंवा नाही हे मी तरी सांगू शकत नाही. कारण आम्ही माणसं 'आरंभशूर!' कोणत्याही गोष्टीची सुरुवात नेहमीच धूमधडाक्यात करतो परंतु आमच्या आरंभशूरतेला 'आळस' हा वैरी कायम चिकटलेला असतो. कोणत्याही गोष्टीची सुरुवात अगदी मोठमोठ्या योजनांची सुरुवातही आम्ही वाजतगाजत करतो परंतु आळस आणि भ्रष्टाचार यामुळे आमच्या अनेक योजना रखडतात. वर्षानुवर्षे धूळ खात पडतात. शेवटी वेळ अशी येते की, त्या प्रकल्पाचा अंत होतो. हेच आमचे तुझ्यावरील प्रेम!
एखादी नवीन गोष्ट दिसली, आवडली, भावली की ती गोष्ट आमच्या घरात, शहरात आणण्याचा आम्ही संकल्प करतो. केलेल्या संकल्पाची घोषणा करतानाचा आमचा आवेश म्हणजे जणू काय प्रत्यक्ष सीमेवर निघालो असल्याप्रमाणे! पण आमच्या कचखाऊ वृत्तीमुळे अंमलबजावणीसाठी मात्र वर्षानुवर्षे आम्ही काहीही करत नाहीत. उलट तेच तेच संकल्प पुन्हा पुन्हा करतो. वाईट व्यसनं लावून घेणे, त्याच्या आहारी जाणे हे आमच्या रक्तातच भिनले आहे. कधी तरी, कोणाच्या आग्रहाखातर, व्यसनाचे दुष्परिणाम जाणवू लागताच आम्ही त्या व्यसनापासून कधी मनोमन, कधी जाहीरपणे, तर कधी अत्यंत प्रिय अशा व्यक्तीची शपथ घेऊन दूर जाण्याचा संकल्प करतो. चार-आठ दिवस त्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी वाटचालही करतो परंतु पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, ये रे माझ्या मागल्या!आम्ही लालसेपोटी, वासनेपायी, लालचेसमोर नतमस्तक होऊन हे संकल्पा तुला चक्क विसरून जातो. तुला खरे सांगू का संकल्पा, अगदी ईश्वराच्या शपथेचाही आम्हाला विसर पडतो. शपथ घेण्यासाठी हक्काचे, सहजासहजी सापडणारे कुणी असेल तर तो परमेश्वर! देवाची मूर्ती समोर नसतानाही आम्ही ईश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतो, संकल्पा, तुला आवाहन करतो. परंतु कसचे काय? पूर्ततेसाठी बोंबाबोंब! एखादी गोष्ट करायची नाही असा संकल्प केला ना तर नेमकी तीच गोष्ट एक सारखी समोर येते, आमच्या सहनशक्तीला, संयमाला आवाहन करते आणि मग आम्ही सारे विसरून त्या गोष्टीला कवेत घेण्यासाठी तडफडतो, तळमळतो. एक वेळ अशी येते संकल्पा, ज्याला आम्ही वाजतगाजत आणले त्या तुलाच आम्ही विसरून जातो. घेतलेल्या शपथेकडे, केलेल्या निर्धाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून आम्ही वाहवत जातो. संकल्पनेला पूर्तीची जोड मिळत नाही. एखाद्या त्रासदायक गोष्टीचा त्याग करणे या संकल्पनेला कुकल्पनेत परावर्तीत करण्याचा जणू आम्हाला शापच असतो.
संकल्पा तुला आवाहन करण्याचा हमखास असा बळीचा बकरा म्हणजे नववर्षाची पहाट! सरत्या वर्षाच्या अंतिम आठवड्यात आणि शेवटच्या दिवशी आम्ही सारे मिळून शेकडो संकल्प करतो. हे करताना ज्या गोष्टीचा त्याग करायचा आहे, त्याच गोष्टीच्या मांडीवर बसून, पदराआड लपून आम्ही शपथ घेतो. किती दिवस टिकतात हे संकल्प? किती काळ आम्ही निर्धाराने त्या रस्त्यावर चालतो? फार कमी दिवस! नियमाला अपवाद असतात त्याप्रमाणे केलेले संकल्प प्रामाणिकपणे पाळणारे लोक आहेत परंतु अशा मानवांची संख्या फार कमी. मोह! संकल्पपूर्तीच्या आड येणा फार मोठा दुर्गुण आहे. मोहाच्या आहारी जाऊन, मोहाला बळी पडून, संकल्पाला मूठमाती देत आम्ही पुन्हा त्याच मार्गाने जातो. कुणी लपतछपत जाते, कुणी उजळ माथ्याने जाताना स्वतःच केलेल्या संकल्पांना पायदळी तुडवताय. संकल्प मोडणे म्हणजे काय तर एक प्रकारची फसवणूकच, आणि फसवणूक म्हणजे काय तर दुसऱ्या शब्दात चोरी! नववर्षाच्या निमित्ताने केलेल्या संकल्पाची कुणी आठवण दिली तर आम्ही तिकडे सोईस्करपणे कानाडोळा करतो. स्वतः केलेल्या संकल्पाचे, तुला घातलेल्या साकड्याचे स्मरण पुन्हा केव्हा होते तर दुसऱ्या नवीन वर्षाच्या आगमनाची चाहूल लागते तेव्हा! परत नव्या जोमाने एखाद्या संकल्पाची तयारी होते. संकल्पांची यादी तयार होत असताना भूतकाळात केलेल्या संकल्पांची उजळणी होत नाही, स्मरण येत नाही. गत् वर्षी कोणता संकल्प केला होता, कशापासून दूर जायचे होते, कोणती गोष्ट वर्ज्य करायची होती याचे विस्मरण झालेले असते. पूर्वी केलेल्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी काय प्रयत्न केले, कोणते नियोजन केले, किती प्रमाणात यशस्वी झालो हे तपासताना अयशस्वी झालो असेल तर त्याची कारणमीमांसा होते काय? आश्चर्याची गोष्ट अशी की, विस्मरणात गेलेल्या जुन्या संकल्पाला नव्याने वाजतगाजत, नाचत-ओरडत आवाहन करतो आणि नवीन वर्षात महत्त्वाचा संकल्प केला अशी शेखी मिरवत राहतो.
हे संकल्पा, मी तुला नव्याने काय सांगू? तुझी अशी अवह, फसगत, अपमान आम्ही पदोपदी करत असतो परंतु संकल्पा, तुझ्या संयमाला, तुझ्या दातृत्वाला, तु मनाच्या मोठेपणाला सलाम! आम्ही तुला वारंवार बाहेरचा रस्ता दाखवत असताना तू मात्र झालेला अपमान विसरून नव्या जोमाने, नव्या स्फूर्तीने आमच्या मदतीला धावून येतो. खरे तर संकल्पा, तू आम्हा मानवासाठी एक स्वप्नच आहे. एखादा संकल्प केला की, त्या संकल्पपूर्तीचा आनंद आम्ही स्वप्नात मिळवतो. वास्तव काही वेगळेच असते. एक मात्र निश्चित, संकल्पा, तू प्रसन्न झालास ना की, पूर्तीचा आनंद काही वेगळाच असतो. संकल्पपूर्तीमुळे जीवनात पूर्णत्व आल्याचे समाधान मिळते.
मित्रा संकल्पा, तुझी ऐसीतैशी का होते माहिती आहे? आम्ही केलेले संकल्प यशस्वी का होत नाहीत तर संकल्पा, आवाक्याबाहेर असलेले संकल्प निभावण्याची शपथ आम्ही घेतो. 'अंथरूण न पाहता पाय पसरण्याची वृत्ती' हा मानव जातीला मिळालेला शाप आहे. सहज, सोपे, विनासायास पूर्णत्वाला जाऊ शकतील असे संकल्प करणे अनेकांना कमीपणाचे वाटते.
हे संकल्पा, दरवर्षी तुझे आवाहन करणे, तुला पाचारण करणे नंतर तुला अर्ध्या ताटावरुन उठवून तुझी रित्या हाताने बोळवण करणे हे आजकाल मला स्वतःला अपमानास्पद वाटते. म्हणून मी ठरवलय संकल्पा, यानंतर कधीच कोणताही संकल्प, निर्धार करायचा नाही. शपथ घ्यायची नाही. उगाच तुझ्या मानगुटीवर बसून नुसती शेखी मिरवायची नाही. स्वतःचा उदोउदो करुन घ्यायचा नाही. नाही म्हणजे नाही........ यानिमित्ताने ही शब्द सुमने अर्पण करतो...
** स्वागत नववर्षाचे!**
आयोजन नव संकल्पाचे
चाळून बघा पान गत् वर्षाचे।
काय केला होता संकल्प
झाला का पूर्ण वा तरी अल्प।
किती दिवस बाळगून उराशी
वागलो का संकल्पानिशी।
वाटत असेल खरेच
नेले का पूर्णत्वास तेच।
मग योजा आता आज
जे जाईल तडीस खास।
नसेल पूर्ण होत प्रतिज्ञा
करू नका ग अवज्ञा।
चालू द्या आहे तोच क्रम
नको उगीच कोणता भ्रम।
तुझाच,
तुला नित्यनेमाने आवाहन करणारा एक
नागेश सू. शेवाळकर
थेरगाव, पुणे ४११०३३