Pyar mein.. kadhi kadhi - 8 in Marathi Love Stories by Aniket Samudra books and stories PDF | प्यार मे.. कधी कधी (भाग-८)

Featured Books
  • 99 का धर्म — 1 का भ्रम

    ९९ का धर्म — १ का भ्रमविज्ञान और वेदांत का संगम — 𝓐𝓰𝓎𝓪𝓣 𝓐𝓰𝓎...

  • Whispers In The Dark - 2

    शहर में दिन का उजाला था, लेकिन अजीब-सी खामोशी फैली हुई थी। अ...

  • Last Benchers - 3

    कुछ साल बीत चुके थे। राहुल अब अपने ऑफिस के काम में व्यस्त था...

  • सपनों का सौदा

    --- सपनों का सौदा (लेखक – विजय शर्मा एरी)रात का सन्नाटा पूरे...

  • The Risky Love - 25

    ... विवेक , मुझे बचाओ...."आखिर में इतना कहकर अदिति की आंखें...

Categories
Share

प्यार मे.. कधी कधी (भाग-८)

आयुष्य कध्धीच.. कुणासाठीच.. कश्यासाठीच थांबत नाही का?
आपला म्हणवणारा वेळ, खरंच आपल्यासाठी असतो का?
क्षुद्र.. किडुक-मिडूक भासणारा सेकंदकाटा सुध्दा आपण थांबवु शकत नाही का?

दिवस भराभर पलटत होते.. नेहाचं लग्न झालं त्याच्या दुसर्‍याच दिवशी.. रविवारी.. वाटलं होतं आजचा मोकळा वेळ आपला जिव घेणार, पण झालं उलटच.. जरा कुठं आवरुन होतं नाही तोवर.. विनीतचा, ऑफीसमधल्या कलीगचा फोन आला..

“अरे कस्टमर इश्यु आहे.. पट्कन लॉगीन कर.. तुला ब्रिफ करतो…”

हाय.. हॅलो.. गुड मॉर्नींग कसलीही फॉर्मॅलीटी न करता तो म्हणाला ह्यावरुनच ‘आग लागलेली आहे’ ह्याची जाणीव झाली.
‘कस्टमर हा भगवान असतो’ असं आम्ही सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत म्हणतो आणि बर्‍याच वेळा ते पाळतोही.. किंवा पाळावे लागतेच.

लगेच लॅपटॉप समोर ओढला आणि व्हिपीएन टनेलला कनेक्ट केले. विनीत ऑनलाईन होताच. त्याने पट्कन इश्यु एक्स्प्लेन केला.

माझ्याच मॉड्युलमध्ये ‘बग’ होता.. नेहाने जेंव्हा एन्गेजमेंटची बातमी दिली होती त्याच्या दुसर्‍या का तिसर्‍या दिवशीचे माझे चेक-इन होते.. थोडक्यात मीच माती खाल्ली होती.

नेहाची त्या दिवशी आठवण झाली ती तेवढीच.. नंतर मी पुर्णपणे कामात बुडुन गेलो. पटापट डिबगर लाऊन कोड-चेंजेस केले, एक युनिट-टेस्ट मारली.. तोपर्यंत विनीतने ‘आशनाला’, आमची टेस्ट-लिड.. तिला कॉलवर घेतलं होतं.

तुझी चुक-माझी चुक असल्या फालतू फंदात न पडता फटाफट टेस्ट रन केल्या आणि संध्याकाळपर्यंत पॅच रिलिज पण करुन टाकला.

रात्री झोपेपर्यंत कस्टमरची अ‍ॅप्रीसिएशनची मेल सुध्दा आली होती.

वाटलं होतं.. आयुष्य खुप सोप्प आहे, पण तसं नसतं बहुदा.. मनाला कितीही समजावलं तरीही का कुणास ठाऊक, नको त्या वेळी ते आपलं शत्रुच बनुन रहातं. ऑफीसमध्ये एका मित्राकडे ‘चंद्रशेखर गोखलेंच’ ‘मी-माझा’ पुस्तक बघीतलं आणि सगळं वाचुन काढलं..

वाटलं.. ह्या कवि-लोकांच कित्ती बरं असतं नै. मनातल्या भावना सहजतेने कागदावर उतरवुन मोकळे होतात.

मी मनसोक्त रडून घेतो,
घरात कुणी नसल्यावर,
मग सहज हसायला जमत,
चारचौघात बसल्यावर…..!!!!!
अगदी माझ्या मनातलंच ओळखून जणु त्यांनी शब्दबध्द केल्ं होतं.. किंवा हे –

हल्ली मी आरशात पाहायचं टाळतो,
कारण…नसते प्रश्न उभे राहतात,
हल्ली माझेच डोळे माझ्याकडे,
अगदी अनोळख्या नजरेने पाहतात !!
असं म्हणतात की प्रेमात पडल्यावर किंवा ब्रेक-अप झाल्यावरच प्रत्येकाला कवितांचे अर्थ उमजु लागतात..
माझंही कदाचीत तसंच झालं होतं.


दोन आठवडे उलटले असतील. माझा आणि प्रितीचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. आणि होणार तरी कसा? आमच्या दोघांमधला कॉमन दुवाच मिटला होता. ‘सिटी-लायब्ररीला’ जाणे हा एक पर्याय माझ्याकडे होता.. पण जेथे माझी मलाच किव येत होती.. तेथे असला दिनवाणा चेहरा तिच्या समोर घेऊन जायची मला आजिबात इच्छा नव्हती.

आणि एके दिवशी अचानक नेहाचा फोन आला..

“हाssssय तरुण…”, नेहा नेहमीच्याच बबली आवाजात बोलत होती..
“हाय नेहा…”, नेहमीची ‘डार्लिंगची’ जागा आज त्या ‘हाय’ मध्ये नव्हती..”हाऊ आर यु? आहेस कुठे??”
“आय एम जस्ट फाईन.. कॉलेज जॉईन केलं आज.. लंचला भेटतोस?”, नेहा
“अम्म.. लंच नको, दुपारी लगेच काही मिटींग्ज आहेत, लंचला भेटलो तर परत ऑफीसला यायला उशीर होईल..”
“ओके.. निदान कॉफी???”

खरं तर तिला भेटायची मला इच्छा नव्हती. पण मी लग्नालाही गेलो नव्हतो.. थोड्यावेळ भेटून यायला काही हरकत नव्हती. आणि कुणास ठाऊक, कदाचीत तिथे प्रिती असेलही असा विचार मनात येऊन गेला.

“ओके.. १२.३०ला भेटू”, असं म्हणून फोन ठेऊन दिला

नेक्स्ट रिलीज संध्याकाळी द्यायचे होते. फ्रेशर्सना युनिट टेस्टींगला लाऊन दुपारी बाहेर पडलो.


दुर्दैव माझी पाठ सोडायला तयार नव्हते. कॉलेजपाशी नेहा एकटीच होती.

नेहा बाकी मस्त दिसत होती. सिंदुर, हातात चमचमत्या बांगड्या, बर्‍यापैकी मोठ्ठ मंगळसुत्र, ब्राईट निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस. इन्फॅक्ट थोडं पुट-ऑन पण केलं होतं.

देअर वॉज नो हग धिस टाईम..

“हाऊ वॉज ईट?”, कॉफी ऑर्डर केल्यावर मी विचारलं
“हाऊ वॉज व्हॉट? वेडींग ऑर हनीमून?”, डोळे मिचकावत नेहा म्हणाली..
“अम्म.. दोन्ही?”

“दोन्ही मस्त.. लग्न छानच झालं.. तु हवा होतास.. बट एनिवेज.. हनीमुनही मस्त.. आम्ही मॉरीशसला गेलो होतो..”
“मॉरीशस.. वॉव्व.. ऑस्सम..”

“हो.. व्हर्जीन बिच, ब्ल्यु कलर्ड वॉटर.. लेस क्राऊडेड क्लिन रोड्स…”, पुढची दहा मिनीटं नेहा मॉरीशसबद्दलच बोलत होती..काय काय खाल्लं, कुठे फिरले, काय बघितले, तेथील हॉटेल्स, तेथील कल्चर वगैरे वगैरे

मी सॉल्लीड बोअर झालो होतो.

“अजून काय विशेष? सेटल झालीस नवीन घरी?”, मी विषय बदलत म्हणालो
“नाही रे, १५-२० दिवसांत काय सेटल… ”

“तुमचं नारायणगावाला आहे ना घर? मग आता कॉलेज?”
“हो, मग आता काही दिवस इकडे आई बाबांकडे, काही दिवस तिकडे अस राहणार, ऑक्टोबर ची सेम झाली कि मग क्रिसमस पर्यंत तिकडे आणि मग परत जानेवारी ते मार्च, परीक्षा संपेपर्यंत आईकडे, असले उद्योग करावे लागणारे.”

“अरे बापरे, नसता उद्योग. पण तुला कधी पासून कोलेजची गोडी लागली, आधी तर कधी अटेंड नव्हती करत”
“कॉलेज तर उगाच आपलं कारण रे, अजून इतक्या लवकर संसार, घर वगैरे नको वाटतंय. तिथे कुठे आड-बाजूला जाऊन राहायचं. इथे असले कि तुम्ही पण सगळे भेटाल ना. ”

“हम्म .. मग? उद्यापासून रेग्युलर कॉलेज सुरु?”
“नाही नाही, उद्यापासून लगेच नाही, एक महिना तरी नाही अजून. तिकडे अजून काही रिसेप्शन्स, काही पूजा राहिल्यात, मग सगळे देव-दर्शन, त्यांचे फार्म हाउस आहे, तिकडे काही दिवस, सो दीड-महिन्यांनी कॉलेज सुरु करेन, तेच अप्लिकेशन द्यायला आले होते ऑफिसला.”

“ए मी तुला माझे मौरिशस चे फोटो पाठवते, यु नो, पूर्ण वेळ मी शौर्ट्सवरच होते.”
“आई शप्पथ, फक्त शौर्ट्सवरच?”
“गप्प बस मूर्ख, काही बोलतो, टी-शर्ट होता वरती”
“अच्छा अच्छा, नाही तिकडे न्यूड बिच वगैरे असतात असे ऐकून होतो म्हणून म्हणल”

“आय मिस्ड यु तरुण.. तु असतास तेथे तर अजुन मज्जा आली असती…”

तिच्या नजरेत त्या जुन्या नेहाचे भाव क्षणभर चमकुन गेले..

तो क्षण खुप्पच सेन्टी होता.. इतर कुठल्याही दिवशी मी तिला जवळ घेतले असते.. किंवा मिठी मारली असती. पण आज… आज समोर बसलेली नेहा माझी नव्हती.

“मला यायला काहीच प्रॉब्लेम नव्हता.. पण तुझ्या नवर्‍याला चाललं असतं का ते?”, मी वातावरण थोडं नॉर्मल करत म्हणालो..

नेहा नुसतीच हसली.

“आमचे हे म्हणजे अगदीच अन-रोमांटीक आहेत. आपण किती किती वेळ गप्पा मारायचो नाही? कुठल्याही विषयावर बोलताना अस कधी ऑकवर्ड वाटायचं नाही”, नेहा थोड उदास होत म्हणाली
“अरे थोडा वेळ तर दे त्याला. त्याला काय माहित तू कशी आहेस ते!”

“आय नो, खर तर वेळ त्याला नाही, मला लागणार आहे जुळवून घ्यायला, आय विल मिस यु तरुण. ” आणि मग तिने पर्समधुन फोन काढुन एक नंबर फिरवला.. “भैय्या.. चलो.. आय एम वेटींग..”

“तुझा नवरा आलाय इथे?”, खुर्चीतून उडत मी म्हणालो
“नवऱ्याला भैय्या म्हणेन का मी? ड्रायव्हर आहे..”

“क्या बात है शौफ़र ड्रिव्हन कार एन्ड ऑल..”

मी बिल पे करण्यासाठी पाकीट काढलं तसं मला थांबवत ती म्हणाली.. “इतके दिवस तुच पे करत होतास.. आज माझी टर्न..” नेहाने तिच्या वॉलेटमधुन पैसे काढुन टेबलावर ठेवले..

तिचं वॉलेट १००-५०० च्या नोटांनी खच्चाखच्च भरलेलं होतं..

“चल निघुयात?”,नेहा खुर्चीतून उठत म्हणाली

“हे.. बाय द वे.. लग्नाचे फोटो?”
“अरे.. इतक्यात कुठले? अजुन एक महीना तरी जाईल अल्बम यायला..”

“पण डिजीटल असतील की कुणीतरी काढलेले..”
“हो.. प्रितीकडे आहेत, तिने सेल मधुन काढले होते त्या दिवशी.. मी एक काम करते.. तिला व्हॉट्स-अ‍ॅपवर पाठवायला सांगते.. आणि मग तुला फॉर्वर्ड करते.. ओके?”

“इतका कश्याला उपद्याप? ती काय मला ओळखत नाही का? सरळ मलाच पाठवायला सांग ना..”

“ओके.. नंबर देते तुझा मी तिला.. ती करेल फॉर्वर्ड..”
“माझा आहे नंबर तिच्याकडे.. त्या दिवशी नाही का तिने फोन केला होता..”
“त्या दिवशी? कधी?”, नेहाने चमकुन विचारले..

मला एकदम माझी चुक लक्षात आली..लग्नाच्या दिवशी प्रितीने मला फोन केला होता, आम्ही भेटलो होतो, मी कार्यालयाच्या समोरच होतो वगैरे गोष्टी नेहाला ठाऊक नव्हत्या.

“ओह राईट.. तिच्याकडे कुठुन माझा नंबर असणार? ठिक आहे.. तु दे नंबर तिला.. नक्की पाठवायला सांग पण..”, मी सारवासारव करत म्हणालो..

ती अजुन काही बोलणार एव्हढ्यात बाहेर हॉटेलच्या दाराशी पांढरी स्कॉर्पीओ येऊन थांबली..

काही क्षण.. काहीही नं बोलता आम्ही एकमेकांकडे बघीतलं आणि मग ती गाडीत बसुन निघुन गेली.


आयुष्य खरंच खूप निरस झालं होतं.

नो गर्ल-फ्रेंड, बिझी फ्रेंड्स, लॉट्स ऑफ़ वर्क आणि कंटाळवाणे विकएन्ड्स.
फिफा-वर्ल्डकप चालु असल्याने ऑफीसमध्ये दुसरा कुणालाही कुठलाच विषय नव्हता. आणि मला फुटबॉल किंवा फिफा मध्ये इंटरेस्ट नसल्याने त्यांच्या बोलण्याचा काहीही गंध लागत नव्हता.

गाणी ऐकणं, पुस्तकं वाचणं असले रिकामटेकडेपणाचे उद्योग करण्याचाही कंटाळा आला होता. पाऊस नसल्याने ट्रेक्सचे प्लॅनही बारगळले होते.

सगळंच कसं असं मनाविरुध्द्द चाललं होतं.

आणि एकदिवस प्रितीचा व्हॉट्स-अ‍ॅपवर मेसेज आला..

“हाय तरुण.. प्रिती हिअर..”

पेरण्या खोळंबलेल्या शेतकर्‍याला पावसाचं आगमन कसं वाटावं.. तप्त उन्हाच्या दुपारीनंतर अचानक आकाशात मेघांनी दाटी करावी आणि मोराने पंख पसरवुन गडगडत्या आवाजावर तालं धरावा..रिमीक्सची कर्णकर्कश्श गाणी ऐकुन विटलेल्या कानांना वसंतोत्सव अनुभवायला मिळावा.. अगदी तस्सच काहीसं वाटलं..

मी पट्कन तिचा नंबर सेव्ह करुन ठेवला..

“हाय..”
“नेहाच्या लग्नाचे फोटो आहेत.. पाठवू ना?”

मी उगाचच दोन मिनीटं वेळ घेतला आणि मग म्हणालो.. “हम्म…”

खरंच.. टी.व्ही. वर ती जाहीरात दाखवतात ना.. ‘मेन विल बी मेन’ तस्संच.. कध्धी.. सुधरणार नाही.. नौटंकी करण्यामध्ये अव्वल नंबर..
प्रितीने १५-२० फोटो पाठवुन दिले.

मला ती लिंक तेथेच तोडायची नव्हती

“वॉव्व.. मस्त कॅमेरा आहे तुझ्या सेलचा.. कुठला आहे फोन?…”,मी उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून

..आणि अश्या रितीने आमच्या व्हॉट्स-अ‍ॅप चॅटला सुरुवात झाली..पुढे घडणाऱ्या घटनांची ती एक सुरुवात होती


पुढे काय होणार.. सगळ्यांनाच उत्सुकता आहे..एक नातं तुटलं आणि दुसरं नातं जोडलं जात होत. कधी? कसं? वगैरे प्रश्न आहेतच, ज्याची उत्तर येणारा भाग देईल.. एक मस्त रोमॅन्टीक फिल देण्याचा प्रयत्न आहे.. यशस्वी होतो.. की नाही ते नक्की सांगा. पुढचा भाग एकद्दम नविन आहे, जुन्या इंग्रजी कथेत नसलेला.. आशा करतो तुम्हाला आवडेल..

तो पर्यंत..
[क्रमशः]