आदल्या दिवशीच , विनयने काही ठरवलं होते. तशीच तयारी करून तो निघाला ऑफिसच्या दिशेने. वाटेत दिक्षा दिसली चालताना. बुलेट तिच्या समोरच थांबवली.
" काय मॅडम ... कधी पासून हाक मारतो आहे.. एवढं काय लक्ष नाही तुझं... " दिक्षाने पाहिलं त्याच्याकडे आणि कानातले इअरफोन काढले.
" हे होते ना कानात .... बोल... काय बोलत होतास ... " ,
" मी बोललो .... ऑफिस मध्ये चालली आहेस ना.. बस मागे... जाऊ एकत्र... " तिने एकदा विनयकडे पाहिलं आणि नंतर बुलेटकडे.
" नको ... राहू दे... चालत जाऊ शकते मी... " दीक्षाने पुन्हा इअरफोन लावले कानात आणि चालू लागली. विनयने पुन्हा गाडी सुरु केली , तिच्या पुढयात थांबवली...
" अरे !! ... आपण एकत्र ... एकाच ऑफिस मध्ये काम करतो ... आहे ना लक्षात... " ,
" हो... आहे लक्षात.. पण मला चालत जायचे आहे.. "
काय बोलू हिला.. विनयने गाडी सुरु केली आणि आला ऑफिस मध्ये. त्याच्या डोकयात काही सुरु होते काल पासून.. पटापट कामाला लागला. " चंदन.. चल.. मिटिंग आहे.... " विनयने चंदनला कामातून जागे केले. " कुठे मिटिंग आहे... " , " मेल नाही आला का तुला... नीट बघ... " चंदनने मेल बघितला. " एक काम कर... तू पुढे हो... मी येतोच मागून... " चंदन ठरवलेल्या रूममध्ये जाऊन बसला. थोड्यावेळाने हेमंत आला , त्याच्या ५ मिनिटांनी अनुजा आणि काही वेळाने दिक्षा.. सर्वात शेवटी ... विनय अव्याला घेऊन आला. विनयने दरवाजा आतून लावून घेतला.
हे सगळे एकमेकांकडे बघू लागले. विनय एका खुर्चीवर जाऊन बसला आणि मोबाईल वर गेम खेळू लागला. कोणालाच काही कळेना. मिटिंग कुठे आहे. आणि हे बाकीचे कुठून आले. हाचं प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर. त्यात विनय एकटाच एका कोपऱ्यात. अवि गेला तणतणत त्याच्याकडे.
" काय रे शान्या... मिटिंग होती असा मेल केला होतास ना ... कुठे आहे मिटिंग... ",
" थांब जरा... " विनय गेम मधेच गुंतलेला. अर्थात याचा राग आला सर्वाना.
" काय फालतुगिरी लावली आहेस विनय. " हेमंतचा आवाज सुद्धा वाढला.
" High score !! " विनय आनंदाने ओरडला. चंदनने डोक्याला हात लावला.
" म्हणजे तूच सगळ्यांना मेल केलेस ??? ... काय गरज होती अशी खोटेपणा करायची... " दिक्षा बोलली.
" एक मिनिट थांबा जरा ... आणि खाली बसा... " विनय शांतपणे बोलला.
" मला नाही थांबायचे ... दुसरी important कामं आहेत मला. " अनुजा निघाली. दरवाजा बंद . तिच्या मागोमाग हेमंत आला. त्याने try केले दरवाजा उघडायला. नाहीच उघडला.
" नाही उघडणार... मी लॉक करून चावी माझ्याकडे ठेवली आहे. बसा... आणि हीच मिटिंग आहे.... बसून घ्या... " नाईलाजाने सर्व बसले पण एकमेकांपासून दूर. चंदन विनयजवळच बसला होता.
" का करतो आहेस हे ... " चंदन बोलला. तस विनयने त्याला गप्प केले.
" चला ... मिटिंग मीच arrange केली आहे. मीच सुरु करणार आहे. तर चला, सुरु करूया. मिटींग आहे ती काही वर्षांपूर्वी झालेल्या misunderstanding ची. " यावर अवि तापला.
" विन्या ... काय बोलतो आहेस तू.. कळते ना.. " विनयने ऐकून घेतलं.
" अविनाश ... बस खाली. please, बोलू दे मला... " विनय बोलला तरी अविनाश हेमंतकडे रागाने बघत खाली बसला.
" आठवतो का तो दिवस.. २६ जानेवारी.. हा.. त्याच दिवशी झालेली भांडणे. " विनय सर्वाकडे पाहत म्हणाला.
" सगळयांना पटलेले दिसते.... तर त्याच दिवसापासून थोडं मागे जाऊ... त्यात मी सर्वाना आता छान ओळखतो. चांगली मैत्री झाली आहे माझ्याशी. तुम्हीही सारे मित्र होता एकमेकांचे... so , प्रत्येकाला काही विचारीन , त्याचे उत्तर स्पष्ठ द्यावे हीच अपेक्षा... " त्याने सर्वाकडे नजर फिरवली.
" पहिला प्रश्न... चंदनला ... आणि खरं सांगायचे हा.. " चंदन आधीच डोक्याला हात लावून बसला होता.
" हो सर... विचारा प्रश्न.. " ,
" exact काय झालं होते त्यादिवशी... " ,
" विनय ... का पुन्हा तेच ते... सोडून दे ना ... " चंदन म्हणाला.
" मला प्रश्नाचे उत्तर पाहिजे आहे... काय झालं होते... " चंदनने सर्वाकडे नजर फिरवली.
" मलाही माहित नाही. मी त्यादिवशी नेमका उशिरा आलेलो. आलो तेव्हाच भांडण सुरु होते या सर्वामध्ये... " ,
" कारण काय होते त्यामागे... " विनयने पुन्हा विचारलं.
" हेमंत अनुजाला लग्नाची मागणी घालणार होता, हीच बातमी आलेली कानावर माझ्या. " हेमंतकडे पाहत बोलला तो. हेमंत काहीच बोलला नाही.
"आता अनुजा ... तुला प्रश्न... तुला का राग आला या गोष्टीचा... कि थेट त्याला कानाखाली मारलीस... " ,
" मग काय करणार ... इतका चांगला मित्र होता तो.. त्याच्या मनात कस येऊ शकते असं माझ्याबद्दल..... एव्हडी close friendship ... म्हणजे मुलं काय मुलींशी मैत्री फक्त लग्नासाठीच करतात का... " अनुजा रागातच बोलत होती.
" cool down ... ".... विनय...
" हेमंतला काही बोलायचे नाही का यावर... " दिक्षा बोलली.
" कशाला लावलीस रे मिटिंग... सगळ्यांत पुन्हा भांडण करायला का साल्या ... " तिथून अवि ओरडला.
" शांत व्हा साऱ्यांनी.. वातावरण तापत चालले आहे.. प्लिज शांत व्हा ".... विनय..
" पण हेमंत आताही काही बोलत नाही आहे... त्यादिवशी सुद्धा गप्प होता. म्हणजे हे सर्व तो एकप्रकारे कबूलच करतो आहे. " ....दिक्षा...
" दिक्षा मॅडम.. नका रागावू... मी सांगतो...त्या दिवसापासून थोडे मागे जाऊया म्हणजे ४-५ दिवस मागे... सांगायचे झाले तर २० जानेवारी... तेव्हा काय झाले होते अनुजा... " विनय तिच्याकडे पाहत बोलला.
" काय ? " ,
" त्या दिवशी बोलली ना ... तुला बघायला आलेले ... घरी... लग्नासाठी... " ,
" विनय !! ... मित्र आहेस म्हणून सांगितलं होते... या personal गोष्टी का आणतोस लोकांसमोर... तुला सांगितलं हेच चुकलं... " अनुजा रागावली पुन्हा.
" लोकं ... ?? मित्रच आहोत सगळे ... बरोबर ना... आणि सांगायचे झाले तर त्याच गोष्टीमुळे तुझा मूड ऑफ होता... "
" हो... मला हे नाही आवडत... कोणीतरी life मध्ये येते अचानक... त्याला न समजता त्याच्याशी लग्न करावे.. मी तयार सुद्धा नव्हते त्या गोष्टीसाठी... दोनदा झालं तसं.. मीच रिजेक्ट केले दोन्ही वेळेला... इतकी घाई झालेली घरी, जशी मी नकोच आहे त्यांना घरात... डोकं सटकलं होते, त्यात हेमंतचे कळलं... मला propose करणार ते. एवढा चांगला मित्र... मनातल्या सगळ्या गोष्टी share करायचे. कधी कधी त्याला माझ्या scooty वरून घरी सोडायचे. मला bore झालं कि त्याला हक्काने कॉफी साठी घेऊन जायचे.. याच्याशी free वागले तर याला वाटलं प्रेमात पडले. राग आला मला. मारली कानाखाली... " पट्पट बोलून टाकलं अनुजाने.
" तुला हेमंत बोलला होता का आधी तसं... तुला मागणी घालणार आहे ते.. " विनयने उलट प्रश्न केला.
" नाही ..but एक मुलगी होती.. परी नावाची... तिने अवि आणि हेमंतचे बोलणं ऐकलं होते. हेमंत अविला सांगत होता. मला २६ जानेवारीला propose करणार ते.. " ,
" मग अविला तरी विचारलं होते का तू... ",
" नाही... का विचारावे झालं ना तेव्हाच... हेमंत सुद्धा काही बोलला नाही त्यादिवसापासून... निदान सॉरी बोलेल असं वाटलं होते.. तेही नाही. मग ते खरच होते. हेच prove झालं. "
" ok ... आता हेमंतची गोष्ट सांगतो. तो काही बोलणार नाही .. मीच सांगतो. " विनय हेमंतकडे पाहत म्हणाला.
" नको विनय ... प्लिज ... " ,
" आताच वेळ आहे , नाहीतर आयुष्यभर असेच गैरसमज राहतील. .. हेमंत त्या काळात ऑफिस मध्ये नव्हता ... बरोबर... ",.... विनय..
" हो.. म्हणजे तो... मला वाटते, १९ जानेवारीला आलेला. त्यानंतर २० जानेवारीला सकाळी आलेला. अवी सोबत काही बोलून निघून गेला. तो थेट, २५ तारखेला आलेला, ते सुद्धा मीटिंग होती म्हणून ... मिटिंग संपली तसा निघून गेला. " चंदनने माहिती पुरवली.
-------------------------- क्रमश: ------------------