Rudra - 5 in Marathi Fiction Stories by suresh kulkarni books and stories PDF | रुद्रा ! - ५

Featured Books
Categories
Share

रुद्रा ! - ५

फोनची रिंग वाजली म्हणून रुद्राने फोन उचलला. अननोन नंबर होता.
"रुद्रा बोलतोय!"
"हो मला माहित आहे! तुझ्या कडे किती पैसे आहेत?"
"साला, कोण बोलतंय? असल्या फडतूस गोष्टीन साठी माझ्या कडे वेळ नाही!"
"असं डोक्यात राख घालून घेण्यात काही अर्थ नसतो. सध्या मला फक्त तीन लाखाचं पाहिजेत! आणि ते तू देणार आहेस!"
"आबे हट !"रुद्रा फोन कट करत म्हणाला.
पुन्हा रिंग वाजली. पण या वेळेस काही तरी मेसेज आल्याची होती.
मेसेज मध्ये केवळ पाच सेकंदाची व्हिडीओ क्लिप होती! रुद्राला दरदरून घाम आला! तो खून करताना त्याने संतुकरावांच्या तोंडावर दाबलेल्या हाताची ती क्लिप होती! त्यात फक्त त्याचा चेहरा दिसत नव्हता. नसता ती क्लिप त्याला फासावर चढवण्यास पुरेशी होती!
पुन्हा रिंग वाजली. नम्बर तोच होता! या वेळेस रुद्राने कॉल रेकॉर्डर सुरु केला!
"रुद्रा, हे फक्त त्या सिनेमाचे टीजर पाठवलंय! सम्पूर्ण मुव्ही इन्स्पे. राघव आवडीने पाहिलं! आणि त्याला तुझ्या पर्यंत पोहचवण्याची मी व्यवस्था नक्कीच करू शकतो! तुझ्या साठी तीन लाख किरकोळ रक्कम आहे. तुला ते हातउसने कोणी पण देईल किंवा ---- जावू दे. मार्ग काढणे तुझा प्रॉब्लेम, मला पैसे हवेत!अर्थात अजून लागले तर काळवीनच म्हणा! लवकरच पैसे कोठे आणि कसे पोहंचवायचे ते सांगीन! तोवर बाय !" फोन कट झाला.
रुद्राने कपाळाला हात लावला! हे नवीनच झेंगट सुरु झाले होते! त्याने नवीन सिगारेट शिलगावली. थोडा शांत विचार करायला हवा. There is always a way! हे त्याचे लाडके तत्व होते. रुद्राने कॉल रेकॉर्डर ऑन केला. एकदा, दोनदा, तीनदा,तो पुन्हा पुन्हा एकला. त्या आवाजात काही तरी ओळखीचे जाणवत होते. चौथ्या वेळेस ऐकताना 'एस!' रूद्रा स्वतःशिच म्हणाला. शंकाच नको तो सोलापुरी हेल! हा कॉल त्या 'सुपारी'वाल्याचाच होता! आता ते पाच फुटी माकड पकडणे गरजेचे होते. एक तर पैसे देऊन 'काम'करून घेतले. त्याची व्हिडीओ करून तो ते पैसे परत मिळवू पहात होता! तेव्हा आश्चर्य याचे वाटले होते कि, इतक्या झटपट कशी डील झाली होती, पण याचा उलगडा आता होत होता! पण व्हिडीओ झालाच कसा? कारण त्या आऊट हाऊस मध्ये cctv कोठेच नव्हता! याची खात्री रुद्राने जातीने करून घेतली होती. आणि शूटिंगचा अँगल पहाता, रेकॉर्डिंग खूप जवळून घेतल्या सारखे दिसत होते. इतके जवळून कि रुद्राच्या हातावरचे केस पण स्पष्ट दिसत होते! अगदी समोरून घेतल्या सारखे! समोर तर फक्त लॅपटॉप, पुस्तक आणि वही होती. लॅपटॉपचा कॅमेरा तर ऑन नसेल? नाही ती शक्यता नाही. कारण तसे असते तर इन्स्पे. राघवने एव्हाना त्याचा फोटो व्हायरल केला असता! मग रेकॉर्डिंग कसे झाले?
काहीही करून त्या सुपारीवाल्याचा बंदोबस्त करणे गरजेचे होते. पण त्याला या विशाल शहरात कोठे म्हणून हुडकावे? आणि कसे? काही क्षणत रुद्रा ताठ झाला. खरे तर हे त्याच्या आधीच लक्षात यायला हवे होते. तो किंवा त्याचा हस्तकआपल्यावर पाळत ठेवून असणार होता! त्याला ट्रेस करणे फारसे आवघड नव्हते.

000

रुद्राला सुपारी दिल्या पासून मनोहर त्याच्यावर लक्ष ठेवून होता. रुद्राच्या फ्लॅट समोरच्या टपरीवर चहा, जवळच्या 'बनारस पान महल' मध्ये पान -तंबाखू. आणि कोपऱ्यावरच्या वडापावच्या गाड्यावर क्षुधा शांती!
भोसेकराच्या चाळीच्या दुसऱ्या मजल्यावर शेवटची खोलीत मनोहर गेल्या आठ -दहा महिन्या पासून भाड्याने रहात होता. भोसेकराच्या गुंड भावाला त्याने वर्षाचे घर भाडे सुरवातीसच देऊन टाकले होते. दर महिन्याला तो तगादा त्याला दारात नको होता. तो सकाळीच घरा बाहेर पडत असे आणि रात्री उशिरा म्हणजे अकराच्या नन्तर परतत असे. त्यामुळे शेजाऱ्यांना त्याचे अस्तित्व फारसे जाणवत पण नसे. हे शहर अक्राळ विक्राळ पसरलेले, पब्लिक ट्रान्सपोर्ट बेभरोश्याचा, म्हणून धावपळी साठी एक जुनाट मोटरसायकल त्याने विकत घेतली होती. तिचा प्रत्येक पार्ट वेगळ्या कंपनीचा होता! इतकेच काय पण नम्बर प्लेट सुद्धा ओरिजिनल नव्हती!
रात्रीचे साडेअकरा वाजले होते. सारी चाळ झोपेच्या आधीन झाली होती. सर्व बिऱ्हाडात अंधार होता. अपवाद फक्त मनोहरची खोली होती. त्यात अजून पिवळा पडलेला चाळीसचा बल्ब जळत होता. त्याच्या खोलीत एक लोखंडी पलंग, त्याच्यावर कापसाच्या गुठुळ्या झालेली गादी. कोपऱ्यातल्या बाथरूम नामक आडोश्याला एक प्लॅस्टिकची बदली आणि मग, इतकीच मनोहरची जंगम मालमत्ता . या गोष्टी त्याने येथेच खरेदी केल्या होत्या. गावाकडून येताना त्याने फक्त एक पत्र्याची ट्रंक आणलेली होती. त्यात चार कपडे, टॉवेल आणि बुडाला बारा लाखाच्या नोटा भरून आणल्या होत्या! आजवर त्यातले निम्मे संपले होते! आजोबा मेल्यावर त्यांचे राहते घर अन सोलापूरच्या विजापूर रोडला लागून असलेली सात एकरचा तुकडा फुकून टाकला होता.
खोलीच्या मध्यभागी तो दोन्ही तंगड्या पसरून बसला होता. समोरच्या कागदावरच्या फरसाणचे बकणे तोंडात कोंबत होता. मधेच गावठी दारूची बाटली तोंडाला लावत होता.
"धूत साली हि जिंदगी! भिकार जीण! त्या थेरड्या मुळे हे दरिद्री जगावं लागतंय! पण वांदा नाही. आपुन पन एक दिवस पैश्याच्या ढिगल्यात लोळणार! चांदीच्या --हाड --सोन्याच्या गिलासात विलायती दारू पिणार! बुढ्या, तुला नाय सोडणार! अन तुझा पैसा पन! माज्या आईचा आणि माझी जिंदगानी बरबाद केल्याचा बदला घेणार!"
त्या नशेत त्याने कॉट खालची पेटी वडून बाहेर काढली. तीच झाकण खाड्कन उघडलं. नोटा खाली तळाला कागदात ठेवलेले जुने पुराने, पिवळे पडलेले काही फोटो त्यात होते. त्यातला एक फोटो त्याने थरथरत्या हाताने डोळ्यापुढे धरला. त्यात एक विशीतली पोरगी आणि वयाने थोडा मोठा असलेला म्हणजे तिशीकडे झुकलेला माणूस तिच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता. त्या फोटोतल्या पोरी कडे तो बराच वेळ टक लावून पहात होता. त्याच्या डोळ्यात पाणी साचूलागले, हुंदका अनावर झाला! ती पोरगी मोहिनी होती,मनोहरची आई!
०००
"मोहिनी, मी उद्या मुंबईला जातोय! चार सहा दिवसात परत येईल." संतुक मोहिनीच्या शेजारी बसत म्हणाला.
"संतू ,तुला मही परिस्थिती ठावंच हाय ! दोन महिन झाल्याती! मह्या पोटातलं बाळ झपाट्याने वाढतंया. लई काळ नाही झाकून रह्यच !" मोहिनी काळजीच्या सुरात म्हणाली.
"हो ग ,मला ठाऊक आहे. नौकरीचा इंटरव्हिव आहे. जाण भाग आहे. तेथून आलो कि तडक तुझ्या घरी येतो अन तुला मागणीच घालतो! मग त झालं? मला नौकरी लागली कि मजेत दोघ मुबईत राहूत! "
" संत्या, त्या चिकन्या गप्पा नग हनूस! लवकर ये बाबा! आजवर काई मागतील नाई, पर आज मागते आपल्या या पेरमाला नात्याचं नाव दे!"
"मोहना, मी हा गेलो अन हा आलो! येताना मंगळसूत्र घेऊन येतो! मग त झालं?"
पण 'हा' गेलेला संतुक परातलाच नाही! चार दिवसात येणारा संत्या, महिना झाला तरी आला नाही! संतू आपल्याला 'टाकून'गेल्याच मोहिनीने डोक्यात घेतले. ती वेडी पिशी झाली. पोटातलं पोर, गावकऱ्यांच्या विचित्र नजरा, आणि प्रश्नांची उत्तर काय देणार?आणि कुणा कुणाला? विश्वासघात, अपमान,असहाय्यता, राग याने तिच्या डोक्यावर परिणाम झाला! तिला खरेच वेड लागले! तिच्या पेक्षा तिच्या बाबाची अवस्था बिकट होती. आईविना मोहिनीला बापाने तळहातावरच्या फोडा प्रमाणे जपली होती. तिचे पोट दिसू लागले तसे त्याच्या हातापायातले बळ गेले. तिने संतुकचे नाव सांगितले ! संतुकला त्याच्या चुलत्याने सांभाळे होते. बाप संतुकच्या चुलत्या कडे जाब विचारायला गेला. "तुझी पोरगी भ्रमिष्ट झालिया! कुणाचं बी नाव घेतीय!" चुलत्याने हात वर केले. गावात फक्त 'मुंबईला गेलाय चार दिवसात परतणार!' संतुकची इतकीच माहित मिळत होती.त्यात 'तो लोकल खाली मेला असेल!' अशी हूल कोणी तरी उठवली. बाप तिला कसेबसे डॉक्टरकडे घेऊन गेला. पण डॉक्टरनी 'मोकळी' करण्यास नकार दिला! कारण ती वेळ टळून गेली होती !
बापाने कशी बशी दोन महिने कळ काढली. एके रात्री घरबार विकून, मोहिनी सकट गाव सोडले! लांब सोलापूरकडे निघून गेला. मोहिनीने एक गोंडस बाळ बापाच्या पदरी टाकलं अन जीव सोडला. जणू त्याच्या जन्मासाठीच ती माउली जगत होती! हि सारी कर्मकहाणी मनोहरला त्याच्या आजोबानी अनेक वेळा सांगितली होती. त्यानेच मोहिनी आणि संतुकचा जत्रेत काढलेला फोटो दाखवत 'हा,हाच तुझा बाप! बेईमान,हरामखोर, उलट्या काळजाचा, तुझ्या, माझ्या आणि तुझ्या आईच्या वनवासाला कारणीभूत झालेला नीच माणूस! याचा बदला घ्यायला हवा! अश्या लोकांची जागा नरकातच! मी आता म्हातारा झालोय, हे काम तुलाच करायचंय!' हे विचार लहानग्या मनोहरच्या कोवळ्या मनावर म्हाताऱ्याने चांगलेच बिंबवले होते!
आजोबा मेल्यावर एक दिवस अचानक 'संतुकराव सहदेव' यांचा ठाव ठिकाणा मनोहरला लागला ! कुठल्याश्या पेपरात संतुकरावची अल्पकाळातील उतुंग भरारीची ती कहाणी होती. त्यात त्यांच्या काही फोटोंचा समावेश होता, जुन्या नव्या! मनोहरने ' बापाला ' तात्काळ ओळखले!

000

बदल्याची आग घेऊन मनोहर संतुकरावांचा माग काढत मुंबईत पोहंचला. जमेल त्या प्रकारे त्याने संतुकरावची सखोल माहिती काढली,आणि समोर जे आले ते अविश्वसनीय होते! त्याच्या कल्पने पेक्षा संतुकराव कितीतरी पटीने अधिक धनवान होते! मनोहर एका कुबेराचा एकुलता एक पुत्र होता. आणि ते मेल्या नन्तर एकुलता एक वारस!
'बदल्या' बरोबरच त्याला 'सम्पत्तिची' पण आस लागली. मूर्खा सारखा त्याने बदल्यासाठी स्वतः संतुकरावाचा खून केला असतात तर, फासावर गेला असता,आणि ती कुबेराची तिजोरी हातची गेली असती! म्हणून त्याने दुसऱ्या करवी मुडदा पडण्याचा घाट घातला. भरपूर चौकशी करून त्याने रुद्राला फिक्स केले. एक तर तो एकडा शिलेदार होता. त्याचे क्रिमिनल रेप्युटेशन उत्तम होते. इतर गल्लीतल्या गुंडां सारखा बेभरवशाचा नव्हता. इतर गुंडां कडून काम करून घेतले असते तर ते स्वस्तात झाले असते ,पण मेलेला म्हातारा श्रीमंत आहे हे कळल्याबरोबर त्यांनी इतर बिग डॉनना ती बातमी विकून टाकली असती! अन मग त्यांनी त्याला आयुष्यभर पिळून काढले असते!
रुद्राला साथीदार नव्हते. तो त्याचे काम गुपचिप करत असे. आणि आता एक अजून मोहरा मनोहरच्या हाती होता. त्याच्या जोरावर तो रुद्रावर मात करणार होता. त्याची योजनाही त्याच्या डोक्यात तयार होतीच! रुद्राचा बंदोबस्त करणे गरजेचेच होते,कारण तो पण मनोहरला ब्लॅक- मेल करू शकणार होता! हे सर्व पक्के झाल्यावरच मनोहरने रुद्राला 'सुपारी' दिली होती.
०००
संतुक मुंबईत आला ती वेळच बहुदा अशुभ असावी. रात्री साडेदहाच्या सुमारास, तो दादरला उतरून टॅक्सी ठरवताना,त्याने समोर नजर टाकली. एक तोंडाला फडके बांधलेला तरुण, एका म्हाताऱ्यावर पिस्तूल रोखून उभा असलेला त्याला दिसला. तो तरुण चाप ओढण्याच्या बेतात होता. संतुकने कसलाही विचार नकरता जोरात धावत जाऊन त्या पाठमोऱ्या पिस्तूलवाल्यावर झेप घेतली! पण त्याचा अंदाज चुकला. तो हवेत असतानाच त्या पिस्तूलवाल्या तरुणास चाहूल लागली होती. त्याने बेधडक मागे वळून गोळी झाडली! संतुक रक्ताच्या थारोळ्यात पडला. तो मारेकरी झटक्यात शेजारच्या बाइकवल्याच्या मागे बसून फरार झाला. आवाजाने जमणार मुंबईच पब्लिक आणि पोलीस राडा करणार होते! सायरन वरून पोलीस येत असल्याचे संतुकला जाणवले. त्याची शुद्ध हरवली.
संतुकने डोळे उघडले. तो एका आलिशान हॉस्पिटलच्या स्पेशल रूममध्ये होता.
"व्हेरी गुड! मिस्टर तुम्ही बाजी जिंकलीत! आम्ही तर निराश होत चाललो होतो. "डॉक्टर त्याची नाडी तपासात म्हणाले.
"पण मी कोठे आहे?"
त्या नन्तर त्याला जे कळले ते थोडक्यात असे होते. त्याने झेप घेऊन ज्या मारेकऱ्यांचा लक्ष विचलित केले होते, तो के. ड्यानियल या धनाढ्य व्यासायिकावर हल्ला करणार होता. चहा साम्राज्यातले के. ड्यानियल एक जबरदस्त नाव. गोळी बारगड्यात घुसल्या मुळे वैद्यकीय मदत मिळे पर्यंत रक्तस्त्राव खूप झाला होता. ऑपरेशन करून गोळी काढण्यात आली,पण ऑपरेशन शॉक त्याच्या अशक्त झालेल्या शरीराला सोसला नाही. संतुक कोमात गेला! तब्बल तीन महिने! ड्यानियल उत्कृष्ट हॉस्पिटल मध्ये त्याची ट्रीटमेंट करत होते.
थोडी प्रकृती सुधारल्यावर संतुकने गावाकडल्या मित्राला फोन लावला.
"तात्या, मी संतुक बोलतोय!"
"कोन? संत्या! आबे कूट तडमडला? चार दिसात म्हनून सटकलास अन चार म्हयन्यानं फोन करतुयास?"
"आर तात्या, मी दवाखान्यातून बोलतोय!" आणि मग त्याने सारी कहाणी तात्याला सांगितली.
"मायला ,हित गावाकडं, तू लोकल खाली मेल्याची आवई उठलिया! आमी पंचायतीत दोन मिंट शांतता पाळली लेक तुज्या सटी! अन दूखवट्याच्या ठराव पन पास केलाय!"
"बर मोहिनी कशी आहे?"
"आता कुठाय मोहनी? ती अन तिचा बाप गाव सोडून गेल्यात!"
" कुठं?"
"ठाव नै ! पर तू कवा येनार वापस?"
सुन्न मनाने संतुकने फोन कट केला. फोन कसला,त्याने त्या गावचा सम्बन्धच तोडून टाकला होता. ज्या गावात मोहिनी नाही त्या गावचा समंध ठेवण्यात अर्थ नव्हता!
आपला जीव वाचताना या तरुणाची नौकरीची संधी गमावली गेली,आणि जीव वाचवल्याच्या ऋणाची अल्प परतफेड म्हणून ड्यानियल यांनी संतुकला उटीतला एक पाच एकर टी प्लांटेशन असलेला प्लॉट, प्रोसेसिंग युनिट सह बक्षीस म्हणून देऊन टाकला. मग संतुकने मागे वळून पहिले नाही.

(क्रमशः )