Rudra - 4 in Marathi Fiction Stories by suresh kulkarni books and stories PDF | रुद्रा ! - ४

Featured Books
Categories
Share

रुद्रा ! - ४

राघवच्या डोळ्या समोरून म्हाताऱ्या संतुकरावांचा चेहरा हालत नव्हता. कारण पंधरा दिवसापूर्वीच ते राघवला भेटून गेले होते! राघव ऑफिस मध्ये सकाळी डेली केसेस पहात होता. जाधव काकाही त्यांच्या रुटीन मध्ये गाढले होते.
"सर, कोणी तरी एक म्हातारा तुम्हाला भेटायचं म्हणुन आलाय. अर्जंट काम आहे असं म्हणतोय." शिपाई निरोप घेऊन आला. राघवच्या कपाळावर आठ्या पडल्या. हे लोक नको त्या वेळेला येतात. कामात डिस्टरब झालेलं राघवला चालत नसे. पण एका वृद्धाला टाळणे त्याच्या जीवावर आले.
"ठीक आहे. पाठव त्यांना. " राघवन उघड्या फाईल्स बंद करून ठेवल्या.
पांढऱ्याशुभ्र रेशमी केसांचा स्लिम म्हातारा ताडताड पावले टाकत ताठ मानेने आत आला. तजेलदार चेहरा, साठीच्या आसपासचे परिपकव वय, 'मना सारखे करीन! ' हा चेहऱ्यावरचा भाव!
"मला त्या राघवला भेटायचंय! कोठय तो ?" त्याने राघवलाच विचारले.
"मीच इन्स्पे. राघव! बोला !" त्याने एकेरी केलेला उल्लेख राघवला खटकला. उर्मट दिसतोय. पण त्याचे वय पाहून तो ताड्कन काही बोलला नाही.
"माझ्या जीवाला धोका आहे!" तो म्हातारा म्हणाला. त्याच्या आवाजात 'भीती 'चा लवलेशहि नव्हता.
"कशावरून ? काही धमकीचा फोन , पत्र ,मेल वगैरे आलंय का ?"
"नाही ! अजून नाही. पण त्याची कशाला वाट पहायची ?"
"आधी समोरच्या खुर्चीत बसा. तुमच नाव ,गाव, पत्ता आणि फोन नम्बर सांगा !"
"आधार कार्ड दाखवू का ?" म्हातारा खुर्चीत बसत म्हणाला. म्हातारा आगाऊ पण होता.
"सध्या नको तूर्तास नाव, काय उद्योग करता ते आणि फोन नम्बर सांगा !" राघव स्वतःला संयमित राखण्याचा प्रयत्न करत म्हणाला.
तेव्हड्यात जाधवकाकानी चहा आणि पाणी आणून ठेवले.
"अरे वा ! अजून पोलिसात माणुसकी शिल्लक आहे तर! माझं नाव संतुक. चहाची दोन दुकान आहेत. आणि माझा फोन नम्बर १२३४५६७८९० आहे." तो सांगत होता आणि जाधवकाका त्याच्या खुर्चीच्या मागे उभाराहून लिहून घेत होते.
"आतां सांगा संतुकराव, कोण तुमच्या जीवावर उठलाय ?"
" मला काय माहित? माझ्या सारखा श्रीमंत माणूस असला कि त्याचा जीव नेहमीच धोक्यात असतो! मी पुस्तकात वाचलंय आणि सिनेमात सुद्धा बघितलय!"
"दोन चहाची दुकान ! अन श्रीमंत? अन तुमच्या जीव धोक्यात ?" राघव उपहासाने म्हणाला.
"त्या दोन दुकानाच्या स्टोक साठी, सतरा गोडावून्स आहेत! आणि सतरा गोडावून्स साठी आठ,प्रत्येकी वीस एकरच्या चहाचे प्लांटेशन्स आहेत! मग इतके गोडावून्स लागणारच कि !"
"बापरे ! हे सगळं तुमचं ?" म्हातारा पक्का फेकू दिसत होता.
"हो तर! आहेतच!"
" संतुकशेठ, तुमचा पत्ता सांगा. उद्या पासून दोन पोलीस बंदोबस्तासाठी येतील!"
"नको!"
"नको? तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन नको ? मग कशासाठी सकाळी-सकाळी माझ्या कडे आलात?"
आता मात्र राघवचा आवाज वाढला.
"एक सेल्फी तुझ्या सोबत काढावा म्हणून आलो होतो!" संतुकराव शांतपणे म्हणाले.
" वॉट? शुद्धीवर आहेत का? आल्या पासून बघतोय, तुम्ही तोंडाला येईल ते बरळताय! तुमच्या वयाकडे पाहून गप्प बसलोय! तुमचा पोरकटपणा वाढतच चाललंय!" शेवटी राघव भडकलाच.
"अरे बाबा, भडकतोस कशाला? आपण सेल्फी काढला कि त्याची एन्लार्गड कॉपी घरात लावीन! तुझी माझी ओळख आहे म्हणल्यावर तो 'खुनी' घाबरून पाळूनच जाईल कि! तुला गुन्हेगार खूप घाबरतात असे ऐकलेय. तुझा चांगलाच दरारा आहे म्हणे! म्हणून सेल्फी साठी आलो होतो. तुला त्यात पोरकटपणा वाटत असेल तर राहू दे. पण मी मेलो तर मात्र तूच जिम्मेदार!" असे बडबडत म्हातारा हातवारे करत निघून गेला.
राघवने जाधवकाकांना इशारा केला. ते संतुकराव पाठोपाठ बाहेर गेले.
तासाभराने जाधवकाका परत आले.
"जाधव काका कोण होता तो म्हातारा?"
"सर! ते ----"
"हा, बोला."
"ते अब्जाधीश संतुकराव सहदेव होते! चहाचे दुकाने नाहीत तर 'चहाचे साम्राज ' आहे त्यांचे!"
या गृहस्थाच्या विक्षिप्तपणाचे किस्से राघवने ऐकले होते. आज अनुभवही घेतला !

आणि पंधराच दिवसात त्यांना वाटले ते खरे झाले होते. त्यांना शंका असावी पण खात्री नसावी. का बोला फुलाला गाठ पडली? राघव विचारात गढून गेला होता.
"सर, स्केचिंग साठी आर्टिस्ट आलाय." जाधव काकाच्या आवाजाने राघव भानावर आला.
राघवने 'नक्षत्र' बंगल्यात जाताना आणि येताना मिरर मध्ये दिसलेल्या माणसाचे वर्णन करायला सुरवात केली. त्या आधारे तो आर्टिस्ट चित्र साकारत होता.

००० 'अब्जाधीश संतुकराव सहदेव यांची हत्या!--(आमच्या क्राईम रिपोर्टर कडून)- संतुकराव सहदेव (६५)हे 'चहा साम्राज्याचे 'अधिपती यांची त्यांच्या 'नक्षत्र' नामक बंगल्यात हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांचा मृत देह त्यांच्या आउट हाऊस मध्ये सकाळी त्यांच्या वॉचमनला आढळला. त्याने पोलिसांना पाचारण केले.
प्रथम दर्शनी नाकतोंड दाबून खून झाला असल्याची पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.पण हा खून त्यांच्या अफाट संपती साठी झाला असावा असा आमचा अंदाज आहे. सहदेव इंडस्ट्रीज ग्रुप मध्ये चहा,कॉफीचेअनेक मळे, प्रोसेसिंग युनिटस , कोळशाच्या अनेक खाणी,आणि इतर बरेच उद्योग आहेत. या अथांग 'साम्राज्याचे' वारस कोण ? हा यक्ष प्रश्न. त्यांनी लग्न केले नव्हते.त्याचे नातेवाईक कोण हेही सध्या कोणास द्यात नाहीत. त्यांच्या वारसाची डोकेदुखी पोलिसांच्या मागे लागणार आहे.
या सर्व गोष्टींवर आमचे वार्ताहर लक्ष ठेवून आहेत. वेळोवेळी या प्रकरणातली अद्यावत माहिती आपल्या पर्यंत पोंचविण्याची जवाबदारी आमची आहे.
या केसची जवाबदारी, प्रसिद्ध, इन्स्पेक्टर राघव यांचावर सोपवण्यात आली आहे.' बातमी खाली नक्षत्र बंगल्याचा आणि संतुकरावांचा फोटो छापला होता. रुद्राने रागारागाने त्या पेपरचा बोळा करून कोपऱ्यात फेकून दिला.
स्टुपिड! किती सहजपणे आपल्या हातून 'एक म्हातारा नौकर' म्हणून ,नवकोट नारायणाचा खून करून घेतला. एरव्ही रुद्रा 'सावजाची' साधारण माहिती काढायचा, त्यात त्याचे नावगाव, व्यवसाय, आणि मुख्य म्हणजे त्याची दिनचर्या असायची. येथे त्या सुपारी देणाऱ्याने हि माहिती त्याला बसल्या जागी पुरवली होती. सावजाचे राहते ठिकाण मात्र बंगल्या ऐवजी आऊट हाऊस सांगितले होते. वर सेक्युरिटी गार्ड मॅनेज करून दिला होता! खोटी माहिती पुरवली होती! खरे तर त्याच वेळेस शंका यावयास हवी होती. पण सारे काही इतके सहज आणि वेगाने घडत गेले कि विचार करायला त्याला वेळच मिळाला नाही. तसेच ऐत्यावेळेस 'खुनाचा' मोहर्त कळवाल्याने रुद्राच्या हातून एक घोडचूक झालीच होती. बाइकसाठीचे ग्रीपर त्याने घातले ते खुनाच्या वेळेस तसेच राहिले होते. ग्लोज घालायचे राहूनच गेले होते! त्या ग्रीपरमध्ये त्याची बोट उघडीच होती. त्यामुळे खुनाच्या ठिकाणी कोठे तरी त्याच्या फिंगर प्रिंट्स राहिल्याचं असणार होत्या! फक्त एकच समाधानाची बाब होती, ती म्हणजे पोलीस रेकॉर्डला त्याच्या प्रिंट्स नव्हत्या!
महत्वाचा प्रश्न होता तो त्या बुटक्या सुपारी देणाऱ्या माणसाचा आणि संतुकरावचा काय संबंध होता? हा खून कोट्यवधीच्या इस्टेटी साठी किंवा व्यावसायिक वैमन्यस्ययातून करवून घेतला असण्याची शक्यता होती. तोच खरा वारसदार असेल का? का त्याने सुपारी फिरवली असेल? म्हणजे कोटीत घेतलेली सुपारी लाखात काम करून घ्यायचे! आता इतका श्रीमंत माणूस म्हणजे पोलीस गप्प बसणार नाहीत,आणि हे पेपरवाले-मीडियावाले गप्प बसू देणार नाहीत.त्यात तो इन्स्पे. राघव म्हणजे 'खावीस' आहे! त्याचा इतिहास भयानक आहे! तो हाताखालच्या माणसावर फारसा विसंबून रहात नाही. स्वतःच्या मार्गाने तपास करतो. अंडर वर्ड मध्ये त्याला उगाच 'वन मॅन आर्मी' नाही म्हणत! तो पाताळातूनहि आपल्याला हुडकून काढणार हे नक्की! पिंजऱ्यात अडकलेल्या श्वापदा सारखी त्याची अवस्था झाली होती. त्याने त्या सुपारीवाल्याला रिंग केली. रिंग वाजली. रुद्राने श्वास रोखून धरला.'हा क्रमांक अस्तित्वात नाही. कृपया क्रमांक तपासून पहा!!' हे उत्तर आले. तो मूर्खपणा होता. त्या बेरकी माणसाने एव्हाना सिम कार्ड नष्ट करून टाकले असणार!
बेचैन रुद्राने सिगारेटचे पॅकेट चाचपले, ते रिकामे होते.
०००

इन्स्पे. राघवने समाधानाने मान हलवली. साले हे आर्टिस्ट लोक कमाल असतात. त्याने केलेल्या वर्णनावरून काढलेले ते स्केच खूप समाधानकारक निघाले होते. त्याने ते स्केच स्कॅन करून क्राईम डाटा सेंटरला पाठवले. काही क्रिमिनल रेकॉर्ड सापडते का याचा शोध घ्यावा लागणार होता. खरे तर हे कडब्याच्या गंजीत सुई शोधण्या सारखे होते. पण राघव कोणतीच शक्यता न तपासता सोडणार नव्हता. त्याने ते स्केच सर्व पोलीस स्टेशन्स आणि आपल्या सर्व इन्फर्मर्सना 'आलर्ट ' म्हणून हि पाठवले होते.
राघवने सहा इंच उंचीचा कॉफी मग भरून घेतला आणि ऑफिसच्या खिडकीतून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पहात घुटके घ्यायला सुरवात केली. डोक्यातील विचार आणि घटनांचा मेळ घालण्यात त्याचे मन गुंतून गेले होते. त्याला या प्रकरणात बरेच प्रश्न पडले होते.
इतका देखणा राज प्रसाद सोडून हा म्हातारा त्या आऊट हाऊस मध्ये का झोपत होता? लॅपटॉपवर कामुक चित्रफीत पहायला एकांत हवा म्हणून? पण त्याची काय आवशकता होती? तो एकटाच रहात होता त्या बंगल्यात! मग का तो आऊट हाऊस मध्ये येत होता ? दुसरे तो बाईकच्या मिरर मध्ये दिसलेला कोण होता? तो नक्कीच 'नक्षत्रा'वर नजर ठेवून होता. का? खुन्याने काही धागे दोरे मागे सोडले नव्हते. सराईत पणे तो वावरला होता. बंगल्याची खडा-न-खडा माहिती असल्या सारखा. एक तर तो घरातीलच कोणीतरी असावा,किंवा घराची रेकी करून घेतली असावी. कॉफी संपवून गेली होती. प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार होती.
जाधव काकांनी पोस्टमोर्टमचे आणि इतर रिपोर्ट्स टेबलवर ठेवले होते.त्यात मृत्यूचे कारण, 'श्वास कोंडल्या 'मुळे असे नमूद केले होते. हा अंदाज राघवने आधीच बांधला होता. म्हातारा रात्री साधारण दहाला जेवला होता,अन्नात काही आक्षेपाहार्य म्हणजे गुंगीचे रसायन किंवा घातक पदार्थ नव्हते,हे व्हिसेरा रिपोर्ट सांगत होता. मरताना त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. बहुदा त्याला असे काही होईल अपेक्षित नव्हते.
फिंगर प्रिंटवाल्यानी मात्र झकास काम केले होते. म्हाताऱ्याच्या मनगटावर तर्जनीची अस्पष्ट प्रिंट होती पण नाकाच्या डाव्या नाकपुडीवर अंगठ्याची तर उजव्या नाकपुडीवर तर्जनीची स्पष्ट ठसे खुनी सोडून गेला होता. आणि बाकी तीन बोटांचे ठसे उजव्या कान जवळ होते! चिमटीत नाक दाबून धरले आणि तळवा तोंडावर दाबल्याचा तो स्पष्ट पुरावा होता! दुसरी महत्वाची गोष्ट यावरून सिद्ध होत होती कि खुनी डावखोर असावा! बुटाच्या ठश्यावरून त्या खुन्याची उंची सहा फुटाच्या आस पास होती! तेच ठसे त्या व्यक्तीचे वजन साधारण सत्तर -ऐंशी किलो असावे या कडे निर्देश करत होते ! राघवच्या नजरे समोर जसवंत उभा राहिला! त्याच बरोबर त्याच्या पायातले ते कॅनवास शूजपण ! जसवंत डावखोरा होता! वजन-उंचीच्या अपेक्षित मोजमापात होता! आणि फक्त आणि फक्त जसवंतलाच माहित होते कि संतुकराव आऊट हाऊस मध्ये झोपतात!!
राघवने फोन उचलला.
"राकेश, जाधव काकांनी जसवंतचे फिंगर प्रिंट्स घेतले आहेत. ते बॉडीवरील प्रिन्टशी जुळतात का मॅच करून पहा. "
"ओके सर"
"आणि हो त्या स्केचच काही रेकॉर्ड सापडते का ?"
"आम्ही पहातोय पण अजून काही क्लू नाही लागलेला. काही समजले तर कळवतो."
"ठीक , बाय ." राघवने फोन ठेवला.

(क्रमशः )