Gaavkus - 1 in Marathi Fiction Stories by Sanjay L. Bansode books and stories PDF | गावकूस 1

Featured Books
Categories
Share

गावकूस 1

जून महीना उजाडला होता.वातवरण ढगाळ झालं होतं.एप्रिल मे महिन्यात हाहाकार माजवलेल्या सूर्याचे तप्तरूप जमिनीत खोलवर जावून जमीन भेगाडली होती.त्यामुळे सूर्य जरी ढगाआड असला तरी, गर्मीमूळे अंगातून घामाचा पाट वाहत होता.
माझे माय बाप मात्र पत्र फ्यारण्यामधे व्यस्त होते. माझा बाप घरावर चढून, पतरावरची मोठ मोठी दगड बाजूला सारून घरावरचे एक एक पतर मायच्या मदतीने खाली उतरवीत होता. खाली आणलेले पतर माय फड्याने स्वच्छ झाडत होती व फुटक्या ठिकाणी त्याची डागडुज करत होती. पतर साफ झाल्यावर पुन्हा ते पतर वर चढवून त्यावर माझा बाप दगड ठेवीत होता. मी मात्र पत्रावरच्या मातीत काही खेळण्याचे सापडते का,ते शोधीत होतो. मला खाली खेळताना बघून वरून माझा बाप मला आवाज देत होता,
"बापू, बाजूला व्हय !
एखादा दगड बिगड पडल अंगावर तुह्या !"
बापाचे संपल्यावर मायने ही आवाज चढवला,
"व्हय रं डेंगरा बाजूला !
मधी मधी करते माय कामाच्या !"
माझा बाप मला लहानपणी बापूच बोलीत होता.तो अजूनही मला बापूच बोलतो. त्याचे कारण ही तसेच होते.मी होण्या अगोदर माझ्या माय बापाला चार मुली अन्एकच मुलगा झाला. माझा बाप माझ्या आजोबांच्या खूप लाडका होता आणि एकुलता एक ही ,त्यामुळे माझ्या आजोबांचा माझ्या बापावर फार जीव. पण माझ्या बापाला, बापाचे प्रेम जास्त दिवस वाट्याला आले नाही. माझा बाप सोळा सतरा वर्षाचा असतांनाच माझ्या आजोबांची प्राणज्योत मालवली. पण जाताजाता आजोबांनी माझ्या वडिलांकडून एक वचन मागितले,
" जसा तु एकुलता एक हायीस, तसा तुझा वंश नको ठेवू,चांगले चार पाच होऊंदे. साऱ्या भावकित त्यांचा दरारा असला पाहिजे."
तसा माझ्या बापानेही प्रयत्न केला. पण वाट्याला जास्त मुलीच आल्या. माझ्या मायच्या प्रत्येक गरोदरपणात माझा बाप एका देवाला नवस बोलायचा. मुलगी झाली तर स्वतःला दोष द्यायचा मुलगा झाला तर देवाचा आशीर्वाद समजायचा. ज्या दोन देवाने माझ्या वडिलांचे नवस पूर्ण केले, एक माझा भाऊ होतांना आणि दुसरा मी होतांना त्या देवाची सर्वात जास्त कृपादृष्टी आपल्यावर आहे म्हणून अजूनही त्या देवांचे उपास तापास सोडले नाही.मायच्या गरोदरपणात माझा बाप ज्या देवाला नवस बोलला व मुलगी झाली त्या देवाला माझा बाप विसरून गेला पण ज्या देवाला नवस बोलला आणि मुलगा झाला त्या देवाला माझा बाप अद्यापही विसरला नाही. माझा जन्म झाल्यावर माझ्या घरात भावंडांची अर्धा डजन संख्या झाली. मी सर्वात लहान होतो व एका भविष्यवाल्यांनी माझ्या बापाला पैशांने गंडवून भविष्यवाणी केली होती की, हा (मी )साक्षात तुमच्या वडीलांचा अवतार आहे. तुम्हांला ते जीवनाच्या अर्ध्यारस्त्यावर सोडून गेले म्हणून त्यांनी पुन्हा तुझ्या कुळात जन्म घेतला. त्यामुळे मी माझ्या बापाचा फार लाडका होतो. शेतात, जत्रेला, परगावी कुठेही मला ते आपल्या खांद्यावर घेऊन जात. माझ्या बापाला जवानपणी कुश्त्याचा फार नांद होता. जेंव्हा जत्रेत कुश्त्या चालू होत होत्या तेंव्हा ते मला एकट्यालाच घेऊन जात असत. त्यामुळे माझ्या भावंडांना माझा फार राग यायचा.

पावसाळा जवळ येत होता म्हणून साऱ्या गावातच पत्रे फ्यारनी व डाळणी चालू होती. माझ्या बापानेही पत्रे फ्यारनी झाल्यावर लगेच पळसाच्या पानाने घरावर डाळण केले. जेणेकरून पत्रांच्या व भिंतीच्या मधून पावसाचे पाणी आत येऊ नये. जेंव्हापासून वातावरणात बदल झाला तेंव्हापासून मला विचित्र त्रास होत होता.माझ्या साऱ्या अंगाने खाज सुटत होती.हा त्रास मी लगेच माझ्या माय बापाला कळवला.

माझ्या माय बापाने जेंव्हा माझ्या अंगावर निरखून बघितले तर त्यांना" सुवा" (पिसू -ज्या प्राण्यांच्या अंगावर असतात )आढळून आल्या. ह्या सुवा दुसऱ्या तिसऱ्या काही नसून हा आपल्या गावातील मारुतीचाच प्रकोप आहे असे माझ्या मायने निश्चित केले.त्या सुवा बघून माझी माय त्या मारुती देवाला म्हणत होती,
"देवा !
हे मारुती राया !
का सतवतो रे मह्या लेकराला ?"
मी तेंव्हा सात आठ वर्षाचा होतो. हे सारे माझ्यासाठी नवीन होते. हे सारे माझ्या कोवळ्या मेंदूत खोलवर घर करत होते. मायचे असे बोल ऐकून मी लगेच मायला बोललो,
"माँ...
ह्या मारुतीच्या सुवा ह्यायतं ?"
"होय बाबा "
मंग ह्या मह्या अंगावून कधी जाणार ?
लय तरास द्यायल्यात मल !
खाजवून खाजवून अंगाची आग होतय मह्या,
त्यो कव्हा त्याच्या सुवा वापस घेणार ?"
असे बोलल्यावर माझ्या मायने माझ्या अंगावरची एक सु घट्ट हातात पकडली.तिला एका कागदावर ठेऊन पुडीबंद करून माझ्या हातात दिली आणि मला म्हणाली,
"जा .........!
एखाद्या सोबत्याला घेऊन,
आणि पारावरच्या मारुती जवळ ही सु सोडून ये !
म्हणजे तुह्या अंगावरच्या साऱ्या सुवा गायब व्हतील."
मी ती कागदाची पुडी हातात घेतली व माझ्या मायने फार मोठी मोहीम माझ्यावर सोपवली असे समजून तडक शेजारच्या बंड्याच्या घरात गेलो,अन् बंड्याला हाक मारली,
"ये बंड्या !
हायेस का घरात ?"
माझा आवाज ऐकताच मायच्या मांडीवर झोपलेला बंड्या ताडकन उठून बाहेर आला आणि बोलला,
"काय रे संज्या ?
काय...?"
"अरे,इकडे ये !
तुला एक गोष्ट सांगायची."
तसा बंड्या लगबगीने खाली आला अन् मला म्हणाला,
"काय,बोल ?"
बंड्या माझ्या जवळ आल्यावर मी सारी हकीकत बयान केली.
बंड्या माझ्यापेक्षा दोन वर्षानी मोठा असल्यामुळे भोंगळ्या पायाने सारे गाव पालथे घालीत होता.गावातली एकएक गल्ली बोळी त्याला माहीत होती.
मी मात्र बुद्धवाड्याच्या बाहेर अजून पडलोच नव्हतो.शाळाही बुद्धवाड्या जवळच असल्यामुळे मराठवाड्यात (गावात )जाण्याचा प्रश्नच येत नव्हता.
बंड्यान माझं सारं गाऱ्हाण ऐकून घेतल्यावर पुढे म्हणाला,
"अरे, पारावरच्या मारुतीवर आपल्याला जाता येत नाही.
तिथं आपल्याला एखाद्या मराठ्याच्या पोरानं पाह्येलं तर आपल्याला ती मारतील !"
"म्हंजी "
बंड्याचे बोलणे मला थोडे वेगळेच वाटले.
"अरे संज्या,
आपण बुद्धाचे पोरं त्या मारुतीला चालत नाही.
आपण एक काम करू, संध्याकाळ झाल्यावर आपण त्या पोरांच्या मुकाट्यान मारुतीच्या मंदिराच्या मागं ही सु सोडून येऊ."
बंड्याचे बोलणे ऐकून घेऊन आमच्या दोघांचे मारुतीच्या मंदिरात जाण्याचे नक्की झाले.
पण संध्याकाळ होईपर्यंत माझ्या कोवळ्या मेंदूवर प्रश्नाचा मारा होत होता. आता मला फक्त त्या मारुतीची उत्सुकता लागली होती.ज्याला आम्ही चालत नाही त्यांनी त्याच्या सुवा माझ्या अंगावर का सोडल्या ?
सूर्य ववभर डूबायचा बाकी होता तोच बंड्या माझ्या दारात उभा !
त्याला बघताच मीही खाली आलो.सुवाची पुडी मी घट्ट हातातच पकडली होती. एकटं गावात जाण्याची ही माझी पहीलीच वेळ. एखाद्या वेळी बोटाला धरून पाटलाच्या घरी रई लागल्यावर ताक घेण्यासाठी
माय मला घेऊन जाई.पण आज मी माझ्या स्वतःच्या पायावर गावात जात होतो, मायने दिलेले काम फत्ते करण्यासाठी. एका हातात बंड्याचा हात पकडून व एका हातात कागदबंद सु घट्ट पकडून कावऱ्या बावऱ्या नजरने पुढे पुढे जात होतो.पारावरच्या मारुतीच मंदिर शेवटच्या टोकाला आणि बुद्धवाडा एका टोकाला असल्यामुळे सारे गाव आम्हांला पालथे घालायचे होते.गावातल्या पाटलाचे घर संपल्यावर पुढचे घरे माझ्या अनोळखीचे होते. बुद्धवाड्यातली घरे दगड पत्राची व त्यावर सेणाचे लिंपण,पण गावातली.माळवदाची घरे बघून मी चकित झालो. प्रत्येक घर हे एकाचढ एक होते. आत सागवाण लाकडाचे माळवद आणि बाहेर भलेमोठ जोतं. त्यावर गावातली सारी मंडळी संध्याकाळच्या वेळी आपआपल्या जोत्यावर बसून आराम करीत होती.काही बायका सुपात गहू तांदूळ घेऊन पाखडत होत्या.पाखडता पाखडता आमच्याकडे बघून एकमेकीस विचारीत होत्या,
"कोणाची गं पोरं ही ?"
शेजारच्या बाईला माहीत असेल तर ती चटकन तिला सांगित होती,
"त्यों पलिकडचा ज्ञानबा बुद्धाचा अन् ह्यो लिंबा बुद्धाचा."
जिला माहीत नव्हते ती सरळ आम्हांला विचारीत होती.
"कोणाची रं पोरहो तुम्ही ?"
तेंव्हा आम्ही दबक्या आवाजात कावरे बावरे होऊन उत्तर देत होतो,
"मी, ज्ञानबा बुद्धाचा "
"आन्
मी ....मी लिंबाजी बुद्धाचा "
हे ऐकून पाटलीन बाई चढ्या आवाजात आम्हाला खडसावत होती.
"ऐधोका इकडं काय चोरी करायलं आले का रे ?"
हे ऐकून आम्ही तेथून चुपचाप काढता पाय घेऊन पुढे पुढे जात होतो. थोड्या वेळाने मी ज्या मारुती रायाची वाट बघित होतो तो क्षण आला.
एक मोठा वटा त्याच्या शेजारी भलं मोठं एक वडाचं झाड़, त्याच्या खोडाला दोऱ्याचा वेढा आणि वट्याच्या मधोमध मारुतीचे मंदिर त्या मंदिराच्या छोटोशा दरवाज्यातून आत एक मोठा दगड व त्यावर अबडधोबड मूर्तिचे कोरीव काम आणि त्या पूर्ण दगडाला शेंदूरफासलेला. मला बंड्याने सांगितले,
"ह्योच त्यों मारुती."
मारुती दिसताच बंड्याने हात जोडले त्याचे बघून मीही जोडले.
मंदिरा बाहेर जोत्यावर पाच सहा जन गप्पा मारीत बसले होते. बसता बसता कुणी दोरी वळत होते तर कुणी नुसत्याच गप्पा गोष्टी करीत होते.त्यांच्या नजरा चुकवून आम्ही चुपचाप त्या मंदिरा मागे गेलो आणि हातात असलेली ती सु सोडून तेथून काढता पाय घेतला.तेथून घरी येता येता चांगलाच अंधार झाला होता. माझे मायबाप ही काम करून थकले होते.सर्वांना कडाडून भूका लागल्या होत्या म्हणून आम्हां भावंडांचे लक्ष आता चुलीकडे लागले होते. माझ्या मायने एका चुलीवर मातीच्या मडक्यात डाळ शिजवायाला ठेवली होती अन् ऐका चुलीवर ती भाकरी थापत होती. तव्यावर टाकलेली आंबटओली भाकर ती चुलीतल्या विस्तवावर भाजून गरम करीत होती अन् माझी मोठी बहीण आम्हांभावंडांना डाळ अन् भाकर वाढत होती.सर्वांचे जेवण झाल्यावर मी रात्रीचा निवांत माझ्या आईच्या खुशीत झोपलो.आज माझे मन ऐका वेगळ्याच गोष्टीमुळे प्रसन्न झाले होते. म्हणून आईची राक्षस,देवाच्या गोष्टी न ऐकताच शेंदूर फासलेल्या मारुतीलाच आठवून झोपी गेलो.