देवाचे ठाणे २( कथा पूर्णतः काल्पनिक आहे.)पुढे चालू...मी पार काळोख पडेपर्यंत काम करत होतो.खरतर मला रात्री तिथेच तंबू लावून राहायचे होते. त्या शिल्पा पासून २० फूटांवर एक छान जागा दिसली होती.तिथे पाणी नव्हतं.पण मला काही गोष्टी स्कॅन करायच्या होत्या.लॅपटाॅपवर काहीआराखडे तयार करायचे होते.माझा अंदाज होता की ते शिल्पकिमान दहा हजार वर्षांपूर्वीचे असावे.शिवाय माझ्या सिस्मोग्राफ मध्ये काही विचित्र कंपने दिसली होती.त्याचे विश्लेषण करायचे होते.त्यासाठी टेबल खुर्ची व लाईट लागणार होती.म्हणून मी त्या रात्री खाली गावात राहायचे ठरवले. मी माझं सगळं सामान आवरलं .मी गाडीवरून खाली उतरलो.चौकशी करता कळलं की गावात एकच होम स्टे होता. मी तिथे पोहचलो.ते एक मजली घर होतं.खाली बाहेरच्या रुममध्ये एक छोटं टेबल होते व तिथे कोणीतरी इंग्रजी पेपर वाचत बसल होत." मालक ,एखादी रुम आहे का?"त्या व्यक्तीने पेपर बाजूला केला.माझे डोळे विस्फारले. समोर ती सुजा.. नावाची मुलगी होती.मला काय बोलावे ते समजेना." मालक कुठे आहेत?"" का ? रुम पाहिजे? इथे वर दोनच रुम आहेत.एक आम्ही घेतलीय. एक शिल्लक आहे.ती पलिकडची बेल दाबा.मालक येतील."" तुम्ही दोघं आहात तर इथे राहण्यात काहीच अर्थ नाही."मी वळून निघत होतो." या गावात आणखी कुठेच राहायची सोय नाही."ती हसत म्हणाली.तेवढ्यात पट्ट्यांचा लेहंगा व वर बनियन घातलेला एक साठीतला इसम आला .तो बहुतेक मालक असावा.त्याच्या कांनावर ताठ उभे राहिलेले केस होते.आपल्या जाड भिंगाच्या चष्म्यातून माझ्याकडे बघत त्याने विचारले..." रुम पाहिजे का?"" अं... हो."" पाचशे रुपये भरा.वरची डावीकडची रूम तुमची. जेवण हवं असेल तर आत्ताच सांगा.रात्री नऊ वाजता जेवण खोलीत आणून दिले जाईल.त्याचे वेगळे पैसे पडतील. "तो एका दमात म्हणाला.मी सगळे सोपस्कार पूर्ण करून चावी ताब्यात घेतली." फुशारकी मारत होता. आला मोठ्ठा शाहणा."ती वात्रट पोरगी म्हणाली.मी तिच्याकडे दुर्लक्ष करत वर गेलो.अलिकडच्या खोलीत मंद पाश्चिमात्य संगीत चालू होतं व त्यावर तो बोकड दाडीवाला तरूण नाचत होता. नाचत होता कसला ? माकड उड्या मारत होता तो ! मला हसू आवरेना मी तसाच माझ्या खोलीत गेलो . मी मस्त आंघोळ केली .आता मी ताजातवाना झालो होतो.मी माझं सगळं साहित्य बेडवर ठेवलं व कामाला लागलो. मी लॅपटॉपवर फोटो अपलोड केला.त्या मानवी शिल्पाचा प्रत्येक भाग मोठा करून मी त्याच विश्लेषण करत होतो.त्याची उंची आजच्या सामान्य माणसांपेक्षा जास्त होती.त्याने कुठचातरी पोषाख घातला असव असं मला वाटतं.पण आठ ते दहा हजार वर्षांपूर्वी असा प्रकारचा पोषाख उपलब्ध होता का ? शिवाय त्याच्या डाव्या हातात असलेली वस्तू कोणती ते कळत नव्हते. मी माझ्या डायरीत टिपण काढत होतो. तेवढ्यात दार वाजलं." दार उघडेच आहे." मी म्हणालो.दार उघडून मघाचे बनियनवाले काका आले.त्यांच्या हातातजेवणाच ताट होत.ताट टेबलावर ठेवून ते म्हणाले..." जेवण झालं की बेल वाजवा.ताट घेऊन जातो."काका सगळी कामे स्वतः करत असावेत.एक तर पैसा वाचवणं हा उद्देश असेल किंवा दुसऱ्या कुणाच काम पसंत पडत नसाव.खरतर सगळ्या परीसरात वाखाणण्याजोगी स्वच्छता दिसत होती." अहो , पलिकडच्या रुममधील भाऊ -बहिण खूपच गोंधळ घालत आहेत.काय ते त्यांचे वेष आणि बोलणं... सगळंच उलट."जाता जाता काका बोलले." काका ,नवी पिढी आहे.जाऊ द्या.."मी हसत म्हणालो.मी जेवण झाल्यावर पुन्हा कामाला बसलो.रात्री अकरा वाजता पुन्हा दरवाजा वाजला...." काका आत या."पण आत आलेल्या व्यक्तीला बघून मी दचकलो.सुजा , नावाची तरूणी घाब-या घुब-या अवस्थेत आत आली.जीन्सची हाफ पँट वर ढिला टिशर्ट या पेहरावात ती होती. " ऐ,जरा मदत करशील?"" काय झालं? " मी वैतागून म्हणालो." रॉकी... ! अं..राकेश... बाहेर फिरायला गेलाय तो अजून आला नाहीय."मी क्षणभर गप्प राहिलो." गाडी घेऊन गेलाय की चालत ?"" चालत."" वाट चुकला असेल. येईल थोड्या वेळात."मी बेफिकिरीने म्हणालो." एक तास होवून गेलाय. आपण शोधूया त्याला."" फोन वैगरे केलास?"" हो पण ,फोन स्विच ऑफ येतोय."मी शर्ट अंगावर चढवला. बुलेटची चावी घेतली." मी शोधून येतो."" मी पण येतेय." मी काकांना कुठे जातोय त्यांची कल्पना दिली." हे बघा ,गावात एवढ्या रात्री सहसा कोणी बाहेर पडत नाही.इथून तिठ्यावर गेलात की डावीकडे प्रथम बघा.तिकडे सापडला नाही तर रत्नागिरी रोडला शोधा." मी गाडी स्टार्ट केली.सुजा पाठीमागे बसली. आम्ही डावीकडे चार एक किलोमीटर शोध घेतला.पुन्हा मागे परततउजवीकडच्या रस्त्यावर पाच एक किलोमीटर शोध घेतला.चालत येणारा माणूस एवढा दूर येणे शक्य नव्हते.सगळ्या आसमंतात शांतता पसरली होती.सगळा परीसर काळोखात बुडाला होता. वाटेत एखादं दुसरं घर दिसत होतं पण माणसांची हालचाल दिसत नव्हती.कुणाला विचारायचं तर ते ही शक्य नव्हते.सुजा सारखा फोन लावत होती पण तोही लागत नव्हता.ती आता रडण्याच्या स्थितीत आली होती." आज रात्री नाही आला तर उद्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी लागेल.". मी म्हणालो." घाबरवू नको." ती रडवेली होत म्हणाली." अरेच्चा....! तो वर सड्यावर तर गेला नसेल ?मी म्हणालो." अशा रात्री? " ती म्हणाली.मी बुलेट वळवली व पुन्हा मागे फिरलो. परशुरामाच्या मंदिरा जवळ आलो.आमच होम स्टे तिथेच होत.मी तिथून सरळ सड्याचा रस्ता धरला.जांभ्या दगडावर गाडी उडत होती.इथे बरीच घरं होती.गाडीच्या आवाजाने स्थानिक लोक जागे होतील.अशा रात्री एका तरुणीला मागे बसवून सड्यावर जाताना कोणी बघितलं तर गहजब झाला असता.मी गाडी अगदी सावकाश वर नेली .निशाणाच्या जवळ मी गाडी लावली.आता सर्वदूर काळोख होता. आमच्या चाहूलीनेकाही कोल्हे ओरडत पळत दूर गेले.मी गाडीच्या डिकीतली टॉर्च काढली.मला अशा प्रसंगांची सवय होती.पण सुजा जाम घाबरली होती .तिने माझा दंड घट्ट पकडला होता व मला बिलगून उभी होती.तिचा जोरात चाललेला श्वासोच्छ्वास त्या भिषण शांततेत स्पष्ट ऐकू येत होता.मी टॉर्च ऑन केली आणि मी दचकलो.समोरचा सगळा परीसर दाट पांढ-या धुक्यात बुडून गेला होता. मी गाडी लावे पर्यंत कुठेच धुके नव्हते.गाडीच्या प्रखर प्रकाश झोतात सगळा हिरवागार परिसर स्वच्छ दिसला होता.मग दोन मिनिटात हा चमत्कार कसा झाला? कदाचित वातावरणाचे तापमान दवबिंदू तापमानाएवढ आताच कमी झाले असेल. त्या दाट धुक्यात राकेश इथे असला तरी तो दिसणे शक्य नव्हते. मी टॉर्च ऑफ केली आणि शांत राहून अतिशय एकाग्रतेने कानोसा घेऊ लागलो.बाजूला सुजी माझा हात धरुन अगदी मला बिलगून उभी होती.त्या विस्तिर्ण माळरानावर भयाण अंधारात आम्ही दोघे उभे होतो.तिच्या ह्रदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती.त्या जीवघेण्या शांततेत तो आवाज मला खूप मोठा वाटू लागला.तेवड्यात मला उजवीकडे कोणीतरी कण्हत असल्याचा अस्पष्ट आवाज आला.मी कान टवकारले....सगळं ध्यान त्या आवाजाकडे लावले. होय तो मानवी आवाजच होता.पंधरा एक मीटर वरून तो आवाज येत होता." तिथे कुणीतरी आहे.सावधपणे आपल्याला तिथे जावं लागेल. घाबरू नकोस...माझ्यावर विश्वास ठेव."मी सुजीच्या कानात कुजबुजलो.तिने माझ्या हातावर हलका दाब दिला.मी पुन्हा टॉर्च ऑन केली व आवाजाच्या रोखाने सावकाश चालायला सुरुवात केली.या अशा वातावरणात हाक मारणे ही धोकादायक होते. आम्ही थोडं चाललो आणि अचानक धुकं विरल होत गेले. काही क्षणातच ते नाहिसे झाले." तो...तो...बघ रॉकी! त्या आंब्याच्या झाडाजवळ ."सुजी उत्तेजीत होत दबक्या आवाजात कुजबुजली.मी तिथे बॅटरीचा झोत टाकला.समोर एका आंब्याच्या झाडाच्या खोडाजवळ राकेश दिसला.आम्ही वेगाने तिथे पोहचलो.राकेशला कोणीतरी तिथे बांधून त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला होता.राकेशचाच शर्ट फाडून बोळा बनवला होता.त्याला थोडा मारही दिला होता.मी झटपट त्याला सोडवलं.तो अतिशय घाबरलेला होता.तो बोलतच नव्हता." चला आपण लवकरच इथून निघूया."मी व सुजीने राकेशला आधार देत बुलेट जवळ आणलं व त्याला मध्ये बसवून आम्ही आमच्या राहण्याच्या ठिकाणी आलो. मालक दार बंद करून झोपले होते.आम्ही जीना चढून वर आलो.राकेशला त्यांच्या रुममध्ये पोहचवल." त्याला हातपाय धुवून घेऊ दे. मग बोलूया त्याच्याशी."राकेश हातपाय धुवून येईपर्यंत मी पाय-यांवरचे चिखलाचे डाग धुऊन काढले. मी परते पर्यंत राकेश बाथरूममधून बाहेर आला होता." बोल ,नेमकं काय घडलं? मी विचारलं." मी सहज चालत पाठीमागे जी घर आहेत तिथपर्यंत गेलो होतो.मोबाईलची टॉर्च चालू होती.मी सड्यावरच्या रस्त्यावर शेवटचं घर आहे तिथपर्यंत पोहचलो तेवढ्यात दोघांनी मला पकडलं .मी ओरडू नये म्हणून माझ्या तोंडावर हात ठेवला.माझा मोबाईल...खिशातले वन् थाऊसंड रुपीज आणि घड्याळ पळवल व पार सड्यावर नेऊन बांधून ठेवले."" अरे सहज फिरायला जाताना एवढे पैसे कोण घेऊन जातो ?" सुजी वैतागली." हे बघा, पोलीस केस केलात तर खूप झंझट होतील. चोरांनी सीमकार्ड फेकले असावं तरीही त्या कार्डाला लिंक असलेले बॅंक अकाऊंट तत्काळ बंद करावं लागेल.बॅंकेला व कंपनीला मेसेज करा." मी सूचना केली." यार,त्या सड्यावर केवडा डार्कनेस होता. आजूबाजूला हॉरीफाईड आवाज येत होते.दूरवर अनेक हिरवे डोळे चमकत होते. नशीब माझं...ते कोणी माझ्या जवळ आले नाहीत." राकेश नावाचं ते येडं बाळ बरळले." काकांना काही सांगू नका. जमलं तर सकाळी इथून निघून जा. नशिब याच ते कोल्हे आणि लांडगे याच्या जवळ आले नाहीत ते."मी त्यांच्या खोलीतून बाहेर पडलो.सुजी माझ्या मागोमाग बाहेर आली." ऐ, थॅन्क्स.तू आज नसतास तर ...तर खरंतर कल्पनाही करवत नाही काय घडलं असतं ते. तूझ नाव काय?"" रत्नकांत...!""छान नाव आहे. माझं नाव विचारणार नाहिसे ? "" शोलेतल्या अमिताभ सारखा विचारु का ' सुजी तूझ नाव काय म्हणून...?"ती सुरेख हसली. " माझं नाव सुजाता आहे. कालची रात्र मी कधीच विसरणार नाही.त्या माळावर तूला बिलगून उभी होते तेव्हा तू काहीही करू शकला असतास...पण का कोण जाणे मला तूझ्या सोबत खूप सुरक्षित वाटत होतं."ती माझ्याकडे तिरक बघत म्हणाली.ती नजर विलक्षण होती.एक हलका कंप माझ्या ह्रदयात उठला.मी नजर फिरवली.खांदे उडवत मी वळलो. मला खात्री होती की ती नजर माझा पाठलाग करतेय ते.मी पुन्हा मागे वळून बघणे टाळले. मी माझ्या रूममध्ये शिरलो. मला काही काळ झोप येईना.उगाचच अस्वस्थ वाटत होतं.सकाळी मी लवकर उठलो पण सगळं आटपून बाहेर पडेपर्यंत आठ वाजले. बाजूचा रूम आतून बंद होता. ती मंडळी अजून गेली नव्हती.मी सामान गाडीला लावलं वगाडी घेऊन निघालो. वस्तीच्या पुढे गेलो तर वाटेत एक तरुणी खांद्याला बॅग लटकवून चालताना दिसली. माझ्या गाडीचा आवाज ऐकून ती फक्त बाजूला सरकली. तिने वळूनही बघितलं नाही.मी जवळ गेलो तेव्हा लक्षात आलं ती सुजा होती.आज तिने पूर्ण जिन्स् वर निळा टॉप घातला होता.केस व्यवस्थित विंचरलेले दिसत होते. कालची ' लूक ॲट मी 'वाली सुजी आणि आताची खरोखर लक्ष वेधून घेणारी ही सुजाता,हा एका दिवसातला फरक होता. तिला हटकाव की नाही ते मला कळत नव्हते.शिवाय एक अनामिक भिती मनाला हुरहूर लावून जात होती.अखेर मी तिच्या जवळ गेल्यावर गाडी थांबवली." अरेच्या, तुम्ही गेला नाही?"" का? खरच जायला पाहिजे होते?"मी काहीच बोललो नाही." तू सड्यावर चाललीस ना? मी पण तिथेच चाललोय."ती काही न बोलता गाडीवर बसली." खरं तर आज गेलं पाहिजे होतं.पण अजून काही नमुने गोळा करायचे आहेत."" राकेश कुठे आहे?"" तो रुमवरच राहिलाय.पाय दुखतोय म्हणाला."" अती उचापती आहे तो. सड्यावर काही वेगळ्या वनस्पती आढळल्या?"" वेगळ्या! ' दिपकाडी' ही १९९० पर्यंत एक्सटिंक्ट झाली असं सगळे समजत होते.पण आता या परीसरात ती आढळून आलीय..आणि ' कापरी कमळ 'तर फक्त या सड्यावरच सापडते.पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे इथे मला अशा काही वनस्पती आढळल्या की त्या या पृथ्वीवर कुठेच आढळत नाही."हे ऐकताच मी दचकलो." तूला खात्री आहे."" हो.तरीही मी अजून विश्लेषण करतेय."गाडी देवाच्या निशानाजवळ आल्यावर मी थांबलो.आज स्वच्छ ऊन पडले होते.सकाळच्या कोवळ्या उन्हात माळ विलक्षण साजीरा वाटत होता. ----*****-----****-----*****-----****-----*****--भाग २ समाप्त बाळकृष्ण सखाराम राणे 8605678026