अंधारछाया
माधवी मराठे
१
सह्याद्रीच्या दाट जंगलांमध्ये जिथे सूर्यप्रकाशसुद्धा जमिनीला स्पर्श करायला घाबरतो, तिथे एक प्राचीन वस्ती होती. रामदुर्ग हे गाव लहान होतं पण त्याच्या भोवती असलेली शांतता भेसूर होती. पक्षांचे आवाज क्वचितच एकू येत आणि रात्री तर वारासुद्धा कुजबुजल्यासारखा वाटायचा.
त्या गावात रहात होता वासूदत्त. एक तरुण वैद्य. औषधी वनस्पतींचे ज्ञान त्याला त्याच्या वडिलांकडून मिळालेले होते. पण वडिल त्याला एक गोष्ट नेहमी सांगत असत की जंगलाच्या पश्चिमेकडच्या भागात कधीही जाऊ नकोस. तिथे जे आहे ते जिवंत नाही. वासूदत्त नेहमी ती गोष्ट हसून उडवून लावत असे. त्याला वाटायचं अश्या कथा लोकांना घाबरवण्यासाठी बनवल्या जातात.
एके दिवशी गावात एक माणूस आणला गेला. अर्धंमेला. त्याचे नाव पुरखा. त्याच्या अंगावर खोल ओरखडे होते. जणू एखाद्या प्राण्याने त्याला फाडले होते. पण त्याच्या डोळ्यात असलेली भिती काही वेगळीच होती. वासूदत्तांनी त्याला औषध दिले आणि विचारले “ काय झाले तुला? कशामुळे या जखमा तुझ्या अंगावर झाल्या?”
“ तो.. तो काही प्राणी नव्हता... आणि माणूसही नव्हता.” पुरखा थरथरत म्हणाला.
“ मग काय होतं?” पुरखाने हळू आवाजात उत्तर दिले “ सावली.”
काय म्हणतोय ते काहीच न कळल्याने व तो फार बोलायच्या स्थितीत नसल्याने यथायोग्य औषधोपचार करुन वासूदत्तांनी त्याला घरी पाठवले. त्या रात्रीच पुरखा मरण पावला.
त्या घटनेनंतर गावात विचित्र घटना घडू लागल्या. रात्री अचानक जनावरं गायब होऊ लागली. कुत्रे एका दिशेला बघत गुरगुरत बसायचे आणि सर्वात भयंकर.. रात्री लोकांना त्यांच्या घरासमोर कुणीतरी उभे असल्याचा भास व्हायचा. एका रात्री वासूदत्तांना झोप येत नव्हती. बाहेर जोरदार वारा सुटला होता. अचानक त्यांना दारावर हलकासा आवाज झालेला जाणवला. टक....टक ते ऐकून त्यांनी तिथूनच विचारले “ कोण आहे?” पण काहीच उत्तर न आल्याने ते उठले व दाराच्या फटीतून कोण आले आहे ते बघू लागले. बाहेर जे काही दिसले ते बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अंगावर सरसरून काटा आला. दारासमोर कुणीतरी उभं होतं पण त्याला शरीर नव्हतं. फक्त ती एक काळी सावली होती. जिवंतपणाचा पूर्ण आभास देणारी. घाबरून वासूदत्त मागे सरकले. तेव्हढ्यात अमानवी आवाज आला “ वा..सू..द..त्त.” त्याच्या गूढ आवाजातली हाक ऐकून वासूदत्तांचे भान हरपले.
दुसऱ्याच दिवशी वासूदत्त गावातील वृद्ध पुजारी नामाभट्ट यांना जाऊन भेटले. रात्रीची सर्व घटना सांगून झाल्यावर ते म्हणाले “ पुजारी महाराज आपण गावातील सर्वात वयोवृद्ध आणि ज्ञानी व्यक्ती आहात. सध्या या ज्या विचित्र घटना घडत आहेत त्या काय आहेत? हे काय चाललय?” नामाभट्ट काही वेळ विचार करत बसून राहिले, मग म्हणाले “ तू जे पाहिलस ती छाया आहे.”
“ छाया?”
“ हो. खूप वर्षांपूर्वी या जंगलात एक साधू रहात होता. त्याने अमरत्व मिळवण्याचा खूप प्रयत्न केला..... पण कुठेतरी चूक झाली. त्याचा आत्मा शरीरातून वेगळा झाला...आणि मग तो सावली बनून अडकला.”
“ पण मग तो लोकांना का मारतो आहे?”
“ कारण त्याला योग्य ते शरीर हवे आहे.” वासूदत्तांच्या अंगावर काटा आला.
त्या रात्री पुन्हा आवाज आले. यावेळी संपूर्ण गाव जागं झालं. एका घरातून किंकाळी ऐकू आली, लोकं तिथे धावले. घरात एक स्त्री मृत पडली होती. तिच्या चेहेऱ्यावर काहीतरी अमानवीय पाहिल्याच्या खुणा होत्या.....आणि भिंतीवर एक काळी सावली हलत होती. जिवंत असल्यासारखी. वासूदत्तांच्या लक्षात आले हे कुठेतरी थांबायला हवे.
“ मी त्या जंगलात जाणार.” ते म्हणाले. ते ऐकून गावकरी घाबरले. “ वासूदत्त, काय बोलता तुम्ही हे?” तुम्हाला तुमचा जीव का धोक्यात घालायचा आहे?”
“ वासूदत्ता, तू जर का जंगलातल्या त्या भागात गेलास तर तू कदाचित तिथून कधीच परत येऊ शकणार नाहीस.” नामाभट्ट म्हणाले.
“ जर मी तिथे गेलो नाही तर गावातले कोणीच वाचणार नाही.”
दुसऱ्या दिवशी पहाटे वासूदत्त औषधी, मंत्र आणि एक जुनी तलवार घेऊन जंगलाच्या पश्चिमेकडे निघाले. जंगलात पाऊल टाकताच त्यांना जाणवले....इथे काहीतरी वेगळे आहे. हवा अचानक थंड झाली. पहाटेचे येणारे पक्षांचे आवाज थांबले आणि आपल्या मागून कुणीतरी चालत येत असल्याचा भास होऊ लागला. त्यांनी गरकन वळून मागे बघितले. तर तिथे कोणीच नव्हते. पण त्यांचे लक्ष जमिनीवर पडलेल्या दोन सावल्यांकडे गेले. एक त्यांची स्वतःची आणि दुसरी कोणाचीतरी. अजून तर सुर्योदय झालाही नव्हता. सूर्यप्रकाशाशिवाय सावली कशी पडेल? वासूदत्त अचंबित झाले. एकदम थिजलेल्या अवस्थेत ते तिथेच उभे राहिले. क्षणभराने स्वतःला सावरून खात्री करण्यासाठी आपले हातपाय हलवले, तेव्हा त्यांची सावली तर हलली पण दुसरी सावली त्यांच्या जवळ सरकू लागली. वासूदत्त आता गांगरले. त्या सावलीला चेहेरा नव्हता, डोळे नव्हते तरी ती त्यांच्याकडे पहात आहे हे त्यांना स्पष्ट जाणवत होते. अचानक जंगलातून कुठूनतरी कुजबूज ऐकू आली. “ परत जा.” त्या अमानवीय आवाजाने वासूदत्तांचे भान हरपू लागले. पण नकळत त्यांचा हात मंत्राच्या ताम्रपटावर स्थिरावला, तसे ते भानावर आले. एक हात तलवारीच्या मुठीकडे वळला व दुसरा हात त्या ताम्रपटावर ठेवून ते निश्चयाने म्हणाले “ मी परत जाणार नाही.” त्या क्षणी दुसरी सावली लांब सरकत जाऊन झाडांच्या बुंध्यात मिसळून नाहीशी झाली.
थोडं पुढे गेल्यावर जंगल आणखी दाट झाले. आता सुर्योदय झाला होता पण झाडांच्या फांद्या एकमेकात इतक्या गुंतल्या होत्या की खाली अजून अंधारच जाणवत होता. फांद्यांमधून डोकावणारं आकाश तुकड्या-तुकड्याने दिसत होतं. त्या नीरव शांततेत वासूदत्त चालत आजुबाजूची चाहूल घेत राहिले. इतक्यात त्यांची नजर दूरवर असलेल्या जुन्या दगडी खांबावर पडली. त्यावर ब्राम्ही लिपीत काहीतरी कोरलेलं होतं. त्या दगडी खांबाजवळ जाऊन त्यांनी बारकाईने न्याहाळले. अत्यंत प्राचीन अंशतेचा परिणाम दाखवणारा तो खांब होता. ब्राम्ही लिपीत लिहिलेल्या मजकुराची धूळ झटकत वासूदत्त त्यावरील मजकूर वाचू लागले. ‘ येथून पुढे प्रकाशाचा अधिकार संपतो.’ वाक्य वाचून ते एकदम दचकले. प्रकाशाचा अधिकार संपतो म्हणजे काय? पृथ्वीवर अशी कणभर जागा असेल का? की जिथे प्रकाश पोहोचत नसेल? तेव्हढ्यात मागून आवाज आला “ आता हे सगळं कळून घ्यायला तुला खूप उशिर झाला आहे वासूदत्त.” गरकन वळून मागे वळून बघितले तर तिथे त्यांचे वडील उभे होते. “ बाबा......” वासूदत्तांच्या डोळ्यात आश्चर्य आणि वेदना दाटली. त्यांचे वडील तर पाच वर्षांपूर्वीच मरण पावले होते. वडील त्यांच्याकडे शांतपणे पहात म्हणाले
“ वासूदत्ता... मी तुला सांगितले होते की जंगलाच्या पश्चिमेकडे जाऊ नकोस.” वासूदत्त एकदम एक पाऊल मागे सरकले. “ तू माझे बाबा नाहीस. कोण आहेस तू ?” त्या आकृतीच्या ओठांवर विचित्र हास्य उमटलं. “ तुझे बाबा नाही तर मी कोण आहे असे तुला वाटले?” क्षणात त्या आकृतीत बदल घडू लागला. वडिलांसारखा दिसणारा चेहेरा काळा पडून त्या जागी खोल पोकळ्या निर्माण झाल्या. त्वचा विरळ होऊन चारीबाजूंनी नाहीशी होऊ लागली आणि पुढच्या क्षणात तिथे फक्त काळी छाया उभी होती. ती छाया म्हणाली “ तुझे गरम शरीर मला दे...” ती आकृती आपल्या रोखाने जवळ येत आहे हे पहाताच वासूदत्तांनी मंत्र म्हणत मुठीत आवळलेले भस्म त्या छायेवर फेकले. ते भस्म शरीर नसलेल्या छायेवर पडताच त्याने किंकाळी फोडली. अमानवीय आवाजातल्या त्या किंकाळीने सगळे जंगल हादरले. तो आवाज इतका भयानक होता की जणू शेकडो लोकं एकाचवेळी असहाय्य वेदनेने मृत्यु पावत आहेत असे वाटू लागले. छाया वेडीवाकडी धावत सुटली. त्याच्या मागे वासूदत्तही धावत सुटले. पण शेवटी ती सावली कुठे गायब झाली ते न समजल्याने काही क्षण ते स्तब्ध उभे राहिले आणि मग ती छाया ज्या दिशेने गेली तो मार्ग चालत राहिले. आता सूर्य बराच वर आला होता. पण कुठे-कुठे उजेडाच्या तिरिपीने जंगल आत्ता कुठे उजळत चालले होते. समोरचे दृश्य आता स्पष्ट दिसत असल्यामुळे वासूदत्त जरा स्थिर मनाने चालू शकत होते. अन्यथा अंधारात श्वापदांची भीती व तसेच अमानवीय सावलीने मांडलेला उच्छाद दोन्हींचा भार मनावर इतका वेळ होता की वासूदत्त कितीवेळ चालत राहिले हे त्यांनाच कळेना.
दूरवर आश्रमासारखा आकार दिसताच त्यांचे डोळे चमकले व घाईघाईत तो मार्ग चालायला सुरवात केली. लवकरच ते त्या भग्न आश्रमापाशी पोहोचले. सर्वत्र उजाड, भकास, कुठल्यातरी तुफानाने विखुरल्यासारखे तिथले अवशेष दिसत होते. अर्धे कोसळलेले दगड, मुर्तींचे तुकडे विखूरलेले होते आणि त्याच मध्यभागी विशाल काळा यज्ञकुंड. अश्या सर्व गोष्टी न्याहाळत कुठल्या प्रकारचे तुफान इथे आले असावे किंवा कुठल्या अघोरी क्रिया केल्यामुळे त्या शक्तींनी या ठिकाणाची अशी अवस्था केली असावी याचा अंदाज घेत ते सावधपणे त्या आश्रमात गेले. त्या अर्ध तुटक्या भिंतींवर चित्र-विचित्र चित्रे रेखाटलेली होती. मानव शरीरातून बाहेर पडणाऱ्या सावल्या, रक्ताने रेखाटलेले वर्तुळं आणि एका साधुचा चेहेरा. त्या चेहेऱ्याकडे पहाताच वासूदत्तांच्या डोक्यात वेदना उसळली. एव्हढ्यात मागून आवाज आला
“ मी मृत्युला जिंकणार होतो.... देवाच्या वरचे स्थान मिळवणार होतो.....पण एका चुकीच्या साधनेने माझा घात झाला आणि माझं शरीर नष्ट झाले...उरली ती केवळ सावली.”
वासूदत्तांनी डोळे घट्ट मिटले आणि नामाभटांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मनात उभ्या राहिल्या. ‘ ज्याला देह नाही, त्याला नावाने बांधून टाकता येते. फक्त त्याचं खरं नाव काय आहे ते शोध.’ वासूदत्त एकदम सतर्क झाले. आश्रमात कुठल्या गोष्टींचा शोध लागतो ते बघू लागले. अघोरी कर्मासाठी लागणारे चित्र-विचित्र सामान सर्वत्र विखुरलेले होते. त्यांची तेज नजर त्या नावाचा शोध घेऊ लागली. ती छायाही त्यांच्या मागे-पुढे धावत, त्यांना घाबरवत पाठलाग करू लागली. वासूदत्त काय शोधत आहेत याचा अंदाज त्या सावलीला आला नव्हता, शिवाय त्यांच्याजवळ असलेला मंत्र लिखित ताम्रपट छायेला जवळ येऊ देत नव्हता. केवळ मृत शरीराचा ताबाच त्या छायेला मिळवता येत असल्याने ती आता वासूदत्तांना काही करू शकत नव्हती. केवळ त्यांना घाबरवणे, धमकावणे एव्हढेच त्या छायेच्या हातात होते. इतर लोकं केवळ छाया पाहून भीतीने बोबडी वळून मरण पावत असत पण त्या छायेला ताकदीचे शरीर हवे होते. त्याच्या साधनेचे तेज पेलणारे शरीर हवे होते आणि आता त्याला ज्या देहाची गरज होती तो देह समोर होता. कुठल्यातरी तऱ्हेने वासूदत्तांचा मृत्यु होईल असे करणे गरजेचे होते.
पण आता वासूदत्त सावलीच्या धमकावण्याला किंवा छळ-कपटाला भीक घालत नव्हते. त्यांच्या लक्षात आले की ही छाया आपलं काहीही वाईट करू शकत नाहीये. तिला घाबरून आपण मेलो तरच ती आपल्या शरीराचा वापर करू शकेल, अन्यथा ती काहीही करू शकणार नाही. असा विश्वास जेव्हा त्यांच्या मनात बळावला तेव्हा त्यांचे मन स्थिर झाले. बारकाईने शोध घेत आता ते निवांतपणे फिरू लागले. त्यांची नजर एका भग्न गुंफेच्या दगडांपाशी गेली. तिथे ते गेले व बघू लागले. त्या दगडांखाली कोरड्या पानांचा ढीग साठला होता. भिंतींच्या भेगांमधून झाडं डोकावत होती. जवळच पडलेली काठी घेऊन तो पालापाचोळा दूर करत शोध घेऊ लागले. तेव्हढ्यात खाली तांब्याच्या पट्टीवर लिहिलेली अक्षरं त्यांना दिसली. ‘ कालयात्री सोमेश्वर ’. त्यांचा श्वास क्षणभर थांबल्यासारखा झाला. हेच नाव त्या सावलीचे होते. आता वासूदत्त काय शोधत आहे हे त्या सावलीलाही कळाले व त्याचा काय परिणाम होईल हे ही लक्षात येताच ती बेभान झाली. आता निकराची झुंज देण्याचा पवित्रा त्या सावलीने घेतला. सोसाट्याचा वारा सुटला. सर्वत्र धुळ, कचरा उडू लागला. समोरचे दिसणेही मुश्किल झाले. विचित्र आवाजाने परिसर हादरू लागला. वासूदत्तांच्या लक्षात आले की आपल्याला बांधले जाईल या भीतीने सावली आता बिथरली आहे. अजून काही मिनिटे जरी आपण वाया घालवली तर आपला मृत्यु अटळ आहे. काही दिसत नसताना अंदाजानेच जिथे तांब्याची पट्टी होती तिथे त्यांनी हात घातला व हाताला त्या पट्टीचा स्पर्श होताच ती ओढून काढण्याचा ते प्रयत्न करू लागले. वाऱ्याच्या झोताने त्यांना धड उभेही रहाता येत नव्हते. धुळ गेल्यामुळे डोळे चुरचुरू लागले. एक असह्य दुर्गंधी सर्वत्र पसरली त्यामुळे त्यांच्या पोटात ढवळू लागले. आता एकच क्षण, एकच जोर अन्यथा मृत्यु. या विचाराने त्यांनी निकराने ती पट्टी ओढली.
रक्तबंबाळ हातात ती पट्टी आली आणि सगळं जंगल एकदम शांत झालं. एका क्षणापूर्वी जे घडत होतं त्याचा कुठे मागमूसही उरला नाही. पण ते घडलं होतं याची साक्ष देणारी तांब्याची पट्टी वासूदत्तांच्या हातात होती. आता जंगलाला त्याचे स्वतःचे अस्तित्व मिळू लागले. पानांची जिवंत सळसळ, वाऱ्याची हलकी गुणगुण, पक्षांची किलबिल सुरू झाली. झाडावर कोमेजलेले फुलं परत सजीव झाले. जिथे काळ थांबला होता तो आता परत श्वास घेऊ लागला. हळुहळू चालत वासूदत्त यज्ञकुंडापाशी आले आणि म्हणाले “ कालयात्री सोमेश्वर” आता आश्रमाच्या चारही बाजूंनी सावल्या हळुहळू सरकू लागल्या. एक नाही....दोन नाही......शेकडो सावल्या. प्रत्येक सावली वेगळी. काही प्राण्यांच्या आकाराच्या तर काही माणसांसारख्या होत्या आणि काही तर आकारहीन होत्या. मध्यभागी सर्वात मोठी छाया उभी राहिली. तिचा आवाज आश्रमभर घुमला
“ वासूदत्त, माझं नाव उच्चारण्याची तुझी हिंमत कशी झाली?” वासूदत्त तलवार उचलून म्हणाले “ तुझा अंत करण्यासाठी मी तुझे नाव उच्चारले आहे.” आपले तलवार उचलणे किती अनाठायी आहे हे ते जाणून होते. तलवारीने छायेला कसे मारता येणार? पण काही गोष्टीच्या स्पर्शाने त्या त्या प्रकारचे भाव प्रकट होतात. तलवारीच्या स्पर्शाने वीरभाव, फुलांच्या स्पर्शाने कोमलभाव..... पण आता इथे तर त्या कशाचा संबंध नव्हता. वासूदत्ताच्या वक्तव्यावर छाया हसली
“ माझा अंत? मी तर अंतानंतरच्या अवस्थेत आहे.” असे म्हणून वासूदत्त बेसावध आहे हे लक्षात घेऊन ती छाया एकदम झेपावली. तिच्या झेपावण्याने दचकून ते मागे झाले पण त्या छायेचा ओझरता स्पर्श, एक थंड विचित्र हवा त्यांना स्पर्शून गेली. क्षणभर त्यांचा श्वास अडखळला. डोळ्यासमोर गाव दिसू लागलं. जळणारं गाव..... लोकं बेभान होऊन सैरावैरा पळत आहेत....कुणी आग विझवायचा प्रयत्न करतय, कुणी वेदनेनी ओरडतय, लहान मुलं, स्त्रियांचे आक्रोश, बांधलेल्या जनावरांची खुंट्यांपासून सुटण्याची धडपड.....आणि त्यांची नजर एकदम खाली पडलेल्या एका माणसावर गेली. ते नामाभट्ट होते. मृतावस्थेत. त्यांचा देह जळून खाक झाला होता. हे सर्व पहाताना आत छातीत कुणीतरी प्रवेश केल्याचे जाणवले. स्वतःच्या शरीरात अजून कुणाचे तरी वास्तव्य जाणवू लागले. आतून हलका आवाज आला “ मला शरीर दे.....त्याबदल्यात मी तुझे गाव वाचवेन.” वासूदत्त आतून थरथरले. उदात्तता अथवा स्वार्थ या कोंडीमधे त्यांना पकडले गेले होते. तरी निकराने लढा देत ते म्हणाले “ तू खोटं बोलत आहेस.”
“ नाही....मी खोटे बोलत नाही. तुझा देह माझ्यासाठी परिपूर्ण आहे. माझ्या इच्छा-आकांक्षांची परिपूर्ती करणारा आहे. असा देह मिळवण्यासाठी मी किती वर्षानुवर्ष फिरत आहे. तुझा देह मला दे अन्यथा या गावाच्या प्रत्येक घरात मी शिरेन.”
वासूदत्तांना कळून चुकले आपण स्वार्थी भावना निवडून आपला जीव वाचवला तरी जगूनही हा आपल्या आयुष्याशी खेळच करत रहाणार त्यापेक्षा गावातले लोकं सुखी रहातील हाच मार्ग निवडावा पण त्या अगोदर जेव्हढे लढता येईल तेव्हढे लढून त्याला मात देण्याचा प्रयत्न करावा. मग कुठलाच विचार न करता हातातली तांब्याची पट्टी वासूदत्तांनी धगधगत्या यज्ञकुंडात फेकली व म्हणाले “ कालयात्री सोमेश्वर, मला तुझे नाव माहित आहे. आता तुझा प्रकाश हरवला आहे. तुझी छाया तुझी राहिली नाही. जिथून आलास तिथे परत निघून जा.” यज्ञकुंडातल्या तीव्र आचेने वितळणाऱ्या ताम्रपट्टीतून निळसर ज्वाला उठू लागल्या. त्यासरशी ती छाया भेसूरपणे किंचाळू लागली. त्या अमानवीय भेसूरतेने वासूदत्तांच्या अंगावर शहारे आले. रक्तवाहिन्यातले रक्त गोठत असल्याचे त्यांना जाणवू लागले. आश्रमाच्या सभोवताली जमा झालेल्या सावल्या एक-एक करुन जळू लागल्या. पण मुख्य छाया अजून तिथे तशीच उभी होती. रागाने बेभान होऊन वाकडी-तिकडी हलत होती. “ तू मला बांधू शकणार नाहीस.” जोरदार गर्जना करुन त्वेषाने पेटलेली ती छाया वासूदत्तांच्या सावलीत शिरली. ते खाली कोसळले. शरीराची तडफड होऊ लागली. आतमध्ये अंगार पेटल्याचा भास होत होता. अनाम दडपणाने सगळे रोम न रोम भरुन गेले. डोळे आपली स्थिरता गमावून गरागरा फिरू लागले. कानात अनामिक आवाजांचा कल्लोळ चालू होता. सगळेच अमानवीय. काही क्षणानंतर अचानक सर्वत्र शांतता भरुन राहिली. जंगलात पुन्हा वारा वाहू लागला. वासूदत्त जमिनीवरून स्वतःला सावरत उठले. यज्ञकुंड आता विझलं होतं. तांब्याची पट्टी काळी पडलेली दिसत होती. इकडे-तिकडे पहात असताना त्यांना एकदम जाणवले की आपल्या शरीराची सावली जमिनीवर पडत नाहीये.
२
सुर्योदयापूर्वी निघालेले वासूदत्त, सगळी ही घडामोड होऊन जंगलातून वाट काढत जेव्हा गावात पोहोचले तेव्हा रात्र झाली होती. पारावर त्यांची वाट बघत लोकं थांबलेले आहेत हे त्यांनी बघितले. लोकांमधली अस्वस्थता जाणवत होती. एकदम लोकांचे लक्ष जंगलातल्या वाटेवरून परतणाऱ्या वासूदत्तांकडे गेले. सुटकेचा निःश्वास टाकत काहीजणं धावतच त्यांच्या जवळ गेले. पारावर जमलेल्या लोकांपाशी आल्यावर वासूदत्तांनी शांतपणे नजर फिरवली. कोणीतरी विचारले “ छाया गेली का?” स्थिरपणे पहात उत्तर दिले
“ नाही. पण आता ती कोणालाही त्रास देणार नाही.” ते ऐकून लोकं आनंदले. काही वेळ आपापसात चर्चा करत ते घरी निघून गेले. पण नामाभट्टांना वेगळीच शंका येत होती. बारकाईने त्यांचे निरीक्षण केल्यावर नामाभट्टांनी हळू आवाजात विचारले “ वासूदत्ता, तुझी सावली कुठे आहे?” वासूदत्तांनी आपल्या पायाखाली पाहिले. सूर्यप्रकाशातही त्यांच्या पायाखालची जमिन मोकळी होती. त्यांच्या चेहेऱ्यावर आता मंद गूढ स्मित दिसू लागले. “ छायेची सावली दिसत नसते भटजी.” नामाभट्ट या उत्तराने चमकले. त्यांच्या चेहेऱ्यावर भीती उमटली. वासूदत्त जंगलातून एकटेच परत आलेले नाही हे त्यांना जाणवले. त्या छायेने वासूदत्तांवर मात केली व आपला डाव साधला आहे हे लक्षात येताच त्यांच्या समोरच्या भिंतीवर एक सावली डुलत असल्याचे दिसू लागले.
ती सावली एका साधूची आहे हे त्यांनी जाणले. जंगलात काय घटना घडली असणार याचा त्यांना अंदाज आला पण अजून जाणून घेण्यासाठी त्यांनी ध्यान लावले. हळुहळू आपल्या अंतर्चक्षूनी काळाच्या आत शिरत ते त्या दिवसाच्या सुरवातीच्या घटनेपर्यंत पोहोचले. त्यांच्या डोळ्यासमोर पूर्ण प्रसंग चित्रपटासारखा तरळू लागला. झालेल्या घटनेने त्यांच्या लक्षात आले की वासूदत्तांना त्या साधूचे नाव कळाले व त्यांना यज्ञकुंडात बांधून घालताना ज्या अनेक लोकांचा बळी घेऊन सोमेश्वरने बांधून ठेवले होते ते या घटनेमूळे मुक्त झाले पण कालयात्री सोमेश्वरला बांधून ठेवायला वासूदत्त कमी पडले होते. भावनिकतेच्या आहारी न जाता त्यांनी दृढ मनानी ते कार्य केले असते तर कदाचित सोमेश्वरचा नाश होऊ शकला असता, पण गावाची राख-रांगोळी केलेले दृश्य वासूदत्त पाहू शकले नाही व त्या क्षणी ते कमजोर पडल्यामुळे सोमेश्वरला त्यांच्या विरळ झालेल्या इच्छाशक्तीतून आत शिरायला जागा मिळाली. शरीर वासूदत्तांचे आणि त्यात सोमेश्वरचे सुक्ष्म शरीर सामिल झाले. त्यात आता वासूदत्तांच्या सुक्ष्म शरीराची तडफड होत असेल. त्यांना मोकळे केले पाहिजे. पण ते कसे? याचे उत्तर सोमेश्वरकडूनच मिळू शकणार होते. ताकदीचे साधू होते ते. केवळ अमरत्वाच्या इच्छेने त्यांच्या सर्व आध्यात्मिक शक्तींचा ऱ्हास झाला होता.
त्या रात्री रामदुर्ग गावावर शांतता पसरली होती. पण त्या शांततेतही एकप्रकारची अस्वस्थता जाणवत होती. नैसर्गिक शांतीची कमतरता होती. सतत कुणीतरी कशाची तरी चाहूल घेत आहे असे वाटत होते. नामाभट्ट मंदिरात जाऊन बसले. देवाच्या सगुण मूर्तीकडे पहात त्यांच्या हातातली जपमाळ फिरत होती. यंत्रवत माळेचे मणी व मंत्र पुढे सरकत होते. विचलित मनाने देवापाशी धावा चालू होता. वासूदत्त हे आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत अधिकारी असलेला आत्मा होते. जीवनात आपल्याला काय करायचे हे त्यांना पूर्ण ज्ञात होते. अन्यथा फार कमी मनूष्यांना आपल्या जीवनाचे ध्येय सापडलेले असते. आयुष्यभर जशा वाटा मिळतील तसे चालत राहून मनुष्य आपले जीवन संपवतो. नाही......वासूदत्तांना परत आणायलाच हवे. नामाभट्टांना आता रात्र किती झाली याचे भानही राहिले नाही. देवाला आळवता आळवता कुठेतरी पहाटेचा कोंबडा आरवल्यावर ते भानावर आले. देवाने एक रस्ता दाखवला होता. काळयात्री सोमेश्वरचीच मदत घेऊन त्याला आधी मार्गावर आणण्याचे काम नामाभट्टांवर सोपवले. मग सोमेश्वरची सुटका झाली की आपोआपच वासूदत्तांची सुटका होणार होती. पण ते एव्हढे सोपे नव्हते.
इकडे वासूदत्त आपल्या घरी पोहोचले. त्यांच्या हालचालीत एक विचित्रता होती. एरव्ही धीर-गंभीर, आत्मविश्वासपूर्ण पावले टाकणारे वासूदत्त, एका वेगळ्याच लयीत चालत होते. सावली जशी वर-खाली होत असे तसे त्यांचे चालणे वाटत होते. आईने वासूदत्तांना पहाताच एक निःश्वास सोडला. आपलं देवाचं लेकरू घरी येतं की नाही याचीच तिला चिंता लागून राहिली होती. गावाचं भलं करण्यासाठी जीवावर उदार होऊन निघालेला आपला मुलगा म्हणून तिला अभिमानही होता पण त्याला गमवायची तिची तयारीही नव्हती. कुटुंब म्हणून ते दोघच एकमेकांना राहिले होते. वासूदत्तांकडे प्रेमाने पहात ती माऊली म्हणाली
“ आलास बाळा, काही त्रास झाला नाही ना?” त्यावर हलकेच हसत पण थंडपणे ते म्हणाले “ आई, मी अगदी बरा आहे. काही काळजी करू नकोस. झोप तू आता. मी थोड्यावेळाने जेऊन घेईन.” वासूदत्तांचा आवाज ऐकून आई चरकली. हा आपलाच मुलगा आहे ना? अशी कुठेतरी भावना तिच्या मनात दाटून आली.....पण तो परत आला आहे हे पाहून बाकी शंका तिने झटकून टाकल्या आणि ती झोपायला गेली.
इकडे वासूदत्त, एका खोलीतला गडद अंधार शोधून त्या कोपऱ्यात बसून राहिले. आतून काहीतरी हालचाल होत होती. मनावर त्या सावलीचा इतका विलक्षण पगडा होता की स्वत:च्या मनाचा क्षीण आवाज आता त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचतही नव्हता. शरीराला भूक लागली होती पण सोमेश्वरचे साधना असलेले मन व सुक्ष्म शरीर अन्नापासून दूर होते. शरीरात असताना दिवसें दिवस काहीही न खाता-पिता साधना करत रहायचे हेच त्यांच्या सुक्ष्म शरीरातही भिनलेले होते. वासूदत्तांचे शरीर व सोमेश्वरची आतली सावली या दोघांना, अजून एकमेकांशी सांगड घालता आली नव्हती. काही काळ गेल्यावर दोघेही थोडे शांत होऊ लागले. शरीरावर हुकमत गाजवायची तर त्याच्या गरजा पूर्ण करणं आवश्यक आहे हे सोमेश्वरच्या लक्षात आले व त्यांनी वासूदत्तांना खाण्याची आज्ञा दिली. सोमेश्वरच्या सुक्ष्म शरीराने दिलेला संकेत हलकेच कुठेतरी जाणवला. शिवदत्तांच्या मनात दुसरा विचारही तरळून गेला की सध्या तो सांगतोय ते निमूटपणे करुन त्याचा विश्वास जिंकून घ्यावा. मग योग्य वेळी यावर तोडगा मिळेल. वासूदत्त उठले. आईने केलेल्या रुचकर स्वैपाकाचा आस्वाद घेऊ लागले. खात तर ते होते पण अन्न खाल्यावर जशी तृप्ती जाणवायची ती त्यांना कळत नव्हती. ती तृप्ती सोमेश्वरला जाणवत होती. किती वर्षांनी अन्नाच्या वासनेचा त्यांनी उपभोग घेतला होता. आजच्या एव्हढ्या घडामोडीनंतर वासूदत्तांना जागत ठेवणे व त्यांच्याकडून साधना करुन घेणे योग्य नाही व आपल्यालाही मिळालेल्या या नवीन शरीरकडून काय व कसे काम करुन घ्यायचे याचा ही आराखडा तयार करण्यासाठी वेळ हवा आहे या हेतूने त्यांनी वासूदत्तांना झोपण्याचे संकेत दिले. सुर्योदया आधीपासून निघालेले वासूदत्त खूपच दमले होते. पडल्या-पडल्या त्यांना झोप लागली.
दुसऱ्या दिवशी सगळं गाव तर तसं सामान्य दिनक्रम आक्रमत होतं. सुरक्षितता जाणवून कुठेतरी त्यांच्यात आनंद दाटला होता. नामाभट्ट मात्र आपले सगळे आवरून वासूदत्तांच्या घरी आले.
“ वासूदत्ता, मला जरा तुझ्याशी बोलायचे आहे.” त्यांनी नामाभट्टांना आत नेले. घरी कोणीही नव्हते.
“ तुला वासूदत्त म्हणू की सोमेश्वर, हे मला कळत नाहीये. पण कुठल्या कारणाने तू या शरीराची निवड केली आहेस?”
“ नामाभट्ट, खूप प्रगती केली आहे तुम्ही अध्यात्मात. त्यामुळेच तुम्ही मला ओळखू शकलात. वासूदत्त पण किती आध्यात्मिक ताकदीचा आहे हे ही तुम्हाला माहित आहे. माझ्यासारख्या महान तपस्वीला काही प्राप्त करण्यासाठी किती शक्तिशाली शरीराची गरज आहे हे ही तुम्हाला माहित आहे. वासूदत्ताचे शरीर म्हणजे अगदी माझ्यासाठी योग्य ते पात्र हातात येणं आहे.”
“ पण तू काय करणार आहेस? त्यामुळे वासूदत्ताला काही अपाय तर होणार नाही ना?”
“ मी त्याच्या शरीरात आहे तोपर्यंत त्याला कोणीही धक्कापण लावू शकणार नाही. पण त्याच्या आत्म्याविषयी, सुक्ष्म शरीराविषयी बोलायचे झाले तर आम्हालाच एकमेकांशी कधी-कधी संघर्ष करावा लागणार आहे. कोण? कधी? किती? कसे? एकमेकांवर हावी होतील हे आत्ताच सांगणे कठीण आहे.”
“ तू काय प्राप्त करणार आहेस?”
“ अजून मी काही ठरवले नाही. विचारांची दिशा पक्की झाल्यावर मी तुम्हाला सगळी कल्पना देईन पण तुम्हाला हे ही सांगून ठेवतो की गावात अजून काही बळी जातील.”
“ सोमेश्वर, हे ठीक नाही. वासूदत्तांचे शरीर तर तू मिळवले आहेस मग तुला आता अजून बळी कश्यासाठी पाहिजे आहेत?”
“ माझ्या मजबुतीसाठी. आता तुम्ही जा.” वासूदत्त थंड नजरेने नामाभट्टांकडे पहात म्हणाले.
घरातून बाहेर पडताच नामाभट्ट गावातील पाराकडे निघाले. जाता-जाता जे कोणी रस्त्यात भेटतील त्याला, पारावर सगळ्यांना जमायला सांगा असे निरोप देत ते तिथे पोहोचले. नामाभट्टांना गावात फार मान होता. काही अवधीतच लोकं पारावर जमा झाले. जवळपास सगळे आलेले दिसताच नामाभट्ट बोलू लागले. “ माझ्या गावकऱ्यांनो, आपल्या गावावरचे संकट टळलेले नाही. छाया गावातून, जंगलातून नाहीशी झालेली नाही. काही अघटित दिसले तर त्याला न घाबरता सामना करा. अन्यथा तुमचा भीतीनेच जीव जाईल. रात्र व्हायच्या आत सगळे आपापल्या घरी परता. घरात मंत्रजागर करा. आलेल्या संकटाला तोंड द्या.” हे ऐकून सर्वजण घाबरले. या आलेल्या प्रसंगाला तोंड कसे द्यायचे हे कुणालाच माहित नव्हते. म्हणजे गावात अजून बळी जाणार हे निश्चित होते. एकजण म्हणाले “ त्याला थांबवता येणार नाही का?”
“ आपण सर्व प्रकाराने त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण तो खूप शक्तिशाली आहे. त्याच्याशी लढायला सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. घाबरू नका. सतर्क रहा. जा आता तुम्ही सगळे घरी.”
रात्र झाली. सगळे गाव सामसुम झाले. मध्यरात्री वासूदत्त उठले. आईची झोपमोड न होऊ देता, दार उघडून ते जंगलाच्या दिशेने निघाले. रात्र होताच या जंगलातले वातावरण पूर्ण बदलून जाते. भयानक शांततेच्या डोहात जणू ते पूर्णपणे बुडालेले असते. दिवसा जे जंगल एक गुढतेचा आभास देते, ते आता पूर्ण काळ्या अंधाराच्या आधीन झालेले एक राज्य वाटत होते. पूर्ण चंद्र असुनही झाडांच्या घनदाटतेला छेद देऊ न शकल्याने चुकार चंद्रकिरणांच्या सावल्या वातावरणाला अजूनच भितीदायक बनवत होत्या. रात्रीच्या वेळी जंगलाचे उग्र रुप समोर येत होते. रातकिडयांच्या किर्र आवाजाने जंगलाची जागा जिवंत भासत होती. जणू तो जंगलाचा आवाज होता. वासूदत्तांच्या मनात काहूर उठले होते. या सर्व भीषणतेकडे त्यांचे लक्षही जात नव्हते. अचानक दूरवरून कोल्हेकुई एकू आली. घुबडाच्या हिरव्या डोळ्यांकडे लक्ष जाताच ते दचकले. मनात विचार चमकून गेला. घुबडाचे डोळे हिरवे असतात? मनाच्या जाळ्यात आपण गुंतत चालल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि मान झटकून विचार दूर करण्याचा प्रयत्न करत ते वेगाने चालू लागले. पायाखाली वाजणाऱ्या सुक्या पानांच्या आवाजाने जिवाणूंची चाहूल लागत नव्हती. सभोवतालचा गारवा आता शरीराबरोबर मनही गोठवून टाकत होता. जंगल श्वास-उछवास करत खाली-वर होत आहे असे वासूदत्तांना भासू लागले. अचानक समोर अजगराचा विळखा जाणवून ते स्तब्ध झाले. पण क्षणभरात लक्षात आले ती तर वेलीची जाड फांदी होती. पुढे जाता-जात त्यांना हवेत एकप्रकारचा विचित्र तवंग आणि उग्र वास जाणवू लागला. आपल्या मनावर काबू मिळवण्यासाठी ते एका विस्तीर्ण झाडाखाली थांबून सर्वत्र बघू लागले. तिथून खाली झिरपणाऱ्या चंद्रप्रकाशात त्यांचा चेहेरा अर्धा उजळलेला होता आणि अर्धा काळोखात. जणू जिवंत शरीर आणि छायेचा खेळ तो चेहेरा दर्शवत होता. त्यांच्या पायाजवळ अजूनही स्वत:ची सावली नव्हती. पण त्यांच्या लक्षात आले आपल्या मागे मात्र विशाल छाया उभी आहे. रात्रीचा अंमल त्या छायेवर चढून बेसावधपणे सोमेश्वर म्हणाले “ वासूदत्ता, तू मनाने आणि शरीरानेही मजबूत आहेस....तुझ्यामुळे मी जिवंत आहे. तू मला शक्ती पुरवत आहेस. आपण दोघे मिळून पूर्ण जग अंधारात बुडवू शकतो आणि लोकांची ऊर्जा आपल्यात सामावून घेऊन अमर होऊ शकतो.” वासूदत्तांनी क्षणभर डोळे मिटले. डोळ्यांसमोर जीवनभर साथ दिलेले गावकरी....आई.....नामाभट्ट हे सगळे तरळून गेले. या एका बेसावध क्षणी वासूदत्तांना आपल्या सुक्ष्म शरीराची साथ मिळत होती. पुढे काय करायचे? यावर उपाय दाखवत होती. पण काही क्षणातच सोमेश्वरचे शरीर बलवान झाले. तोपर्यंत वासूदत्तांना उपाय मिळाला होता. आता आपण काय करायचे हे त्यांच्या लक्षात आले.
ते म्हणाले “ सोमेश्वर, मी कुणालाही इजा करणार नाही.” छाया गुढपणे हसली. “ वासूदत्ता, आपण कालच त्याची सुरवात केलेली आहे.” वासूदत्त चमकले. सोमेश्वरचा बलवान आत्मा आपल्याकडून नकळत गोष्टी करुन घेत आहे हे त्यांच्या लक्षात आले. किंचित थरथरत्या आवाजात ते म्हणाले “ काल काय केलस ते मला पहायचे आहे आत्ता. या क्षणी...” सोमेश्वरनी जोरात हसत ते दृश्य समोर उभे केले.
रात्री दोन वाजण्याचा सुमार....किर्रर्र....अंधारात बेवारस कुत्रे अनामिक चाहूल लागून भुंकू लागले. रडू लागले. सर्वत्र जोरात वारे वाहण्याच्या आवाजाने वातावरणात एक भीषणता जाणवू लागली. सोमेश्वरने एक घर हेरले आणि वाऱ्याने उघडल्या गेलेल्या खिडकीतून वासूदत्तांसह आत गेले. एका खोलीत म्हातारे आई-बाप आणि दुसऱ्या खोलीत लेक-सून, छोट्या बाळासह झोपले होते. अचानक काही विचित्र आवाज सगळ्यांच्या कानावर आदळू लागला. त्या आवाजाच्या धसक्याने घरातले लोकं जागे झाले. भिंतींवर चित्र-विचित्र आकृत्या नाचताना पाहून सगळ्यांची नजर विस्फारली. बोबडी वळू लागली. घशातून विचित्र आवाज येऊ लागले. एका विशिष्ट दर्पाने त्यांचा श्वास घुसमटू लागला आणि हळुहळू त्या छायेचा जोर वाढू लागला तसा त्या माणसांचा मृत्यु समीप आला. छाया त्या सगळ्यांना ओलांडून गेली. मग घरात राहिले फक्त चेहेऱ्यावर भीती गोठलेली कलेवरं......वासूदत्तांना दाखवत असलेले दृश्य संपवत सोमेश्वर म्हणाला “ बघितलस, काही क्षणांचा खेळ....पण त्या पाच बळींनी आपली किती ताकद वाढली.”
“ नाही....हे मी केलेले नाही. मी कधीच कुणाचे प्राण घेऊ शकत नाही.”
“ वासूदत्ता, आता तू आणि मी वेगळे नाही आहोत. तुझ्या शरीरात, प्रत्येक विचारात, सावलीत मी सामावलेलो आहे. अजून तुझ्या काही भागावर मला ताबा मिळवता आलेला नाही. तुझी सद्विवेक बुद्धी अजून जागृत आहे. पण लवकरच तिथेही मी ताबा मिळवेन.”
“आता मी तुला थांबवणार आहे सोमेश्वर....माझी सद्विवेकबुद्धी नष्ट व्हायच्या आत मी निर्णय घेणार आहे.” छाया थरथरली. हाती आलेले पात्र जाऊ देणं त्याला परवडणार नव्हतं. सोमेश्वर तातडीने काय करता येईल त्याचा विचार करू लागले. वासूदत्त एका ठाम निश्चयाने नामाभट्टांच्या घराकडे चालू लागले.
३
आता सकाळ होत आली होती. लोकांचे दैनंदिन काम सुरु झालेले. वासूदत्तांच्या लक्षात आले नामाभट्ट आता मंदिरात असतील आणि छायेचे बळ मंदिरात कमी होते. त्यामुळे तिथे ठोस निर्णय घेणे सोपे जाईल. मंदिरात शिरताच नामाभट्ट जणू त्याची वाट पहात बसल्यासारखे दिसले. त्यांना पहाताच वासूदत्तांना जरा हायसे वाटले.
“ आलास वासूदत्ता..”
“ हो. मी आलो आहे आणि यावर काय उपाय करायचा ते मला माहित आहे.”
“ तुला खात्री आहे त्याची ?” नामाभट्ट ठामपणे त्याच्या डोळ्यात पहात म्हणाले.
“ हो.....आता दुसरा कुठला मार्ग उरला नाही. छाया भिंतीवर विस्तारत चालली होती. इथे तिचे बळ फारच क्षीण झाल्याचे जाणवत होते. नामाभट्ट आणि वासूदत्तांनी मिळून मंदिरात असलेले यज्ञकुंड सर्व सामग्रीने सज्ज केले. हळुहळू कुतुहलाने सर्व गाव तिथे गोळा होऊ लागला. नामाभट्ट आता जोरानी मंत्र म्हणू लागले. वासूदत्त पूर्ण तयारीनिशी यज्ञकुंडासमोर उभे राहिले. त्या सावलीलाही त्यांच्या मागे उभे रहाणे भाग पडले. काय होत आहे आणि काय होणार आहे याची सोमेश्वरला जाणिव होताच ते रागारागात चित्र-विचित्र आवाजात ओरडू लागले.
“ तू मला फसवत आहेस वासूदत्ता.”
“ नाही सोमेश्वर, मी तुला मुक्त करत आहे. यातच तुमचे भले आहे. परत जन्म घ्या. साधना करा. इतका शक्तिशाली आत्मा तुमचा. चांगली साधना करुन देवप्राप्ती करुन घ्या. अमरत्वाचा नाद सोडून द्या. अमरत्वाच्या पाठी जो कोणी लागला त्याचा नेहमी विनाशच झाला. त्यापेक्षा तुम्ही मोक्षाचा मार्ग निवडा. तुमच्यामध्ये ती क्षमता पण आहे. जिथे पृथ्वी नाशवंत आहे तिथे मनुष्याने अमरत्वाची भाषा कशाला करायला पाहिजे?” वासूदत्त शांतपणे म्हणाले.
“ तू मला शहाणपणा शिकवू नको.” सोमेश्वर गुरकावून म्हणाले.
“ बरं मला एक सांगा. अमरत्व मिळवून तुम्हाला काय करायचे आहे?”
सोमेश्वर खरच क्षणभर विचारात पडले. आपण कश्यासाठी अमरत्वाच्या मागे लागलेलो आहोत? इतके वर्ष नुसतेच पृथ्वीतलावर भरकटत आहोत. ना मरण पावलो ना जगलो. याचा अर्थ काय? तर प्रत्येक सुखाचा उपभोग आणि दु:खाचा भोग भोगणे हेच जर का जगणे आहे तर मला हे काय कामाचे?
“ सोमेश्वरा, तू खूप गोंधळला आहेस. खरं अमरत्व कश्यासाठी प्राप्त करायचे हे मी तुला सांगतो. पण त्याआधी तुझी जन्मकथा, साधना विषयक जीवनशैली व अमरत्वाची इच्छा तुझ्या मनात कशी निर्माण झाली? हे सर्व मला सविस्तर सांग.” नामाभट्ट म्हणाले.
आता सोमेश्वरांचे उग्र रुप मावळू लागले. इतकी शतके दिशाहीन जगण्याने त्यांना एकप्रकारचा कंटाळा आला होता. असा विचार मनात येताच ते चमकले, कंटाळा आला होता? तर मग अमरत्व प्राप्त झाले तर काय होईल ? आत्ताच आपण आहे त्या परिस्थितीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहोत. अमरत्व मिळाले तर किती प्रकारच्या परिस्थितीत कितीदा अडकून रहावे लागेल? मरण ही एकप्रकारची सुटका तरी आहे. हे आपण विसरलो आहोत का ? खरच आपल्याला अमरत्व कश्यासाठी हवे आहे? सोमेश्वर आपल्या मूळ बिंदुकडे वळू लागले आणि आपली जन्मकहाणी नामाभट्टांना सांगू लागले.
“ माझे नाव सोमेश्वर, इ. स. ४०० च्या सुमारास म्हणजेच गुप्त साम्राज्याच्या सुवर्णकाळात नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या एका गावी माझा जन्म झाला. अत्यंत विद्वान कुटुंब होते ते. सत्यशील, सदाचारी. घरात पूर्णपणे धार्मिक वातावरण होते. चर्चा चालत त्याही, आध्यात्मिक संदर्भातल्या असायच्या. आमच्या कुटुंबाशी जोडला जाणारा प्रत्येक व्यक्ती हा अध्यात्माशी निगडीत असलेलाच होता. अन्य विषय, देव जणू आमच्या पर्यंत पोहोचू देत नसत. मलाही लहानपणापासून देव पहायची, ध्यानाची ओढ लागली. मुलांबरोबर खेळण्यापेक्षा मी नदीकाठी किंवा जंगलात दूरवर फिरायला जात असे. गावात साधू आलेले असतील तर त्यांची दिनचर्या बघण्यात किंवा त्यांच्या संगतीत त्यांनी राहू दिल्यास दिवस-दिवस तिथे घालवत असे. वडिलांनी माझी ती ओढ ओळखली होती. पण नुसती ओढ असून चालत नाही तर योग्य मार्गावरून जाणे गरजेचे असते. वडील माझ्या जन्माच्या वेळची गोष्ट सांगायचे. माझ्या जन्माच्या वेळी एक विचित्र खगोलीय घटना घडली होती. आकाशात त्यावेळी एक दुर्मिळ धूमकेतू अवतरीत झाला आणि नक्षत्रांची अशी स्थिती झाली की हजार वर्षांमधे जी एकदाच येते. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा गाढा अभ्यास असल्याने या खगोलीय स्थितीचे महत्व त्यांना पूर्ण लक्षात आले होते. त्यातच आपला मुलगा जन्मला म्हणजे कुणीतरी महान आत्मा कुठलेतरी स्वतःचे कार्य पार पाडण्यासाठी पृथ्वीवर आला आहे, पण धुमकेतूचे अस्तित्व त्याला वेगळे वळण लावेल हे त्यांनी ओळखले. कुणीही जरी आपला जन्महेतू ठरवून आले तरी पृथ्वीवरच्या अनेक स्थिती अश्या असतात की त्यामुळे तुम्ही मूळ मुद्दयापासून भरकटू शकता. तुम्ही ठरवलेला हेतु साध्य करायला तुम्हाला कितीतरी जन्मशृंखलातून जावे लागते. काहीतरी आठवून सोमेश्वर भेसूर हसले. त्या हसण्याने सर्वांच्या अंगावर काटा आला. “ काय झाले सोमेश्वर ?”
“ काही नाही. सांगतो पुढे. माझे वडील आयुर्वेदाचार्य होते. वंशपरंपरागत वैद्की आमच्या घरात चालू होती. माझे जसे शिक्षणाचे वय आले, तसे वडिलांनी माझ्या सततच्या भटकंतीला आळा घातला. पहिल्यांदा तर मला हे सगळे जड गेले, पण हळुहळू वनस्पतींचे गुणधर्म, मानवी शरीररचना, जनुके, संपूर्ण एकमेकांशी जोडलेल्या शरीररचनेचा अभ्यास करणे यात मला गोडी वाटू लागली. मन, निसर्ग याच्याशी शरीर कसे जोडलेले असते याचे धागे-दोरे उलगडू लागले, तशी जिज्ञासा वाढत जाऊ लागली. त्याबरोबरच वडिलांनी इतर शिक्षकांचा प्रबंध करुन ज्योतिषशास्त्र, खगोलीयशास्त्राचा अभ्यास माझ्याकडून करुन घ्यायला सुरवात केली. वयाच्या विसाव्या वर्षात आयुर्वेद, ज्योतिष्य, खगोलशास्त्र या विषयात मी पूर्ण पारंगत झालो. माझ्या आयुष्यात एक विचित्र प्रसंग येऊन मी ध्येयापासून ढळणार आणि दुसऱ्या साधनेकडे वळणार हे मलाही कळाले होते आणि वडीलही वेळोवेळी सुचना देत असत की देव, निसर्ग, मन याव्यतिरिक्त तू कुठल्याही साधनेकडे वळू नकोस. फक्त याच साधना तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचवतील. दुसऱ्या कुठल्या साधनेकडे वळलास तर तुला फार काळ सगळ्याचा सामना करावा लागेल. वडिलांचे हे बोल मी अगदी मनात कोरून ठेवले होते.”
“ पण मग तू या अघोर साधनेकडे कसा वळलास ?”
“ जे होणार आहे ते कधीच, कुणीच बदलू शकत नाही हेच खरं. सगळं सुरळीत चालले होते. आध्यात्मिक मार्गात माझी लक्षणीय प्रगती होत होती.
वयाच्या पंचविसाव्या वर्षी आमच्या गावात एक भीषण व अज्ञात महामारीने विळखा घातला. मी, वडिलांनी, काकांनी सर्वप्रकारे लोकांना या महामारीतून बाहेर काढण्याचा निकराने प्रयत्न केला पण माझ्या डोळयादेखत आई-वडील, भाऊ-बहिणी, नातलग-मित्र, या सर्वांना तडफडून मरताना पाहिले. मी या कोणाचाही जीव वाचवू शकलो नाही. मानवी शरीराची तडफड, वेदना, हतबलता आणि मृत्यूचे क्रूर रुप पाहून मी हादरलो. गाव एक स्मशानभूमी बनल्यासारखे झाले. सर्वत्र प्रेतं जळत असताना पाहून मन विषण्ण झाले. यात कितीतरी ज्ञानी व्यक्ती होते जे आपल्या ध्येयप्राप्तीच्या अगदी जवळ आले होते. पण ते एका क्षणात संपले. इतक्या वर्षांच्या त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले. इथेच बीज पडले अमरत्वाचे. माणूस कितीतरी वर्ष शिकतो, प्रगती करतो, ज्ञान गोळा करतो पण निसर्गाचा एक छोटा बिंदु, किंवा वय वाढून शरीराची झालेली झीज त्याला मरणपर्यंत नेते आणि त्याची आयुष्यभराची मेहनत एका क्षणात नष्ट होते. अशी माझी समजुत झाली. काही काळाच्या साधनेनंतर कळाले की ते नष्ट होत नाही. पुढच्या जन्मात त्यानंतरचा अभ्यास सुरू रहातो. निसर्गाचे अंतिम सत्य समजून घ्यायला माणसाचे शरीर फारच दुबळे आहे. जर मला या सृष्टीची रचना, रहस्य समजून घ्यायचे असतील तर मृत्यूवर विजय मिळवायला लागेल. या विचारानंतर माझी जीवनदिशा बदलली. संसारत्याग करण्याचे ठरवून मी तिथून नर्मदा खोऱ्यातील घनदाट जंगलात निघून गेलो.
ते जंगल म्हणजे केवळ अंधाराला चिरत जाणारे दाट झाडे, आणि त्या झाडांच्या फांद्यांवर विळखा घातलेल्या वेलींचे साम्राज्य होते. त्यातून गळत येणारा सूर्यप्रकाश जमिनीवर कधी पोहोचू शकेल का? असा प्रश्न जणू धरतीला पडत असावा. त्या अगणित वृक्षवल्लीत नानाविध प्रजातीचे कीटक, पशू, पक्षी वास्तव्याला होते. प्रखर माध्यान्हालाही मंद सावली खाली रेंगाळत असायची. जसजसे जंगलात प्रवेश कराल तसतसे गुढ आभास जाणवून दचकायला व्हायचे. जंगलाचा श्वास-उछवास तिथे जणू प्रतित व्हायचा. कधी पानांचा उग्र वास, तर कुठे कुबट ओलसर वासाची परिसीमा असायची. कधी सोसाट्याचा वारा तर कधी धुक्यात हरवलेल्या वाटा, मुसळधार पावसाची झड, तर कधी रौद्ररूपातले वीजेचे नृत्य सगळच कसं विलोभनीय वाटायचे. जंगल हे स्वत: एक रहस्यमयी कोंदण आहे. एखाद्यालाच या कोंदणात जडण्याचा अधिकार जंगल स्वत: देते.”
नामाभट्टांनी ओळखले सोमेश्वर आपल्या गत स्मृती परत जगत आहेत. ही चांगली बाजू होती. त्यातून त्यालाच स्वत:ची कुठे चुक झाली ते कळून येणार होते. सोमेश्वर बोलतच होता. नामाभट्ट परत ऐकू लागले.
“ त्या जंगलात एक सपाट जागा पाहून मी कुटी उभारणे सुरू केले. प्रचंड मोठा घेर असलेल्या वडाच्या झाडाखाली पारंब्यांच्या आधाराने पाने व मोठ्या लाकडाच्या सहाय्याने भिंती उभ्या केल्या. छपरावर लाकडे व बांबूचा आधार देऊन मातीने कुटी सावरून घेतली. कुटी तयार झाल्यावर आत देवाची जागा ठरवून तिथे देव मांडले. जुनी हस्तलिखिते, पोथ्या, वडिलांचे आयुर्वेदाचे परंपरागत साहित्य, संदर्भग्रंथ, ठेऊन बाकी रचना केली.” सोमेश्वरची सावली अचानक जोरजोरात हलू लागली. आठवणीत रममाण होऊन ते परत बोलू लागले. मी “ साधनेची रूपरेषा ठरवून त्याप्रमाणे दिनचर्या सुरू केली. अजुन मला गुरुप्राप्ती झालेली नव्हती. पण योग्य वेळ आली की गुरु तुम्हाला भेटायला येतात हे वडिलांनी आम्हा भावंडांच्या मनावर बिंबवले होते. अमृतबेला या प्रहराचे महत्व सांगून ठेवले होते. संपुर्ण जीवसृष्टी त्या वेळी विश्रांती घेते त्यामूळे बाह्य नाद लहरी कमीतकमी असतात. अश्या शांतवेळी अत्यंत पवित्र दिव्य लहरी योगी महात्म्यांच्या ध्यानातून स्पंदन पावून वातावरणात सर्वत्र पसरलेल्या असतात. ही वेळ ध्यानाला अत्यंत उपयुक्त असते. अश्यावेळी मी दर्भासनावर एका वटवृक्षाखाली बसून गुप्त मंत्राचा जप सुरू करत असे. त्याचा नाद एव्हढा गंभीर आणि भेदक खोल होता की जंगलाच्या त्या शांततेत दूरपर्यंत तो घुमत रहायचा. त्याचे स्पंदन लहरत रहायचे. त्यामूळे माझ्या वास्तव्याच्या परिसरात दैवी शांतता, सकारात्मकता जाणवत रहायची. हळुहळू तो मंत्र सिद्ध होऊ लागला. ध्यानाची खोली वाढली. काही अनुभव प्राप्त होऊन साधनेला एक दिशा मिळू लागली.
एके दिवशी ध्यानाला बसलो असताना कानात आवाज आला. ‘प्राणायाम कर. जेव्हा श्वसन प्रक्रिया जाणशील तेव्हा तुझ्या साधनेत विलक्षण प्रगती होईल. लवकरच गुरु तुझ्या सान्निध्यात येतील आणि तुला योग्य ते मार्गदर्शन करतील.’ या दिव्य अनुभवाने मला खूप आनंद झाला. योग्य मार्गावर असल्याचा तो संकेत होता. एके दिवशी रोजच्याप्रमाणे ध्यानसाधना करत असताना सूर्य उगवतीला कुणीतरी आपल्या बाजूने येत आहे अशी चाहूल लागून मी डोळे उघडले. समोर एक तेज:पुंज ऋषी उभे होते. आठ-साडे आठ फूट उंचीची व्यक्ती मी कधी आयुष्यात पहिली नव्हती. त्यांची नजर एव्हढी भेदक की माझ्या शरीरातून आरपार जात शरीरातील अणुरेणूंची जणू ते तपासणी करत होते. डोक्यावर असलेल्या जटाभारांवरून ती असामान्य व्यक्ती शतकांच्यावर वय असलेली असावी. पण कांती मात्र सोळा वर्षाच्या मुलाची. मी नुसताच त्या अलौकिकत्वाकडे बघत राहिलो. उठून त्यांना नमस्कार करण्याचेही भान राहिले नाही. त्यांच्या मुखातून आवाज आला तो ही कुठून अंतराळातून येत आहे असे वाटू लागले. “ ऊठ बाळा. आता आपण तुझी खरी साधना सुरू करूया. इतके दिवस तू संकल्पसिद्धी वापरुन साधना करत होतास. आता संकल्परहित साधना सुरू करायची आहे. ही साधना जरा अवघडही आहे. सगुणात खूप आनंद असतो, रस असतो. एका देवावर विश्वास ठेऊन ही साधना सुरू असते. ती शक्ती कायम आपल्या सोबत असल्याची जाणिव होत रहाते आणि त्या साधनेतून समजू लागतो की आपल्याला परमात्मप्राप्ती झाली आहे. पण त्याच्यापूढे खरी अध्यात्मयात्रा सुरू होते. जेव्हा साधनेच्या एका टप्प्यावर तुम्ही पोहोचता तेव्हा हा आधार काढून घेऊन सृष्टीचक्राशी संलग्न केले जाते आणि इथून सुरू होतो ज्ञानमार्ग. ती वाट तुमची तुम्हालाच चालायची असते. इथे सगुणरस संपतो. तेव्हा ही अवस्था पेलणे कठीण जाऊ शकते. कधी-कधी तर तुम्ही मध्येच अडकता. सगूणसार कळालेले असते आणि त्याच्या पुढच्या पायरीवर ज्ञानमार्ग उभा असतो. अश्यावेळी वर चढण्यासाठी सगूणरसाची पायरी सोडणे गरजेचे असते. ज्ञानमार्गात आता तू प्रवेश कर. त्यासाठी आधी तुला काही प्राणायाम तंत्र शिकवेन. उद्या याच वेळी मी तुला भेटेन.” गुरुप्राप्तीच्या आनंदात मी त्यांच्या पायावर डोके ठेवले. कधी उद्याचा दिवस उगवतो आणि परत त्या महात्म्यांना भेटतो हीच अधिरता सतावू लागली. त्यामूळे आजच्या साधनेकडे दुर्लक्ष होऊ लागले.
दुसरा दिवस उजाडला. माझ्या अमृतबेलेच्या साधनेनंतर ते महात्मा समोर येऊन बसले आहेत असे जाणवल्यावर मी डोळे उघडले.
“ सोमेश्वर, माझे नाव प्रणवानंद आहे. तुझा जन्मोजन्मीचा गुरु. जेव्हा जिथे तुला माझी गरज असते, तेव्हा मी तुझ्या सहाय्याला येतो.” मी त्यांच्या पायावर फुले वाहून फळांची टोकरी समोर ठेवली व साष्टांग प्रणिपात केला. त्यांनी मला प्रेमाने उठवले आणि म्हणाले “ चल वत्सा, पद्मासन घालून बस.” मग त्यांनी अनुलोम-विलोम, कुंभक करण्याची विधी समजावून सांगितली. श्वसनमात्रा ठरवून दिल्या व त्याचा अभ्यास माझ्याकडून करवून घेतला.
“ सोमेश्वरा, तू जेव्हा या श्वास लयीशी एकरूप पावशील, तेव्हा तू खऱ्या अर्थाने ब्रम्हांडाशी जोडला जाशील. तुझे निर्विकल्प ध्यान लागेल. त्यावेळेस तुझा श्वास चालू आहे की नाही हे कुणाला कळू शकणार नाही. कित्येक तासांसाठी आपला श्वास पूर्ण रोखण्यात यश येईल. जो श्वासावर विजय मिळवतो, तो काळावरही विजय मिळवतो. हे झाले श्वासाचे. आता तुला आहारा संदर्भातील काही गुप्त बाबी सांगतो. ज्यामुळे तू अन्नपाण्याविना महिनों-महिने राहू शकशील. या नर्मदा खोऱ्यात काही गुप्त व दुर्मिळ वनस्पती आहेत. त्यांच्या रसाच्या केवळ काही थेंबांमूळे शरीरात अनेक महिन्यांची ऊर्जा साठते. त्यामूळे अन्नजल ग्रहण व त्याग क्रियेचा वेळही ध्यानाला वापरला जातो. नित्यकर्म कमी होते. त्याच्या पुढे जाऊन जेव्हा तू प्राणायामावर विजय मिळवशील तेव्हा कडक उपवास, केवळ वायूभक्षण करुन तुला साधना करायची आहे. त्यामुळे शरीरात कुठलीही अशुद्धता रहात नाही. सध्या एव्हढेच पुरे. आता मी इथे तीन महिन्यांनी परत येईन. तोपर्यंत हा शिकवलेला अभ्यास तू योग्य रितीने कर. तुझे विचार, लक्ष भरकटवू देऊ नकोस. अन्य कुठलीही इच्छा तुझ्या मनात डोकावू देऊ नकोस. या मार्गावरून ढळलास तर मी तुला कोणतीही मदत करू शकणार नाही.” एव्हढे बोलून ते महात्मा तेथून गुप्त झाले. कितीतरी वेळ मी त्या दिव्य अनुभवात डुंबत राहिलो. जेव्हा भान आले तेव्हा परत विचारचक्र सुरू झाले. साधना तर मी करणार आहे. त्यासाठी माझा जन्म आहे. पण जे बाबांनी सांगितले तेच या महात्म्यांनीही कसे सांगितले ? मी या मार्गावरून का ढळेन ? अशी कुठली संसारइच्छा माझ्या मनात राहिली आहे की मी त्यासाठी आध्यात्मिक मार्गावरून भरकटलो जाईन ? असे कुठलेही विचार दुरदूरपर्यंत माझ्या मनात जाणवत नव्हते. आता त्या गोष्टीचा विचार करायचाही नाही. जे होईल ते बघू. म्हणून मी परत त्या महात्म्यांनी शिकवलेल्या साधनेकडे वळलो. दिवसरात्र एक करुन गुरूंनी दिलेल्या साधनेत लीन झालो. कधी-कधी गावात घडलेल्या त्या अज्ञात रोगाच्यावेळी पाहिलेली परिस्थिती डोक्यात गोंधळ घालू लागायची. या सगळ्यावर काय उपाय ? जन्माला येऊन जर का ते असे वाया गेले तर ज्ञानप्राप्ती कशी होणार ? पण त्या विचारांना छेद देऊन मी माझी साधना मन लावून करण्याचा प्रयत्न करत होतो. पण जर सगळ्याचं उत्तर मृत्यु हेच अंतिम आहे तर या सृष्टीरचनेचा फायदा काय ? नातेसंबंधांचे गणित काय आहे ? जन्माला येताना का हे सर्व बरोबर घेऊन यावे लागते? या गोष्टी मला उलगडत नव्हत्या.
४
असेच काही महिने गेले. अचानक काही बदल जाणवू लागले. दिवसरात्र काहीतरी विचित्र अवस्थेत जाऊ लागले. काय होत आहे काही कळेना. कधीतरी ध्यानात संदेश येऊ लागले ‘ शांत हो सोमेश्वर, विचारांकडे लक्ष देऊ नको. श्वासावर लक्ष केंद्रित कर.’ तेवह्ढ्यापुरते मन शांत होत असे पण परत त्या विचारांचा अंमल एव्हढा मनावर चढू लागे की ती अस्वस्थतेची पातळी असह्य होऊ लागली. या साधनेपेक्षा दुसरे काहीतरी हवे आहे अशी जाणिव मला सतावू लागली. आज रोजच्या प्रमाणे ध्यानाला बसलेलो असताना दूरवरून एक साधू जाताना दिसला. त्याने लांबूनच माझ्याकडे पाहिले आणि आतून काहीतरी हलले. सततच्या विचारांमुळे माझा माझ्यावर ताबा न राहिल्यामूळे त्या साधूच्या दृष्टीने मी बांधला गेलो. त्याचे विचार तो माझ्या अंतरंगात प्रक्षेपित करू लागला. न कळत उठून मी त्याच्या मागे चालू लागलो. जेव्हा आपले विचार ठाम नसतात, एकाग्र झालेले नसतात तेव्हा कुठलीही शक्ती आपले चित्त भरकटवू शकते याचे ते उदाहरण होते. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात एक क्षीण आवाज एकू येऊ लागला
‘ त्या साधूच्या मागे जाऊ नकोस.’ पण त्या साधूने आता माझ्यावर पूर्ण अंमल बसवला होता. तो जाईल तिकडे जात आम्ही दोघे स्मशानात कधी आलो हे मला कळालेही नाही. रात्रीचे दोन-तीन वाजले असावेत. काळयाकुट्ट अंधाराच्या पार्श्वभुमीवर एका बाजूला अर्धवट विझत आलेली चिता भयावहतेने लाल, पिवळा प्रकाशझोत फैलावत मधेच ठिणग्यांना उडवत जळत होती. अर्धवट जळलेल्या लाकडांमधून चित्र-विचित्र आकार डोकावत होते आणि वातावरणाला अजूनच भेसूरता आणत होते. हवेत त्या जळालेल्या मांसाचा उग्र दर्प सर्वत्र पसरलेला होता. कितीही धैर्यवान असलेला माणूस असे दृश्य पाहून गर्भगळित नक्कीच होत असणार. या दृश्याने माझ्याही अंगावर काटा आला. मग जाणवत राहिली जीवघेणी स्मशानशांतता, वटवाघूळांचे घुत्कार, घुबडाचे चमकणारे डोळे, वाऱ्याचा रहस्यमयी आवाज. स्मशान म्हणले की भूताखेतांचा वावर ही कल्पना जोर धरू लागली आणि माझी वाचा बसली. धाडकन जमिनीवर मुर्छित होऊन पडलो. किती वेळ असा पडलो असेन माहित नाही पण जेव्हा जाग आली तेव्हा वातावरण आधी होते तसेच होते आणि तो साधू त्या चितेजवळ बसून गुग्गूळ, कापूर, तांत्रिक औषधी, धतुरा, भांग, धुप तिथे मांडून त्या चितेच्या आसपास चित्र-विचित्र रंगावली काढत असलेला दिसला. अजूनही आमची काही बोलाचाली झालेली नव्हती. अचानक त्या वातावरणात कवटी फुटण्याचा जोरात आवाज आला आणि दूरवर कुत्र्यांचे रडणे सुरू झाले. घुबडांचे घुत्कार वाढू लागले. अश्या वातावरणाला छेद देत तो साधू म्हणाला “ उठ. तू या दिक्षेसाठी निवडला गेलेला आहेस. ही अत्यंत योग्य वेळ आहे. कुणीही कुणाचं प्रारब्ध बदलू शकत नाही. अगदी स्वत:सुद्धा.” मी एकदम दचकलो. अश्या अघोरी मार्गाकडे मी का वळेन ? अशी इच्छा तर कधीच करणार नाही. हा माझा मार्ग नाही. माझ्या मनातले वाक्य वाचल्यासारखा तो म्हणाला “ हो बरोबर आहे. हे भाव तुझ्या या जन्मातले नाही. जी परिस्थिती ओढावून तू साधना मार्गाला लागला होतास, तीच तशीच परिस्थिती मागच्या जन्मातही तुझ्यावर ओढवली होती आणि तेव्हापासून तू अमरत्वाच्या हट्टाने साधना सुरू केलीस. आधीची कर्म तुला योग्य त्या आध्यात्मिक मार्गावरून नेत राहिले पण हा जन्म मात्र तुझा अघोरी साधनेचा आहे. अमरत्वाला सर्व साधना जरूरी असतात, आणि असेही जरूरी नाही की सर्व साधना करूनही तुला ते प्राप्त होईलच. साधना समाप्तीच्या वेळेस तुला असेही वाटू शकते की मला हे अमरत्व नको. पण सध्या तुझी साधना मार्गाची वाटचाल सुरू आहे आणि आता तुला सर्व साधना प्राप्तीतून जावे लागेल. शेवटी तू अमरत्व मिळवून लोकसेवा करशील की अहंभावाने लोकांचा विनाश करशील यावरही त्याचे फळ अवलंबून आहे.” आता मात्र कानात जोरात आवाज येऊ लागला
‘ इथून ताबडतोब निघून जा. तू या मार्गातला नाहीस. तो साधू तुला वश करू पहात आहे. तुझे शरीर त्याला पुढची वाट मिळण्यासाठी आवश्यक आहे.’ हे ऐकून तर मी घाबरूनच गेलो. उठून बसून पळण्यासाठी प्रयत्न करू लागलो पण माझ्या शरीराची हालचालही करता येत नाही हे मला जाणवले. त्या साधूने मंत्रबळाने मला बांधून टाकले होते. मग परत कानात आवाज आला
‘ बाळ, आता तू पूरता त्याच्या मंत्रबळात अडकला आहेस. तो साधू अत्यंत उच्च प्रतीचा साधक आहे आणि तुझी साधना पाहून त्याने तुला अघोरी साधनेची दीक्षा देण्यासाठी निवडले आहे. मुक्तीच्या मार्गावर जाताना तुम्हाला सर्व साधनांच्या प्रक्रियेतून जावे लागते. तू आता ही साधना संपादन करुन घे. योग्यवेळी मी येईन आणि या सगळ्यातून तुला सोडवेन. हे विधिलिखित आहे. तुझी कधीतरी अघोरी साधना करण्याची वासना या जन्मात तुला पुर्ण करावी लागणार आहे.’
कानातला आवाज एकदम थांबला. तो माझ्या गुरूंचा होता. आता जे समोर आहे त्याला सामोरे जाणे भाग होते. दिलासा एव्हढाच होता की जीवाला काही धोका नव्हता.
“ उठ आणि इथे येऊन बस.” त्या साधूने आज्ञा दिली. आता मला पाय असल्याचे जाणवले. उठून उभा रहात त्याच्याकडे चालू लागलो. खाली चितेची राख, अर्धवट जळालेली हाडे, मडकी, अंत्यसंस्काराचे विखूरलेले सामान पायाला जाणवत होते. स्मशानाच्या वेशीवरचा पिंपळ करकर करत होता. अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत मी त्या साधू जवळ जाऊन उभा राहिलो. त्याने एका रंगावलीवर जाऊन बसण्याचा इशारा केला. त्या चित्र-विचित्र आकृत्या काढलेल्या एका रंगावलीवर मी जाऊन बसलो. काहीसा चिकट स्पर्श खालून जाणवत होता. अंधारामुळे फार काही दिसत नव्हते. त्या साधूने भस्म लावून एक विचित्र लाल रंगाची माला माझ्या गळ्यात घातली. त्याचा उग्र दर्प मला असह्य होत होता.
“ सोमेश्वर ऐक, या जन्मात तुला ही साधना पार पाडायची आहे. या जन्मात ही साधना संपव. तुझी तीव्र इच्छाशक्ती पणाला लाव आणि कुठेही चुक करू नकोस. हा साधना मार्ग म्हणजे विस्तवाशी खेळ आहे. तू छोटीशी जरी चूक केलीस तर कितीतरी युगं वाईट छायेच्या अंधारात फिरत रहाशील. लोकांना त्रास देऊ नकोस. जेव्हा तुझी साधना सिद्ध होईल तेव्हा योग्य शिष्य निवड आणि त्याला तुझ्या साधनेचे पुण्य देऊन तू या मार्गातून मोकळा हो. मुक्तीची पुढची वाटचाल तुझे गुरु तुला दाखवतील.”
“ म्हणजे तुम्हीही आता तेच करत आहात. मला या मार्गाची साधना देऊन स्वत: मुक्त होत आहात.” मी जरा धिटाईने म्हणालो.
“ हो. माझे आता एव्हढेच शेवटचे जीवितकार्य उरलेले आहे. कधीपासून तुझ्या बाकी साधना पुर्ण होण्यासाठी वाट बघत होतो. तुला सगळे सावध तर करत होते. या मार्गात येण्यासाठी रोखत होते पण त्यांना हे ही माहित होते की या जन्मात ही वाटचाल केल्यावाचून तू पुढे जाणे शक्य नाही आणि हा मार्ग सामान्यांचा नाही. या साधनेला खूप कणखर शरीर व मनाची ताकद याची गरज असते. त्यामुळे तू खऱ्या अर्थाने योग्य होणेही आवश्यक होते. आता तू परिपूर्ण आहेस. आज मी तुला दीक्षा देणार आहे. भरकटू नको. कुणाला त्रास देऊ नको. हे वाक्य मी परत-परत उच्चारत आहे. कारण एक वेळ अशी येणार आहे की तिथे तुझ्या मनाचा अंत पाहिला जाईल. तेव्हा तू ढळलास तर कित्येक जन्मांच्या छायेत तुला वावरत रहावे लागणार आहे.” एव्हढे बोलून तो साधू जळत्या चितेजवळ नानाविध तांत्रिक क्रिया करू लागला. अधुन-मधून मदिरा प्राशनही मला करायला लावत होता. सगळ्यात शेवटी माझ्या कानात एक मंत्र सांगून डोक्यावर हात ठेवला. त्याबरोबर स्मशानातल्या सर्व कर्ण-पिशाच्यांच्या आवाजांची वावटळ कानावर आदळू लागली. त्या भयानक आवाजाने पहिल्यांदा मन एकदम बावरलं. त्या अघोरी साधूच्या अंतिम आहुतीने जणू संपूर्ण ब्रम्हांडाला एक अदृश्य हादरा बसला. कुठेतरी वावटळ सुरू झाली. आत्तापर्यंत रात्रीच्या अंधाराला जो नाद होता तो क्षणार्धात नाहीसा झाला. एका अनाम शांततेत जंगल बुडून गेले. पण तो फक्त काही क्षणाचा काळ होता. अमानवीय, अनाकलनीय शक्ती जणू निसर्गात सामावल्या आणि सृष्टीचे तांडव सुरू झाले. अंधारातही जाणवतील असे रक्तासारखे लाल ढग व त्यामधून कडाडणारी वीज यांचे थैमान सुरू झाले. वीजेचा प्रखर प्रकाश माझ्यावर आणि त्या साधूवर पडला. अलौकिक शांतता समोरच्या साधूच्या चेहेऱ्यावर दिसताच माझ्या लक्षात आले की त्या साधूचे काम पूर्ण झाले आहे. त्यांच्यातल्या सर्व शक्ती झेपावत माझ्याकडे येत असल्याचे जाणवून आता मी फक्त त्या प्रसंगाला, शक्तीला सामोरे जाण्याचे ठरवले. आता सर्व जंगलातल्या शक्तींनी आपले कार्य सुरू केले. सिद्धींचा चक्राकार झोत गरगर माझ्याभोवती फिरू लागला. हवेत उग्र दर्प, मांस, मदिरेचा वास, आणि लवकरच अनोखे सुवासही माझ्या आतपर्यंत झिरपू लागले. त्या वासाने कधी डोक्याची शंभर शकलं होतील तर कधी तरलतेने भान हरपेल असे चित्र-विचित्र अनुभव सामावू लागले. हळुहळू एका भयाण नादाबरोबर शेकडो आत्मे, त्यांच्या सिद्धींबरोबर माझ्या आत प्रविष्ट होऊ लागले. प्रत्येकाच्या प्रवेशाबरोबर आतमधे एक जबरदस्त हादरा बसत होता. कितीतरी वेळ ही प्रक्रिया सुरू होती. त्याचे मला भानही राहिले नाही पण प्रत्येक हादऱ्याबरोबर माझे बळ वाढत होते. अमरत्वाच्या दिशेने मी एक पाऊल टाकले आहे हे जाणवताच एक अहंकाराचे बीजही त्यात केव्हा उतरले ते मलाच कळाले नाही. त्यानंतर एक ध्वनीकंपन वाढत जाऊन तो नाद ब्रम्हांडनादात परिवर्तित झाला. खोल भुगर्भातून शेकडो लहरी जाणवू लागल्या.....आणि शेवटी एका उच्च बिंदूला जाऊन सगळे नाद एकदम थांबले. प्रक्रिया संपली. हळुहळू जंगल, स्मशान आपल्या पूर्वस्थितीला येत आहे असे जाणवले. माझे लक्ष समोरच्या साधूकडे गेले. त्यांच्या चेहेऱ्यावर गूढ, अलौकिक स्मित तरळत होते. माझ्याकडे एक कटाक्ष टाकून ते उभे राहिले व आपले हात वर उंचावून तीव्र विरहात प्रभूंची आळवणी केली. त्या विरहाचे तरंग जणू अंतराळात जाऊन घुमले. मग सर्वत्र पसरली परमशान्ती, एक विलक्षण मुक्तीचा आनंद. अघोरीने आपले डोळे बंद केले. त्याबरोबर त्यांच्या शरीराभोवती एक प्रकारचे आभामंडल तयार झाले. निळ्या-पांढऱ्या रंगांची वलयं त्यांच्या शरीराभोवती तयार होऊ लागली. त्या प्रकाशरंगात साधूचे शरीर हळुहळू विरघळत जाऊन पारदर्शी होऊ लागले. शेवटचा बिंदू वलय पावत असताना मला उद्देशून ते साधू म्हणाले “ सोमेश्वरा, तुझी मी कधीची वाट बघत होतो. तुला हे ज्ञान, सिद्धी प्रदान केल्यावरच माझी यातून मुक्ती होणार होती. नियतीच्या खेळाप्रमाणे आज ती घटना घडून आली. पंचमहाभूत तत्वाच्या या फेऱ्यातून मी आता मुक्त झालो. शून्यात विरुन जात आहे. आता तू माझ्या पदावर आला आहेस. तुझ्या नियतीचे फेरे पाहून एकच सांगावे वाटत आहे की अहंकारी बनू नको. कुणाला मारू नको. अन्यथा तुला मुक्तीचा मार्ग सापडणे फार दुर्लभ होऊन जाईल. जेव्हा अहंकाररहित होऊन तुझ्या सर्व सिद्धी योग्य त्या साधकाला देशील तेव्हाच तू मुक्तीच्या मार्गावर येशील आणि यथायोग्य वेळी या तत्वांच्या पार जाशील.” आता त्या साधूचा शेवटचा बिंदू विलीन झाला. सर्वत्र एक असीम शांतता पसरली. चंदन, धुपाच्या सुगंधाचे लोट वातावरणात पसरले. त्या साधूच्या हातातला कमंडलू, हे सर्व घडल्याची खुण म्हणून माझ्या हातात आला होता. कधी? कसा ? ते ही सांगता येणार नाही.
सुर्योदयाबरोबरच एका नवीन जीवनाची सुरवात झाली हे मला जाणवले. आता फक्त साधना करत रहायची. अमरत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवायची. या आधीच माझा प्रवास या दिशेने सुरू झाला असणार, कारण अघोरी साधना ही फार वेगळी वाट आहे. सामान्य जनांसाठी नाही. सामान्य माणसापासून ते काही स्तरापर्यंत असामान्य बनायला बरेच जन्म आपली वाटचाल झाली असणार. अर्थात या जन्मातही ही साधना पूर्ण होईल की नाही ते ही माहित नाही. त्यामुळे जे आपल्या हातात आहे ते निष्ठेने करायचे. अश्या ध्येयनिष्ठेने मी उठलो. आधीच मानवजातीशी फार काही संपर्क राहिला नव्हता. आता तर तो पूर्णच तुटला.
दाट जंगलातल्या प्रकाशहीन गुहेत मी साधना सुरू केली. ती गुहा म्हणजे जणू पृथ्वीच्या पोटातले गर्भगृह जाणवावे, अशी बाह्य स्पंदनरहित जागा होती. त्या गर्द काळोखात मी एकदा ती गुहा न्याहाळायला दिव्याच्या प्रकाशाचा वापर केला. लागणाऱ्या वस्तू जागेवर ठेवून माझे आसन तयार केले. समोर त्या साधूचा कमंडलू ठेवला. त्यातून एक प्रकारच्या लहरी निर्माण होत असत. कधी-कधी निळी-पिवळी आभा त्याभोवती पसरली आहे असेही जाणवत असे. म्हणजेच तो कमंडलू मला मार्गदर्शन करणार होता. गुहेलगतच एका अंतर्भागातून मार्ग निघून उफाळणाऱ्या समुद्राच्या रेतीला जाऊन मिळत होता. स्मशानातील एक कवटी माझ्याबरोबर होती. त्याचाच वापर करुन पाणी पिणे, खाणे इ. कर्म करायचे मी ठरवले. पाणी व जंगलातील काही गोष्टी जास्त कष्ट न करता मिळतील त्याचाच वापर करुन मी उदरनिर्वाह करायचो. दिव्याची गरज संपल्यावर त्याचेही निशाण मिटवले. गुहेला आता सरावलो. मग सुरू झाली दिवस-रात्रीची घोर साधना.....उजेड-अंधाराचा फरक नष्ट झाला. बाह्यसृष्टी लोप पावून अंतर्मनाकडे जोमाने वाटचाल सुरू झाली. शरीर आता आपले ठळक अस्तित्व दाखवू लागले. कानाला जणू अंधाराचाही आवाज ऐकू येऊ लागला. रक्तवाहिन्यांची सळसळ, हृदयाची स्पंदनं, श्वासाची घोंघावती प्रक्रिया एका अक्राळ-विक्राळ रूपात समोर येऊ लागली. हा देह म्हणजे स्वबळावर चालवण्यासाठी दिलेला केव्हढा मोठा कारखाना होता, हे लक्षात येऊ लागले. हळुहळू किती काळ उलटला याचीही जाणिव लोप पावली. गुहेत जणू आता स्वयंप्रकाश जाणवू लागला. सृष्टीची रहस्य उलगडू लागली. भूत-पिशाच्च जन्म मृत्यूच्या मधल्या फेऱ्यात का अडकले जातात याची जाणिव होऊ लागली. निशाचरांसारखे आता अंधारातही स्वच्छ दिसू लागले. भूतकाळ, भविष्यकाळाचे अचूक ज्ञान समजू लागले.
एक दिवस गुहेत आवाज घुमला ‘ आता तुझी साधना पूर्ण झाली आहे. लोककल्याण, परोपकार या दिशेने आता तू वाटचाल कर. तेव्हा तुला समजून येईल की आपल्या भाव-भावनांमधे आपण किती अजून अडकलो आहोत आणि किती बाहेर आलो आहोत.’ कितीतरी वर्षांनी कुणाचे तरी शब्द, आवाज ऐकला होता. क्षणभर आकलनच झाले नाही. मग त्या अर्थाची संवेदना पसरली तेव्हा तो भाव कळून आला. आता गुहेबाहेर जायचे होते पण ते इतक्या लवकर माझ्यासाठी शक्य नव्हते. बाह्य जगातल्या शारीरिक आणि मानसिक क्रिया सुरू होणार होत्या. अंधाराला सरावलेले डोळे, आता बाहेरचा प्रकाश एकदम सहजपणे स्विकारू शकणार नाही हे लक्षात आले. थोडा-थोडा वेळ बाहेर जाऊन हवेचा झोत, आवाज याचा सराव करायला लागणार. मग मी शांतपणे काही दिवस पूर्णवेळ साधना करणे थांबवले. ध्यानाची ठराविक वेळ पाळून गुहेतच हालचाल सुरू केली. हात व शरीराचे चलन-वलन सुरू होण्यासाठी गुहा साफ करणे, रात्रीच्या वेळेस समोरच्या बाजूने गुहेबाहेर येऊन हवा अंगावर घेणे, समोर एखादे फळ सापडले तर ते घेऊन येणे. कितीतरी महिन्यांमध्ये आपण अन्नपाणी पण घेतलेले नाही. हे माझ्या लक्षात आले. शरीरात कमजोरी तर नव्हती, पण साधना करणे कमी केल्यावर शरीराच्या गरजा सुरू होऊ लागल्या. अजून समुद्राकडे मी एकदाही वळलो नव्हतो. त्या आवाजाचा जोर अजून सहन होईल का ? याबाबत साशंक होतो. हळुहळू सर्व सुरळीत होत गेले. शरीर बाह्यसृष्टीला सरावल्यावर मी जंगलात फिरू लागलो. एकदा पाणी पिण्यासाठी तळ्यावर गेलो असताना पाण्यात माझं प्रतिबिंब पाहून एकदम दचकलो. आता समाजात मिसळायचे तर उग्र रुप ठेवून चालणार नव्हतं. एका धारदार दगडाने काही प्रमाणात दाढी, जटा कमी केल्या. स्वच्छ आंघोळ केल्यावर बऱाच उग्रपणा कमी झाला. कुणाचं तरी उडून पडलेलं वस्त्र ही जंगलात सापडलं. आता समाज जीवनात पाऊल टाकायला मी तयार झालो आणि लवकरच हातात कमंडलू घेऊन गुहेचा त्याग केला. गावाच्या दिशेने चालू लागलो. एकदम जाणवलं की सुप्त मनात कुठेतरी अहंभाव वसलेला आहे. हे लक्षात येताच त्यावर ताबा ठेवण्याचा निश्चय केला.
५
गावाबाहेर एक देऊळ दिसल्यावर तेच रहाण्याचे ठिकाण ठरवले. त्याची साफसफाई करुन मागच्या भागात असलेल्या खोलीत माझे बस्तान बसवले. हळुहळू गुराखी, वाटसरु यांच्या मार्फत माझे नाव गावात पसरू लागले आणि सुरू झाला पीडितांचा ओघ. लोकांना त्यांच्या समस्येवर समाधान मिळायला लागल्यावर माझे नाव पंचक्रोशीत पसरू लागले. रात्रीची अघोर साधना भूत-पिशाच्च्यांना मुक्त करण्यासाठी कामी येऊ लागली. जन्म-मरण, नशिबाचे खेळ सर्व देवाच्या हातात आहेत तर त्यात आपण देवाचे माध्यम बनून मदत करत आहे या भावने ऐवजी या प्रक्रियेत मी बदल करू शकतो असा अहंकार कुठेतरी उत्पन्न होऊ लागला. वडिलांनी, गुरूंनी, त्या अघोरी साधूने दिलेली चेतावणी कधीतरी मनाला सावध करायची, पण आता मी प्रसिद्धीने फुशारलो होतो. माझा तांत्रिकाचा प्रवास एक महान तांत्रिक या शिखरावर लोकांनी नेऊन बसवला होता. लोकांच्या रांगा वाढतच चालल्या होत्या. भूता-खेतांनी पछाडलेले, सांसारिक समस्यांनी गांजलेले लोकं निराशेने येत आणि आपल्या नीरस झालेल्या जीवनात आशेची पालवी घेऊन जात. भूतांनी पछाडलेल्या लोकांच्या आरडा-ओरडयांनी आणि वेदनेनी त्या शिवमंदिराचा परिसर विकल होऊन जात असे. त्यांना वेदनेतून मुक्त करताना मला आनंद होत होता. पण लोकांना बरं करतोय यात करुणा नव्हती तर एक प्रकारचा अहंमन्य विजय मनात येऊ लागला. अधून-मधुन सावधगिरीचा इशारा मिळत होता. पण मी आता लीलया, ज्या गोष्टी करायला नको त्याही गोष्टी करायला लागलो. काळ्या जादूच्या प्रांगणात जो माझी मदत मागेल त्याला ती देऊ लागलो. यात कोण बरोबर? कोण चुक ? याचा न्यायनिवडा न करता केवळ माझ्याकडे जो आला तो बरोबर या विचार पध्दतीने, नकळत दुसऱ्यांवर अत्याचार करू लागलो. हळुहळू त्या अत्याचारांच्या सीमा वाढत जाऊ लागल्या. मी धुंद झालो आणि मग माझ्या अधोगतीचा दिवस उजाडला. मीच माझी हानी करुन घेतली.
त्या दिवशी सगळ्या दिशा कुंद झाल्या होत्या. रात्रीच्या साधनेतच मला जाणवले होते की आज काहीतरी विपरीत घडणार आहे. सकाळी सुर्योदयाच्या सुमारास अचानक जोर-जोरात ओरडण्याचे आवाज येऊ लागले. लोकांच्या ओरडण्यात एक भयानक अमानवीय आवाज जाणवत होता. त्या विलक्षण आवाजाने माझाही थरकाप झाला. काही क्षण मनात एक आवाज घुमला ‘ या पिशाच्यावर तू, तुझे मुक्तीमंत्र प्रयोग करू नकोस. त्याचे भोग अजून बाकी आहेत. त्याला तू सोडवशील तर त्याचे भोग तुला भोगावे लागतील.’ माझ्या गुरुदेवांचा आवाज होता तो. पण माझ्या सद्विवेक बुद्धीचा कौल क्षीण झाला होता. गुरुदेवांची ती वाक्य मी ऐकली पण त्याकडे दुर्लक्ष झाले. बाह्य आवाजात तो आतला आवाज लोप पावला. मी धावतच बाहेर गेलो. एका आडदांड तरुणाला लोकं, दोरखंडांनी बांधून ओढत-ओढत रस्त्यावरून आणताना शरीराला जखमाही होत होत्या. त्या जखमांमधून लाल-काळ्या रक्ताचा द्रव स्त्रवत होता. वेदना आणि पिशाच्याचे उग्र रुप सहन करताना त्याची ससेहोलपट झाली होती. मी ओळखले की हे अत्यंत ताकदीचे पिशाच्च आहे. यातून त्याला सोडवणे हे अत्यंत आवश्यक होते पण त्या पिशाच्याचा भोग अजून सरला नाही असे गुरुदेवांनी सांगितले होते. त्या तरुणाची अवस्था बघवत नव्हती. अश्या स्थितीत तो मेला असता तर तो ही कुठल्यातरी सुडाने पेटून पिशाच्च योनीतच अडकला जाईल. पिशाच्याचे पुर्ण वर्चस्व, डोळ्यातून पेटलेले अंगार, भेसूरता, एखादा हिंस्त्र रानटी पशू असल्याचे भाव त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट जाणवत होते. त्याच्या अंगाचा विचित्र उग्र दर्प लांबूनही येत होता. माझ्यावर त्याची दृष्टी पडताच त्याने आपल्याला जे हवे होते ते सापडले अश्या आविर्भावात एक विकट हास्य केले. त्या अमानवीय हास्याने सगळा परिसर हादरला. आपल्या हाताने जोर लावून सगळे दोरखंड एकत्र आणले व लोकांना हवेत भिरकावून दिले. अशी ताकद यापूर्वी मी कधीही पहिली नव्हती. सामान्य माणूस अशी हरकत कधीच करू शकला नसता. ही सैतानी ताकद त्या माणसाला सर्व काही करायला लावत होती. दोरखंडातून मुक्त झालेले ते पिशाच्च रुप आता माझ्याकडे वळले आणि नजरेला नजर देऊन आव्हानाने हल्ला करण्याच्या पावित्र्यात उभे राहिले. कुठल्याही क्षणी तो माझा ताबा घेऊ शकला असता. विलंब न करता अघोरी साधूंनी दिलेला कमंडलू हातात घेतला व त्यातील जलाचे प्रोक्षण त्या पिशाच्च्यावर केले. ते मंत्रजल त्याच्या अंगावर पडताच वाफेचा एक मोठा ढग त्याच्याभोवती तयार झाला व त्या ढगावर एक पिशाच्च आकृती दिसू लागली. दुसऱ्याच क्षणी त्या तरुणाचा देह लोळागोळा होऊन जमिनीवर धाडकन पडला. लगेचच जवळच्या माणसांनी त्याला उचलले व माझ्या इशाऱ्याने कुटीतल्या धुनी जवळ नेऊन ठेवले. गुरूंनी भारित केलेल्या त्या कुटीत पिशाच्च जाऊ शकणार नव्हते. अघोरी साधूच्या आणि माझ्या उर्जेसमोर त्या पिशाच्च्याची शक्ती कमी पडली होती. वाफेच्या ढगावर तो अजूनही तरंगत होता. त्याच्या नजरेला नजर देऊन उभे राहिल्यावर तो शांत होऊ लागला. त्याच्या अक्राळ-विक्राळ रुपापूढे ती असहायता वेगळीच दिसत होती. अमानवीय आवाजात तो माझी करुणा भाकू लागला. “ मला या योनीतून मुक्त करा. आत्तापर्यंत किती मंत्रिकांसमोर या लोकांनी मला उभं केलं पण कुणालाही यश आलं नव्हतं. त्या माणसापासून मला वेगळे केले म्हणजे तुम्ही कुणीतरी खूप मोठे साधू आहात. तुमचे गुरूही महान असणार. मी अनेक युगांपासून फिरत आहे. या अंधाऱ्या अतृप्त जीवांच्या सान्निध्यात राहून मी पण त्यांच्यासारखाच क्रूर बनलो.”
“ पण तुझ्या अश्या कुठल्या चुकीमुळे किंवा इच्छेमूळे या अर्धवट तरंगणाऱ्या जगात जावं लागलं?”
“ जमावातल्या हिंस्त्र लोकभावनेने पेटून मी ही नको ते कृत्य केले व त्याचे फळ या अर्धवट जगात अडकून मिळाले. ती धग अजून शांत न झाल्याने मी सर्वांना त्रास देत राहिलो. या अंधारातून बाहेर पडणे मला जमत नाहीये. काही चांगली कामे करण्याचाही मी प्रयत्न केला. पण माझ्या वाईट वासना नेहमीच आड आल्या. तुमची भेट झाली आणि माझे रूपांतर झाले म्हणजेच आता माझ्या सुटकेची वेळ आली आहे.”
समोर दीनपणे उभ्या असलेल्या त्या महापिशाच्च्याचा पश्चाताप पाहून माझं मन द्रवलं. त्याला मुक्त करताना आपला बळी जाऊ शकतो हा विचारही माझ्या मनाला शिवला नाही. त्याचे भोग अजून सरलेले नाही हे गुरूंनी सांगितले होते पण त्या क्षणी ते दुर्लक्षित झाले. कमंडलू मधले मंत्रजल त्यावर प्रोक्षण करताच हवेत अनेक चित्कार उमटले. त्याच्यामधून अनेक आत्मे मुक्त होऊन, मला नमस्कार करत आकाशात एका वलय रूपात विलीन होऊ लागले. शेवटचा बिंदु उरला होता. त्याचे मोठे काळे वलय निर्माण झाले, एका बेसावध क्षणी त्याने मला घेरले व त्यानंतर तो पांढऱ्या वलयात आकाशात विलीन होऊन गेला. तेव्हा माझ्या लक्षात आले की बाकी सर्व आत्म्यांना या पिशाच्च योनीतून मुक्तता मिळाली होती पण या पिशाच्च्याचे भोग न सरल्यामूळे त्याने मला पकडले होते. माझ्याकडे सर्व चांगले-वाईट कर्म सुपूर्द करुन तो मुक्त झाला होता. आता त्याचे भोग मला भोगावे लागणार होते. मी तात्काळ मरण पावलो आणि त्या अंधाऱ्या अर्धवट जगात माझा प्रवेश झाला. एव्हढी केलेली साधना निष्फळ ठरली ? अधोगती वाट्याला आली? या विचारांनी हतबल होऊन त्या जगात वावरू लागलो. इतर भूत-पिशाच्यांनी मला घेरले. यातनांचा कळस याप्रमाणे त्यांचा छळ सहन करू लागलो. तेव्हा एका क्षणी गुरूंचा आवाज कानी आला. “ यातूनच तुम्हाला कसं बाहेर पडायचं ? हे कळाले पाहिजे. आता अजून काही शतकं तू असाच फिरशील. तू केलेले तप वाया जाणार नाही. तुझी तप:साधना धारण करू शकेल असा योगी मिळेपर्यंत तुला याच फेऱ्यात फिरावे लागेल. हे तुझे प्रारब्ध होते.”
“ पण मग जो योगी मला देह देईल त्यालाही यातनां मधून जावे लागेल का ?”
“ नाही. तो योगी भेटेपर्यंत तुझे आणि त्या पिशाच्च्याचे राहिलेले प्रारब्ध पूर्ण संपलेले असेल. तेव्हाच तो तुला भेटेल.” हे ऐकल्यावर मी पण शेर झालो. यातना देणाऱ्या पिशाच्च्यांना वठणीवर आणू लागलो. त्यामुळे शांत प्रवृत्तीचे अडकलेले आत्मे या छळातून सुटले व आपल्या वाट्याला आलेले कर्मभोग शांतपणे भोगू लागले. हेच माझे चांगले कर्म ठरले. यामुळे कुठेतरी हलके, तरलपणाची जाणिव होऊ लागली. तरीही त्या पिशाच्च्याचे खूप बळी माझ्यात अजून उरले होते. वासूदत्ता, तू जेव्हा माझ्या नावाची ताम्रपट्टी यज्ञकुंडात टाकलीस तेव्हा ते सर्व बळी मुक्त झाले. तूच तो योगी आहेस. ज्यामुळे मी मुक्त होणार आहे. याची आता मला जाणिव झाली आहे.”
नामाभट्ट व वासूदत्तांना कळून चुकले की सोमेश्वरला आपली स्वत:चीच उत्तरे व मुक्तीचा मार्ग मिळाला आहे. नामाभट्ट म्हणाले
“ सोमेश्वरा, आता तूच सांग की तुझी मुक्ती कशी होईल? कारण तू अघोर पंथाचा आहेस. आम्हा कुणालाही त्या मार्गाबद्दल काहीही ठाऊक नाही.”
“ तुम्ही काळभैरव यज्ञ करा व त्या पूर्णाहुतीत मी स्वत:ला समर्पित करेन व वासूदत्तांना माझ्या सर्व सिद्धी प्रदान करेन.”
“ पण यात वासूदत्तांना अपाय तर होणार नाही ना ?”
“ नाही. उलट मी जाताना त्यांना सर्व सिद्धी देऊन जाईन. त्यांनी त्या लोककल्याणार्थ वापराव्या. पण मी असे म्हणेन की त्या सिद्धींचा उपयोग स्वत:साठी न केल्यास त्यांच्या साधनेचा प्रवास अजून वेगाने होईल. सिद्धी तुमच्या जवळ येतात त्या केवळ परीक्षा पहाण्यासाठी. अजूनही तुला या धरतीचा मोह आहे का ते बघायला. कारण इथेच सिद्धींचे बळ चांगल्या किंवा वाईट कर्मासाठी वापरले जाते. पृथ्वीबाहेर या सिद्धींचे काहीही काम नाही. वासूदत्तांना सिद्धी प्राप्त होऊनही ते निरीच्छ् राहिले तर ते महापुरुष आहेत असे मी म्हणेन.” वासूदत्तांनी मान तुकवली व म्हणाले “ सेवा हा माझा धर्म आहे पण त्यासाठी सिद्धींची मला अपेक्षा नाही.”
“ माझ्या गुरूंच्या आदेशाप्रमाणे मी जाताना तुला सर्व सिद्धी प्रदान करेन. पुढे तू तुझा मार्ग ठरव.”
“ ठीक आहे सोमेश्वर. आता तू परत वासूदत्तांच्या शरीराचा उपयोग करू नकोस. तू सांगशील तशी आम्ही सर्व काळभैरव यज्ञाची तयारी करू आणि तुझ्या मुक्तीसाठी सहाय्य करू.” नामाभट्ट म्हणाले.
सोमेश्वराने यज्ञाची सर्व सामग्री व्यवस्था व काही काळापूरता वासूदत्तांच्या शरीरात रहाण्याची मागणी केली, कारण नुसते सांगून या यज्ञाचे आयोजन सामान्यांना करणे शक्य नव्हते. शिवाय अघोरी गुरूंनी दिलेला कमंडलू कुठे आहे हे फक्त त्यालाच माहित होते. तो कमंडलू वासूदत्तांकडे सोपवल्याशिवाय सोमेश्वरांची मुक्ती शक्य नव्हती.
वासूदत्तांना सोमेश्वरांचे म्हणणे मान्य करावे लागले. सोमेश्वर आता मुक्तीच्या आनंदात असताना विश्वासघात करणार नाही एव्हढे तरी सगळ्यांना मान्य होते. शेवटी ते एक फार मोठे नावाजलेले तपस्वी साधू होते, याची खात्री पटली होती. यज्ञाचा दिवस ठरला. त्याआधी वासूदत्त आणि सोमेश्वर तो कमंडलू घेऊन येतील याचा आराखडा ठरला व मंदिरात इतका वेळ ही सर्व कथा ऐकत असलेल्या लोकांनी निःश्वास सोडला. मंदिरातून बाहेर पडताच सोमेश्वरांनी वासूदत्तांच्या शरीरात प्रवेश केला व सर्वजण आपापल्या घरी गेले.
६
मधल्या दोन महिन्यांच्या काळात खडतर प्रवास करुन वासूदत्तांनी सोमेश्वरांचा कमंडलू आणला व मंदिरात शिवमूर्तीसमोर एका वेदीवर विधिवत ठेवला. सगळे गाव उत्सुकतेने ही अनोखी घटना पहायला गोळा झाले होते. सोमेश्वरांनी आपले काही पुण्य, या गावातील लोकांमधे वितरित करायचे ठरवले होते. या गावामध्ये त्यांचा उध्दार होत होता. कमंडलूच्या तिथे सोन्याच्या मोहरांचा कलशही ठेवला होता. तो ही वासूदत्तांना घ्यायला लावला होता. सोन्याचा उपयोग करुन गावजेवण, यज्ञ, व लोकसेवेसाठी आश्रम उभारणी करण्याचे सोमेश्वरांनी सांगून ठेवले.
काळभैरव यज्ञाचा दिवस उजाडला. सर्व गावकरी राबत होते. सोमेश्वर सर्वांना अन्नदान, वस्त्रदान, दक्षिणा देऊन मध्यरात्री यज्ञाला प्रारंभ करणार होते. सर्व गोष्टी सोमेश्वरांनी वासूदत्तांच्या शरीराद्वारे यथोचित पार पाडल्या. सोमेश्वर जसे सांगतील तसे ते करत होते. या दोन महिन्यांच्या कालावधीत सोमेश्वरांकडून त्यांना खूप ज्ञान प्राप्ती झाली होती. शेवटी ती वेळ आली. कृष्ण पक्षातील काळयाकुट्ट अंधाराने व्यापलेली अमावस्येची रात्र होती ती. मंदिरातील मैदानाच्या मध्यभागी तयार केलेल्या वेदीवर काळ्या मातीने त्रिकोणी आकाराची भैरववेदी तयार केली होती. त्याच्या सभोवताली काळ्या तिळांचे, उडद डाळीचे मंडल आखले. सरसों तेलाचे दिवे, मशाली सगळीकडे लखलखत होते. नामाभट्टांनी मंत्र उच्चारण सुरू केले. आता वासूदत्त एकदम शांत दिसू लागले. नामाभट्टांसमोर बसलेले त्यांचे रूप, मधूनच मंत्राग्नीच्या वेळेस वेडेवाकडे होत होते. कधी त्यांचा चेहेरा पिळवटून निघे, तर कधी अंगातून रक्ताची चिळकांडी उडून त्या अग्नीत विलीन होई. सोमेश्वरांनी या सर्व गोष्टी आधीच सांगून ठेवल्या होत्या त्यामुळे ते मनाने आधीच खंबीर होऊन त्याचा सामना करत होते. सगळे गाव विस्फारीत नजरेने ही घटना बघत होते. मंत्रांचा वाढता आवाज आसमंतात घुमू लागला, तसे सोमेश्वरांचे उग्र रुप दिसू लागले. भेसूर पिशाच्च्यांच्या आकृत्या बाहेर पडून आकाशात जाऊ लागल्या. नामाभट्टांनी कमंडलुतील मंत्रजल वासूदत्तांच्या अंगावर शिंपडताच एक दिव्य लोळ बाहेर पडला. ते झगमगीत वलय सोमेश्वरांचे होते. त्यांना पिशाच्च योनीतून मुक्ती मिळाली होती. पुढच्याच क्षणी आसमंतात एक अलौकिक प्रकाश पसरला. त्याचा एक किरण त्या वलयात शिरला आणि सोमेश्वरांना आपल्या गुरूंचे दर्शन झाले. हे दर्शन वासूदत्तांना आणि नामाभट्ट यांनाही प्राप्त झाले कारण त्यांनी सोमेश्वरांना मुक्त होण्यात मदत केली होती. त्यामुळे दोन्ही गुरूंनी व काळभैरवांनी त्यांनाही दर्शन देऊन आशिर्वाद दिला.
हळुहळू ते वलय वासूदत्तांच्या मस्तकावर स्थिरावले व काही सुवर्णरंगांचे झोत त्यांच्या शरीरात शिरले. ती सोमेश्वरांची तप:साधना व सिद्धी होती. त्या तपाने ते विलक्षण तेजाने उजळून निघाले.
“ दत्ता, आता मी निघालो, तुम्हा सर्वांना कल्याणाचा आशिर्वाद देऊन मी मुक्त होत आहे.” त्यानंतर ते वलय आकाशात वेगाने झेपावले व काही क्षणात नाहीसे झाले. सोमेश्वर आता जन्म-मरणाच्या फेऱ्यातून आणि सृष्टी चक्रातून कायमचे मुक्त झाले होते.
.................................................