भाग एक
आशीर्वाद बंगला नंबर १० . शहरातल्या एका उच्चभ्रू वस्तीत दिमाखात उभा असलेला हा एक मोठा प्रशस्त बंगला. बंगल्याची भव्यता, त्याची देखणी रचना आणि समोरची सुंदर बाग. त्याला बघून च कल्पना येते की हा कुठल्या मोठ्या बिझनेस मॅन चा किंवा तत्सम व्यक्ती चा बंगला असावा , आणि तो होता ही त्या शहरातील मोठ्या बिझनेस मॅन श्री अजित नाईक ह्यांचा बंगला .या बंगल्यात श्री अजित नाईक त्यांच्या पत्नी सौ अर्चना नाईक आणि त्यांची मुलगी अनघा नाईक रहात असत . अनघा लहान असताना तिला सांभाळायला म्हणून गावाकडून अजित रावांची लांब ची बहीण जी खूप कमी वयात विधवा झाली होती आणि समाजात आणि नात्यात पदोपदी होणारी अवहेलना सहन करत भाऊ भावजय वर उगाचच ओझं झाली होती. अशा वेळी अजितरावांनी त्यांना आपल्या घरी आणले आणि मानाचे स्थान दिले. त्या दिवसापासून ती आलेली होती ते आजतागायत इथेच ह्यांच्या सोबत रहात असत . या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनून राहिली होती. तिनेच अनघा ला आईच्या मायेने लहानाची मोठी केली होती . त्यामुळेच अनघाचे सुद्धा आपल्या या आत्यावर स्वतःच्या आईइतकेच, किंबहुना कधीकधी त्याहूनही जास्त प्रेम करत होती. ती आत्यावर मनापासून जीव ओवाळून टाकायची. जसं त्यांचं अनघा शिवाय दिवस उगवायचा नाही तसंच अनघा च सुध्दा त्यांच्यावर खूप जीव होता ती आत्यावर मनापासून जीव ओवाळून टाकायची. . आत्या च नाव मीना असं होतं .
" अनघा... अगं ऐ अनघा... उठ लवकर आज तुझा शेवटचा पेपर आहे ना ?? . चल आवर लवकर . दादा साहेब कधीच उठले . ते नाश्त्यासाठी टेबल वर तुला बोलावतील... आळस नको करू,चल उठ लवकर . " मीना ताई अनघा च्या खोलीत येत सगळीकडे पसरलेला पुस्तकांचा, वह्यांचा आणि नोट्सचा पसारा आवरत मायेने बोलल्या.
" किती वाजले आत्या..." अनघाने डोळ्यांवरून ब्लँकेट जराही न हटवता, आळसावलेल्या आवाजात आतुनच विचारले.
"आठ वाजले... उठ लवकर " मीनाताईंनी जरा गंभीर आवाज करत खोटेच सांगितले.
" काय !!!! आठ वाजले? " अनघा ताडकन उठून बसली . तिच्या चेहऱ्यावर एकदम भीती पसरली. ती तशाच घाईघाईत बेडवरून उतरली आणि बाथरुममध्ये पळत सुटली आणि बाथरुममध्ये शिरत वैतागून बोलली ...
" ऐ काय गं आत्या ... लवकर उठवायचं ना उशीर होईल ना मला . रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होते कधी झोपले कळलं नाही . "
बाहेर उभ्या असलेल्या मीनाताईंच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटले. " अगं हो... हो.... सावकाश ...नको घाई करू . घाबरू नकोस सातच वाजले आत्ता . भरपूर वेळ आहे तुझ्या कडे . " मीना ताई हसत बोलल्या .
" काय यार आत्या ....तू हे लहानपणापासून करतेय माझ्या सोबत . दरवेळी मला अशीच खोटी वेळ सांगून घाबरवतेस. पण खरंच सांगू? त्या मुळे मी आज पर्यंत कधीच कुठेच उशीरा पोहोचले नाही . " अनघा ने आवरायला घेतलं .
स्वतःला व्यवस्थित आवरून, डोक्यात पेपरचे विचार घोळवत अनघा नाश्त्यासाठी खाली डायनिंग टेबलवर आली. तिथे अजित आणि अर्चना आधीच येऊन बसले होते . अजितराव नेहमीप्रमाणे हातात बिझनेस न्यूजपेपर घेऊन वाचत होते, तर अर्चनाताई त्यांच्या फोन मधे काहीतरी बघत त्या वर विचार करत होत्या.अनघा येताच मीना ताईंनी तिच्या साठी प्लेट तयार केली .
" अनघा आज तुझा शेवटला पेपर आहे ना ! " अजित यांनी
अनघा ला विचारले.
" हो बाबा ! आज शेवटचा पेपर की एकदाची परीक्षा संपली . " अनघा ने हसत उत्तर दिले .
" बरं मग पुढे काय विचार आहे . " अजित यांनी पुन्हा अनघा ला प्रश्न विचारला .
" बाबा ! खरं तर मी MBA आपला बिझनेस सांभाळण्यासाठी च केलं आहे . पण बाबा .... मला काही दिवस job करून अनुभव घ्यायचा आहे . कारण हे जे काही उभारले आहे ते तुम्ही स्वकष्टाने उभारले आहे . तसंच मला सुद्धा स्वतः ला सिद्ध करून दाखवायचं आहे . " अनघाने आजित रावांना सांगितले .
" हे काय ... तुम्ही दोघं नाश्ता करताना तर जरा इकडच्या तिकडच्या गप्पा मारा ना . इथे ही तुमचं करियर आणि बिझनेस वरच गप्पा सुरू आहेत . " अर्चना ताई दोघांना बघून बोलल्या .
" अर्चना !!! अगं काळ कुठल्या कुठे चालला आहे अश्या वेळी मुलांचं उचित मार्गदर्शन झालंच पाहिजे . आणि हे स्टेटस , ही पोझिशन , सोसायटी मधे नाव ... हे सगळं असंच होत नसत तर त्या साठी कष्ट करावे लागतात . बरेच छक्के पंजे खेळावे लागतात . " अजित राव बोलले .
" बरं ठीके .....चालू दे तुमचं मला जरा घाई आहे आज मला आमच्या NGO च्या office ला जायचं आहे . मला उशीर होतोय . भेटू नंतर .... बरं अनघा best of luck . " इतकं बोलून अर्चना ताई तिथून निघून गेल्या. अनघा आणि अजित पण नाश्ता करून आपापल्या कामासाठी निघून गेले.
अनघा चा पेपर झाला . तिची परीक्षा संपली होती . सगळ्या मित्र मैत्रिणींनी फिरायला जाण्याचं ठरवलं होतं .
" अनघा !! सांग ना कुठे जाऊया फिरायला ... ?? " वैभवी ने विचारले .
" कुठेतरी लांब जाऊयात हां . हे इथेच महाबळेश्वर किंवा माथेरान नको ... " सौम्या बोलली .
" यार पण लांब जायचं तर आधीच बुकिंग करून घेतलं पाहिजे." तरूण ने सल्ला दिला .
" तुम्ही फक्त ठरवा कुठे जायचंय , बाकीचं सगळं मी बघतो .. किशोर ने आश्वासन दिलं .
" काय अनघा अगं गप्प का ...सांग की कुठे जाऊया... " वैभवी ने विचारलं .
" हे बघा !!! कुठेही चला पण अमोल सोबत येणार हे विसरू नका . " अनघा ने तिचा फोन गोल फिरवत सांगितलं.
" तसं हे तू नसतं सांगितलं तरी आम्हाला माहीत होतं ...पण काय गं त्याला वेळ मिळेल का ... " सौम्य बोलली .
" विचारेन त्याला !!! अजून पोस्टिंग मिळाली नाही म्हणून सध्या वेळ आहे त्याला. बरं आधी मी अमोल ला विचारते मग आपण ठरवू काय ते . चला उशीर होतोय घरी जाऊया. " इतकं बोलून अनघा उठून उभी राहिली .
अमोल ... अनघा चा बालमित्र ... हुशार , देखणा , उमद्या व्यक्तिमत्वाचा मालक . त्याने UPSC दिली होती आणि तो आता IPS च्या ट्रेनिंगसाठी हैद्राबाद ला जाणार होता . आई वडिलांचा एकच मुलगा आहे त्याला एक धाकटी बहीण आहे . वडील बँक मॅनेजर आहेत आणि आई कॉलेज मधे प्रोफेसर आहे .
घरी आल्यावर अनघा ने अमोल ला फोन केला ...
" ऐक ना ... भेटुयात का . मला तुला काही विचारायचं आहे . " अनघा बोलली .
" आता काय झालं ... काय विचारायचं आहे . " अमोल ने वैतागून विचारलं .
" अरे तू भेट तर...मग. सांगते . " अनघा बोलली .
" बरं ठीके !! संध्याकाळी आपल्या नेहमीच्या जागी . चालेल...? " अमोल बोलला .
" हो चालेल... पण वेळेत ये.. " अनघा ने दटावले .
एकमेकांशी थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून दोघे झोपी गेले .अमोल आणि अनघा लहानपणापासून चे खूप चांगले मित्र होते . लोकांना त्यांच्या नात्याचा संशय यायचा , पण ते दोघे कधीच कोणाला स्पष्टीकरण द्यायच्या भानगडीत पडलेच नाही . ते दोघे फक्त एकमेकांच्या मैत्री जपत होते .
क्रमशः
>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<