जया देव तारी - भाग ०१
श्रावणात दाजी प्रभू मिराश्यांची वरसल सुरू झाली आणि ईश्वराच्या गाभाऱ्याला कुलूप लागलं. दत्तंभट सालाबाद प्रमाणे सकाळीच पूजा साहित्य घेवून एकादष्णी करायला देवळात गेले. बळाणीवर सामान ठेवून गाभाऱ्या बाहेरची कळशी घेऊन विहीरीवर गेले. विहीर म्हणजे छोटेखानी तळंच होतं. सहा हात औरस चौरस घडीव चिऱ्याच चौकोनी बांधकाम केलेली ती विहीर कायम तोंडोतोंड भरलेले असायची. पावसाळी उमळं फुटल्यावर अगदी माघापर्यंन्त उगवतच्या बाजूने छिनेलानी बांधलेल्या हातभर रुंद आणि ढोपरभर खोल पाटातून व्हावटीचं पाणी सदू लिंगायताच्या गोठ्यामागच्या व्हाळीत जात असे. पाऊसकाळात दर्शनाला येणारी माणसं त्या पाटातच हातपाय धुवून मग देवदर्शनाला जात असत. दत्तंभटाने हातपाय धुवून कळशी घेवून देवळात गेले. मुकटा नेसून पंचाचा पिळा बळाणीवर ठेवून पूजा साहित्य घेवून ते गर्भागाराच्या चौकात गेले. गाभाऱ्या समोरच्या नंदीवर कळशीतलं पाणी ओतून मागे जावून ताजी कळशी भरून आत आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की गाभाऱ्याला कुलूप घातलेलं आहे. गेली पन्नास वर्षं श्रावणातल्या दर सोमवारी आणि वर्षभरात अधेमधे ते एकादष्णी करायला ईश्वराच्या देवळात यायचे. पण त्यांच्या आठवणीत आज प्रथमच गाभाऱ्याला कुलूप अघून ते थक्क झाले.
हरभट दात्ये आणि दाजी मिराशी हे देवाचे मुख्य मानकरी. मिराशी हे हळये गावाचे महाजन. प्रभू ही त्याना पेशवाईत मिळालेले उपाधी होती. पेशवाई च्या काळात घेरियातल्या (विजयदुर्ग) आंग्र्यानी जंजिऱ्यात सिद्धीकडे जाणारं कोणा मुसलमान व्यापाऱ्याचं बंदरात आलेलं जहाज जप्त केलं. ही वार्ता सिद्धीपर्यंत पोहोचल्यावर पंधरवडा भराने सिद्धीची चार पाच जहाजं घेरियावर चाल करून आली. आंग्रे किल्ल्यात दडून बसले. आठवडाभर गडावर दारूगोळ्याचा मारा करूनही गडाच्या भक्कम तटबंदीचा एक कपचासुद्धा उडाला नाही. उलत चार दिवस गेल्यावर मालवण मसुऱ्याचे पाडावे सरदार कुमक घेवून आंग्र्यांच्या मदतीली आले. त्यावेळी खुष्कीच्या मार्गाने घेरियाच्या नजिक हळयात येवून त्या नस्ता वरून पडाव गुराब्याने किल्ल्याच्या दिशेने येवून सिद्दीच्या जहाजांवर पेटते पलिते टाकीत. त्याचे सैनिक पाठलाग करायला आले की हळयाच्या नस्तावरून पळ काढीत. दोन तीन वेळा हा प्रकार झाल्यावर पाडाव्यांच्या मागावर मोठी कुमक आली. नस्तातून जरा आत शिरल्यावर ईश्वराच्या देवाच्या घुमट्या दिसायला लागल्या. सिद्दीचे सैन्य हळयाच्या किनाऱ्यावर आले नी समोरचे भव्य मंदिर बघितल्यावर दीन दीन करीत वाटेत भेटेल त्याना कापून काढीत मंदिरात घुसले. आंग्र्याला धडा शिकवायची आयती संधी त्याना मिळाली.मंदिराजवळ भंडार वाडी आणि गाबीतवाडी मिळून पन्नासेक घरं होती. पाडाव्यांच्या सैनिकानी मुसलमान चाल करून येत असल्याची वर्दी दिल्यामुळे निम्मेशिम्मे माणसं प्राणभयाने पळालेली होती.
मंदिराशेजारी धर्मशाळा आणि मुळवस, लक्ष्मी केशव. काळभैरव अशा चार इमारती होत्या. मुख्य मंदिराला मोठ्या प्रमाणात लाकूड सामान वापरलेलं होतं. मुस्लिम आक्रमकानी देवळं आणि त्या जवळच्या परिसरातली घरं पेटवून दिली. माणसांची सरकट कत्तल केली. मंदिरात भांडीकुंडी वगळता काहीच मौल्यवान ऐवज हाती लागला नाही. बहुसंख्य घरं कोलव्याची (गवताने शाकारलेली) होती, ती धडाघड पेटायला लागली. बंदरात नांगरेल्या होड्या, पडावसुद्धा पेटवून देवून दीड दोन तास थैमान घालून आक्रमक पसार झाले. त्याच रात्री गडाचा वेढा उठवून आक्रमक निघून गेले. हळयात मात्र हाहा:कार माजला. पाडावे सरदारांकडे जेमतेम दोन अडीचशे एवढं मनुष्यबळ असल्यामुळे ते सड्याच्या धारेवर लपून राहिलेले होते . नजरेसमोर म&देर आणि गाव पेटताना दिसत असूनही उजाडल्यावर शत्रू पळून गेल्याची खात्री झाल्यावर माणसं गावात उतरली.
मंदिर पेटल्याची वार्ता कळल्यावर बावडा संस्थान, कोल्हापूर संस्थान सांगली - मिरज संस्थानं या भागात हळयातल्या मुली दिलेल्या होत्या. त्यामुळे या चारही ठिकाणांहून आणि पेशव्यांकडूनही मोठी मदत आली. बावडेकर संस्थानिक तर जातीनिशी मंदिराच्या पुनर्निर्माणावर देखरेख ठेवून होते. काम पूर्ण झाल्यावर त्यानीच मिराशांच्या जोडीला दात्ये कुटूंबाला इनामत देवून देवाच्या सेवेत रुजू केलं. म्हन प्रभूमिराशी दात्यांवर डूख ठेवून होते. एकोणीसशे चाळीस सालाच्या दरम्याने मानापानावरून कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि दरवर्षी श्रावण ते ज्येष्ट आळीपाळीने देवस्थानाची व्यवस्था दात्ये आणि प्रभू मिराशी यानी सांभाळावी असा कोर्टाचा निकाल झाला. दात्ये येण्या पूर्वी देवपूजेसाठी वार्षिक खंडीबर भात पिकेल एवढी देवस्थानाच्या इनामतीपैकी मळेवट शेत जमिन मेहेनतान्यादाखल देवून लिंगायत गुरव ठेवलेला होता. गुरवाला घर बांधण्यासाठी मंदिरा लगत चार कोपरे दिलेले होते. दात्ये आल्यावर त्यांच्या घरातला कर्ता पुरुष सकाळीच ईश्वराची आणि आवाठातल्या मूळवस. लक्ष्मीकेशव आणि काळभैराची पूजा करून जायचा प्रघात पडला. मिराशांची वर्सल असली तरीही मिराशी फक्त मानापुरते सण समारंभ असला की तेवढ्यापुरते देवळात येत. ते पुजेला येत नसत म्हणून दात्यांच्या पुरुषाकडून होणाऱ्या नित्यपूजेत कधी खंड पडला नाही. लिंगायत गुरव मध्यान्ही पूर्वी ईश्वराची सकाळी केलेली पुजा मोडून पुन्हा पुजा करीत असे.
मुळवसाच्या पाषाणा समोर कौल प्रसाद घ्यायचं काम घाडी सांभाळीत. त्यांच्या मूळ चार घरवडी वरसली प्रमाणे पाळीवर हक्क बजावायच्या. प्रभूमिराशी घराण्यातला सध्याचा दादा म्हाजन लंगडा होता. उत्सवात आणि मंदिरातल्या इतर समारंभाच्या वेळी दात्यांच्या जोडीला फक्त हजर रहायचा. पालखी बाहेर पडताना मानाची पंचारती फक्त उचलायचा आणि गावातल्या कोणाकडे तरी द्यायचा. पुराण कीर्तन सुरू असताना गाभाऱ्यासमोर मानाच्या खांबाला टेकून बसायचा. पालखी देवाच्याभोवत्या करून आल्यावर लिंगायत गुरव आतला मुझवटा बिछायतीसह उचलून नंदीच्या बाजूला मांडायचा. त्या जवळचा खांब हा म्हाजनाचा मानाचा खांब.इतर वार्षिकांच्या वेळीही म्हाजन फक्त मान सांभाळण्या पुरता फक्त दात्यांच्या सोबत रहायचा. पुराणिक बुवा, हरदास किंवा इतर सेवेकऱ्याला देवस्थान तर्फे द्यायच्या मानाचे तबक उचलून दात्यांच्या हाती देण्याचे काम करायचा. (क्रमश:)