मनातल्या प्रेमाची रूपे व्यक्तीनिष्ठ असतात तसंच, प्रेमातली मने पण स्वभावानुसार वागतात. काही मनांना प्रेमात समर्पण द्यायचं असतं तर काहींना प्रेमात अपेक्षा असते. काही मने प्रेम वाटत फिरतात. तर काही मने अबोल प्रीती आतच जपत त्या जपलेल्या प्रेमालाच आयुष्यभर कवटाळून बसतात. काही मने प्रेमाला युद्ध समजतात. ज्याच्यावर जीव त्याच्यासोबतच तंटा.
प्रेमातली मने प्रेम करत प्रेमाला सतत आणखी उंच करत राहतात. अशीच एक उच्च प्रेमाची खरी घटना जिचा तिऱ्हाईत प्रेक्षक किंवा साक्षीदार होण्याचं भाग्य मला मिळालं.
"सौऱ्या मुलगी एकदम छान आहे. तुझ्यासाठी एकदम पसन्त भाऊ आपल्याला. तुझं काय म्हणणं आहे? नकार देणार असशील, तर मग हिलाच वहिनी म्हणून हाक मारायला तयार रहा बरं का? कारण मी इथंच विरासत मधल्या अनिल कपूरसारखा तब्बूशी लग्न करायला उभा राहीन हा आधीच सांगतो." मी सौरभ सोबत मुलगी बघायच्या कार्यक्रमाला गेलो होतो. माझ्या तशा डिवचन्याने त्याने कपाळावर हात मारला.
"हिने मला पसंत केलं तर माझं नशीब!"असं तो म्हणाला.
सावळी, तजेलदार चेहऱ्याची, मोठया डोळ्यांची निशा पाहून सौऱ्याच्या तोंडाचा झालेला "आ" मिटायला तयार नव्हता. ते दोघे विसेक मिनिटे खाजगीत बोलून आल्यावर मी ओळखले. सौऱ्या त्रिफळाचित झाला होता. पण मग सगळं सुरळीत पार पडलं. दोन्ही पक्षाकडून आनंदाने लागलीच स्वीकृती आली. ते "नंतर कळवू." वैगरे भानगड झालीच नाही. त्यामुळे सौऱ्याकडे मी खोटा राग दाखवला. तिथंच घरात साखरपुड्याची तारीख आणि साखरपुडा सोहळ्यात लग्नाची तारीख काढून काही दिवसांनी सौरभ आणि निशावहिनी विवाहबद्ध होत पती-पत्नी झाले.
आपण तर आपल्या जिगरीच लग्न म्हणल्यावर भरपूर काम पण केलं आणि मजा पण केली. लग्न झाल्यावर दोघे गोव्याला गेले. ते दोघे गोव्याला जाऊन तिनेक दिवस झाले असतील. मी संध्याकाळी जिम मध्ये होतो. मला सौरभचा कॉल आला.
"टोणग्या जमलं ना सांगितलं तसं."मी पहिली चौकशी केली.
पण तिकडून त्याने दिलेल्या उत्तराने पोटात खड्डा पडला.
निशावहिनींना अचानक चक्कर आली होती. सुरुवातीला सौरभला वाटलं की लग्नाच्या गडबडीतला शारीरिक थकवा असेल त्यामुळे झाले असेल पण तसे नव्हते त्या अर्ध जागृतावस्थेत होत्या. त्याने हनिमून कॅन्सल करत ऍम्ब्युलन्स करुन निशावहिनींना घरी आणले. त्यांना ऍडमिट केलं. टेस्ट झाल्यावर कळले की, हायपर BP चा त्रास होऊन किडनीचं फेल झालीये.
निशावहिनींच्या घरातल्या लोकांवर सौरभच्या घरच्यांनी आरोप लावला की निशाला मोठं आजारपण असताना आम्हाला तुम्ही सांगितलं नाही. आमची फसवणूक केलीत. भडकलेल्या दोन्ही पक्षाकडून भयानक भांडणाला सुरुवात झाली. पण या सगळ्यात सौरभ पडला नाही. तो निश्चलपणे त्याच्या पत्नीचा हात धरून तिच्या शेजारी बसून होता. त्याला मी कधीच दुखी बघितलं नव्हतं. ते पाहिलं ते त्यादिवशी पहिल्यांदाच आणि शेवटचं.
सौरभला त्याच्या घरचे म्हणू लागले की तू सोड तिला. काय असेल ती भरपाई करू यांची, पण तू मोकळा हो. त्यावेळी त्याने घेतलेला त्याच्या पत्नीसाठीचा पवित्रा मला आजही आठवतो.
"निशाला सोडण्यासाठी मला सांगत असाल तर मलाही विसरून जा." एवढं बोलून त्याने त्याच्यासाठी तो विषय तिथंच संपलाय हे जाहीर केलं.
पण पुढलं आयुष्य सोपं नव्हतं. आठवड्यातून दोनदा हेमो - डायलीसिस सुरु झाले. ते सोपं पडावं म्हणून, हॉस्पिटलजवळ सौरभने जागा घेतली. काम सांभाळत त्याने ही तारेवरची कसरत सुरु केली. त्याची ती कष्टप्रद परिस्थिती पाहून मी पण त्याला जमेल तशी मदत करत होतो. शेवटी त्याच्या घरच्यांनी त्याला साथ दिली आणि मग मात्र सौरभ स्थिर झाला. निशावहिनींच्या मनात सौरभबद्दल आई वडिलांहून जास्त प्रेम आणि आदर वाढला होता. हे त्यांनी कैक वेळा बोलून दाखवलं होतं.
त्यांना हॉस्पिटलमध्ये नेता आणताना खूप जपावं लागत होतं. कारण डायलीसिस मुळे हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे कुठेही पडझड होऊ नये याची सतत काळजी घ्यावी लागायची. पण फक्त आहार, पथ्य पाणीच नाही तर, निशावहिनींना सिनेमाला नेणे, नाटक, गाण्यांचे कार्यक्रम, त्यांना घेऊन बागेत फिरणे, मित्रांचे, नातेवाईकांचे सोहळे, लग्न कार्यक्रम हे सगळं करत त्यांचे डायलीसिस आणि मनस्थितीही सौरभ सांभाळत होता. माझ्या लग्नानंतर कित्येक वेळा आम्ही पण त्यांना कम्पनी देऊ लागलो. निशावहिनी स्वभावाने हिरा होत्या. तर सौरभ त्या हिऱ्याच प्रेमळ कोंदण होता.
दोन वेळा निशावहिनींना अपघाताने फ्रॅक्चर देखील झालं. एकदा पायाला तर एकदा खांद्यापाशी. पण वैतागून खचून जाईल तो सौरभ कसला?
"किरकोळ दुखापत आहे गं ही. दहा दिवसात ओके होशील." असं म्हणून धीराने पत्नीला समजवणारा तो, आतमध्ये तिच्या दुःखाने जखमी झालेला मी पाहिलाय. पण चेहरा स्थिर. कदाचित यासाठी की निशावहिनींचं मनोधैर्य सौरभच्या चेहऱ्याकडे बघून स्थिर राहत होतं.
त्याकाळात सौरभने निशावहिनींना घेऊन तीन मुक्कामी ट्रिप सुद्धा केल्या. एकावेळी आम्ही दोघेसूद्धा हिलस्टेशनला त्यांच्यासोबत होतो. तो तिथलं जवळच डायलीसिस सेन्टर आधीच बघून बुक करुन ठेवायचा. त्याचा निशावहिनींच आयुष्य नॉर्मल ठेवण्यासाठीचा प्रयत्न मला सतत दिसायचा. त्यांचे वाद रुसवे फुगवे देखील दोघांच्या कडून मी ऐकलेत. एकदा तर दोघेही आठ दिवस एकमेकांशी बोलत नव्हते. सर्व जोडप्याप्रमाणे त्यांच्यातही सर्व सुरळीत होतं. फक्त नव्हतं ते संतती सुखं. त्याबाबतीतली हतबलता निशावहिनींनी आम्हा दोघांना बोलून दाखवली होती. पण सौरभच्या बोलण्यातून तो उल्लेख कधीच आला नाही.
वयाची चाळीशी आणि लग्नाची पंधरा वर्षे उलटल्यावर एक दिवस डायलीसिसच्याच प्रोसेस दरम्यान एक रक्ताची गाठ मानेत अडकली आणि प्रोसेस पूर्ण व्हायला तासाचाच अवधी असताना निशावहिनींनी जगाचा निरोप घेतला. CPR चा प्रयत्न झाला पण वहिनी पल्स धरत नव्हत्या. शेवटी त्या मृत म्हणून जाहीर करण्यात आलं.
****
सौरभ त्यांचे सर्व सोपस्कार पूर्ण होईतो स्थिर होता. एके संध्याकाळी आम्ही टेकडीवर फिरायला गेलो. तेव्हा त्याला मी विचारलं.
"तू निशावहिनीच्या जाण्याने एवढा स्थिर कसा? तुझं प्रेम हरवलंय तरी तू एवढं सहज कसं सहन करतोय?"
"कारण आता माझ्याकडे भावना उरल्याच नाहीयेत. जितका काळ ती माझ्यासोबत होती. तितका काळ जे द्यायचं ते मी तिलाच देऊन मोकळा होत होतो. ती माझ्या भावनांना प्रवाहित करणारा झरा होती. जर तो झराच आता जर बुजला आहे तर भावनेचा प्रवाह मी कुठून आणू?
ती एकदा म्हणाली होती. "ह्या जन्मी मी पत्नीच झाले. मला आई होता आलंच नाही. पण तुम्ही पती आणि पिता दोन्ही झालात. पुढल्या जन्मी ते भाग्य मला मिळावं."
तिची इच्छा पूर्ण झाली तर मला आवडेल रे तिच्या पोटी जन्म घ्यायला. प्रेम तर शेवटी प्रेमच असतं ना? मग त्याला नावं का द्यायची? तिचं सगळं करताना मला.. मला संतती नाही हे दुःखच कधी शिवलं नाही. उलटं, किती लवकर तिने मला बाप बनवलं. सुखच सुखं दिलंय रे तिने मला. आणि आता तिची बारी आहे. मी तिची वाट बघतोय. तिच्या आठवणी आणि वाट बघण्यातलं सुख आहेच की माझ्यासोबत, म्हणून मी स्थिर आणि सहज आहे."
सौरभ निशाच्या प्रेमाची उंची मला त्यावेळी स्तिमीत करुन गेली होती. प्रेमातलं त्याचं मन मला एक वेगळंच तत्व शिकवून गेलं. दोन भिन्न जीव प्रेमात एकरूप होताना त्यांचं स्वरूप कसं असतं हे सौरभ मला दाखवत होता.
🍁🍁🍁🍁
"अवघ्या काही क्षणांची उत्कटता,
कदाचित जग समजे प्रेम त्यासी.
परी चिरकाळाचा बंध साधाया,
संयम हीच खरी कसोटी मनाची."
- शब्दभ्रमर 🍁🍁