निर्दोष
जिल्हा सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीवर त्या सकाळी एक विचित्र ताण लटकत होता. पावसाळ्याची ओल भिंतींमध्ये मुरली होती, आणि कोर्टरूममध्ये लोकांची गर्दी जमली होती. दोन वर्षांपासून चाललेल्या मालिनी जोशी खून प्रकरणाचा आज अंतिम दिवस होता.
न्यायाधीश त्यांच्या उंच आसनावर बसले होते. सरकारी वकील, बचाव पक्षाचा वकील, पोलिस अधिकारी, पत्रकार… सगळे आपापल्या जागी होते. आरोपीच्या पिंजऱ्यात एक शांत चेहऱ्याचा माणूस उभा होता सुरेश देशमुख.
पेशाने तो शिक्षक.
स्वभावाने शांत.
आणि आज खुनाच्या आरोपातून सुटणार की दोषी ठरणार, याची वाट पाहणारा.
न्यायाधीशांनी निर्णयपत्र उघडले.
“पुरावे, साक्षीदार आणि परिस्थितीजन्य बाबींचा विचार करता… आरोपी सुरेश देशमुख यांच्यावरचा खुनाचा आरोप सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांना निर्दोष मुक्त करण्यात येत आहे.”
कोर्टात हलकी कुजबुज पसरली.
सुरेशच्या चेहऱ्यावर मात्र फारसा बदल झाला नाही. जणू हा निर्णय तो आधीच ऐकून आला होता.
पण या निर्णयामागे दोन वर्षांची अंधारी कहाणी होती.
-----
मालिनी
मालिनी जोशी शहरात ओळखली जाणारी तरुणी होती.
ती नेहमी वेगळी वाट निवडायची.
पत्रकारिता शिकूनही तिने नोकरी केली नाही. तिला कथा लिहायच्या होत्या, लघुपट बनवायचे होते.
लोक म्हणायचे “मालिनी थोडी वेडी आहे.”
पण तिच्या डोळ्यांत स्वप्न होते.
ती एका प्रोजेक्टवर काम करत होती , मानवी मनातील अंधारावर आधारित एक लघुपट.
तिच्या जवळच्या लोकांनाच माहिती होतं की त्या कथेत काही खऱ्या घटना मिसळलेल्या होत्या.
आणि त्यात एक व्यक्ती वारंवार येत होती
सुरेश.
-----
सुरेशचे जीवन :
सुरेश देशमुख बाहेरून पाहता अगदी साधा माणूस होता.
तो एका जुन्या शाळेत मराठी आणि इतिहास शिकवायचा. विद्यार्थ्यांमध्ये त्याचा खूप आदर होता. वर्गात तो नेहमी म्हणायचा
“माणसाचं खरं मोजमाप त्याच्या शांततेत दिसतं.”
पण सुरेशच्या आयुष्यात एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती होती.
त्याची आई त्याच्या लहानपणीच गेली होती.
वडील दारूच्या व्यसनामुळे हिंसक झाले होते.
घरात कायम भीतीचं वातावरण असायचं.
कदाचित म्हणूनच सुरेश लहानपणापासून खूप शांत झाला.
त्याला लोकांपासून अंतर ठेवायची सवय लागली.
-----
मालिनी आणि सुरेश
कॉलेजमध्ये मालिनी आणि सुरेश एकमेकांना भेटले.
मालिनीला सुरेशचा शांत स्वभाव खूप वेगळा वाटायचा.
ती नेहमी म्हणायची,
“तुझ्या डोळ्यांत खूप गोष्टी लपलेल्या आहेत.”
सुरेश फक्त हसायचा.
पण काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा आला.
काही कारणांमुळे ते दूर गेले.
मालिनी मात्र त्याच्यावर आधारित एक कथा लिहू लागली.
ती कथा माणसाच्या मनात लपलेल्या अंधाराबद्दल होती.
-----
खून:
त्या रात्री मालिनी तिच्या घरात मृत सापडली.
टेबलाजवळ पडलेली.
डोक्याला गंभीर मार.
पोस्टमार्टेमनुसार मृत्यू दुपारी १२ ते १ दरम्यान झाला होता.
पोलिस तपासात कळलं की त्या दिवशी सुरेश शाळेतून काही वेळ गायब होता.
आणि मालिनीच्या फोनवरचा शेवटचा कॉल
सुरेशचा होता.
संशय थेट त्याच्यावर गेला.
आणि काही दिवसांतच तो न्यायालयीन कोठडीत गेला.
------
जेल :
जेलचा पहिला दिवस सुरेशला अजूनही आठवत होता.
लोखंडी दरवाजा बंद झाला आणि त्याला एक अंधुक कोठडी मिळाली.
त्या कोठडीत आधीपासून एक वृद्ध कैदी होता
गजानन काका.
त्यांचे केस पूर्ण पांढरे झाले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या, पण डोळ्यांत विचित्र शांतता.
पहिल्याच दिवशी त्यांनी विचारलं,
“काय गुन्हा?”
सुरेश थोडा वेळ शांत राहिला.
“खून… असं म्हणतात.”
गजानन काका हलकेच हसले.
“इथं अर्धे लोक खून करतात… आणि अर्ध्यांवर खून लादला जातो.”
हळूहळू दिवस जाऊ लागले.
सुरेशने जेलमध्ये कैद्यांना वाचायला आणि लिहायला शिकवायला सुरुवात केली.
गजानन काका त्याच्याशी अनेकदा बोलायचे.
एकदा त्यांनी त्यांची गोष्ट सांगितली.
ते म्हणाले,
“मी तरुणपणी रागाच्या भरात माझ्या मित्राला मारलं. एका क्षणाच्या रागाने आयुष्य संपवलं.”
थोडा वेळ शांत राहून ते पुढे म्हणाले
“मास्तर… माणूस खून करताना एक सेकंद घेतो. पण त्या एका सेकंदाची शिक्षा आयुष्यभर चालते.”
-----
गुंता:
खटला चालू राहिला.
पुरावे कधी सुरेशकडे बोट दाखवत, कधी त्याला निर्दोष दाखवत.
मालिनीच्या लॅपटॉपमध्ये तिच्या कथांचे काही ड्राफ्ट सापडले.
त्यात एक ओळ होती
“काही लोक इतके शांत असतात की त्यांच्या आतला अंधार दिसत नाही.”
सरकारी वकील म्हणाला
“ही ओळ सुरेशबद्दल आहे.”
पण ठोस पुरावा कधीच सापडला नाही.
---
निर्णय :
दोन वर्षांनी कोर्टाने सुरेशला निर्दोष घोषित केले.
तो कोर्टातून बाहेर आला.
पावसाचा हलका वारा वाहत होता.
त्याने एकदा मागे वळून कोर्टाकडे पाहिले.
------
शेवटचा धागा:
त्या रात्री तो आपल्या जुन्या घरात गेला.
घरात शांतता होती.
त्याने कपाट उघडले.
आत एक डायरी लपवून ठेवलेली होती.
त्याने ती उघडली.
त्यात त्याचं हस्ताक्षर होतं.
“त्या दिवशी मालिनीने माझं आयुष्य उद्ध्वस्त करणार असल्याचं सांगितलं.”
पुढचं पान.
“ती माझ्या भूतकाळाबद्दल सगळ्यांना सांगणार होती.”
आणखी पुढे.
“मी तिला ढकललं…
ती पडली… ती वाचली असती,हॉस्पिटल ला घेऊन गेलो असतो तर. पण सर्वच उघड झाले असते.
आणि सगळं शांत होऊ दिले.”
सुरेश काही क्षण शांत बसला.
त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा उमटली.
त्याला जेलमधले गजानन काका आठवले.
त्यांचे शब्द पुन्हा कानात घुमले
“इथं दोन प्रकारचे लोक असतात…”
सुरेश हळू आवाजात म्हणाला
“एक जे गुन्हा करून शिक्षा भोगतात…
आणि दुसरे जे गुन्हा करूनही निर्दोष सुटतात.”
त्याने डायरी बंद केली.
खिडकीबाहेर रात्रीचा अंधार पसरत होता.
आणि त्या अंधारात एक निर्दोष ठरलेला खुनी शांतपणे जगू लागला.
© Nisha unkahi