me and my memories - 2 in Marathi Classic Stories by गिरीश books and stories PDF | मी आणि सांगण्यासारखे बरेच काही - 2

Featured Books
Categories
Share

मी आणि सांगण्यासारखे बरेच काही - 2

मी आणि सांगण्यासारखे बरेच काही.

तुम्ही म्हणाल हे काय शिर्षक आहे तर त्याचे 
असे आहे की, आपल्याकडे जुन्या आठवणी असतात, भुतकाळातील घटना किंवा आता घडत असलेल्या घटनांबद्दल आपल्याकडे सांगण्यासारखे असते पण आपण व्यक्त होत नाही. 
हे व्यक्त होणे महत्वपूर्ण असते. संवाद साधणे हे नात्यात देखील महत्वाचे आहे , हल्ली संवाद कमी झाला आहे. मैत्री का तुटते, विवाह का टिकत नाहीत तर संवादाचा अभाव. असो. 
आज महाद्वार रोडवर गेलो होतो. तिथे फडकेंचे होमिओपाथी औषधाचे दुकान आहे तिथे पोचलो आणि एकदम आठवले कोल्हापुरातील पहीला मोठा वडा ज्याला आता जंबो वडा म्हणतात तो वाईकरांचा वडा दोन रुपयात इथेच मिळत असे पण आता वाईकरांचा मागमुस नाही. आताच्या कुणाला वाईकर हॉटेल माहीत पण नाही. 
लक्ष्मीपुरीतील घिसाडगल्लीच्या सुरवातीला एक छोटे हॉटेल होते तिथे आम्ही पापडी कांदा बरोबर गोड खाजा किंवा बालुशाही खात असू, ते हॉटेल कुठे होते हे तिथे जाऊन पण लक्षात येत नाही. जवळच असलेल्या शारदा कॅफेत आता अमेरीकन भेळ मिळत नसली तरी कोबीवडा हा कुठेही मिळत नसलेला पदार्थ अजूनही मिळतो. खाजा बालुशाहीचा विषय निघालाय मग खत्री स्वीट मार्टचा उल्लेख केलाच पाहीजे. शिवाजी पुतळ्याचे या स्वीट मार्टला जसे प्रत्येक सणावाराला अंबाबाई दर्शनाला जायचो तसेच ईथेही जायचो. पतिशा नावाची बेसनवडी ही माझी आवडती . एकदा अलिकडे गेलो तेव्हा मालकांना विचारले पतिशा आहे का , तर ते म्हणाले किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे आता सर्व पदार्थ बदलले आहेत. 
तीच गोष्ट तृषाशांती मध्ये पण झाली त्याना म्हणालो केशरी आईसक्रीम द्या तर तो तरूण मालक म्हणाला हे कुठले आईसक्रीम? शेजारी ड्युकमध्ये पण केशरी आईसक्रीम , लस्सी मिळत असे पण आता काळाच्या पडद्याआड गेले ते.
लक्ष्मीपुरीतील पुरोहीत स्वीट मार्ट पण तीथे नाही आणी एक उडपि हॉटेल ज्यांचे समाधान म्हणून एक हॉटेल जाधव दवाखान्यासमोर (आताचे ॲपल) होते. त्या मालकांची एक आठवण म्हणजे त्यांच्या जवळ कायम एक फडके असायचे त्याने ते काउंटर पुसायचे. हॉटेलमधील टेबल पण कायम स्वच्छ असावी असा त्यांचा कटाक्ष असायचा पण आता तिन्ही बंद झाली आहेत. पुरोहित बोर्ड असलेली इमारत तरी आहे. 
बिंदू चौकातून रविवार बाजारात जाताना चंदू डेअरीमध्ये चक्का (भारत डेअरी आम्हाला लांब वाटायची , शाळेत रोज जायचो तिथेच) आणायला जायचो. रविवारच्या बाजारात असलेल्या जैनबस्ती (मंदीर) मध्ये दिवाळीत केशर आणायला जायचो, आता मिळते की नाही काय माहीत. रविवारच्या बाजारातील दिपक चिवडा आणि ओके हे सलून ही पण प्रसिद्ध. तिथेच पार्वती म्हणून मांसाहारी हॉटेल मध्ये सुक्यातला रस्सा आणायचो आता असे काही विचारायची पण सोय नाही. आणि आमच्या कॉमर्स कॉलेज समोर पार्वती म्हणून मिसळ कटवडा स्पेशल खासबाग हॉटेलवाल्यांचे छोटेसे हॉटेल होते. 
रविवारच्या बाजारात परत जाऊ. ज्या आईसक्रीमच्या दुकानातील मेन्यू कार्डवरील सर्व आइसक्रीम खायची असे ठरवले होते आणि खाल्ली पण ते पेरीना . त्याकाळातील छान फर्निचर वगैरे असलेले आणि सोळंखी शिवाय कोणी आइसक्रीम बनवू शकते हे दाखवणारे. फेमिला म्हणून आईसक्रीम फिरत्या छान गाड्यांवर मिळत असे.  आता बंद. 
तिथेच कोझी कॉर्नर म्हणूंन मांसाहारी हॉटेल व बार होता इथे आम्हाला सरकारनामाचे दिग्दर्शक भेटले होते. बौद्धीक घेतले होते त्यानी आमचे. 
पद्मा शाहू टॉकीज समोर पाणीपुरी भेलच्या गाड्या अजून आहेत. मांसाहारी चे पद्मा गेस्ट हाउस अजून आपला दबदबा टिकवून आहे. मांसाहारीचा विषय निघालाय तर म. प्र. चौकात सेंट्रल दुकानाच्या जरा पुढे माडीवर कोल्हापूर हॉटेल मध्ये पहील्यांदा मुर्गमुसल्लम म्हणून डीश चाखली होती पण ते आता नाही. म. प्र चौकातच अम्रत म्हणून पंजाबी डीशचे पॉश हॉटेल होते ते आमच्या फॅमिली पार्टीचे ठीकाण होते. तिथे जेवण करायचे आणि लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनजवळ असलेल्या शर्मांच्या कोल्डड्रिंक हाउसला मेलोजेलो खायचे. तिथेच गोविंद विडा चे पान दुकान होते. 
सायन्स कॉलेज समोर प्रभात हॉटेल आणी पुढे गेले की मग आठवते आम्ही एका हॉटेलच्या दारात उभे राहायचो जागा आहे का बघत आणि ताटात भरून येणाऱ्या कांदा भजीचा वास घेत आणि आत बसलेले लोक कधी उठतात आणि आमच्यासमोर ती प्लेट यावी म्हणून वाट बघायचो ते मिलन हॉटेल आता एकदा तिकडे गेलो पण रीकामी टेबल बघून आत जावेसे वाटले नाही पण जुन्या मित्रांबरोबर परत भजी खात गप्पा माराव्या अशी ईच्छा मात्र आहे पण... 
या भागातले उल्लेखनिय दुकान लकी स्टोअर्स कारण आता तो एक उद्योग समुह झालाय. 
वांगी बोळात आमच्या एका मित्राचे घर होते त्याच्याकडे गेलो की अशोक हॉटेलला भेट व्हायचीच. 
आम्ही सायकलवरून फिरताना लहर आली म्हणून (कॉलेजचे दिवस) चोरगे मिसळ मध्ये शिरलो चार पाच पाव घेउन मिसळ खाल्ली पैसे देताना कळले की आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत, मालकाना सांगितले सायकल ठेवतो पैसे आणून देतो, ते म्हणाले तुम्ही चांगली मुले दिसताय सायकल घेऊन जा संध्याकाळी या पैसे द्यायला. ऐकून लई भारी वाटले होते. 
वरुणतीर्थ वेसला लोणी डोशाचे हॉटेल झाले होते ते आणि बलभीम बॅंकजवळ विठाई आता थोड्या आधुनिक रुपात चालू आहेत याच भागात पुडाची वडी मिळायची पण जुन्या काळाइतकी आता मागणी आहे असे वाटत नाही. अशाच पदार्थांचे कोल्हापूर संगीत चिवडा या दुकानात का कुणास ठाउक मी आजपर्यंत गेलेलो नाही.
ताराबाई रोडवरील सन्मान, छ.शिवाजीमहाराज पुतळ्याजवळील सत्कार व चोपदार ही हॉटेल्स पण आमची नेहमी व्हिजीट असणारी होती चोपदारमध्ये रवा डोसा. आणि गंगावेशमध्ये सुखसागरला मिसळ.
लहानपणी आजोबा काकांबरोबर इंपिरियल कोल्डड्रींक हाऊस व १९९५ पासून शेजारी असलेल्या एम्पायर मध्ये आईसक्रीम खाणे. व्हरायटी आईसक्रीम तेव्हा २५₹ मध्ये मिळायचे.
आता शाहुपुरीत जाऊया तेव्हा पण थोडे महाग वाटणारे गोकुळ हॉटेल आपला दबदबा टीकवून आहे.
बावडा मिसळ हे शुगरमील ला जातानाचा स्टॉप. पण मिलच्या कॅंटिनला मिळणारी भरलेली ढबू मिरची व आमटी (दाल)ची चव मी कधिच विसरत नाही.
घाटगे पाटील इंडस्ट्रीज जवळच्या हॉटेल मध्ये
चिकन ,अंडा मसाला खाऊन जिलेबी खायचो .
कोल्हापुरात ईडली सांबारला प्रसिद्धी मिळवून दिली ती समर्थ नी,  कसबागेट जवळ. 
सोलापुरात पण सकाळी स्टॅंडवरील ईडली खाऊनच कामाला सुरवात व्हायची. तीथे एक शाकाहारी हॉटेल मध्ये थाळी मध्ये पुरणाचे छोटे वडे मिळायचे.
विद्यापीठ शाळेजवळ आलेले चाट वाले अजूंनही लोकांच्या खिशाला चाट मारत आहेत. 
अशा या जिभेचे चोचले पुरवण्याच्या आठवणी. प्रसंगानुरुप आणखी पण खाद्य गृहे सांगीनच. सध्या थांबतो.
गिरीश.