कथामालिका भाग - 1
कथा – ऑनलाईन
लेखक - प्रा.प्रमोद जगताप
जेवून झोपण्याच्या तयारीत असणारा पराग अंथरूणावर पडून फेसबुकवरच्या पोस्टी चाळत होता.
“घड्याळात साडे आकरा वाजल्या आता तरी की झोप की मुडद्या !” म्हणून आईने दिलेल्या शिवीला कसलीच प्रतिक्रिया न देता फेसबुकमध्ये गुंतलेल्या पराग आपल्याच
तंद्रित होता. तेवढयात एका अनोळखी स्त्रीचा hi...hello म्हणून आलेला इनबॉक्स मधला मेसेज परागसाठी काही नवा नव्हता. नवी होती ती मेसेज पाठवणारी व्यक्ती. एका स्त्रीने केलेला मेसेज आणि तिची ओळख नाही, म्हणून काहीच उत्तर न देणारा पुरूष काही अपवाद वगळता व्हाटसप, फेसबूकवर सापडले तर तो निव्वळ योगायोग म्हणावा लागेल.
या मायावी जगात कुठे ना कुठे कुणाचे कुणाशी तरी बंध जुळलेत यातूनच हल्लीची रात्र डोळ्यांनी जागून निघते. काही वेळेला पहाटे कोंबड्याची बाग ऐकून झोपणारे अगणित लोक आपल्याला आॕनलाईन दिसतात अगदी रात्रभर ही.
पराग आलेल्या मेसेज ला Hello अशी प्रतिक्रिया देऊन तिच्या मेसेज ची वाट पाहू लागला. आणि या 4G च्या युगात एकावर एक मेसेज येवू लागले..जावू लागले. अगदी कोणत्याही विषयावर जसजशी रात्र वाढत होती. तसा विषय ही वाढत होता. रात्रीचे दोन वाजले. वेळ कसा गेला दोघांनाही काहीच कळलं नाही. डोळ्यांत झोप तरळत असतानाच पराग ने खात्री म्हणून विचारलं...
“हॅलो तुझं अकाऊंट फेक तर नाही ना ! नाहीतर उगीच एप्रिल फूल व्हायचा.”
दोन तीन स्माईली पाठवून ती हासू लागली. आणि क्षणभरात संध्याने तिचा फोटो पाठवून परागला तिचे फेसबुक अकांऊट फेक नाही, याची खात्री करून दिली.
रात्रीच्या अडीच वाजता bby... gnsd.. होऊन दोघेही ऑफलाईन गेले, पण एकमेकांच्या विचाराने रात्रभर दोघेही ऑनलाईनच होते. एवढया भयान रात्री, अनोळखी पुरूषा बरोबर बोलणारी संध्या परागला खूपच धाडसी आणि अतृप्त वाटली.
पहाटे-पहाटे झोपी गेलेला पराग कॉलेजला जायचं म्हणून उठला पण त्याला उठायला थोडा उशीर झाला होता. बी.ए. च्या दुसऱ्या वर्गात शिकणारा पराग हुशार, चपलख भाषेतील गोडवा आणि संमोहनशास्त्रात पदवी घेतल्यासारखे चातुर्य त्याच्या बोलण्यात होते. अशा बोलण्याने सहज कुणालाही तो संमोहित करायचा. संध्यालाही तो त्याच्या भाषाशैलीने संमोहित करण्यात यशस्वी झाला होता.
चार-पाच दिवस रोज रात्री संध्या व पराग ऑनलाईन येऊ लागली. आपापल्या सुखदुखाला एकमेकांशी शेअर करू लागली. पराग तिच्या सोबत बोलताना रात्र रात्र घालवू लागला. संध्याला अशा ह्या ऑनलाईन बोलण्यातला मूड कमी होऊ लागला होता, पण तरीही ती बोलतच राहिली. काही दिवसानंतर परागची बी.ए.च्या दुसऱ्या वर्षाची उन्हाळी परीक्षा सुरू झाली. त्यामुळे पराग ही आता जास्त ऑनलाईन येत नव्हता. तिला हे जास्तच त्रासदायक वाटू लागले. कधी-कधी ऑनलाईन आल्यावर दोघांत भांडणे होऊ लागली. या भांडणाचा दोघांनाही कंटाळा आला. पण एकमेकांशी बोलल्या शिवाय दोघांचेही मन कशात लागत नव्हते. संध्यानेच तिचा मोबाईल नंबर मेसेज केला. मग ती परागशी कधी कॉल तर कधी मेसेजने त्याला बोलू लागली. आता दोघांत अधिकच जिव्हाळा वाढू लागला.
परागला आता परीक्षा संपून उन्हाळ्याची सुट्टी लागली होती. शेवटच्या वर्षाच्या ॲडमिशनला लागणारी फी ची रक्कम जमा करायला पाहिजे, म्हणून त्याने खाजगी कंपनीत काम शोधले. यामुळे साहजिकच संध्या आणि परागचा होणारा रोजचा संवाद दिवसेंदिवस आणखीनच कमी होऊ लागला. संध्याची अस्वस्थता लक्षात आल्यावर परागचेही कामात लक्ष लागेना. कामात चुका होऊ लागल्या. मॅनेजरने एक दोनदा मोबाईल जप्त ही केला. पण परागचा नाइलाज होता. काम ही त्याच्यासाठी तेवढच महत्त्वाचं होतं. आणि संध्याशी बोलणं ही. संध्याचा विरह परागला अस्वस्थ करत होता. पराग तिच्या आठवणीत आता रात्र रात्र जागू लागला. कामावरचे लक्ष दिवसेंदिवस कमी होऊ लागले. पराग ज्या कंपनीत हेल्पर म्हणून काम करत होता. त्याच कंपनीत त्याचे मित्रही काम करत होते. गुरूवारी परागच्या कंपनीला सुट्टी असायची. सुट्टी दिवशी फक्त संध्यालाच वेळ द्यायचा म्हणून तो स्वतःशीच बडबडत राहायचा.
.
क्रमशः
भेटूयात पुढील भागात...
©®प्रा. प्रमोद जगताप (फलटणकर)
संवाद - 8554857252