All-weather in Marathi Horror Stories by Ashish Devrukhkar books and stories PDF | सवाष्ण

Featured Books
  • सवाष्ण

    आज जत्रेचा पाचवा दिवस होता आणि त्यात रात्री झालेला पाऊस. सगळ...

  • My Lovely Wife

    अनाथ इशू ला 5 वर्षाची असताना,,शहरातील सर्वात श्रीमंत असणाऱ्य...

  • हेल्लो

    सायली आणि निशात…निशात हा खूप साधा-सरळ मुलगा. कुणालाही उगाच ए...

  • डेथ स्क्रिप्ट - भाग 3 - अध्याय 4

    अध्याय ४--------------मनातील गडद लढा------------------------...

  • ऑपरेशन मेघदूत

    भारतीय सैन्याच्या इतिहासात १३ एप्रिल १९८४ हा दिवस एक अमर क्ष...

Categories
Share

सवाष्ण

आज जत्रेचा पाचवा दिवस होता आणि त्यात रात्री झालेला पाऊस. सगळीकडे नुसता चिखल पण त्यातूनही आपलं सामान भिजण्यापासून वाचवण्यात यशस्वी झालेला तुकाराम स्वतः मात्र पार भिजून गेला होता.  थंडीने बिचारा कुडकूडून गेला होता पण गरिबाला कसली थंडी आणि कसला पाऊस. रस्त्याच्या कडेला आपला डगमगता लाकडी टेबल आणि सामानाच्या पिशव्या ह्यांची मांडामांड तुकाराम करायला लागला. 

आज फेटे घालून चालणारे तरुण दिसायला लागले होते. तुकारामला आधी काही कळेच ना की इतके फेटे घालून तरुण का यायला लागले. रस्ता आता गर्दीने फुलून यायला लागला. फेटे घातलेले तरुण गेले नाहीत तोपर्यंत पोलीस आणि हवालदार दिसू लागले. तुकाराम दरवर्षी येथे टेबल लावायचा पण आजवर कधी इतका पोलिसांचा फौजफाटा आला नव्हता. आपल्यासोबत आलेल्या आपल्या पोटच्या पोराला तुकारामने विचारल.

"पोरा, एवढी का र पोलीस आज."

"बा, आज शेवटचा दिस हाय जत्रचा म्हणून असल."

"नाय र पोरा, म्या इतकी वर्स हिकडं टेबल लावतोया. पोलीस कवा नव्हतं आलं बग."

"म्या बगून यिवू काय?"

"व्हय व्हय, जा बगून ये लवकर."

"व्हय बा."

तुकारामचा मुलगा पटकन धावत गेला आणि धावत आला. त्याच्या हातात चहा होता.

"बा, हे घे चा."

"आर लेका, तुला काय सांगितलं व्हत आणि काय करतोया तू."

"घे र बा, थंडीन कुडकूडला हाईस. चा पी मग सांगतो."

"बर, अस म्हणतुस. दे मग चा मला."

"बा. आज शेवटचा दिस हाय तर कोनी मोठा पुढारी येणार हाय हिकडं. म्हणून पोलीस हायती."

"म्हंजी ती फेटी वाली त्याचे चमचे."

दोघे बाप लेक हसायला लागले. इतक्यात एक हवालदार येऊन तुकारामला म्हणाला, "दादा, मागं घ्या हे टेबल, रस्त्यात अडचण होती. " 

चेहऱ्यावर काकुळतीचे भाव घेऊन तुकाराम, जमेल तितकं मागं सरकला. टेबलाचा एक पाय तुटका होता, त्याला आधाराला दगड लावून पुन्हा त्याने माल लावायला घेतला. अष्टगंध, बुक्का, हळद- लालभडक कुंकू, अबीर, गुलाल, हिरवा चुडा, लखलखते छोटे पंचपाळ असणारा डबा, तुळशीमाळा असं सगळं सामान त्याने वेगवेगळे ताट घेऊन रांगेत मांडलं. त्याचाच बाजूला कुणी टपरी लावून पान-तंबाखू, विकणारा विडी काडीवाला होता तर कुणी लहान मुलांच्या खेळण्याचा गाडा लावून बसला होता. थोड्या अंतरावर एक चहावाला पण टेबल टाकून बसला. आज ह्या सगळ्यांना आशा होती ते सगळा माल विकून रिकामा टेबल आणि पैसे घरी नेण्याची.

आज जत्रेचा शेवटचा दिवस होता. गेले चार दिवस म्हणावा तसा धंदा झाला नव्हता आणि त्यात काल रात्रीचा येऊन जाऊन पडणार पाऊस याने सगळा चिखल झाला होता. त्यामुळे आज धंदा होणार नाही म्हणून तुकारामने आपल्या पोराला गेले तीन दिवसात जमलेले पैसे घेऊन घरी जायला सांगितले. घर जत्रेच्या ठिकाणापासून चांगलं ६ ७ किलोमीटर दूर होत. एवढे सामान ५ दिवस रोज कुठे ने आण करायचं म्हणून तुकाराम आणि त्याचा मुलगा गेले ४ दिवस इकडेच राहत होते. तुकाराम आणि त्याचा मुलगा दुपारी तिथेच कुठेतरी वडापाव किंवा भजी खायचे. रात्रीसुद्धा तेच. पण कालच्या पावसाने सगळी वाट लावून टाकली होती. हळूहळू गर्दी वाढायला लागली होती.

"बा मी थांबतो."

"नको रं, तू जा घरला."

"आव पन, गर्दी लै हाय. तुमानला नाय झेपनार."

"आता काय बापाला शिकीवणार व्हय रं लेका."

"तस नाय बा."

"तू घरला जा आन मायला निरोप दे."

"काय सांगू माय ला? बा न मला घरला पाटवून दिल."

"नाय रं लेकरा माझ्या. मी तिला अगुदरच सांगितलं व्हत की तुला शेवटच्या दिवशी घरला पाटवीन."

"मंग?"

"माय ला सांग आज दुपारच्याला जरा जास्तच जेवन घेऊन ये आनी आमी दोघ रातच्याला संगच एकत्र घरला येऊ. समद सामान घेऊन यायचंय न्हवं."

"व्हय."

"आन लक्षात ठेव, अजिबात त्या मदल्या वाटंनं जायच नाय."

"कोनच्या? त्या जंगलाच्या?"

"हा."

"का र बा?"

"तिकडं झखिण हाय म्हणत्यात लोक."

"झखिण काय असतंय र बा?"

"झखिण म्हनजे एकादी सवाशीन बाय मेली आनी तीच भूत झालं तर तिला झखिण म्हणत्यात."

"बा खरच तीत झखिण हाय काय रं?"

"मला नाय म्हाइत, मी नाय गेलो कवा तिकडन. तू बी नग जाव."

"व्हय बा."

"समद लशक्यात हाय ना?"

"व्हय बा, येतू."

"नीट जा अन मायला निरोप दे."

"व्हय व्हय."

पोरगा दिसेनासा होईपर्यंत तुकाराम त्याला हात दाखवत होता. आता चांगलीच गर्दी झाली होती. कोणी अबीर गुलाल नेत होत तर कोणी तुळशीमाळा. हळद कुंकू सुद्धा नेत होते. दुपार होऊन गेली पण गर्दीमुळे तुकाराम जेवणाचे सुद्धा विसरून गेला. संध्याकाळी गर्दी ओसरू लागली तेव्हा तुकारामाच्या लक्षात आले की त्याची बायको दुपारी जेवण घेऊन आलीच नाही.

पोरगा घरी पोहचला की नाही, पोहचला असेल पण आईला सांगायला विसरला असेल. की तो त्या मधल्या रस्त्याने गेला आणि झखिणने त्याला मारून तर टाकले नसेल ना. त्याच्या डोक्यात विचार सुरू होते. केव्हा जत्रा संपते आणि घरी जातोय असे त्याला झाले होते. पण अचानक गर्दी पुन्हा वाढू लागली कारण आज जत्रेची सांगता होती आणि रात्री भजन स्पर्धा होती. त्यामुळे बरीच लोक त्या हिशोबाने संध्याकाळीच येत होती. 

तुकारामाचा धंदा जोरात झाला पण डोक्यात त्याच्या पोराचाच विचार सुरू होता. आता शेवटचं हळदी कुंकुवाच एक पाकीट आणि एक हिरवा चुडा राहिला होता. सकाळी त्याने बायकोसाठी एक साडी घेतली होती. ती साडी आणि ते हळदी कुंकवाच पाकीट आणि हिरवा चुडा त्याने एका पिशवीत भरलं आणि टेबल तिथेच टाकून तो घराकडे जायला निघाला. टेबल उद्या सकाळी घेऊन जाऊ पण आधी बायको का आली नाही ते बघू, पोरगा पोहचला असेल ना ते बघू ह्या विचाराने तो घराकडे धावत सुटला. रिमझिम पाऊस सुरू झाला होता. हातातला कंदील कधी विझेल ह्याचा नेम नव्हता.

थोडं अंतर गेल्यावर रस्त्याला दोन फाटे फुटले होते. एक होता नेहमीचा रस्ता आणि दुसरा होता जंगलातून जाणारा जिकडे झखिण आहे असे बोलले जायचे. तुकाराम क्षणभर तिथे थांबला. 

'माझं पॉर ह्या वाटंन तर गेलं नसलं ना?' त्याच्या डोक्यात विचार आला आणि शेवटी बापाचं काळीज ओ. त्याने झटकन निर्णय घेतला. ह्याच वाटेने जायचे. पोरगा ह्या वाटेने गेला असेल तर भेटेल, नाही गेला असेल तर लवकर घरी पोहचू. पण झखिण??? 
'झखिण बिखिन कोन नसतय.' अस स्वतःलाच समजावत तुकाराम त्या झाडीत घुसला. 

जसा तो त्या झाडीत घुसला वातावरण अचानक उबदार झालं. कंदिलाच्या प्रकाशात जेवढं दिसत होतं त्यापेक्षा जास्त दिसायला लागला होता आणि पावसाचा मागमूस सुद्धा नव्हता. 

'पाऊस थांबला वाटत.' तो स्वतःशीच बोलला आणि पुढे जायला लागला. मनात सतत झखिणीचा विचार येत होता पण त्याने ठरवले होते की कितीही, कोणाचाही आवाज आला तरी अजिबात थांबायचं नाही. तो पटापट पावलं टाकत जात होता.

आणि अचानक...

"ओ धनी....."

त्याच्या कानावर आवाज आला. त्याने आपल्या बायकोचा आवाज बरोबर ओळखला. तो थांबला पण पटकन त्याला आठवलं की झखिण कोणाचाही आवाज काढू शकते. त्याने मागे वळून न बघता सरळ चालायला सुरुवात केली. परत आवाज आला.

"ओ धनी, थांबा की. तुमास्नी हाक मारालोय. ओ धनी." 

तुकाराम अजिबात थांबायचं नाव घेत नव्हता. त्याने आपला वेग वाढवला. पुन्हा मागून आवाज आला.

"आव धनी, थांबा की. म्या जानकी हाय. तुमची बायको. ओ धनी."

पण तुकाराम काही थांबत नव्हता. अचानक समोरच्या झाडामागून आवाज आला.

"ए बा, आर थांब की. माय हाका मरायले मागून. अस का झखिण दिसल्यावानी पळालाय." 

झाडामागून आपला पोरगा येताना बघून तुकारामने हातातलं सगळं टाकून दिल आणि पोराला मिठी मारली.

"बा, काय झालं तुला?"

"तू ह्या वाटन का आलास?"

"मी नाय आलो बा."

"मग, तू हिकडं कसा?"

"माझ्यासंग आलाय त्यो हिकडन." तुकारामाची बायको मागून धापा टाकत आली.

"पण का?"

"सांगतू."

"आवो, लै उशीर झालता यायला म्हणून हिकडन आलो."

"पन हिकडं झखिण हाय तुला म्हायतेय ना."

"कोन बी नाय हिकडं."

"उगाच."

"आव, आमी येताना वाट चुकलो. वाटेत एक सुंदर बाय भेटली आमाला. त्यांनी त्यांच्या घरला नेलं म्हणून येळ झालाय बघा."

"बर चला घरला आता."

तुकाराम बायको आणि पोराला घेऊन घरी जाऊ लागला. वाटेत एकेठिकाणी तुकारामची बायको बोलली.

"आव, धनी जरा थांबुया का?"

"का?"

"हिथ घर हाय त्या बायच. तीन वाट दावली व्हती आमानला. त्यांना सांगून येतो तुमी घावला म्हणून."

"कुटाय?"

"ते काय समोर."

"हा."

"जावं काय?"

"नग."

"आव जाऊ द्या ओ."

"नग म्हणतोया न्हवं."

"जाऊ द्या ओ. तुमच्याकड हळदीकुंकू हाय काय."

"हाय, कशाला हवंय?"

"आन हिरवा चुडा?"

"हाय तो बी. पण तुला कशाला हवा?"

"ती बाई सवाशीन हाय ओ, तिला द्यायला पायजेल कायतरी."

"म्हणजे?" 

"तुमी द्या ओ."

"थांब, देतो."

तुकारामने आपल्या पिशवीत हात घालून हिरवा चुडा आणि हळदी कुंकवाच पाकीट बाहेर काढलं आणि त्याला अचानक धप्पकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्याने पटकन आवाजाच्या दिशेने पाहिले तर त्या घराच्या समोर त्याला २ व्यक्तींची शरीर दिसली. त्याने नीट पाहिलं तर त्यातील एक शरीर तुकारामाच्या बायकोचे होते आणि दुसरे त्याच्या मुलाचे. अंधार असून देखील त्याला ती शरीर स्पष्ट दिसत होती. त्याने वळून आपल्या बाजूला पाहिले तर त्याच्या बाजूला कोणी नव्हतं. ना बायको ना मुलगा. तो काय ते समजून गेला. त्याने घराकडे पुन्हा पाहिले तर दाराजवळ एक बाई उभी होती. हिरव्या रंगाची साडी घातलेली, गळ्यात मंगळसूत्र घातलेली. ती तिकडूनच मोठ्याने कर्कश्य आवाजात ओरडली.

"मला हिरवा चुडा दे आणि हळद कुंकू लाव मला."

तुकारामने आपली पिशवी तिथेच टाकली आणि धूम ठोकली. तुकाराम जिवाच्या आकांताने धावत होता. अंधारात कंदिलाच्या प्रकाशात काही दिसत नव्हतं तरी तो वाट फुटेल तिकडे धावत होता. पण तिचा आवाज त्याला ऐकू येत होता.

"माझा हिरवा चुडा मला दे."

तुकाराम धावतच होता. धावता धावता ती स्वतःलाच शिव्याशाप देत होता.
'एवड्या अंधारात त्यासनी मी कसा दिसलो याचा इचार करायला हवा व्हता मी, तवाच मला कळायला हवं व्हत की काहीतरी गडबड हाय. माझं पोर आन बायकोला गिळली त्या झखिणीन. आता मी काय करू जगून.'

"झखिण कोणाला म्हणतो रे हरामखोरा?" 

तिचा आवाज ऐकून तुकाराम थांबला. एवढं पळून सुद्धा तिचा आवाज इतक्या जवळून कसा आला त्याला कळत नव्हतं. त्याने कंदील थोडा वर उचलला तर ती सवाष्ण बाई हवेत उडत होती. 

"तुकाराम ना रे तू?" ती हवेत तरंगत होती.

"व्हय." तुकाराम घाबरत घाबरत बोलला.

"तूच हळद कुंकू दिले होतेस माझ्या नवऱ्याला."

"कोन नवरा तुझा?"

"कळेल तुला लवकरच."

"माझ्या बायको अन पोरान काय केलंत तुझं?"

"तुझ्या पोरांन हिरवा चुडा आणून दिलेला माझ्या नवऱ्याला आणि तुझ्या बायकोन माझी ओटी भरली होती शेवटची."

"म्हंजी?"

"माझा नवरा म्हणजे इथला सावकार. तुझ्याकडूनच गेल्यावर्षी जत्रेत त्याने हळदी कुंकू घेतलं होतं. हिरवा चुडा नव्हता म्हणून तुझ्या पोरान घरातून आणून दिलेला हिरवा चुडा मला. तोच हिरवा चुडा घालून मी हळदी कुंकवाला तुझ्या घरी आले होते."

तुकारामला सगळं आठवलं.

"मंग त्यासाठी माझ्या बायको आन पोराला का मारून टाकलसा तुमी."

"का म्हणजे? त्यांनी अप्रत्यक्ष माझ्या नवऱ्याला मदत केली होती."

"कसली मदत?"

"तुझ्या घरातून ओटी घेऊन मी माझ्या घरात आले. समोरच माझा नवरा उभा होता हातात मोठा कोयता घेऊन. पदरात ओटी, हातात हिरवा चुडा आणि कपाळावर हळद कुंकू लावलेली मी जशी उंबऱ्यात आले तसे माझ्या नवऱ्याने माझी मान एका घावेत धडावेगळी केली." एवढं बोलताच हवेत उडणाऱ्या तिच्या शरीरापासून मुंडके वेगळे झाले आणि धड धाडकन जमिनीवर पडले. मुंडके मात्र हवेतच तरंगत होते. तरंगणारे ते मुंडके आता बोलू लागल.

"आता तुझी पाळी आहे."

तुकारामला भोवळ यायची बाकी होती, तरीही त्याने तिला विचारलेच.

"माझा काय दोष?"

"तू हळदी कुंकू विकले होतेस त्यामुळे तुलाही मरायला लागेल आणि ज्याने कोयता त्यालाही मी मारून टाकलं आहे."

"म्हंजी त्या भिक्याला ....."

"होय, मीच मारलं त्याला. माझ्या नवऱ्याला त्याने कोयता दिला होता."

"सावकार अस का वागलं पर?"

"गुप्तधन."

"गुप्तधन?"

"होय. त्याला एका मांत्रिकाने सांगितलं होतं. हातात ओटी, हळदी कुंकू लावलेली सवाष्णीन तुझ्या दाराच्या उंबऱ्यात तिचा बळी दे तुला गुप्तधन मिळेल. त्याने मलाच स्वतःच्याच बायकोला मारले. स्वतःच्या बायकोचा नरबळी दिला त्याने."

"काय?"

"हो. पण मी सवाष्ण मेले ते ही तिन्हीसांजेला म्हणून मी झखिण झाले आणि सगळ्यात आधी माझ्या नवऱ्याला मारून टाकले. त्याच्याच घरात मी त्याला जाळून मारले. मग त्या मांत्रिकाला मारून टाकले. मग कोयता देणारा तो भिक्या. हिरवा चुडा देणारा तुझा मुलगा मग हळदकुंकू लावून माझी ओटी भरणारी तुझी बायको आणि आता तुझी बारी."

एवढे ऐकताच तुकाराम हातातला कंदील टाकून धावत सुटला. वाट मिळेल तिकडे तो धावत होता आणि त्याच्या मागून ते मुंडके मोठ्यामोठ्याने हसत हवेत तरंगत येत होतं. 

सकाळ झाली आणि त्या जंगलात गुर चरायला आलेल्या गुराख्याने गावात जाऊन तुकाराम आणि त्याच्या बायको पोराचं प्रेत सावकाराच्या जळालेल्या घराजवळ पडलं असल्याची खबर दिली. 

त्याच्या पुढच्या दिवशी पेपरात मोठी बातमी होती. 

'जंगलातील सावकाराच्या जळक्या घराजवळ गावातील एकाच परिवारातील तिघांचे मृतदेह सापडले. जळालेल्या घरात सावकाराचा जळलेला मृतदेह सापडल्यानंतर आजवर पाच मृतदेह तिथे सापडले. घराचे गूढ अद्याप कायम.'

-आशिष देवरुखकर