श्रीमद् भागवत -१
जे लोक अनेक समस्यांनी त्रासलेले असलेले असतात, ज्याना पैसे कमी पडत असतात किंवा ज्यांना कोणत्याही कारणांनी भगवंताविषयी जिज्ञासा उत्पन्न होते असे लोक भक्ती मार्गात पाऊल ठेवतात.
भगवंताविषयी ज्ञानाचा प्रसार तसेच नामाचा प्रसार करणारे भगवंताला प्रिय असतात.
जे लोक सतत काही वासना, इच्छांच्या मागे लागून भोग विलास करण्यात मग्न असतात आणि नंतर सुख मिळत नसल्यामुळे दुःखी होत असतात, आपल्या इंद्रीय सुखासाठी कोणत्याही थराला जाऊन चुकीची कामे करण्यात मग्न झालेले असतात , आणि त्यामुळे त्यांना दुःख, संकटांना सामोरे जावे लागते. ज्ञान असूनही भगवंता बद्दल नीट आकलन झालेले नसल्याने जे दुःखी राहतात. तसेच काही लोक स्वतःला नास्तिक म्हणून घेणारे असतात, गैर कृत्य करण्यात मग्न राहतात आणि दुःखात असूनही परमेश्वराचे अस्तित्व नाकारून भक्ती मार्गाला जात नाहीत, अशा सर्व प्रकारच्या माणसांचे कल्याण होणे साठी नारदांनी व्यास देवांना भगवंताविषयी उपदेश करण्यास सांगितले आणि म्हणूनच भागवत हे सर्व वर्गातील सर्व जातीतील सर्व कल्याणाची इच्छा असलेले आणि प्रामाणिकपणे मन:शांती प्राप्तीची इच्छा करणाऱ्या मानवांसाठी आहे.
श्रीकृष्णाप्रती अढळ अशी भक्ती ज्या योगे लाभेल तो श्रेष्ठ धर्म समजावा.
भगवंतानी ज्या त्या काळात ज्या प्रकारची आवश्यकता होती त्याप्रमाणे अवतार घेतले.
भगवान मानव अवतार घेऊन अनेक दिव्य कार्य करत असतात, अशा अवतारांची जे लोक भक्ती करतात त्यांच्यावर देवाची कृपा होते. जगात वेळ वाया न घालवता भगवंताच्या चरित्राचा अभ्यास करून आध्यात्मिक प्रगती करून घ्यावी. भौतिक सुखाच्या मागे लागून त्रिगुणांचे दोष उत्पन्न होतात.
भगवंतांचे चरीत्र ऐकून मानवाची पापे घेऊन जातात जेव्हा माणसाच्या मनात भक्तीचा भाव प्रगट होतो तेव्हा हळूहळू रजो, तमो गुणाच्या प्रभावातून तो मुक्त होऊ लागतो. मानवाने शरीराने देवळात सेवा करावी व मनाने भगवंतांचे चरित्र ऐकावे तसेच नामस्मरण करावे.
मानवाने भगवंतांचे स्मरण करणे आवश्यक आहे. भगवंतांच्या लीला ऐकणे अथवा सांगणे यात मन रमले पाहीजे.
कीर्तन व श्रवण ही नवविधा भक्तीची दोन अंगे आहेत .
नामस्मरण व भगवंतांच्या लीलाचे वर्णन कीर्तनातून करणे हा भक्तीचा मार्ग आहे.
नाम आणि स्वतः श्रीकृष्ण हे समान मानले पाहिजेत.
मनुष्य स्वतःला पापी समजत असला तरी त्यानी नामाचा आधार घेऊन आपण करीत असलेल्या नामस्मरणामुळे पापकर्मापासून स्वतःला वाचवून आपण करत असलेला जप हा पुण्यकर्म आहे हे लक्षात घ्यावे.
स्वतःच्या आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी नामस्मरण हा सर्वाना साध्य होणारा असा मार्ग आहे .
मनुष्याने इच्छांचा त्याग करणे अशक्य असले तरी त्याने विकृत इच्छांचा त्याग करून परमेश्वरा ची सेवा करण्याची करून त्याप्रमाणे वर्तन ठेवले पाहिजे.
भीष्म एक श्रेष्ठ भक्त होते.
कौरव पांडव युद्धात भीष्मां सारखे महापराक्रमी दुर्योधनाच्या बाजूने असले तरी तो जिंकला नाही कारण पाप कोणत्याही परिस्थितीत नीती वर विजय मिळवू शकत नाही .
भीष्म हे भक्त असल्याने श्रीकृष्ण त्यांना भेटण्यासाठी शरशय्ये जवळ गेले भीष्मांनी श्रीकृष्णाने प्रार्थना केली की मी शरीर सोडण्याच्या आधी मला चतुर्भुज रूपात दर्शन द्यावे.
भगवंतांचे चिंतन करताना आपल्याला मृत्यू यावा ही त्यांची इच्छा श्रीकृष्णानी पूर्ण केली भीष्म शरशय्येवर असताना श्रीकृष्ण तिथे गेले तिथे अनेक ऋषी आले होते.
पर्वत, नारद ,भगवान व्यास, भरद्वाज ,परशुराम, वशिष्ठ , विश्वामित्र इत्यादी अनेक ऋषी आले होते. भगवान श्रीकृष्णाची पांडवानी पूजा केली. पांडव व भगवान श्रीकृष्ण जवळ बसल्यावर भीष्म म्हणाले तुमच्या जीवनात ज्या घटना घडल्या ती परमेश्वराची लीला आहे.
जिथे साक्षात धर्म पुत्र युधिष्ठीर आहे, भीमा सारखा गदाधारी आहे आणि अर्जुना सारखा धनुर्धारी आहे व ज्यांचा सखा स्वतः श्रीकृष्ण आहे तिथे संकटाची शक्यताच नाही पण हे सर्व ईश्वर इच्छेने होत असते.
श्रीकृष्ण साक्षात भगवान आहेत तेच परम पुरुष नारायण आहेत , ते आपल्या भक्तांवर कृपा करीत असतात आणि म्हणूनच माझ्या मृत्यू समयी ते इथे आले आहेत.
जे भक्तिभावाने त्यांचे नामस्मरण कीर्तन करत शरीर सोडतात ते कर्म बंधनातून मुक्त होतात. नंतर युधिष्ठीरानी विचारल्यानंतर त्यांनी धर्म,दानधर्म, राजधर्म, मोक्ष, स्त्री धर्म याचे वर्णन केले. उत्तरायणा ची वेळ झाली जी मृत्यू साठी योग्य मानली जाते तेव्हा भीष्मानी आपली दृष्टी भगवान श्रीकृष्णां वर केंद्रीत केली आणि युद्धातील जखमांची वेदना तर दुर झालीच पण सर्व अशुभ गोष्टी नष्ट झाल्या
भीष्मांनी श्रीकृष्णांची स्तुती केली. श्रीकृष्ण हे अनेक रुपात दिसत असले तरी ते प्रत्येकाच्या अंतःकरणात वास करतात. भीष्मांनी मन वाचा दृष्टी आणि वृत्तीने स्वताला भगवंतांना विलीन केले आणि त्यांचा श्वास थांबला.