आई आपल्या मुलीला आज्जीबद्दल सांगत आहे.
“ऐक ग, ही फक्त आज्जीची कथा नाही… तिच्यासारख्या अनंत स्त्रिया होऊन गेल्या ,घडत आहेत,काही लढत आहेत काही माघार घेत आहेत. त्या सर्वांची आहे.
“आई, तुझी आज्जी कशी होती?”
तू विचारलंस तेव्हा, मी गप्प झाले.
उत्तर देण्यापेक्षा तिच्या आठवणींनीच पहिल्यांदा माझा हात धरला.
“बाळा, ही कथा नाही… ही व्यथा आहे.
पण घेण्यासारखं खूप आहे. ते मात्र नीट घे.”
एक आटपाट नगर होतं.
तिथे राहत होता एक ‘राजा माणूस’.
गादी नाही, पण गुणांचा राजा
हुशार, हरहुन्नरी, हाताच्या रेषांसारखा चलाख.
त्याला होत्या दोन बायका
एक आवडती.
एक नावडती.
आणि नावडती?
आपली आज्जी बरं का.
आई,"आवडत नव्हती तर कशाला लग्न केले?
पूर्वी अशीच परंपरा होती ,दुसरी बायको आली की पहिली आपसुकच नावडती होते.
तिने कधी कोणाचा द्वेष केला नाही. तरीही ती नवऱ्यासोबत सगळ्यांचीच नावडती झाली.आणि समाजाने तिला रोजचे दंश दिले.
कधी हाकलली गेली,
कधी मारली गेली ,झोडली गेली,तेव्हाचे तिचे नातेवाईक तिचं म्हणणं न विचारता रोज
जिवंतपणी मरण देत असत.
पण तिच्यात एक खास गोष्ट होतो तिचा स्वाभिमान?
कणखर स्वभाव
दुखापत झाली तरी न मोडणारा बाणा.
तो
काळ होता भारताच्या पारतंत्र्याचा. नुकतेच स्वातंत्र्य येऊ घातले होते. पण तिला काय तिचे स्वातंत्र्य तर गहाण होते.
पदरात दोन मुली होत्या.
आणि आज्जीसमोर दोनच रस्ते—
एक, आपल्या बापाकडे जावं.
दुसरा, नवऱ्याकडे मुली सोडाव्या.मुलींची वये अकरा आणि ,तिन वर्षे.
बाप घ्यायला ही आला.पण
जगाच्या तोंडी "टाकून दिलेल्या बाईच्या मुली" हे शब्द ऐकत जगणं तिला मंजूर नव्हते.
मग तिने तिसरा रस्ता तयार केला—
एकटीच्या हिमतीचा.
ती म्हणाली,
“मुलींचा काय दोष?
बापाचं छत्र असू दे.
मी मार खात बसेन, पण मुलींना पोरकं म्हणू देणार नाही.”
त्या दिवसापासून जग तिला फाडून खाण्यास निघालं.
तिच्या मागे बंदुका फिरू लागल्या.
रात्र तिची सावली झाली.
जंगल तिचं आसरा.
कधीकधी तिने मृत्यूला डोळे उघडे करून पाहिलं.
आणि म्हणाली,
“मी अजून संपले नाही.”
समाज तिचं सिंहासन खेचत राहिलं,
पण तिने कधी थांबून रडली नाही.
शेवटी समाजाने हार मानली.
तिने ओरबाडून हक्क मिळवला.
पायांचे रक्त वाहत असेल तर वाहू दे, पण थांबायचे नाही.
पण डोळ्यात स्वाभिमान कायम पेटता हवा.
अशी तिची भूमिका होती. तिला घर मिळाले.संसार सुरू केला.
वर्षं सरली.
मुली मोठ्या झाल्या, संसाराला लागल्या.
पुढे मुलींची बाळंतपण केली.
आताशा ती निवांत झाली.
तिच्या आतला लाव्हा धुमसू लागला,
पण चेहरा?
दमलेल्या योध्यासारखा शांत. जून वेदना तिला स्वस्थ बसू देत नव्हत्या. काळ तिची माफी मागत राहिला.तिने माफ नाही केले.
माझी थोरली बहीण तिच्याबरोबर राहिली— वाढली
तिच्या नसा-नसांत आजीचे बाळकडू मुरले.
कणखरपणा,
कठोरपणा, पण मनाची उभी ओली माती. माया तितकीच शिकवली.प्रेम आदर , कर्तव्य सर्व केवळ बघून शिकली.
काही वर्षे मी आज्जी सोबत राहिले.
मी मात्र
लहान, गोंधळलेली, भित्र्या मनाची.
पण आजीच्या सांगण्यातून
भीती हळूहळू निडरतेच्या पायाखाली बसली.
ती म्हणायची—
“भाकरी खावी मांडी आड,
जग आहे फारच द्वाड.”
तिच्या डोळ्यांतून जगाचं सत्य
अगदी थेट माझ्या आत्म्यात शिरलं.
कधी मी भित्रीची कधी निडर झाले
मलाही माहित नाही झाले.
पण तिचे संस्कार
फासावरची गाठ असतात तसे
माझ्यात घट्ट रूतले.
कधी मला वाटायचं,
एखादा मामा असता तर?
कदाचित आजी एवढी कणखर झाली नसती.
कदाचित जगाने तिची एवढी कसोटी घेतली नसती.
कदाचित ही वाघीण जन्मलीच नसती.
वेळ पुढे जात होती. यथावकाश
आम्ही दोघी बहिणी पांगलो.
मग आज्जी एकटी पडली.
हक्काने मिळवलेल्या घरात.
पण आजाराने तिची छाती पोकळ करू लागली. एकटी ठेवणे शक्य नव्हते.
तरीही एक हट्ट आजही दगडासारखा—
“जावयाच्या दारात मरायचं नाही.”
पण दिवसांना तरी कोण थांबवतो?
एक दिवस असा आला—
ज्याला आजी देहाने नव्हे,
मनाने खचली.
त्या दिवशी, जेव्हा तिला
जावयाकडे जावं लागलं.
तिचा आवाज प्रथमच सुकला.
गर्व तिच्या डोळ्यांतून पहिल्यांदा ओघळला.
ती रडत होती—मनाच्या आतल्या आत
स्वतःलाच शाप देत.
आणि मी तुझ्या स्मृतीत कोरून ठेवते—
“ज्या दिवशी तिला जावयाकडे जावं लागलं,
त्या दिवशीच ती आतून मरून गेली;
खरा मृत्यू मात्र दहा वर्षांनीच आला.”
त्या नंतरच्या वर्षांत,
तिने युद्ध वादळांशी नाही,
स्वतःशी लढलं. स्वाभिमानाचे
आणि एके दिवशी
तिने जगाचा हात सोडला.
पण ऐक बाळा—
तुझी आज्जी गेली नाही.
ती माझ्या मणक्यात आहे.
माझ्या शब्दांत आहे.
माझ्या नजरेतील तेजात आहे.
आणि आता ती
तुझ्यातही आहे.
ही तिची कथा नाही.
ही तिची वारी, तिची जिद्द,
तिने आपल्याला दिलेला स्वाभिमानाचा वारसा आहे.
तू मोठी झाल्यावर,
तुझ्या आवाजात म्हणशील कदाचित
“माझ्या पणजीसारखी स्त्री
संपूर्ण जंगल पुरून उरली होती.”
आणि त्या दिवशी,
माझा उरही अभिमानाने
आजच्यापेक्षा जास्त भरून येईल.