“नील,” मी अलगद म्हणाले, “आपण असं रोज का भांडतो?”
तो मोबाईलवर काहीतरी स्क्रोल करत होता, नजरही न उचलता म्हणाला,
“तूच सांग, कारण तू बदलली आहेस.”
तीच वाक्य पुन्हा.
दरवेळी तसंच, दोष माझाच.
कधी काळी तो ‘आपण’ म्हणायचा, आता फक्त ‘तू’.
आमचं नातं सुरू झालं तेव्हा, प्रत्येक क्षणात कोवळं प्रेम होतं.
कॉफीचा कप, रात्रीचा चंद्र, आणि दोन जीव एकमेकात हरवलेले.
त्याच्या बोलण्यात ती शांतता होती जी मी वर्षानुवर्षं शोधत होते.
तो माझ्या डोळ्यांत पाहायचा आणि म्हणायचा,
“तू माझं घर आहेस, विभा".
तुझ्यात मला सुकून मिळतो.
हो, मी घर होते, पण हळूहळू मीच कैद बनत गेले.
सुरुवातीला त्याचं “काळजी घेणं” गोड वाटायचं.
“इतका वेळ बाहेर राहू नको,” “कोणाशी काय बोलतेस?”
“मला तुझी चिंता वाटते".
ही वाक्यं प्रेमासारखी वाटायची.
पण दिवसागणिक ती भिंत बनली.
त्याने माझे मित्र दूर केले,
माझी मोकळीक नकळत हिसकावून घेतली.
मी गप्प राहिले — कारण तो प्रेम करतो असं वाटत होतं.
आणि त्यानंतर ती भयाण संध्याकाळ माझ्या आयुष्यात आली.
~ मला नाही राहायचंय या नात्यात नील!
~ अगं पण का विभा? सगळं तर ठीक चाललंय ना आपल्यात.
~ नाही नील. काही ठीक नाहीये आपल्यात.
~ मला कळेल असं बोल विभा.
~ तू टाॅक्सिक होत चाललाय नील आणि हे समजतंय मला.
~ वेडी झालीय का विभा तू? काळजी करणं, पझेसिव्ह असणं म्हणजे टाॅक्सिक वाटतं का तुला?
~ अति काळजी आणि ओव्हर पझेसिव्ह होतोय तू. मला आता भीती वाटायला लागलीय.
~ कसली?
~ तू बाबांसारखा झालास तर! नाही नाही, त्यापेक्षा नकोच मला हे नातं.
~ मूर्ख झालीय विभा तू. तुझ्या बापासारखा नीच आणि नालायक नाहीये मी.
~ नील...
~ ओरडू नकोस विभा. तूच तर सांगितलं होतं ना तुझ्या
बापाबद्दल. त्याच्या इतका खालच्या पातळीतला नाहीये मी.
~ नाही नील. मला जाणवायला लागलंय ते. त्यादिवशी एका साध्या संशयावरून तू हात उचललास माझ्यावर.
~ ओह, कम ऑन विभा, त्यासाठी हजारदा माफी मागितली आहे मी तुझी.
~ आणि सोबत रेस्ट्रिक्शन्स ही लावलेत माझ्यावर तू. काय तर म्हणे " मला नाही आवडत तर नको ना बोलू तू त्याच्याशी".
~ मला तुझी काळजी वाटते म्हणून म्हणतो मी असं.
~ मला गुदमरायला होतंय नील आता तुझ्यासोबत, श्वास कोंडतो माझा.
~ तू माझ्या बद्दल तसा विचार करतीये म्हणून. अगं काय कमी आहे माझ्यात. शहरातला प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहे मी. एकुलता एक आहे आणि श्रीमंती पायाशी लोळण घालतीये. आणि तुला माझं साधं एवढंसं काही सहन होत नाहीये.
~ हाच तुझा ना पुरुषी अहंकार नडत आलाय तुला नील. ते काही नाही, मला नाही राहायचं आता सोबत आणि इट्स ओव्हर नाऊ.
विभा पाठमोरी वळाली आणि जायला निघाली तेवढ्यात नील ने तिला जोरात मागे खेचलं आणि भिंतीवर पुश केलं. तिचा गळा जोरात आवळू लागला.
~ सांगतोय विभा मी तुला, मला सोडून जायचा विचार ही करू नकोस. तुला सुखाने जगू देणार नाही मी.
तेवढ्यात पूर्ण ताकदीनिशी विभा ने त्याला मागे ढकललं.
~ ही टाॅक्सिसीटी नाहीये मग काय आहे नील?
रागात असलेल्या नील ने तिचा परत गळा आवळला.
~ साल्या तुम्ही पोरी...परपुरुषाच्या मिठीत जाताना काही वाटत नाही तुम्हाला. आणि हक्काच्या माणसाच्या मिठीत म्हणे जीव गुदमरतो.
त्याच्या या किळसवाण्या विचारांनी तिला गरगरून आलं, तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला न् तेवढ्यात शेजारीच सजवलेल्या टेबलवर ठेवलेली वाईन ची बाॅटल तिच्या नजरेस पडली आणि उचलून तिने ती त्याच्या डोक्यात मारली. नील ला कळेपर्यंत विभा ने फुटलेल्या बाटलीचा तुकडा नीलच्या पोटात खुपसला आणि खुपसत राहिली.
तोंडावर रक्ताचे शिंतोडे उडत राहिले हात रक्ताने बरबटला तरी ती थांबली नाही.
नंतर अचानक थांबून मोठमोठ्याने हसायला लागली.
काही क्षणांआधी असणारी क्रीमीनल लाॅयर विभा स्वतः क्रीमीनल झाली याचं हसू तिला येत होतं की तिच्या बापासारखाच एक आणखी माणूस संपवला याचं तिला हसू येत होतं, माहीत नाही.
ती फक्त वेड्यासारखी हसत राहिली.