उगवतची आजी भाग 1
लहुतटू लहुतटू फुल कोण तोडतय
पिता तोडतोय.......
मधुराणी मधुराणी पान कोण तोडतय
चाण्डाळीण तोडतेय......
गोष्ट अगदी रंगात आलेली. आम्ही पोरं आजीच्या तोंडाकडे एकटक बघत जीवाचा कान करून ऐकत होतो. राजाच्या दुष्ट लाडक्या राणीने सवतीची आवळी जावळी मुलं लहुतटू नी मधुराणी याना आपल्या दासींकरवी पळवून नेवून राजउद्यानात जिवंतपणी पुरून टाकलं. राजाने देखणेपणाला भुलून दुसरं लग्न केलन. आवडत्या राणीची कुस काय उजवली नाय. पण पहिल्या नावडत्या राणीलाच जुळी मुलं झाली. आता मुलांच्या ओढीने नावडत्या राणीच्या महालात राजाच्या खेपा वाढल्या. आता कदाचित आपल्याला मुलगा झालाच तरी सवतीच्या मुलाला लहूतटूला राज्य मिळणार म्हणून दुष्ट आवडती राणी नुसती पिचत रहायची. तिच्या दासीनी सवतीची मुलं पळवून त्याना मारून टाकायचा बेत दुष्ट राणीला सांगितला.हे काम झालं तर एक हजार सोन्याच्या मोहरा देण्याच वचन तिने दिलं. दासी संधीची वाट पहायला लागला.
राजा शिकारीसाठी बाहेर गेल्याची संधी साधून दुष्ट राणीच्या दासीनी महालाच्या सौधावर खेळणार्या नावडतीच्या मुलाना पळवून नेलं. नावडत्या राणीकडे ना दासी ना बटकी...... बिचारी नावडती राणी मुलाना सौधावर खेळायला सोडून आपली कामं उरकायची. बराच वेळ मुलांचा आवाज येत नाही म्हणताना नावडती राणी मुलांची दखल घ्यायला सौधात गेली. पण मुलं दिसेनात. तिने महालाबाहेरच्या पहारेकर्याना विचारल. पण कोणालाच काही सांगता येईना. तिने आपल्या माहेरच्या कुलदेवीला - वनराणीला साकडं घातलं. " हे वनराणी माते, माझ्या मुलांचं रक्षण तू कर. माझी मुलं सापडेपर्यंत मी अन्नपाणी घेणार नाही. "
दुष्ट राणीच्या दासीनी राजउद्यानात एका पुष्प वाटिकेच्या दोन बाजूना दोन खड्डे खणून त्यात लहुतटू नी मधुराणीला ढकलून खड्ड्यात माती लोटून खड्डे बुजवून टाकले. ही आनंदची वार्ता त्यानी दुष्ट राणीला सांगून तिच्याकडे बक्षिसाची मागणी केली. तिने कोषाध्यक्षाना बोलावून एक हजार सुवर्णमुद्रा मागवून घेवून दासीना बक्षिस दिल्या. आपल्या महालात अत्तराचे दिवे दिवे लावून रोषणाई करायचं फर्मान काढलं. तिकडे नावडत्या राणीची प्रार्थना ऐकल्यावर वनराणीने उद्यानातल्या लता वृक्षांना लहुतटूना जिवंत ठेवायची आज्ञा दिली. खड्ड्यात मुलं सुरक्षित राहतील अशा कपारी तयार झाल्या. लता वृक्षांची मुळं लहुतटूना प्राणवायु नी अन्नपाणी पुरवायला लागली.
रात्री नावडत्या राणीला स्वप्न दृष्टान्त झाला. वनराणी म्हणाली," मुली तू काळजी करू नको. तुझी मुलं सुरक्षीत आहेत. आठवडाभरात ती तुला भेटतील." शिकारीला गेलेला राजा दोन दिवसानी परत आला. मुलं नाहिशी झाल्याचं वृत्त कळताच त्याच्या काळजात चर्र झालं. आवडत्या राणीच्या हट्टापायी आपण नावडतीकडे दुर्लक्ष केल्याचा त्याला पश्चात्ताप झाला. मुलांच्या शोधार्थ त्याने आठ दिशाना सैनिक रवाना केले. चार दिवस सर्वत्र शोध घेवूनही मुल सापडली नाहीत. पाचवे दिवशी एक अद्भूत घडलं. लहुतटू नी मधुराणीला ना पुरण्यात आलं होत त्या जागेवर दोन दिव्य रोप उगवली नी त्यांच्यावर सप्त रंगी फुल उमलली. फुलं उमलल्यावर त्यांचा मोहक गंध दशदिशाना पसरू लागला. आवडती राणी त्या गंधाने मोहूनच गेली आणि तिने आपल्या दासीना उद्यानातून ही मोहक वासाची फुलं तोडून आणायला पाठवल.
दासी वासाच्या रोखाने दिव्य रोपट्यांजवळ गेल्या नी त्यानी फुलं खुडायला हात लावताच रोपांचा मुळातून शब्द उमटले, " खबरदार.... खबरदार.... ही फुलं खुडण्याचा अधिकार फक्त ज्येष्ट राणी अन् महाराजानाच आहे.... तुम्ही स्पर्श कराल तर यांच्या रक्षणार्थ असलेला भुजंग तुम्हाला दंश करील.... चालत्या व्हा इथून. " दासी घाबरून पळत सुटल्या. दरम्याने ही वार्ता षटकर्णी होवून सगळा राजपरिवार आणि रक्षक उद्यानाकडे निघाले. महाराज लहूतटूच्या खड्ड्यावर असलेल्या रोपाच्या दिशेने पुढे येवून फुल खुडू लागताच हवेतून आवाज आला. “लहुतटू लहुतटू फुल कोण तोडतं? ” त्यावर उत्तरादाखल शब्द आले, “ पिता तोडतो” . राजा मागे झाला नी दुसऱ्या रोपाकडे जावून फुल खुडायला लागताच हवेत शब्द उमटले, “मधुराणी मधुराणी फुल कोण तोडतय्?” त्यावर उत्तरादाखल शब्द आले , “पिता तोडतोय्....”
मग नावडती राणी, लहूतटूची खरी आई फुल खुडायला पुढे आली. तिने एका रोपाला मायेने स्पर्श केल्यावर शब्द उमटले,“ मधुराणी मधुराणी फुल कोण तोडतय्?” त्यावर उत्तरादाखल शब्द आले , “माता तोडतोय्....”
मग राजाची आवडती दुष्ट राणी पुढे झाली. तिने एका रोपाला स्पर्श करण्यापूर्वीच शब्द उमटले,“ मधुराणी मधुराणी ही कोण आली.... ही कोण आली ?” त्यावर उत्तर आलं, “ लहुतटू लहुतटू सावध हो रे चाण्डाळीण आली.... ”त्याचवेळी पुष्पवाटिकेच्या बाजूने सर्पाचा फुत्कार ऐकू आला. दुष्ट राणी घाबरून माघारी वळत असता आवाज आला, “ लहूतटू लहूतटू बघ काय झालं बघ काय झालं....... ” त्यावर उत्तर आलं, “ मधुराणी मधुराणी चाण्डाळीण भ्याली, चाण्डाळीण भ्याली...” आता नावडत्या राणीने आपल्या मुलांचा आवाज ओळखला नी दु:खावेग अनावर होवून ती चक्कर येवून खाली कोसळली. (क्रमश:)