A fragile relationship in Marathi Love Stories by jagdish books and stories PDF | काचेचं नातं...

The Author
Featured Books
Categories
Share

काचेचं नातं...

                                     



       

                                    रात्रभर अवनीला झोप आली नव्हती. बेडवरच्या उशीत तिने डोकं खुपसून ठेवलं होतं. खिडकीबाहेर वाऱ्याची झुळूक येत होती. दूर कुणाचा तरी पियानोचा आवाज ऐकू येत होता…ती हलकेच फोनकडे पाहते. तेच नाव आर्यन, व्हॉट्सअॅपवर दिसतं. पाच वर्षांनंतर अचानक आलेलं लग्नाचं निमंत्रणचा मेसेज.तिच्या हृदयात काहीतरी मोडलं… काचेसारखं.“मी का इतका उशीरा केला?” 


                                     ती पाच वर्षांनी परतलेली होती.  वळणाची पायवाट आजही तशीच होती  दोन्ही बाजूंनी गुलमोहराचे झाडं आणि मध्ये एका जुनाट घराकडे जाणारा अरुंद रस्ता. त्या घराच्या गच्चीत कधीकाळी आर्यन आणि अवनी बसत असत. तासन्‌तास गप्पा, थोडं हास्य, थोडे भांडण… आणि खूप प्रेम. 

                                     आज मात्र त्या गच्चीकडे पाहताना अवनीच्या डोळ्यात धुकं दाटलं होतं. हातातली पिशवी सांभाळत ती घराच्या दिशेने चालत होती, प्रत्येक पाऊल टाकताना मनात तोच विचार  “का आले मी? काही बदलणार आहे का आता?”

                           घराचं दार उघडलं. आर्यन समोर उभा होता.चेहरा थोडा बदललेला, डोळ्यांत थकवा, पण अजूनही तीच ओळख… तीच जाणीव.
“अवनी?” त्याचा आवाज हळूसा.
“आर्यन… मी… मी सहज…” ती थांबली. शब्द अडकले.
कधीकाळी ते दोघं परिपूर्ण वाटत होते. एकमेकांवर प्रेम करणारे, स्वप्नं पाहणारे, पण स्वप्नांपेक्षा वास्तव मोठं निघालं.
अवनीला मोठ्या शहरात नोकरी लागली. तिचं दिवसाचं 12 ते 14 तासांचं काम, नवीन जबाबदाऱ्या, नवी माणसं.
आर्यन देखील लहानशा गावात स्टार्टअप उभारण्यात गुंतलेला.आरंभी दोघं धडपडत तरी एकमेकांसाठी वेळ काढत. पण हळूहळू फोन कमी होत गेले. चॅट रिप्लायला तासन-तास लागायला लागले. आर्यनच्या मनात विचारांचे वादळ होतं होत.
“तिला माझी गरज आहे का अजून?”
अवनीच्या मनातही असंच “तो समजून घेईल का मला?”
एके दिवशी आर्यनने अवनीनला कॉल केला मात्र अवनीने आर्यनचा कॉल उचलला नाही. त्याच रात्री आर्यनने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली, ती आपल्या ऑफिसच्या टीमसोबत पार्टी करत होती आणि अवनीचा सहकारी राहुल अगदी तिच्या जवळ उभा होता, अवनीच्या खांद्याचा स्पर्श त्याच्या छातीला लागलेला होता. ती पोस्ट पाहून आर्यनचा राग अनावर झाला, त्या रात्री दोघांचं मोठं भांडण झालं. शब्दांचे तुकडे झाले… आणि मनाच्या काचांवर ओरखडे उमटले.
“तुला पार्टी साठी वेळ आहे, राहुलबरोबर घालवायला वेळ आहे, पण माझ्यासाठी नाही?”
“आर्यन, राहुल फक्त ऑफिसमधला सहकारी आहे. का इतका कमी विश्वास आहे तुझा माझ्यावर?”
"तू आता वेगळ्या जगाची झाली आहेस… आणि मी फक्त एक जुना अध्याय.”
“आर्यन… असं नको बोलूस…” ती त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती मात्र आर्यन काही एकण्याच्या मनस्थिती नव्हता, तो तिला नको ते बोलत होता. शेवटी तिचा ही संयमचा बांध फुटला. तिने रागाच्या भरात कॉल कट केला. फोनवर कट झाल्याचा आवाज… आणि नंतर आयुष्यभर टिकणारी शांतता.

                               तिच्या हातात एक काचेचा तुकडा होता एक जुनी आठवण. आर्यनच्या घरातल्या शोकेसमधली काचेची बाहुली तुटल्यावर उचललेली..., जपून ठेवलेली एक आठवण.
“ही बाहुली अजूनही इथेच आहे?” अवनीने विचारलं.
“हो. जुळवली, पण तडे गेले आहेत.” आर्यन केविलवाणा हसला. तेव्हा तिच्या हातातला काचेचा तुकडा खाली पडला, पण त्याच भान तिला नव्हतं
“आपलं नातंही असंच होतं ना?
तुटलं, पण आपल्याला ते जुळवता आलं नाही.” ती म्हणाली.
“कधी-कधी वेळ निघून गेलेली असते… तेव्हा प्रेम जरी जिवंत असेल, तरी नातं शिल्लक राहत नाही.” आर्यनचा आवाज ओलसर झाला. अवनी दरवाज्याकडे निघाली तेव्हा
पावलांखाली काचेचा तुकडा तुटल्याचा आवाज झाला.
तिने वाकून पाहिलं – तो तोच काच होता...आठवण म्हणून जपून ठेवलेला. तो उचलताच तिच्या डोळ्यातून पाणी गळलं.
“कधी कधी नात्याला चिकटवायला गोंद नसतो, फक्त अश्रू असतात… आणि अश्रूंनी काचेचे तुकडे चिकटत नाहीत.” ती पुटपुटली. आर्यन तिच्याकडे पाहत राहिला –त्याचे शब्दही निघाले नाहीत. अवनीने शेवटचं पाहिलं, हलकं हसली – अश्रू लपवत, खिन्न आवाजात म्हणाली
“तुला आणि सायलीला खूप शुभेच्छा…”
दरवाजा बंद झाला. खिडकीबाहेर पावसाच्या थेंबांनी काचेवर आपटण्याचा आवाज येत होता. आणि मनाच्या आत… दोन भूतकाळाचे जीव काचेच्या तुकड्यांवरून वेगळ्या वाटांवर निघून गेले होते.

..✍️ जगदीश ❤️
©® All Right Reserved.