"बघ, पुन्हा तोच मुर्खपणा करायला जातोयस."
"नाही. अरे खरंच काही वेगळं होतं हे.
"हे गेल्यावेळीही तू म्हणाला होतास."
"पण यावेळी . . ."
"यावेळी काय?"
"जाऊ दे सोड."
"मीही तेच बोलतोय. जाऊ दे. सोड."
दोन सेकंद शांत राहून. तो पुढे म्हणाला
"एकदा बोलायला मिळालं असतं तर . . ."
"हां . . . तर काय? आणि काय बोलणार होतास?"
"नको राहू दे."
"तेच बेस्ट आहे तुझ्यासाठी."
"जसं मला काही हे माहितच नाही ना!"
"माहिती आहे ना तुला. मग कशाला विचार करतोयस?"
"ऐक ना . . ."
"आता काय राहिलंय?"
"तुला क्वांटम फिजिक्सची एक थेअरी माहितीय का?"
"तू काय बरळतोस हेच समजत नाहीये."
तो हसायला लागला.
"तरीपण बोल ना! माहितीये ना तुला ‘ती’ थेअरी."
"म्हणजे! अरे तुला माहितीये म्हणजे मलाही माहिती असणारंच. "
"हा, मग ती थेअरी जशी आहे. तसं हे वाटतंय."
"तुला नेमकं काय बोलायचं आहे? सायन्स आणि आयुष्य सारखंच आहे?"
"हां."
"अरे पण ‘ती’ आणि ती थेअरी दोन्ही इमॅजनरी आहेत. समजतंय का?"
"म्हणून तर!"
"काय म्हणून तर?"
"थेअरी कशी आहे? की एका मांजराला एका बाॅक्समध्ये रेडियोॲक्टीव्ह कंपोनन्ट सोबत ठेवलं तर फिजिक्सनुसार ती मांजर काही वेळाने मरेल पण क्वांटम फिजिक्सनुसार जोपर्यंत तो बाॅक्स उघडून बघत नाही तोपर्यंत त्या मांजराच्या जगण्या-मरण्याच्या दोन्ही रिॲलिटी एकाचवेळी पॅरलल चालू आहेत. म्हणजे जोपर्यंत तो बाॅक्स उघडला जात नाही, आपण ते फिजिकली बघत नाही, तोपर्यंत ती मांजर जिवंतही आहे आणि मेलेलीही. म्हणजेच दोन शक्यता असतात. आयुष्याला जर क्वांटम फिजिक्सनुसार बघितलं तर, एखादी गोष्ट आपणं जाऊन बघत नाही – किंवा करत नाही – तोपर्यंत त्याच्या दोन शक्यता उरतात. बरोबर ना?"
"अरे पण त्या वेडपट सायंटीस्ट ‘श्राॅडिंगर’ने हे सिध्द कुठं केलयं? सगळं इमॅजनरी आहे. आणि तसंही या अशा थेअरीज ऐकवून तू कन्विन्स करायला बघतं असशील तर तू मुर्ख आहेस!"
"पण बघ ना एकदा विचार करून."
"कसला विचार करायचा आहे आता?"
"हेच की ती थेअरी इमॅजनरी जरी असली तरी, वाटते तर खरी!"
"ए मुर्खा जरा पुस्तकांच्या बाहेर ये, रिॲलिटीत ये. हे जे तुझ्या डोक्यात पुन्हा स्वतःला जाणूनबुजून अंधारात ढकलायचे विचार येतात ना, ते थांबव आधी. तुला तो अंधार हवाहवासा वाटायला लागलाय का? मी नेहमी सांगतो पण तू मानत नाहीस. एवढ्या दिवसात शांत राहून तू बोअर झालास. तुला पुन्हा जखमा हव्या झाल्यात. तुला पुन्हा, तुझ्या कमतरता दाखवून, तू का लायक नाहीस हे कोणाकडूनतरी ऐकायचं आहे. है ना?"
"नाही असं काही नाहीये."
"तू चुप रे! तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो मी."
"प्रत्येकवेळी तुला रिअॅलिटी चेक द्यायचाच असतो का?"
"का नको देऊ? तुझ्या मुर्खपणाला मी सांभाळून घेतो. तो त्रास तुझ्यासोबत मलाही होतो. आणि किती वेळा हेच करायचं रे? अजून अक्कल आली नाही का तुला?"
"मला एक सांग ती थेअरी तुला कशी वाटते?"
"आलास पुन्हा तिथेच? अरे मी काय बोलतोय ऐकतोस का बहिऱ्या?"
दिर्घ श्वास घेत तो म्हणाला.
"हो."
"मला माहिती होतं की तुलाही माझ्यासारखंच वाटत असेल."
त्याच हसणं बघून तो त्याला समजावत म्हणाला.
"याच्याने सिध्द काय करायचंय तुला?"
"सिध्द . . . "थोडा वेळ घेत तो पुढे म्हणाला, "काही नाही. बस हेच कि मी विचारायला हवं का तिला?"
"काय विचारायचं आहे पण? आणि का? कशासाठी? कसं विचारणार? काय ओळख काय तुझी? लग्नात दिसली एवढीच. अरे दोन दिवसांची नजरानजर, तुझ्याबाजूला येऊन तिचं उभं राहणं, डिजेच्या आवाजात ओठ अगदी गालाजवळ आणून तुला गाणं बदलायला सांगणं म्हणजे तुला वाटल ती पटली. है ना! येडा साला!"
हे बोलून तो हसायला लागला. हसून झाल्यावर तो त्याला म्हणाला
"माहितीय मला तू कुठे अडकला आहेस. ती छान दिसत होती म्हणून तू अडकलास का – नाही! तिने नाचताना तुझ्या कानाजवळ ओठ आणत तुला गाणं बदलायला सांगितलं तेव्हा नाचत असताना आलेल्या घामाचा स्मेल आणि तिच्या केसाची एक बट तुझ्या गालावर स्पर्श करत होती म्हणून अडकलास का – नाही! ती लग्नात लगबगीने इथून तिथे फिरत असताना सतत तू समोर आहेस की नाही बघत राहत होती, इथे तू अडकलास का – नाही! अचानक ती कुठेच दिसेनाशी झाली आणि तू सगळीकडे तिला शोधत होतास तेव्हा ती तुझ्या बाजूलाच उभी राहून हसत होती म्हणून तू अडकलास का तिच्यात – नाही!"
"मग कुठे अडकलो मी?"
"जेव्हा लग्नाच्या वरातीनंतर तिच्या घरी तू तुझी बॅग आणायला गेलास तेव्हा. तू समोर बसलेलास. तुला माहित होतं की हे आता सगळं इथेच थांबणार आहे. तुला जाणवत होतं की बस हे सगळं इथपर्यंतच, म्हणून तू स्वतःला रोखत होतास. तिला बघायचं टाळत होतास. म्हणून तू मोबाईल मधली नजर हटवायला मागत नव्हतास; पण तेवढ्यात तिने कुणाशीतरी बोलता बोलता तुझ्या नावाचा उल्लेख – मुद्दाम फक्त तुला समजावं आणि कुणाला समजू नये याची काळजी घेत – केला. तुझी आणि तिची ती जेमतेम दहा सेकंदाची नजरानजर . . . तिथे तू अडकलास – खरयं ना? ते डोळे त्या दहा सेकंदांमध्ये काही बोलायला बघत होते; पण ते तुला तेव्हाही समजलं नव्हतं आणि आताही समजत नाहीये."
"हम्म . . ."
"तू लाख लपवशील सगळ्यांपासून पण, मी बोललो ना, तुझ्यापेक्षा जास्त मी तुला ओळखतो. बघ ती एक काॅमन मोमेंट होती. झालं. गेला तो क्षण. तू जास्त विचार नको करूस."
तो काही बोलतच होता की त्याने अडवलं.
"मला माहितीय तुला काय बोलायच आहे ते. हेच ना? की जसा तू विचार करतोस तसा तीही करत असेल का – है ना!"
"तो पुन्हा शांतच राहिला."
"हे होतंच राहतं यार. पण तिथेच थांबणं बरोबर नाही. तुलाही माहितीय याची सुरुवात आणि याचा शेवट कसा होणार! तेच सोशल मिडीयावर तिला शोधणं, तिला मेसेज करणं, बोलणं, तुझ्या थुकरट जोक्सवर तिच हसणं, मग भेटायचे प्लॅन, पहिल्या भेटीची भिती, मग पुन्हा भेटण्याची आतुरता, मग हेच काही महिने चालेल . . . मग कसल्याशा कारणावरून भांडणं, रुसणं, मनवणं, पुन्हा भांडणं आणि शेवट करणं. हेच होत आलयं ना? हेच करायचंय पुन्हा! तसंही हे खूप पुढचं आहे पण खरंतर तुला काय वाटतं याने फरक पडतच नाही. तिला काय वाटतं याने फरक पडतो. तुला कसं समजणार ते? तुला एक टक्का तरी वाटत का ती तुला शोधत येईल? तिने तुझं नाव घेतलं कुणाशी बोलताना म्हणजे ते तुझ्याचसाठी होतं असं नाही. ते नाव एवढं काॅमन आहे की उल्लेख होऊ शकतो पण तुला फक्त तिच्या ओठांवर अचानक आलेलं तुझं नाव ऐकून हे वाटतंय तर मग मला भिती आहे की निराशाच पदरी पडेल."
"मला हेच वाटतं. मलाही ते सगळ काॅमनच वाटतयं. खरचं मला पुन्हा हे सगळं नकोय! मीही थकलोय आता, कंटाळलोय! फक्त . . ."
"फक्त काय?"
"फक्त तिला एकदा विचारायच होतं की जे मला तिच्या डोळ्यांत त्या दहासेकंदामध्ये जाणवलं. एक प्रश्न जो मला वाटतयं की तिला विचारायला हवा होता."
"हेच ना की ती तुझ्याजवळ का बघत होती?"
"नाही! तिला विचारायचं होत की तुझं काही हरवलं आहे का? त्या दहा सेकंदात तिच्या डोळ्यांमध्ये सुरुवातीचे दोन सेकंद माझ्या नावाच्या उल्लेखाचं आश्चर्य होतं; पण पुढचे आठ सेकंद असं वाटल की ते डोळे काही हरवलेलं शोधतायेत. काहीतरी भूतकाळात हातून सुटलयं. काही तिच्या हातून वाळूसारखं सरकत निसटलयं. आणि ते ती तसचं बाहेर कुठे सापडतंय का शोधत तर नाहीये ना?"
"हम्म . . . मी समजू शकतो. मलाही ते जाणवलं. पण हीच वेळ आहे. तू तिचा शोध घेशीलही, तू तिला हे विचारशीलही, पण नंतर काय? त्यापेक्षा ती श्राॅडिंगर थिअरी ठिक आहे. क्वांटम फिजिक्सनुसार तुझं उत्तर त्या बाॅक्समध्ये बंद आहे. बाॅक्स उघडलास तर दोन शक्यतांपैकी एक शक्यता तुला तुझं उत्तर म्हणून मिळेल. कदाचित हो किंवा असं काहीच नाही. मग पुढे काय?"
"माहित नाही."
"मग तो तुझ्या आयुष्यातला ‘श्राॅडिंगर थिअरी बाॅक्स’ असाच राहू दे. कदाचित उत्तर तुला हवं असेल तसं मिळालं किंवा मिळालं नाही तर . . . या ‘तर’वर रहा आणि सोडून दे. काही प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत हेच चांगल असतं. तो बंद बाॅक्स तसाच राहिला तर निदान तुझ्या मनातली शक्यता योग्य होऊ शकत होती या भ्रमाचं सुख निदान तुझ्याजवळ राहील."
तेवढ्यात दरवाजावर टकटक त्याच्या कानी आली. त्याने लगेच खुर्चीतून उठत दरवाजा उघडला.
"अरे किती वेळ दार वाजवतोय? तू ऑर्डर केलेला बाॅक्स आलाय. कॅश पेमेंट करणार आहेस ना? चल तो मुलगा थांबलाय."
हे बोलून दादाने बेडरूममध्ये एकदा डोकावून बघितलं. टेबलावर पुस्तकांचा पसारा होता, खिडक्या बंद असल्याने रूममध्ये अंधार होता पण मेकअपच्या आरशासमोरचा दिवा चालू असल्याने त्या समोरील रिकामी खुर्ची तेवढी दिसत होती. त्याने एकदा त्याच्याकडे बघितलं आणि ‘ये खाली’ म्हणत तो निघाला.
बेडरूमचा दरवाजा बंद करण्याआधी त्याने एकदा त्या मेकअप मिररकडे बघितल आणि तो जिना उतरायला लागला.
कॅश देऊन त्याने तो ऑर्डर केलेला बाॅक्स हातात घेतला. तो पुन्हा आत आला.
बाॅक्स ठेबलावर ठेवत तो बाॅक्स उघडायचा की नाही या विचारात पडला. कारण, आता तो बाॅक्सही त्याला त्या श्राॅडिंगर बाॅक्ससारखाच वाटत होता.