भाग १
चित्राचा अपघात.
सकाळचे ११ वाजले असतील. शरद च्या ऑफिस मध्ये कामाला सुरवात होऊन आता फूल swing मध्ये चालू होतं. शरद परचेस ऑफिसर होता आणि रोजच्या रिपोर्टिंगची सकाळच्या मीटिंगची तयारी सुरू होती. अशातच त्याचा मोबाइल वाजला. सकाळच्या घाईच्या वेळेला कोण फोन करतय म्हणून कापाळाला आठ्या घालत फोन उचलला. फोन वर “ चित्रा ” अस लिहून आलं होतं. आत्ता हिला काय झालं सकाळी सकाळी? बायको नावाच्या प्राण्यांचं काही खरं नाही. अस पुटपुटतच फोन उचलला.
“काय ग? मी जाम बिझी आहे. काय आहे ते पटकन सांग. पाल्हाळ लावू नकोस.” – शरद.
“साहेब मी पोलिस कॉनस्टेबल शीतोळे बोलतोय. या बाईंना अपघात झाला आहे आणि त्यांना आम्ही हॉस्पिटलला घेऊन चाललो आहोत. तुमचं यांच्याशी काय नातं आहे?” – पोलिस
“माझी बायको आहे.” – शरद.
“मग ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचा. मॅटर सिरियस आहे.” – पोलिस.
शरदच्या हातातून फोन गळून पडला. तो थरथरत तसाच उभा होता मग मटकन खाली बसला. स्टाफ त्यांच्या भोवती गोळा झाला. काही तरी गंभीर गोष्ट घडली आहे यांचा अंदाज सर्वांना आलाच होता. कोणीतरी पटकन पाण्याचा ग्लास त्याला दिला. पाणी प्यायल्यावर शरदला जरा हुशारी आली.
“काय झालं सर?” – सहकारी.
“बायकोला अॅक्सिडेंट झाला आहे हॉस्पिटलला नेलं आहे. सिरियस आहे अस पोलिस म्हणत होता.” – शरद.
“बापरे! ताबडतोब निघायला हवं. मी साहेबांना सांगून येतो.” केळकर म्हणाले.
तितक्यात साहेबच बाहेर आले. त्यांना कोणीतरी सर्व सांगितलं.
“ताबडतोब निघा. केळकर तुम्ही, आणि देशमुख यांच्या बरोबर जा. काही मदत लागली तर लगेच फोन करा. कॅशियर कडून १०००० रुपये उचला मी त्याला सांगतो. निघा तुम्ही लगेच.” - साहेब म्हणाले.
हॉस्पिटलला गेल्यावर कळलं की चित्राच्या डोक्याला मार लागला आहे. हात आणि पाय पण तुटले आहेत. रक्तस्त्राव पण खूप झाला आहे आणि आत्ता ती ऑपरेशन टेबल वर आहे. नर्सला विचारलं तर तिने सांगितलं की,
“इथे आणलं तेंव्हा पेशंट बेशुद्ध होती. इमर्जन्सी ऑपरेशन चालू आहे. तुम्ही रीसेप्शन ला जावून पैसे आणि फॉर्म भरून या.” – नर्स
हे सगळं ऐकल्यावर शरद च्या पायातली शक्तिच निघून गेली. तो असहाय्य होऊन खुर्चीवर बसला. केळकर रीसेप्शन ला गेले. जवळ देशमुख होते ते त्याला धीर देत होते. त्यांनीच शरदच्या आई वडिलांना आणि भावाला कळवलं. तासाभराने डॉक्टर बाहेर आले. म्हणाले की,
“चित्रा पेशंट चे नातेवाईक कोण आहेत?” – डॉक्टर.
केळकर आणि देशमुख समोर आले. तोपर्यन्त अजून दोघे जण ऑफिस मधून आले होते.
“आम्ही आहोत.” – देशमुख.
“ठीक. पेशंटला खूप रक्त स्त्राव झाला आहे त्यामुळे, रक्त चढवायला आम्ही सुरवात केली आहे. दोन बाटल्या रक्त रीप्लेस करावं लागणार आहे. तुमच्यापैकी कोणी तयार आहे का? नाही तर कोणाला तरी बोलावून घ्या.” – डॉक्टर.
जे दोघे जण नंतर आले होते, ते म्हणाले,
“आम्ही तरुण आहोत, आम्ही देऊ रक्त.” – साळवे. (दोघांपैकी एक)
“ठीक मग पहिल्या मजल्यावर ब्लड बँक आहे. तुम्ही ब्लड बँकेत जा. आणि रक्त दिल्याची पावती रीसेप्शन मधे द्या. आणि तुमच्या फाइलला लावायला सांगा.” – डॉक्टर.
साळवे आणि वाईकर रक्त देऊन आले. पावती रीसेप्शन वर जमा केली.
ऑपरेशन रूम वर अजून लाल दिवा चालूच होता. आता फक्त वाट बघायची होती. तासाभराने डॉक्टर बाहेर आले. लाल दिवा बंद झाला होता. देशमुख केळकर आणि शरद धावले.
“डॉक्टर नेमकं काय झालं आहे? हे सांगाल का?” – देशमुख.
“हे बघा, फार जबरदस्त अपघात झाला आहे. दोन्ही पाय, हात तुटले आहेत. डोक्याला मार लागला आहे मानेला मोठी जखम झाली आहे. खूप रक्त स्त्राव झाला आहे. पेशंट ची कंडिशन सिरियस आहे. ऑपरेशन झालं, पण ४८ तास काही सांगता येणार नाही. सध्या पेशंट व्हेंटीलेटर वर आहे. तुम्ही जवळच्या लोकांना बोलावून घ्या.” – डॉक्टर.
देशमुखांनीच मग चित्राच्या आई, वडिलांना आणि भावाला पण कळवलं. चित्राची बहीण लगेच यायला निघाली. संध्याकाळ पर्यन्त सर्वच जण येऊन पोहोचले. चित्राला आता आयसीयू मधे शिफ्ट केलं होतं.
“डॉक्टर आम्हाला तिला पाहता येईल का?” चित्राच्या आईने विचारले.
“हो पण दोन मिनिटांच्यावर थांबता येणार नाही. पेशंटच्या जवळ जाऊ नका. दुरूनच बघा. बोलण्याचा प्रश्नच नाही.” डॉक्टर म्हणाले.
मग सर्व जणांनी आत मधे जाऊन चित्राला बघून घेतलं. व्हेंटिललेटर वर असलेली चित्रा बघून सर्वांनाच भडभडून आलं. नेहमीची हसरी आणि बडबडी चित्रा आज मरणासन्न अवस्थेत होती.
सगळे ICU च्या बाहेरच होते. अचानक डॉक्टरांची धावपळ चाललेली दिसली. ICU मध्ये ८ पेशंट होते नेमकी कोणासाठी धावपळ चालली आहे ते कळायला मार्ग नव्हता. कोणी बोलायला पण तयार नव्हतं. चिंताग्रस्त चेहऱ्यांनी सगळे गप्प बसले होते. अर्ध्या तासाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की “आम्ही आमचे सर्व प्रयत्न केले, पण तुमच्या बायकोला वाचवू शकलो नाही. पेशंटची परिस्थिती खूपच वाईट होती.” डॉक्टर म्हणाले आणि ते चालले गेले.
शरदच्या डोक्यावर अभाळच कोसळलं. सगळे त्याला आपापल्या परीने धीर देण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याच्या डोक्यात काहीच शिरत नव्हतं.
एखाद्या यंत्रा प्रमाणे शून्य मनाने शरदनी चित्राचे दिवस केले. पिंड दानांच्या दिवशी कावळे घिरट्या घालत होते पण शिवत नव्हते. गुरुजी म्हणाले की शरदराव कोणती एखादी इच्छा राहिली असेल तर पूर्ण करीन अस म्हणा. शरद घोटाळ्यात पडला. जेमतेम २ वर्ष झाली लग्नाला. काय काय स्वप्न रंगवली असतील पण ती सगळीच अपूर्ण राहिलीत आता. मला कसं कळणार? शरद समोर आला आणि म्हणाला
मी तुझी सर्व स्वप्न पूर्ण करीन.
कावळे थोडे जवळ आले पण पिंडाला शीवायचं नाव नाही. गुरुजी म्हणाले अजून काही बोला. काही वचन दिलं असेल तर ते पूर्ण करीन अस म्हणा.
मी दिलेली आणि न दिलेली पण सर्व वचनं पूर्ण करीन अस शरद म्हणाला. आणि काय आश्चर्य कावळ्यांची एकदम झुबडच उडाली आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
तेरवी झाली आणि सगळे आपापल्या घरी पांगले. शरद एकटाच घरी. त्या दिवशी रात्री त्याला बराच वेळ झोप आली नाही. केंव्हा तरी उशिरा डोळा लागला. त्यामुळे उशीराच उठला. मग त्या दिवशी जेवणाच्या डब्यांची सोय आणि इतर गोष्टी ज्या चित्रा सगळं सांभाळायची त्या करून टाकल्या. आता दुसऱ्या दिवसापासून ऑफिस.
ऑफिस सुरू झालं. शरदचं अर्थातच कशातच लक्ष नव्हतं. दिवसभरात त्याच्याकडून काहीच काम झालं नाही. संध्याकाळी घरी आल्यावर आणखीनच एकटं एकटं वाटायला लागलं. वेळ जाता जाईना. डबा आल्यावर त्या डब्यातले थंडगार बेचव अन्न घशाखाली उतरेना कसे बसे दोन घास खाऊन उठला. रात्री डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी तसंच भरा भरा आटपून ऑफिस ला गेला.
ऑफिस मध्येही काही वेगळं नव्हतच. कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं.
सहकारी चांगले होते म्हणून सगळं सांभाळून घेत होते. पण अस किती दिवस चालणार? जवळ जवळ एक महिना उलटून गेला तरी परिस्थितीत फरक पडत नव्हता. सर्व सहकारी समजावून सांगून थकले. कामाची फारच खोटी व्हायला लागली होती. शेवटी साहेबांनी शरदला बोलावलं म्हणाले
“कुलकर्णी, माणसाला आयुष्यात वेग वेगळ्या संकटांना सामोरं जावच लागतं. पण जसजसा काळ जातो तशी माणसं सावरतात. तुम्ही अजून त्यात अडकला आहात हे बरोबर नाही. मलाही वरच्या लोकांना उत्तरं द्यावी लागतात. तुम्ही जर आता कामाला सुरवात केली नाही तर माझाही नाईलाज होईल.” – साहेब.
त्या दिवशी संध्याकाळी शरद ऑफिस मधून विमनस्क स्थितीतच घरी आला. मेंदूला झिणझिण्यां आल्या होत्या. कुलूप उघडून आत आला. सोफ्यावर चित्रा बसली होती. शरद नी पाहिलं आणि त्याला भोवळच आली. तोंडातून फक्त भू भू भू एवढंच निघत होतं. खाली पडलेल्या शरदला चित्रांनी उचलून सोफ्यावर झोपवलं, तोंडावर पाणी मारलं. शरदनी डोळे उघडले आणि चित्राला बघितलं आणि पुन्हा भूत भूत करत बेशुद्ध झाला. पांच मिनिटांनी डोळे उघडले पुन्हा चित्रा समोर. त्याला कळेना की हे काय चाललंय, आज पर्यन्त तो भूता खेता च्या नुसत्या गोष्टीच ऐकत होता, पण आता प्रत्यक्ष चित्राचं भूतच समोर बसलेलं. काय करांव?
क्रमश:--
दिलीप भिडे