Indravancha Shaap - 2 in English Fiction Stories by Vinayak Kumbhar books and stories PDF | इंद्रवनचा शाप - 2

Featured Books
Categories
Share

इंद्रवनचा शाप - 2

Chapter 2- काळ्या लाटांचे संकेत

दरबारात म्हाताऱ्याचे शब्द अजूनही घुमत होते.

“समुद्र पिशाच…”

काही सरदार उपहासाने हसले.
“वेड्या म्हाताऱ्याचं पिसाटपणं! समुद्रावर पिशाच काय फिरणार?”

पण राजा विरधवल मात्र स्थिर बसला. त्याच्या डोळ्यांत गंभीरतेची झलक होती.
“विनोद करण्याची ही वेळ नाही,” तो म्हणाला. “जेव्हा व्यापाऱ्यांची जहाजं परत येत नाहीत, गावं रिकामी होतात, तेव्हा शंका दूर करणं हाच उपाय आहे.”

त्याने सेनापती रणभीमकडे नजर वळवली.
“तू दक्षिण किनाऱ्याकडे जा. सत्य घेऊन परत ये. आपल्याला अंधश्रद्धा नको, पुरावा हवा.”

रणभीम उठून वंदन करतो.
“आज्ञा आहे, महाराज.”

---

पहाटे रणभीम दहा सैनिकांसह दक्षिणेकडे निघाला.
संपूर्ण मार्ग शांत होता. पण गावाजवळ पोचल्यावर एक अनैसर्गिक शून्यता जाणवली.
घरं मोडकळीला आलेली, काहींच्या दारांवर मीठासारखी पांढरी थर जमलेली.
पायाखाली वाळूत मोठमोठे ठसे होते, जणू एखाद्या विशाल प्राण्याने चालून गेल्यासारखे.

एका तरुण सैनिकाने कुजबुज केली,
“सर… हे पायाचे ठसे नाहीत. हे काहीतरी वेगळंच आहे.”

रणभीम खाली वाकून काळजीपूर्वक पाहतो.
ठशात जाड नखांसारख्या खूणा होत्या.
त्याने तलवार बाहेर काढली आणि गंभीर आवाजात म्हणाला,
“हे प्राणी आपल्याला माहित नाहीत. पण भीती दाखवून पळवणं हा त्यांचा उद्देश असेल. आपण घाबरायचं नाही.”

त्यांना एका जळालेल्या होडीत अर्धवट फाटलेला व्यापाऱ्याचा झेंडा मिळाला.
तो पाहून रणभीम कुजबुजला,
“म्हणजे जहाजं इथून गेली आहेत. मग ती कुठे हरवली?”

---

दरम्यान राजवाड्यात, राजमाता जाहन्वी राजग्रंथालयात जुनी हस्तलिखितं चाळत होती.
तिला एका ग्रंथात पान सापडलं, ज्यावर काळसर शाईने लिहिलं होतं –

“जेव्हा समुद्र काळ्या धुक्याने झाकतो, तेव्हा लाल डोळ्यांचे राक्षस उगवतात.
ते माणसांना समुद्राच्या तळाशी ओढून नेतात, आणि परत पाठवतात त्यांच्या सावल्या.”

जाहन्वीच्या अंगावर काटा आला.
“हे केवळ कथा नाही…” ती मनाशी म्हणाली.
“रणभीम परत येईपर्यंत मला हे राजाला सांगायला हवं.”

---

संध्याकाळ जवळ येत होती. रणभीम आणि सैनिक परतीच्या मार्गावर होते.
समुद्रावरून अचानक दाट काळं धुकं पुढे आलं.
क्षणातच दृष्टी काही फुटांवर थांबली.

एक सैनिक थरथरत म्हणाला,
“सर, हे धुकं… पांढरं नाही, काळसर आहे!”

रणभीमने तलवार उचलून सांगितलं,
“ओळीत उभे राहा! कुणी वेगळं होऊ नका!”

धुक्यात गडगडाटासारखा आवाज आला — जणू समुद्राच्या पोटात कुणीतरी हसत आहे.
मग लालसर डोळ्यांच्या दोन ठिपक्यांसारखी चमक प्रकट झाली.

सैनिक ओरडला,
“ते… माणसं नाहीत!”

धुक्यातून लांबट सावल्या दिसू लागल्या.
मानवी शरीरासारख्या, पण हातपाय धारदार परांसारखे.
त्यांच्या हालचाली पाण्यासारख्या, पण गती अत्यंत जलद.

रणभीम गर्जला,
“ढाली उचला! वर्तुळात उभे राहा!”

सैनिकांनी ढाल उचलल्या. पण पुढच्याच क्षणी एक सावली झेपावली आणि एका तरुणाला गळ्याने पकडून धुक्यात ओढून नेलं.
त्याच्या किंकाळ्या काही क्षण घुमल्या आणि मग शांतता.

रणभीमचे डोळे रागाने चमकले.
“भ्याडांनो! मागे हटू नका! जमेल तितकं रोखा!”

त्याने स्वतः तलवारीने एका सावलीवर वार केला.
धुक्यातून काळसर चिकट द्रव उडाला आणि विचित्र कडवट वास दरवळला.
पण सावली तशीच उभी राहिली. तिचे लाल डोळे अजून भयंकर झाले.

रणभीमला कळलं की ही लढाई जिंकता येणार नाही.
तो जोरात ओरडला,
“पळा! जिवंत राहिलात तरच राजाला सत्य सांगता येईल!”

सैनिक धावत सुटले. धुकं त्यांच्या मागे पसरत होतं, जणू जिवंत भिंत.
रणभीम मागे वळून बघतो – दोन सैनिक आधीच गायब झाले होते.

---
रणभीम संध्याकाळी किल्ल्यात पोचला.
त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग, तलवार अजूनही चिकटलेल्या काळसर द्रवाने माखलेली.
त्याला पाहताच रखवालदार हादरले.

“सेनापती… तुम्ही ठीक आहात का?”

रणभीमच्या डोळ्यांत अजूनही धुकं आणि लाल सावल्या जिवंत होत्या.
त्याचा श्वास जोरजोराने चालू होता.

त्याने पहिल्याच रखवालदाराला धरलं –
“राजाला जागं करा. आत्ता. लगेच!”


---

राजा संध्याकाळी विश्रांतीसाठी निजगृहात होता.
पण रणभीमच्या परतीची बातमी आणि त्याच्या अवस्थेची चर्चा वाऱ्यासारखी पसरली.
दरबार उघडला गेला – आपत्कालीन बैठक.
रात्रीच्या अंधारात मशाली पेटल्या, मेणबत्त्यांच्या उजेडात दरबार भरला.

राजा गंभीर नजरेने म्हणाला,
“असं नेहमी घडत नाही. पण जर सेनापती आत्ता बोलावतोय… तर काहीतरी भयंकर आहे.”

 रणभीम काही उरलेल्या सैनिकांसह दरबारात आला.
तो रक्ताने माखलेला, जखमी होता.
गादीवर बसलेल्या राजाकडे वळून त्याने फाटलेला व्यापाऱ्याचा झेंडा दाखवला.

“महाराज… आपली जहाजं वाऱ्याने हरवली नाहीत.
त्यांना ते घेऊन गेले.
समुद्रात… काहीतरी आहे. ते माणसं नाहीत.”

दरबारात कुजबुज पसरली. काही सरदार भीतीने एकमेकांकडे बघू लागले.

तेवढ्यात दरवाजातून आवाज आला.
तो सैनिक, जो किनाऱ्यावर हरवला होता, दरबारात येऊन उभा राहिला.

महाराज विरधवल सिंहासनावरून उठले.
“कशा रीतीने परत आलास, शूरवीरा?”

पण सैनिक फक्त हसला.
त्याच्या हसण्यात ओठ फाटले, आणि काळसर द्रव त्याच्या हनुवटीखालून टिपकत जमिनीवर पडू लागला.
त्याचा आवाज जड आणि दुहेरी वाटत होता – जणू दोन वेगवेगळ्या जीवांनी एकत्र बोलावं.

“मी… परत आलो नाही…
मीच समुद्र आहे… आणि तुम्ही… तुम्ही माझं अन्न…”


---
दरबारातील लोक घाबरून मागे हटले.
एका दरबाऱ्याने पायरी चुकवली आणि थेट जमिनीवर कोसळला.
तो सैनिक झटक्यात त्याच्यावर झेपावला –
चिर्रर्रक!
त्याने त्या दरबाऱ्याचा घसा दातांनी चावून फाडला.

रक्ताचा फवारा संपूर्ण दरबारभर पसरला.
काही स्त्रिया किंचाळल्या, काही दरबारी दाराकडे धावले.

रणभीमने तलवार उपसली आणि गर्जला,
“पाठीमागे रहा! कोणीही बाहेर पळू नये. हे आतूनच थांबवावं लागेल!”
रणभीमने पुढे सरकत तलवारीचा मुठ पकडला.
“हा मनुष्य उरलाच नाही, महाराज. काहीतरी समुद्राने याला आतून खाल्लंय.”

राजमाता थरथरत होती. तिच्या डोळ्यात भीती आणि राग दोन्ही चमकत होते.
“ही… शापित खूण आहे. समुद्रातील ते जीव परत आलेत!”
त्याने तलवारीचा वार केला, पण सैनिकाने मान वाकवून हल्ला चुकवला. त्याचे हालचाल मानवीच नव्हते—जणू पाण्याखालील मासोळी अचानक उडी मारते तशा.

चंद्रसेनने भाला भोसकला. सैनिक दणकन खाली पडला. पण त्याच्या छातीमधून रक्त नाही, तर काळसर, खारट पाणी बाहेर आलं.
मशालींचा उजेड जणू मंदावला. दरबारात थंडगार धुकं पसरू लागलं.

राजा वीरधवलच्या कपाळावर घाम थेंब पडले. त्याने गरजून आज्ञा दिली—
“दरवाजे बंद करा! कुणालाही बाहेर जाऊ देऊ नका! हे जे काही आहे… ते इथून पसरू नये.”

पण सैनिक अजूनही धडपडत होता. त्याने रक्ताळलेल्या आवाजात शेवटचं वाक्य टाकलं—
“...तो उठतोय… लाटांच्या गाभाऱ्यातून…”

त्याचे डोळे लालसर झाले, आणि शरीर पूर्णपणे कोसळून बर्फासारखं थंड झालं.

दरबारात स्तब्धता पसरली. फक्त समुद्राचा गर्जना ऐकू येत होता.