विषय :- आतिषबाजी
श्रेणी :-सामाजिक प्रबोधन,बोधप्रद,सत्यकथा
शिर्षक :- फाजिल लाड
(सदर कथा ही एक सत्य घटना असून ती जशी घडली तशी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे.कथित व्यक्तीच्या विनंती नुसार त्यातील पात्रांची नावे आणि स्थळ बदलेली आहेत तसेच सदर कथेचा गर्भितार्थ हा संपूर्णतः कथित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार लिहिलेला आहे.)
दिवाळी म्हटलं की, समोर येते दिव्यांची आरास,रोषनाई आणि फटाक्यांची आतिषबाजी. अशाच या दिवाळीच्या दिवसांमध्ये घडलेली ही घटना.
दिनकरराव दिक्षित कोकणातले प्रतिष्ठित नाव. खूप मोठे आंबा व्यापारी. कोकण म्हणजे दुसऱा स्वर्गच जणू आंबा फणसाच्या बागा,पोफळीची झाड,सूरुची बन आणि माडाचे झाड,शांत सुंदर नितळ असे समुद्र किनारे अशाच एका गावामध्ये दिनकर दीक्षितांच घर.
कोकणात दिवाळीची इतकी काही घाई गडबड नसते कारण त्याच वेळेस कोकणात भात शेतीची कापणी, आंब्याच्या झाडावरच्या फवारणी होत असतात पण तरीही यावर्षी दिनकर दिक्षितांच्या घरी खूपच गडबड गोंधळ चालला होता.
दिनकर रावांच्या सुविद्य पत्नी वसुधा बाई यांची खूपच लगबग चालू होती. कारणही तसेच होतं, कारण त्या यावर्षी दिनकरराव सोबत आपल्या माहेरी जायला निघाल्या होत्या.सहकुटुंब त्या वर्तक नगर ला आपल्या माहेरी जायला निघाल्या होत्या.
तसं दिनकर रावांना आपल्या सासुरवाडीला जायला फारसं आवडत नव्हतं कारण ते कोकणातले साधे भोळे गृहस्थ आणि त्यांची सासरवाडी म्हणजे अत्याधुनिक सोयी सुविधा नटलेलं शहर. त्या सोयी सुविधांनी नटलेल्या घरात त्यांना राहायला जमत नव्हते पण यावर्षी मात्र सासुबाईंनी खूपच हट्ट धरला होता.
दिनकर रावांच्या सासूबाईची ८० उलटलेली होती.त्यामुळे कदाचित त्यांचे मन राखण्यासाठी म्हणून दिनकरराव आपल्या सासरवाडीला जायला निघाले. सोबत त्यांच्या पत्नी वसुधा बाई आणि चिरंजीव डॉक्टर विश्वजीत दिक्षित होते. दिवाळीच्या दोन दिवस आधीच दिक्षित कुटुंब वर्तक नगर ला जायला निघाले.
तशी दिक्षितांची सासूरवाडी वर्तक नगर मधील प्रतिष्ठित कुटुंबातील एक होती. वर्तक नगर मधल्या कानिटकर कुटुंबातल्या मुलीशी म्हणजेच वसुधा बाईशी दिनकर रावांचे 33 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांचे थोरले मेहुणे मधुकरराव आणि धाकटे सुधाकर राव. हे दोघेही वर्तक नगर मधल्या सोन्या-चांदीच्या प्रतिष्ठित व्यापाऱ्यांपैकी एक होते.
वर्तक नगर मध्ये असलेल्या लग्नकार्याला कानिटकरांच्या दुकानातला दागिना नसेल,असे आजपर्यंत कधी झालेले नाही. तर अशी ही दोन्ही कुटुंब.
दिनकरराव दिवाळीला दोन दिवस असताना कोकणातून वर्तक नगर ला जाण्यासाठी रवाना झाले.
गाडीत बसताना ते वसुधा बाईंना म्हणाले, "काय मग,स्वारी एकदम खुश ना. माहेरी जात आहात.थोडं मुलाकडे आणि नवऱ्याकडे लक्ष ठेवा म्हणजे झालं."
वसुधा बाई थोडयाशा लाजत म्हणाल्या, "तुमच आपलं काही तरीच बोलणं असतं."
विश्वजीत ने हसतच गाडी चालवायला सुरुवात केली.दिक्षितांच्या घरापासून वर्तक नगर साधारण दहा तासांचा प्रवास होता. त्यामुळे विश्वजीतने स्वतः गाडी चालवणं पसंत केलं होतं.तसंही तो मामाकडे बऱ्याच वर्षांनी जात होता.
साधारण रात्री आठच्या दरम्यान दिक्षित कुटुंब वर्तक नगर ला येऊन पोहोचले. कानिटकारांच्या बंगल्यासमोर गाडी थांबतातच, कानिटकरांचे धाकटे चिरंजीव सुधाकरराव गेटवर बहिणीच्या स्वागताला उभे होते.
खरंतर कानिटकरांना पाच मुलं पण त्यातली तीनच ह्यायात होती. त्यातल्या त्यात सुधाकरराव सर्वात लहान आणि वसुधा बाई मोठ्या होत्या. वसुधा बाईंपेक्षा मधुकरराव मोठे आणि सुधाकरराव लहान होते.
समोर सुधाकर रावांना पाहून वसुधा बाईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी लेकाच्या गाडीची थांबण्याची वाट देखील पाहिली नाही. पटकन दरवाजा उघडून त्या गाडीतून खाली उतरल्या.
हे बघून विश्वजीत म्हणाला,"अगं,आई जरा थांब की,तुला किती घाई लागली आहे.आपण मामाच्याच घरी जातोय ना."
पण हे सगळं ऐकायला त्या गाडीत नव्हत्याच.त्या केव्हाच सुधाकररावांपर्यत जाऊन पोहोचल्या होत्या.
सुधाकररावांना आवाज देत त्या म्हणाल्या, "काय सुधा कसा आहेस?आणि तुझा छोटा कसा आहे रे?"
आपल्या हाताच्या इशाऱ्याने दाखवत सुधाकरराव म्हणाले,"अगं ताई,मी बरा आहे आणि माझा छोटा तो तिथे अंगणात खेळतो आहे."
वसुधा बाई थोड्याशा लटक्या रागाने म्हणाल्या,"मला तुझ्याशी बोलायचं नाही. अरे तुझा मुलगा तीन वर्षाचा झाला तरी त्याला एकदाही माझ्या घरी आणावं असं तुला वाटलं नाही."
सुधाकर राव आपणच आपले कान पकडत म्हणाले,"माफ कर!ताई, चुकलं."
त्या दोघांचं बोलणं कधी संपत आहे त्याची वाट बघत विश्वजीत गाडीत बसला होता. शेवटी न राहून त्याने गाडीचा हॉर्न वाजवला.
त्याचबरोबर सुधाकरराव वसुधा बाईंना म्हणाले, "ताई,चल आपण आत जाऊन बोलूया. तोपर्यंत विश्वजीत आणि भाऊजी आज येतील."
गाडी विश्वजीतने बंगल्याच्या आत घेतली. त्याबरोबर बंगल्यातले नोकर त्यांच्या मागे सामान घ्यायला आले. त्यांच्या हातातल्या बॅग घेऊन नोकर आत गेले.गाडी पार्क करून विश्वजीत आणि दिनकर राव मामाच्या घरात आले. दरवाजावर दिनकर रावांच्या स्वागतासाठी मधुकरराव स्वतः उभे होते.
दिनकरराव दिसताच मधुकरराव म्हणाले," या भाऊजी कसे आहात? खरंच तुम्ही आल्यामुळे खूप बरे वाटले. यावर्षी दिवाळीचा आनंद द्विगुणीत होणार आहे."
मधुकरराव त्यांना हस्तांदोलन करत घरात घेऊन आले.दिनकर राव घरातल्या सोफ्यावर बसले.
समोर बसलेल्या ईरावती बाईंना हात जोडून नमस्कार करत दिनकरराव म्हणाले," काय म्हणताय आई,कशा आहात? बघा मी तुमच्या इच्छेखातर आलोय.
ईरावती बाई हसत म्हणाल्या," बरं केलं आलात.आमच काही सांगू शकत नाही. पिकलं पान केव्हा ही गळेल.
बाजूला बसलेल्या वसुधा बाई थोड्याशा भावनिक होतं म्हणाल्या,"आई, उगाच सणासुदीचा कशाला वाईट बोलतेस."
त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या सुविधा आणि स्वप्नजा दोघीही म्हणाल्या,"तुमचं बरोबर आहे. तुम्हीच त्यांना समजवा."
त्या लोकांच्या गप्पा चालू असतानाच मधुकरराव म्हणाले,"काय म्हणताय दिनकरराव, उद्योग धंदा कसा चाललाय."
दिनकर राव म्हणाले," आमचे सगळे ठीक आहे."
ते दोघे बोलत असतानाच बाहेरून मधुकररावांचे चिरंजीव विलास धावत आला. तो साधारण विश्वजीत पेक्षा एक दोन वर्षांनी लहान होता.
विलास धावत मधुकररावांकडे पाहत म्हणाला, "बाबा! मला जसे हवेत ना तसे फटाके मी आत्ताच ऑर्डर केले आहेत. उद्या फक्त फटाक्यांच्या दुकानात जाऊन ते घेऊन यायचे आहेत."
फटाक्यांचे नाव ऐकताच दिनकरराव म्हणाले,
"अरे विलास फटाके वाजवण्यापेक्षा तेच पैसे एखाद्या अनाथाश्रमात किंवा एखाद्या वृद्धाश्रमात दान केलेस तर तुला त्यांचे आशीर्वाद मिळतील."
त्यांच्या या वाक्यावर विलास बेफिकीरपणे म्हणाला," ओ काका! हे सगळं बुरसटलेल्या विचारांची माणसं करतात. आमच्यासारखी आधुनिक पिढी फटाक्यांची आतिषबाजी करते आणि आम्ही आत्ताच नाही. दरवर्षी हेच करत आलो आहे."
त्याच्या या उत्तराने दिनकर राव थोडे नाराज झाले.
मधुकरराव विलासला रागवत म्हणाले," विलास तोंड सांभाळून बोलत जा. तुला कुठे, काय बोलायचं हे कळतंय का?"
ओरडणाऱ्या मधुकर रावांना शांत करत दिनकरराव म्हणाले," अहो!जाऊ दे,तो लहान आहे.आपल्याला मोठ्यांनाच मुलांना समजून घ्यायला हवं. मुलांचे फाजील लाड केले ना की मुलं ही अशी बेफिकीर वागू लागतात."
दिनकर रावांच्या भोचक बोलल्यामुळे मधुकरराव डोक्याला आठ्या पाडत म्हणाले," कसे आहे ना भाऊजी,आपण देखील पिढीप्रमाणे बदलायला हवे.आपणच जर आपले बुरसटलेले विचार धरून ठेवले तर मग दोन पिढ्यांमधली तफावत जगासमोर यायला वेळ लागत नाही."
त्यांच्या या वाक्यावर दिनकरराव शांतच राहिले कारण त्यांना सणासुदीचे घरात वाद नको होते.
हा वाद वाढायला नको म्हणून इरावती बाई म्हणाल्या,"वसुधे, तुम्ही तिघेही जाऊन हात पाय धुवून घ्या. तोपर्यंत मी स्वप्नजा आणि सुविधाला जेवण वाढायला सांगते. ते तिघेही आपल्या रूममध्ये निघून गेले.
रूममध्ये गेल्यावर वसुधा बाई म्हणाल्या,
"तुम्ही कशाला त्यांच्या भानगडीत पडता, आपण आपल्या मुलाला व्यवस्थित ठेवले ना;मग इतरांचा आपण नाही बघायचं."
दिनकर राव समजावण्याच्या स्वरात म्हणाले,"पण या फटाक्यांमुळे काय घडतं; हे तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही असं बोलताय. उद्या काही वेडेवाकडे झाले तर...."
पुन्हा एकदा वसुधा त्यांना म्हणते," त्यांचे ते बघून घेतील.आपण पाहुणे आहोत, आल्यासारखे चार दिवस राहू आणि नंतर निघून जाऊ."
त्यानंतर हात पाय धुऊन आल्यावर सगळ्यांनी मिळून छान पैकी जेवण केले. दहा तास गाडी चालवल्यामुळे आणि प्रवासामुळे दिक्षित कुटुंब दमले होते म्हणून ते लवकर झोपले.
दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी होती सगळ्यांनीच लवकर उठून चहा नाश्ता केला. सोफ्यावर बसलेल्या विश्वजीत कडे बघून विलास म्हणाला," विशू !अरे तुला जे हवेत ना ते फटाके घे.मी माझ्या ऑर्डर केलेली आहे सोबत तुझी घेऊ.दणक्यात बार उडवून देऊ."
विलास बोलत असतानाच त्याच्या पायात येत तीन वर्षांचा यश म्हणाला," दादा! मलाही फटाके हवेत."
विलास त्याला आपल्या मांडीवर बसवत म्हणाला,"बबड्या तुझ्यासाठी तर लवंगी माळ आणणार आहे."
फटाक्याचा विषय निघतात पुन्हा एकदा दिनकरराव मधुकरराव आणि सुधाकररावांना म्हणाले,
" मी अजूनही सांगतोय, मुलांना फटाके देणे योग्य नाही."
यावर मधुकरराव म्हणाले," अहो त्यांची हौस आहे आणि हे त्यांचे दिवस आहेत ना. उद्या एकदा का ते आमच्या वयाचे झाले की कुठे जाणार आहेत फटाके फोडायला."
त्यांच्या या उत्तरावर दिनकरराव शांतच राहिले विषय पुढे वाढू नये म्हणून स्वप्नाजा म्हणाल्या,"वसुधाताई,यावर्षी तुम्ही तुम्हाला आवडेल ती साडी घ्या बर. दरवर्षी तुम्हाला भाऊबीजेला आम्ही आमच्यात आवडीची साडी पाठवतो पण यावर्षी तुमच्या आवडीची साडी आणि तुमच्या आवडीचा दागिना घेणार आहोत."
त्या दोघींचे हात हातात घेत वसुधाबाई म्हणाल्या, "अगं माझ्यापेक्षा तुमचीच निवड खूप छान आहे. तुम्ही जे द्याल ते मी आनंदाने घेईल."
सगळ्यांचे बोलणे ऐकून ईरावती बाई म्हणाल्या,"आता इथेच बसणार का बोलत, चला बघू सगळ्यांनी आपल्या खरेदीला जा. सगळे जण तयारी करून खरेदीला निघाले.
विलास फटाक्यांच्या दुकानात येताच दिलेली ऑर्डर एका मोठ्या बॉक्समधून एक मुलगा बाहेर येऊन आला.
विलासने त्याला विचारले," मी दिलेली सगळी ऑर्डर आहे ना."
तो म्हणाला," हो! तुम्ही दिलेली सगळी ऑर्डर आहे. याच्यात आणखी तुम्हाला काही फटाके हवे असतील तर मी तुम्हाला आत्ताही देऊ शकतो."
विलास विश्वजीत कडे बघत म्हणाला," विशु, घे ना तुला काय हवंय ते,"
विश्वजीत हसत म्हणाला," अरे मी एक डॉक्टर आहे. मी स्वतः माझ्या पेशंटला फटाके वाजवू नका,प्रदूषण टाळा असे सल्ले देतो आणि आज मी फटाके घेऊन फटाके वाजवून प्रदूषण करू.हे माझ्या तत्वात बसत नाही.तुला फटाके वाजवायचे तर तू अजून घे."
त्यानंतर सगळेजण घरी आले. संध्याकाळी धन्वंतरी ची पूजा झाल्यानंतर विलासने आपण आणलेल्या फटाक्यांपैकी काही फटाके वाजवायला सुरुवात केली. सुतळी बॉम्ब, बाण, लक्ष्मी बॉम्ब यासारखे भले मोठे आवाज करणारे फटाके तो वाजवत होता.
त्याच्या आवाजाने कानठळ्या बसत होत्या. त्याने आतिषबाजी करणारे आकाशात उडणारे अनेक चायनीज फटाके मागवले होते.
ते सारे आकाशात बघून मधुकरराव म्हणाले, "पाहिले दिनकरराव मुलांच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसतोय ."
दिनकरराव म्हणाले," हो!पाहिलं की"
त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवाळीच्या अंघोळीसाठी सगळेजण चार वाजता उठून बसले.सगळ्यांना उठणं लावण्यात आल्यावर छान पैकी दूध खोबऱ्याच्या आणि हळदी मिश्रित पाण्याने अंघोळ घालण्यात आली. दिवाळीचा बनवलेला फराळ स्वप्नजा आणि सुविधाने सर्वांसमोर आणून ठेवला. सर्वांनी फराळ मस्तपैकी फस्त केला आणि पुन्हा एकदा विलास फटाके वाजवायला निघून गेला.
पण का कुणास ठाऊक दिनकर राव यांच्या मनात मात्र एक वेगळी दूगदूग वाटत होती. संध्याकाळी लक्ष्मीपूजनाची तयारी होऊ लागली कानिटकरांच्या घरात आधी घरातले लक्ष्मी पूजन केले जाई आणि नंतर दुकानातले त्याप्रमाणे त्यांनी साडेसहा वाजता घरातले लक्ष्मीपूजन करायला सुरुवात केली गेली. घरातले लक्ष्मी पूजन आटोपल्यानंतर ते दुकानात लक्ष्मीपूजन करायला निघाले.
विलास ने सोबत मोठमोठे फटाके घेतले होते. दुकानातले लक्ष्मीपूजन झाल्यानंतर त्याने दुकानाच्या समोर असलेले रस्त्यावर फटाके फोडायला सुरुवात केली. तिथेच असलेल्या एका बाटलीत त्याने बाण लावला आणि एका प्लास्टिकच्या डब्यात सात आठ सुतळी बाॅम्ब पेटवून दिले. खूप मोठा आवाज झाला आणि त्या आवाजाने दिनकर राव घाबरले.
त्यांनी विलासला सांगितले,"अरे तुला फटाके वाजवायचेत ना मग ते नीट वाजवं. असं नको ते कुठलेही कृत्य करू नकोस.हे तुझ्याच जीवावर बेतू शकते."
त्याही वेळेस विलास ऐकला नाही.त्यानंतर सगळेजण घरी आले. घरच्या लक्ष्मीपूजनाचे फटाके वाजवणं अजून बाकी होतं.
विलासने फटाक्यांचा मोठा बॉक्स बाहेर आणून ठेवला. त्याने नेहमीप्रमाणे बाटल्यांमध्ये बाण लावले.जवळच असलेल्या पत्र्याच्या डब्यात त्यांने मघाशी लावले तसे सात आठ सुतळी बाॅम्ब एकत्र टाकले आणि सगळे त्याने एकदमच पेटवलं.
हे सगळं करत असताना त्यांने लावलेल्या बाणा पैकी एका बाणांची बाटली खाली पडली आणि तो बाण सरळ फटाक्यांच्या बॉक्समध्ये गेला. कोणाला काही कळायच्या आत त्यातले फटाके फूटू लागले.
आजूबाजूला असलेल्या घरातल्या स्त्रिया घाबरून इकडे तिकडे पळू लागल्या. फटाकांच्या खोक्याची आग वाढवायला लागली तसा विलास ती विझवण्यासाठी गेला पण त्याच्या कपड्यानी पेट घेतला.हे काय कमी होतं म्हणूनच पत्र्याच्या डब्यात लावलेले बॉम्ब फुटले आणि त्यामुळे तो पत्र्याच्या डबा फाटला.त्यातून एक पत्रा उडून तिथून काहीच अंतरावर उभ्या असलेल्या यशच्या पोटावर पडला.त्याचे पोट त्या पत्राने कापले गेले.तो तीन वर्षांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.एकीकडे विलास जळून पडला होता तर दुसरीकडे यश होता.
घरातल्यांना कळत नव्हतं नक्की काय करावे.क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. तिथे ताबडतोब ॲम्बुलन्स आली. विलास ला आणि यशला हॉस्पिटल ला नेण्यात आलं. ॲम्बुलन्स मध्ये असलेल्या विश्वजीतने विलासची नाडी चेक केली. तो ॲम्बुलन्स मध्येच गेला होता.
त्यांने दिनकररावंकडे पाहत नकारार्थी मान हलवली पण तरीदेखील हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत शांत राहिला. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी विलासला मृत घोषित केला आणि यश वरती आम्हाला जमतील तेवढे उपचार करतोय असे सांगितले.
मधुकरराव तुटून पडले होते कारण त्यांचा वयात आलेला मुलगा आज गेला होता. फटाक्यांची आतिषबाजी त्याच्या जीवावर बेतली होती तर त्यांच्या भावाचा तीन वर्षाचा मुलगा मृत्यूच्या दारात मृत्यूची झुंज देत होता.
वाचकांनो,तुम्हाला इथे एकच सांगेन,दिवाळी साजरी करा पण ते तुमच्या जीवावर बेतणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. पर्यावरणाला जपा आणि तुमच्या जीवाला ही जपा.
समाप्त
©®
अंजली वेंगुर्लेकर (अंजू)
रत्नागिरी 🌹🌹🌹🌹