(खास विद्यार्थ्यांसाठी संस्कारमोती या सदराखाली लेखमाला)
3. देश
विद्यार्थी मित्रांनो ! आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशामध्ये विविध जाती, धर्माचे लोक राहतात. आपल्या देशामध्ये विविध राज्य, प्रांत आहेत. विविध भाषा बोलल्या जातात. आपल्या देशामध्ये खाद्यपदार्थामध्येही विविधता आढळून येते. तसेच राज्यानुसार कला व नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत. आपल्या भारत देशाला एक गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. आपल्या देशाला नैसर्गीक सौंदर्य, समुद्र किनारे, नद्या, वाळवंट, बर्फाळ प्रदेश अशी नैसर्गीक विविधताही लाभलेली आहे. या विविधतेतेमुळेच आपल्या देशाची जागतीक पातळीवर एक वेगळी ओळख आहे.
आपल्या देशामध्ये एकूण 29 राज्य आहेत. आपला भारत देश हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सातव्या क्रमांकाचा देश आहे. आपला देश इतका विशाल व विविधतेने नटलेला असला तरी एकसंध आहे. कारण आपला देश हा संविधानानुसार चालतो. त्यालाच आपण आपली राज्यघटना म्हणतो. घटना म्हणजे देशातील नागरिकांनी एकमेकांशी कसे संबंध राहतील या बाबत केलेला एक सामाजिक करार असतो. आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखीत राज्यघटना आहे. ज्याला आपण संविधान म्हणतो. आपल्या देशाचे संविधान लिहिण्याचे महान कार्य हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. संविधानानुसार आपल्या देशातील प्रत्येक नागरीकाला स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार आहे. आपल्या देशाचे संविधान हे देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार प्रदान करते. संविधानामुळे आपल्या देशाचे ऐक्य अबाधीत आहे. तसेच त्यामुळे आपले नागरी अधिकार सुरक्षित आहेत. आपला भारत देश हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य. म्हणजेच आपल्याला आपले सरकार निवडण्याचे स्वातंत्र्य आहे.
आपला देश खूप विशाल आहे. आपण आपल्या गावात, शहरात राहतो. आपले शहर आपल्या राज्यामध्ये आहे. आपले राज्य आपल्या भारत देशामध्ये आहे. आपला भारत देश जगामध्ये आहे. ज्यावेळी आपण देशाबाहेर जातो. त्यावेळी आपण कोणत्याही जाती, धर्माचे असो किंवा कोणत्याही राज्याचे असो किंवा कोणतीही भाषा बोलत असो शेवटी देशाबाहेर आपली ओळख ही एक भारतीय म्हणूनच असते. त्यामुळे आपण आपल्या भारत देशातील कोणत्याही नागरीकांचा द्वेष करायचा नाही.
आपण शाळेमध्ये दररोज सकाळी ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत म्हणतो. जे रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. आपण शाळेमध्ये दररोज प्रार्थना म्हणत असतो. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. पण आपल्या मनाशी एक विचार करा. आपण सारे भारतीय तर आहोत. पण साऱ्या भारतीयांना आपले बांधव मानतो का ?
पूर्वी आपला देश पारतंत्र्यामध्ये होता. आपल्या देशाला सन 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले आहे. ते इतके सहजासहजी मिळालेले नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. कित्येक स्वातंत्र्यवीरांनी आपले जीवन तुरुंगामध्ये व्यतीत केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकांनी खूप कष्ट सोसले आहेत. म्हणूनच आज आपण स्वातंत्र्य देशामध्ये मोकळा श्वास घेत आहोत. आपण स्वातंत्र्य भारतात जन्मलो आहोत.
आपल्या देशामध्ये आपल्याला घर, अन्न, कपडे, सुरक्षा मिळते. आपल्याला आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच आपण या देशाचे एक नागरीक म्हणून आपले काही कर्तव्य आहेत. आपण आपल्या देशाशी नेहमी प्रामाणिक राहायला हवं. आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने आपापला परिसर स्वच्छ ठेवला तर देश आपोआप स्वच्छ होईल. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत. त्यामुळे आजचे युवा चांगले राहीले तर देश आपोआप चांगला होईल. आपल्या देशाचे नाव जागतीक पातळीवर उंचावेल असे कार्य आपण करायला हवं.
देश कोणा एका व्यक्तीवर चालत नाही. या देशाला सैनिक, शेतकरी, कष्टकरी, उद्योगपती, डॉक्टर, इंजिनिअर, नोकरदार, चालक, वाहक, कारागीर या सर्वांचीच आवश्यकता असते. ते सर्वजण काम करतात म्हणूनच देश चालत असतो. एक प्रकारे हे सर्वजण देशसेवाच करत असतात. आपण आपल्या देशासाठी छोटया छोटया गोष्टी केल्या तरी देशाची सेवा होते. मित्रांच्या मदतीने तुमच्या घराचा, शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. कचरा हा नेहमी कचरा पेटीतच टाका रस्त्यावर टाकू नका. व्यसन करुन नका. कोणाचाही द्वेष करु नका. आपल्या देशाचा नेहमी आदर बाळगा. नेहमी लक्षा ठेवा. आपला देश सुरक्षित राहिला तरच आपण सुरक्षित राहू. आणि सर्वात महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा. आपण जाती,धर्म,वंश, प्रांत, भाषा यामुळे वेगळे असलो तरी प्रथमत: आणि अंतिमत: भारतीय आहोत.
लेखक- संदीप खुरुद