सध्याचा काळ हा मानवाच्या आतापर्यंतच्या उत्क्रांती काळामधील सर्वांत चांगला व सुवर्णकाळ म्हणावा लागेल. कारण असा काळ यापूर्वी नव्हता. भविष्यातही असा समृद्ध काळ राहील असे सांगता येत नाही. आपली आजची पिढी ही सर्व सुख, सोईंनी समृद्ध आहे. आपल्याकडे सर्व प्रकारची आधुनिक साधनं उपलब्ध आहेत. मानवाला सुखाने जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत. त्या सर्व गोष्टी आज आपल्याकडे उपलब्ध आहेत.
पूर्वीच्या काळी माणसाला राहण्यासाठी घरे नव्हती. आज राहण्यासाठी पक्की व सुरक्षित घरे आहेत. पूर्वी माणसाला अंग झाकण्यासाठी कपडे नव्हते. त्यावेळी थंडी, ऊन, वारा, पाऊस यामुळे माणसांचे किती हाल होत असतील ? आज आपण पुरेसे कपडे परिधान करतो. पूर्वी माणसाला एक वेळचं जेवण मिळालं तरी आनंद व्हायचा. कारण त्यावेळी पुरेसं अन्न खायला मिळत नव्हतं. आज आपल्याला मुबलक प्रमाणात अन्न उपलब्ध आहे. पूर्वी मिळेल ते अन्न खावे लागत असे. आज आपल्याकडे आपल्या आवडीनुसार पदार्थ उपलब्ध आहेत. पूर्वी माणसाला पाण्याच्या शोधात कित्येक किलोमीटर भटकंती करावी लागे. आता पाणी घरी उपलब्ध होत आहे. पूर्वी प्रवासासाठी वाहतुकीची पुरेशी साधनं उपलब्ध नव्हती. त्यावेळी प्रवास करताना माणसाचे किती हाल होत असतील ? आता प्रवासासाठी चांगली व जलद वाहने उपलब्ध आहेत. पूर्वी मनोरंजनाची मुबलक साधने उपलब्ध नव्हती. आता मनोरंजनासाठी चित्रपट, विविध मालिका व इतर तत्सम बरीचशी साधनं उपलब्ध आहेत. आज प्रत्येकाकडे मोबाईल उपलब्ध आहे. त्यामध्ये माणसाला बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत. पूर्वी एखादा व्यक्ती आजारी असेल तर उपचाराअभावी त्याचा तडपडून मृत्यू व्हायचा. आता सर्व सोईंनी युक्त अशा आरोग्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. पूर्वी लाईट नव्हती. आता प्रत्येक घरी लाईट उपलब्ध आहे. पूर्वी माणूस भटकंती करायचा. आता माणसाला स्थैर्य लाभलं आहे. माणसाच्या अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा तर पूर्ण होतच आहेत. त्यासोबतच इतर सर्व गरजाही पूर्ण होत आहेत.
आज रोजी पूर्वीच्या तुलनेत माणसाकडे सर्व सुख, सुविधा उपलब्ध आहेत. तरीही माणूस सुखी नाही. कारण माणूस समाधानी नाही. एकमेकांचा द्वेष करणे, ईर्षा, असुया बाळगणे, छोटया छोटया गोष्टींवर रागावणे, इतरांकडून अपेक्षा ठेवणे, पैशालाच सर्वस्व मानून पैसे कमावण्याच्या मागे लागणे, विकासाच्या नावावर निसर्ग उद्धस्त करणे, पैशाचे व वेळेचे योग्य नियोजन नसणे, वैरभाव बाळगणे, नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणे या व अशा ईतर अनेक कारणांवरून माणूस आपलं सुख आणि समाधान गमावून बसला आहे.
सुख हे छोटया - छोटया गोष्टींमध्ये दडलेलं असतं. सुख हे आपल्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतं. मन सुखी असेल तर आपण सुखी असतो. मन दु:खी असेल तर आपण दु:खी असतो. बऱ्याच वेळा क्षुल्लक गोष्टी आपण आपल्या मनाला लागून घेत असतो. विचार केला तर त्या गोष्टींचा आपण प्रमाणापेक्षा जास्त ताण घेवून स्वत:च दु:ख ओढावून घेत असतो. सारख्याच प्रसंगी भिन्न व्यक्ती वेगवेगळे वर्तन करतात. काही व्यक्ती त्या प्रसंगाला धैर्याने आणि संयमाने सामोऱ्या जातात व आपले जीवन समृद्ध करतात. तर काही व्यक्ती त्याच प्रसंगाचा अतिताण घेवून दु:खी होतात. काही गोष्टींबद्दल आपण अवाजवी भिती बाळगतो. त्यामुळे आपला वर्तमानकाळ खराब करतो. सर्वच गोष्टी धरुन ठेवायच्या नसतात. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. त्या गोष्टी सोडून दिल्या तर आपल्याला हलकं वाटु लागतं. आपलं दु:ख आपोआप नाहीसं होतं. आपण इतरांचा द्वेष केल्याने आपल्याला दु:ख होतं. तसेच अपेक्षाभंग झाल्यावरही आपल्याला दु:ख होतं. पण या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. आपण उगाच इतरांचा द्वेष करतो. इतरांकडून कशाची तरी अपेक्षा बाळगतो. दुसऱ्याची प्रगती पाहून आपल्याच मनाला दु:ख करुन घेतो. आपण एखाद्याबद्दल गैरसमज निर्माण करुन घेतो. त्यामुळेही आपण दु:खी होतो. चुकीचं कृत्य करुनही आपण आपल्यावर दु:ख ओढावून घेत असतो.
प्रत्येक माणसाची सुखाची व्याख्या ही वेगवेगळी असते. सुखी राहायचे हे आपल्याच हातात असते. आपल्या जीवनाचा अंतिम उद्देश हा सुखाने आणि समाधानाने जीवन व्यतीत करणे हाच आहे. आपलं मन आनंदी असेल तर सारं जगही आपल्याला आनंदी दिसतं. फक्त जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपण बदलला पाहिजे. हे जीवन परत मिळत नाही. हे जीवन आणि हे जग खरोखरच सुंदर आहे. फक्त जगाकडे पाहण्याचा चांगला व सकारात्मक दृष्टीकोन आपल्याकडे हवा.
कस्तुरीमृगाच्या कस्तुरीमधून सुगंध दरवळत असतो. तो आयुष्यभर त्या सुगंधी कस्तुरीच्या शोधात रानोमाळ फिरत असतो. पण आपण ज्या कस्तुरीसाठी भटकत आहोत. ती कस्तुरी आपल्याजवळच आहे याची कल्पना त्या कस्तुरीमृगाला नसते. तो आयुष्यभर असाच भटकत राहतो.
आपलंही अगदी तसंच आहे. आपण सुखाच्या शोधात आयुष्यभर भटकत असतो. पण आपल्याला सुख मिळत नाही. कारण आपल्याला सुखाचा शोध घेता येत नाही. सुख हे आपल्या जीवाभावाच्या लोकांना चांगले बोलण्याने मिळते. सुख हे समाधानी राहण्याने मिळते. सुख हे आपल्याला आवडणारी कला जोपासल्यावर मिळते. सुख हे इतरांच्या सुखात सहभागी झाल्याने मिळते. सुख हे इतरांशी आपुलकीने, प्रेमाने व आपलेपणाने वागल्यावर मिळते. सुख हे निसर्गाच्या सानिध्यात फिरल्याने मिळते. सुख हे आरोग्याची काळजी घेतल्याने व सकारात्मक विचार केल्याने मिळते. सुख हे अशाच छोटया छोटया गोष्टींमध्ये दडलेले असते. फक्त ते आपल्याला शोधता यायला हवं.
लेखक – संदीप खुरुद