Bap Vitthal in Marathi Moral Stories by संदिप खुरुद books and stories PDF | बाप विठ्ठल !

Featured Books
  • ఆపరేషన్ సింధూర

    "ఆపరేషన్ సింధూర" అనేది భారత సైన్యం పాకిస్తాన్ లోని ఉగ్రవాద శ...

  • అంతం కాదు - 8

    ఇదంతా గమనిస్తున్న వృద్ధ సలీం, "ఇక ఇతని వల్ల కాదు. అసలు ఇతన్న...

  • ఉడైల్ ఘాటి

    అది ఉత్తరఖాండ రాష్ట్రం లోని నైనితల్ నగరం. రాత్రి 10 గంటలు. ఒ...

  • థ జాంబి ఎంపరర్ - 5

    . ప్రభాకర్ మెడ నుంచి, ఆదిత్య గోర్ల నుంచి ప్రభాకర్ శరీరంలో ను...

  • అధూరి కథ - 1

    Episode 1:విద్యుత్ దీపాల కాంతిలో మెరుస్తున్న విశాఖపట్నంలోని...

Categories
Share

बाप विठ्ठल !

 माझे स्नेही, मार्गदर्शक गणपतराव जगताप (अण्णा) यांचा दिनांक 28.06.2025 वार शनिवार रोजी 75 वा वाढदिवस (अमृत महोत्सव) साजरा झाला. तीन दिवसांपूर्वी कार्यक्रमाचे निमंत्रण अण्णांनी मला दिले होते. शनिवार असल्यामुळे मला सुट्टीच होती. शुक्रवारी रात्री नातेवाईकांसोबत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्याचे अचानक ठरले. सकाळी लवकर दर्शन घेऊन शनिवारी रात्री 7.00 वाजता संभाजीनगरला अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी जाता येईल असे मी ठरवले होते. शनिवारी पहाटे 3.00 वाजता आम्ही पंढरपूरला पोहचलो. चंद्रभागेमध्ये स्नान करून पहाटे 4.00 वाजता दर्शनासाठी रांगेत उभा राहिलो.

          भाविकांची खूप गर्दी होती. एका रांगेमध्ये भाविकांची चर्चा चालू होती. एक भाविक दुसऱ्याला दर्शनासाठी दुपारचे 12.00 वाजतील असे सांगत होता. दुपारी 12.00 वाजता जरी दर्शन झाले तरी मला संभाजीनगरला रात्री 7.00 वाजेपर्यंत कार्यक्रमासाठी जाणे शक्य होते. तेवढयात दुसऱ्या एका भाविकाने दर्शनासाठी सायंकाळचे किमान 5.00 वाजतील असे सांगीतले. त्यांचे बोलणे ऐकून आता आपल्याला संभाजीनगरला 7.00 वाजेपर्यंत जाणे शक्य होणार नाही असे मला वाटले. दर्शन लवकर होवू दे. आणि माझे कार्यक्रमाला वेळेत जाणे होऊ दे. अशी मी विठ्ठलाला मनोमन प्रार्थना केली. असे म्हणतात मनातून केलेली प्रार्थना देवाजवळ लवकर पोहचते. थोडया वेळात पत्र्याच्या शेडमधील गोल फिरण्याचे राऊंड पूर्ण झाले. आता आम्ही सरळ रेषेत असलेल्या रांगेत आलो. आणि दर्शनाची रांग पटापट पुढे सरकू लागली. आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो. विठ्ठलाची मनोहर मूर्ती पाहून इतका वेळ रांगेत उभा राहिल्याचा शिण निघून गेला. मन ताजेतवाने, प्रसन्न झाले. सकाळी 10.00 वाजता दर्शन पूर्ण झाले. मंदिराच्या बाहेर थोडी खरेदी केली. तेथून एका पाहुण्याच्या घरी गेलो. त्यांनी आग्रह करून जेऊ घातले. पंढरपूरहून निघायला दुपारचे 1.30 वाजले. तेथून आम्ही संभाजीनगरकडे निघालो. रात्री 7.30 वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचलो. कार्यक्रम आणखी सुरू झाला नव्हता. अण्णा येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभे असलेले दिसले. त्यांना पाहून नमस्कार केला. मला पाहून त्यांना खूप आनंद झाला. आमची भेट तीन महिण्यानंतर होत होती. त्यांनी हसून हातात हात दिला. मी त्यांची परवानगी घेवून खुर्चीवर बसलो. पाहुणे येतच होते. अण्णा सर्वांचे आपुलकीने स्वागत करीत होते.         

            कार्यक्रमासाठी अण्णांची तिन्ही मुले उपस्थित होती. ते तिघेही येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करत होते. मोठा मुलगा इंजिनिअर (अंगद), मधवा मुलगा मराठी भाषेतील सुप्रसिद्ध लेखक (अरविंद) आणि सर्वात लहान मुलगा राज्य प्रशासन सेवेतील अधिकारी (प्रदीप).

            अण्णांनी वयाची चाळीस ते पन्नास वर्ष अतिशय काबाडकष्ट केले होते. त्या कष्टांचं आज चीज झालं होतं. त्यांनी तिन्ही मुलांना चांगले संस्कार देवून आपापल्या पायावर उभे केले होते. आपली मुले यशस्वी झाली आहेत.ते आपली काळजी घेतात. आपल्याला जपतात. याचे समाधान आज त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. माणसाच्या जीवनाचा अंतिम उद्देश हा सुखी राहणे हाच असतो. आज खऱ्या अर्थाने अण्णांना सुखी पाहून मलाही खूप आनंद झाला होता. अण्णांवर प्रेम करणारी बरीचशी माणसं कार्यक्रमाला उपस्थित होती. त्यांचा आनंदी परिवार आणि त्यांच्यावर असलेल्या प्रेमाखातर त्याठिकाणी जमलेली माणसं हीच खरी अण्णांची संपत्ती होती.

           अण्णांच्या आणि माझ्या वयामध्ये 40 वर्षाचं अंतर आहे. तरीही त्यांनी माझ्याशी जुळवून घेतलं. नव्या पिढीशी कसं जुळवून घ्यायचं हे त्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे. साधारणत: तीन वर्षापूर्वी माझी आणि अण्णांची ओळख झाली. आता अण्णांचे आणि माझे अतिशय जिव्हाळयाचे आणि घरगुती संबंध आहेत. माझ्यापेक्षा वयाने वडील असतानाही अण्णांचे आणि माझे मित्रत्वाचे नाते आहे. सर्वांशी जूळवून घेणे, सर्वांशी आपुलकीने वागणे हीच त्यांची खासियत आहे. लहान असो, मोठा असो, श्रीमंत अथवा गरीब असो अण्णा सर्वांशी आपलेपणाने वागतात. अण्णांशी बोलताना समोरच्या माणसाला आपलेपणा जाणवतो.

            अण्णा सन 1978 मध्ये पाडळसिंगी या बीड जिल्ह्यातील छोट्याशा गावातून नोकरीनिमित्त संभाजीनगर येथे आले होते. ते शहर बसमध्ये वाहक म्हणून कार्यरत होते. तुटपुंजा पगार आणि शहरातील महागाई यामुळे संसाराचा गाडा हाकताना त्यांची तारेवरची कसरत व्हायची. पुढे मुलांची शिक्षणं सुरु झाली. त्यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण होत होती. पैसा कमी पडला तरी त्यांनी आपली इमानदारी कधी सोडली नाही. पैसा कमावण्यासाठी त्यांनी चुकीच्या मार्गाचा कधी अवलंब केला नाही. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्यावर चांगले संस्कार केले. आज त्याचा चांगला परिणाम म्हणजे त्यांची तिन्ही मुले आपआपल्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत.

          ‘अरविंद जगताप’ यांनी अण्णांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पाडळशिंगी येथील शेतामध्ये 75 झाडे लावली आहेत. हाच शुभ मुहुर्त म्हणून रामगड ता.जि.बीड येथे नविन सहयाद्री देवराईचं उद्घाटन केलं आणि 75 दुर्मिळ झाडं लावली. सहयाद्री देवराईकडून रामगडला येत्या दोन महिन्यात ते आणि त्यांची टीम पाच हजार नविन झाडे लावणार आहेत.चार वर्षापूर्वी अण्णांची बिजतुला केली होती. त्या बियांची हजारो रोपे राज्यात अनेक ठिकाणी बहरत आहेत. सावलीसारख्या आई बापासाठी लाखो झाडांची सावली पेरत राहू. असं ते नेहमी म्हणतात. अण्णा झाडांच्या रुपाने आपल्यासोबत कायम राहावेत आणि त्या माध्यमातून पर्यावरणाचेही संवर्धन व्हावे हाच त्यामागील मुख्य उद्देश आहे. आजच्या कलियुगात आपल्या वडीलांवर जीवापाड प्रेम करणारी मुले खूप कमी आहेत. त्यातीलच एक अरविंद जगताप आणि त्यांचे इतर बंधू. अरविंद जगताप कामानिमित्त गोरेगाव, मुंबई येथे राहतात. पण ज्यावेळी अण्णा आणि त्यांची भेट होते. त्यावेळी कोठेही असले तरी अरविंद जगताप अण्णांच्या पायाला हाताने स्पर्श करुन त्यांचे आशीर्वाद घेतात. आपण कितीही मोठे झालो तरी आपली संस्कृती जपायची असते. हे संस्कार अरविंद दादांना अण्णांकडूनच मिळाले आहेत. पांडळशिंगी या गावातील गावकरीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. शहरामध्ये स्थायिक झालो तरी आपली माणसं जपायची असतात. आपल्या गावाशी जोडलेली नाळ कधी तुटु द्यायची नसते. आपल्या गावातील लोकांशी असलेले आपले नाते नेहमी घट्ट ठेवायचे असते. असे अण्णा नेहमी बोलतात. आणि ते तसे बोलतच नाहीत तर त्याप्रमाणे कृतीही करतात. हे कार्यक्रमास गावकऱ्यांच्या उपस्थितीवरून त्यावेळी दिसूनही आले.

            अण्णांच्या कुटुंबाकडे पाहून खूप छान वाटले. अण्णांनी जीवनात येऊन खरे समाधान कमावले आहे. माणूस समाधानी असेल तरच सुख मिळतं. सुख हे समाधानावर आणि आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. अण्णा नेहमी आनंदी आणि समाधानी राहतात. त्यांच्याकडे पाहून जगण्यास नवी ऊर्जा मिळते. आज अण्णांची सर्व मुले आपापल्या पायावर उभी आहेत. ते सर्वजण अण्णांवर जीवापाड प्रेम करतात. अण्णांनी मुलांना चांगले संस्कार दिले. यामुळेच आजच्या जमान्यातील एक आदर्श बाप म्हणून अण्णांकडे पाहता येईल.

 

            अण्णांची तिन्ही मुले, सुना, नातवंडे आणि त्यांच्यावरील प्रेमाखातर आलेले पाहुणे व मित्र मंडळी पाहून मला संत जनाबाईंचा पुढील अभंग आठवला.

 

विठु माझा लेकुरवाळा

संगे गोपाळांचा मेळा

 

            अण्णांच्या भोवती गोपाळांचा मेळाच भरला होता. ते दृश्य सुखकारक होते. त्यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक माणूस त्यांचे स्वागत करीत होता. अण्णांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद झळकत होता. तो आनंद पाहून मलाही खूप आनंद झाला होता. आपल्या लेकरांना चांगले संस्कार देणारा बाप आणि आपल्या वडिलांना जीवापाड जपणारी मुले पाहून मला खूप समाधान वाटले.

             अण्णांच्या 75 व्या वाढदिवसाप्रसंगी (अमृत महोत्सव) माझ्या एक गोष्ट लक्षात आली. उतारवयात सुखाने आणि समाधानाने राहायचे असेल तर वडिलांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायला हवेत. मुले त्यांच्या पायावर उभी राहिली, ती चांगल्या प्रकारे स्थिरावली तरच बापाला खऱ्या अर्थाने आनंद मिळतो. आणि मुलांनी बापाला विठ्ठल समजून त्याची सेवा केली तर तो पंढरीचा विठ्ठल मुलांना काही कमी पडु देत नाही.

            बोला जय हरी विठ्ठल !