क्लिक
"क्लिकचा विरोधाभास : सौंदर्याला बंधन, उघडेपणाला स्वातंत्र्य?"
"देवळाच्या पायऱ्यांवर पाय ठेवताच एक शांत, गूढ, प्रसन्न लाट अंगावरून गेली. बाहेरच्या गोंगाटातून मन अलगद एका शांततेकडे सरकत होतं."
पावले आपोआप हलकी झाली.
गाभाऱ्यात प्रवेश करताच मनाचे कंप थांबले. समोर नजरेस पडली ती एक दिव्य मूर्ती — कापसासारखी शुभ्र, तरीही तेजासारखी झगमगती. आजूबाजूला रांगोळी, समया, हार-फुलांनी सजवलेली ती जागा. वातावरणात मंद धूपाचा वास आणि घंटानादाची सौम्य लहरी. संपूर्ण शरीर थरथरलं.
क्षणभरासाठी वाटलं — “हा क्षण जपून ठेवावा… कॅमेरात बंदिस्त करावा.”
इतकं पवित्र, इतकं शांत, इतकं सुंदर दृश्य पुन्हा पाहता येईल का?
हळूच हातातील फोन उचलला, पण नजर भिंतीकडे गेली...
"इथे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे."
त्या एका ओळीनं हात थबकले. कॅमेरा सुरू न करताच फोन परत खिशात गेला.
मन थोडं खट्टू झालं, पण स्वतःलाच समजावलं – "मनाच्या कॅमेरात घेतलंय ना, पुरे."
पण आतून एक सल कायम राहिला —
सौंदर्याला नियमांची बेडी का?
कारण हेच सौंदर्य समाजाला दाखवावंसं वाटतं.
हेच चित्र जगाला सांगावंसं वाटतं…
हीच पवित्रता आपल्याला जपून ठेवायची असते…
…आणि तेवढ्यात मनातला कॅनव्हास बदलतो…
त्या प्रसन्न मंदिरातून बाहेर पडलो. समोरच्या रस्त्यावर एक दृश्य...
एका कोपऱ्यावर एक तरुणी मॉडेलिंग शूट करत होती. अंगावर कपड्यांचा केवळ उल्लेख. पोझेस देत होती. तिच्या आजूबाजूला कॅमेऱ्यांचा मारा — काही DSLR, काही मोबाईल, काही व्हिडीओ. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास नव्हता, पण बाहेरून तो दाखवायचा प्रयत्न होता.
तिथे कुणी पाटी लावलेली नव्हती –
"इथे फोटो काढू नका."
कुणी सक्त मनाई केली नव्हती –
"इथे शील-संस्कृतीचे बंधन आहे."
इथे फोटोंचा उत्सव चालू होता.
क्षणभर गोंधळलो.
म्हणजे देवळाच्या गाभाऱ्यात – जिथे देव आहे, दिव्यता आहे, भक्ती आहे – तिथे फोटोंना मनाई?
आणि इथे – जिथे शरीर उघडं आहे, मन ओलांडून गेलेलं आहे, आणि कुठेही सौंदर्य नाही, तिथे उत्सव?
कुठे पवित्रतेवर बंधनं – आणि कुठे उघडेपणावर स्वातंत्र्य?
हा विरोधाभास झोंबतोय.
समाज काय म्हणतोय?
श्रद्धेचं चित्र – कॅमेरात नको.
शरीराचं चित्र – व्हायरल करा.
आतल्या गाभाऱ्यात साक्षात देव झोपलेला – त्याचं दर्शनही डोळे मिटून घ्यावं लागतं…
आणि रस्त्यावर उघडं उभं शरीर – ते मात्र डोळे भरून, कॅमेरा झूम करून टिपलं जातं!
हेच काय आपल्याला हवं होतं?
या देशात आपण "कामसूत्र" लिहिलं, पण "कर्मसूत्र" जगायला विसरलो.
देवळात श्रद्धा जपण्यासाठी नियम असतात.
रस्त्यावर दृश्य विकण्यासाठी खुले दरवाजे असतात.
जे अंतर्मन उजळवणारं असतं, ते बंधनात...
आणि जे वासनेला चाळवणारं असतं, ते खुलेआम…
लोक गाभाऱ्यात फोटो काढले, तर म्हणतात – "श्रद्धेचा अपमान होतो."
पण अर्धनग्न फोटोवर लाखो लाईक्स घेतले जातात, तर म्हणतात – "अभिव्यक्ती स्वातंत्र्य!"
हा विरोधाभास सोडवायला कोणीच तयार नाही.
जेव्हा आपण देव पाहतो, तेव्हा डोळे मिटतो…
जेव्हा शरीर पाहतो, तेव्हा क्लिक करतो.
कधी देवाच्या सान्निध्यात आलो, तर भावना जागृत होतात,
पण एखाद्या कमालीच्या नग्नतेपुढे आलो की भावना नाहीशा होतात –
फक्त दृष्टिकोन उरतो – "हे हिट होईल, वायरल होईल!"
कोणी काही सांगितलं, तर लगेच प्रतिक्रिया येते –
"माझं शरीर, माझा हक्क."
हो! तुझं शरीर तुझा हक्कच…
पण त्या शरीरात जर "संस्कार" असतील,
तर तो हक्क विचारपूर्वक वापरला जातो, प्रदर्शनपूर्वक नाही!
माझं शरीर, माझा अभिमान — या वाक्याची जागा
माझं शरीर, माझी प्रसिद्धी — यानं घेतलीये.
खरंतर फोटो कोणत्याही गोष्टीचा असो – तो 'भावनेचा आरसा' असायला हवा.
देवळात असो वा रस्त्यावर – सौंदर्याचं भान, मर्यादेचं भान, आणि श्रद्धेचं स्थान या सगळ्यांची जाणीव असायला हवी.
देवळाच्या गाभाऱ्यातला तो प्रसन्न क्षण…
तो मनात घर करून राहिला…
मग समोरचे कॅमेरे, झाकले-उघडलेले शरीर, समाजाचं दृश्यदर्शन…
या दोन टोकांमध्ये आपण नेमकं काय पाहतोय?
क्लिक करायचं तेव्हा
"दृष्टी" ठेवा, पण "दृष्टीकोन" हरवू देऊ नका.
शेवटची दोन ओळी — "मनाच्या कॅमेरात जपलेली श्रद्धा, मोबाईलच्या गॅलरीतल्या नग्नतेपेक्षा लाखपटींनी सुंदर असते."
"फोटो काढताना क्षण जपतो, पण मन गमावतो… हे विसरू नका!"
"क्लिक संस्कृती आणि आपली जबाबदारी"
कॅमेरा आज आपल्या खिशात असतो… पण नजर मात्र कुठे आहे? कोणते फोटो काढायचे, याचं भान आपल्याकडे असायला हवं.
समोरचा काहीही करत असेल – कमी कपडे, अर्धवट विचार, अंगप्रदर्शन… पण आपण काय टिपतो, ते आपली ओळख ठरवतं.
त्याला कदाचित संस्कार नसेल… पण आपल्याला ‘संस्कृती’ जपता आली पाहिजे – आपल्या मोबाईलच्या कॅमेरातून, आपल्या क्लिकमधून.
फोटो म्हणजे क्षण कैद करणं. पण ते क्षण ‘मूल्यवान’ असायला हवेत.
एखाद्या मंदिरात, एखाद्या आजीच्या हातातलं प्रेम, एखाद्या आईच्या चेहऱ्यावरील ओलावा… हे क्षण क्लिक करा.
शरीर नाही, संस्कार टिपा. उघडेपणा नाही, उर्जेचा प्रकाश टिपा.
कारण मोबाईल हातात सगळ्यांच्या असतो… पण दृष्टिकोन फक्त तुमचाच असतो!
सौ तृप्ती देव
भिलाई छत्तीसगड