Dushtachakrat Adkalela To - 15 in Marathi Thriller by Pranali Salunke books and stories PDF | दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 15

Featured Books
Categories
Share

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 15

साधिकाने शलाका आणलेले पाहून अजित आणि अभिमन्यू विचारात पडतात. तेवढ्यात आरती एकटीच खाली आल्याने अभिमन्यूला हायसे वाटते. शलाका घरात असताना श्रेया तिच्यासमोर येऊ नये असे त्याला मनोमन वाटते.

 

आरती : साधिका, तू हिला घेऊन का आली आहेस?

 

साधिका : काकी, ही फार उपयोगाची आहे आपल्या…

 

अभिमन्यू : हिला असं घरात घेऊन येणं धोक्याचं आहे…उगाच नको त्या फंदात मला पडायचं नाहीयेय…तुला हिला बाहेर सोडून ये…

 

अजित : अभि, साधिका बोलतेय त्याचा रोख माझ्या लक्षात आला आहे…मी तिच्याशी सहमत आहे…

 

आरती : मीही… आणि अभि हिच्याकडे कोणत्याही प्रकारची शक्ती नाही…

 

अभिमन्यू : आई….?

 

शलाका : हे बघा, तुम्ही मला सोडून द्या नाहीतर मी तुमची पोलिसांत तक्रार करेन…

 

आरती : अच्छा…हा घे माझा फोन….आणि लाव पोलिसांना फोन…मग मीही सांगेन…की कसं तू आणि तुझी मैत्रीण आम्हाला त्रास देते ते…

 

शलाका : आम्ही जे काही केलंय त्याचा पुरावा आहे का तुमच्याकडे?

 

साधिका : पुरावा तर मी देईन…आणि तू शलाका असं वागताना लाज नाही का वाटली? तुझे आई-वडील किती साधे भोळे आहेत… ते दोघेही तुझ्यासाठी कष्ट उपसत आहेस आणि तू ? तुझ्या आईला समजलं तर काय होईल याचा विचार केलास का? आणि हे सगळं करताना तुला काही झालं तर तिचं काय होईल हा विचारही तूझ्या मनाला शिवला नाही?

 

शलाका : मला काहीही होणार नाही, असं विनिता बोलली आहे मला… त्यामुळे मी का त्या गोष्टीचा विचार करावा…

 

आरती : अग मूर्ख मुली, हा विचार कर की ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासोबत हे असले प्रयोग करते मग तूझ्यासोबत तिने काय काय केलं असेल…ते तुला आठवत पण नसेल….जसं ती अभिला संमोहित करते तसच तुलाही केलं असेलच ना…

 

अजित : तिने हा असा विचार केला नसेल कदाचित आरती…

 

साधिका : त्या मुलीने हिच्या मैत्रीचा फायदा घेतला आहे…ती हीची चांगली मैत्रिण आहे हे दर्शवण्यासाठी तिला वेळोवेळी पैसे आणि इतर गरजेच्या वस्तू पुरवल्या..मग त्या विनिताने कुणाचा जीव घेतला तरी चालेल…हो ना ग?

 

शलाका : विनी, मला बोललेली की ती कुणाचा जीव घेणार नाही फक्त अभिमन्यू सरांना संमोहित करून आपलंस करणार आणि त्याच जोरावर त्यांच्याशी लग्नही करणार….

 

आरती : अच्छा, मग त्या श्रेयाचं काय ?

 

शलाका : तिचं काय? तिला फक्त ती घाबरवणार होती ती की सरांपासून लांब रहा…बाकी काही नाही…

 

आरती : पण विनिताने श्रेयाला घाबरवण्याचे कारण काय? उगाच त्या मुलीला किती त्रास सहन करावा लागला तुला माहिती आहे का ?

 

शलाका : अहो एकदा मीच श्रेयाच्या वहीच्या मागच्या पानावर तिने तिचं आणि सरांचं नाव लिहिलेलं पाहिलं…त्याच पानावर सगळीकडे अभिमन्यू असं लिहिलेलं होतं…आणि सरांची ती आवडती विद्यार्थीनी पण होती…

 

साधिका : म्हणजे श्रेया अभिमन्यूवर प्रेम करते….?

 

शलाका : हो, हे तिने माझ्याजवळ कबूल केलं होतं…

 

साधिका : आणि म्हणून तुम्ही तिला त्रास द्यायचं ठरवलंत…बिचारीच्या शरीरात एका अतृप्त आत्म्याला जागा करून दिलीत…म्हणून तुम्ही त्या सहलीचा प्लॅन केलात?

 

शलाका : काय ? आत्मा वैगरे काय? मला विनी एवढंच बोलली होती की तिला फक्त घाबरवणार मी…बाकी ती तिला काही करणार नाही…

 

अभिमन्यू : तू खरं बोलते आहेस…

 

शलाका : सर मी का खोटं बोलू…श्रेया आणि मी लहानपणापासून मैत्रिणी आहोत….शेजारी आहोत…मी तस वचन घेतलं होतं विनीकडून…

 

साधिका : तू खरं बोलते आहेस यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा…तू तर हल्ली देवपूजा पण सोडली आहेस.. 

 

शलाका : ते फक्त विनीला दाखवायला…आईमुळे मी नियमित देवाला हात जोडते…फक्त मधे महिनाभर आई नव्हती तेव्हा मी विनीच्या घरी राहायला गेले होते…त्यावेळी मी पूजा किंवा देवासमोर हात जोडू शकले नाही…कारण तिच्या घरी देव्हारा आणि देव नव्हता…

 

आरती : तू तिला याबद्दल विचारलं नाहीस…

 

शलाका : विचारलं, पण तिच्या वडिलांना हे देव आणि कर्मकांड आवडत नाही असं सांगितलं तिने मला…

 

साधिका : तुझी आणि तिची मैत्री कशी झाली हे तुला आठवतंय का ?

 

शलाका : मला हेच आठवतच नाहीयेय…श्रेयासोबतच्या छोट्या छोट्या गोष्टी आठवतात पण विनीसोबतची अशी कोणतीच आठवण नाही…

 

आरती : साधिका, हिच्यावर पण संमोहन विद्या वापरली होती… किंबहुना जरा जास्तच वापरली आहे…

 

साधिका : हो… मला कल्पना आलीच होती…जेव्हा मी हिला पहिल्यांदा भेटले तेव्हा…

 

शलाका : तुम्ही मला भेटला होतात… पण कधी मला का आठवत नाहीयेय…

 

साधिका : श्रेयाच्या घरीच भेटलो होतो…जेव्हा तिला बरं नाही म्हणून तिच्या आजीने मला बोलावलं होतं… असो तो प्रकार आता घडून गेला आहे त्यावर चर्चा नको…तुला अजून काही माहिती आहे तिच्याबद्दल?

 

शलाका : तस मला काही सांगता येणार नाही…मला जेव्हा वाटतं की मी हिला पूर्ण ओळखू लागले आहे तेव्हा ही नेमकं असं काही तरी करते की मला वाटतं मी हिला ओळखतच नाही…

 

आरती : बरं असू दे…तू जास्त ताण नको देऊस डोक्याला…आम्ही जे विचारू त्या प्रश्नांना उत्तरे दे फक्त…

 

अजित : मी आपल्या सगळ्यांसाठी चहा बनवून आणतो….

 

साधिका : काका जरा कडाक चहा करा हा… काय आहे रात्रभर फिरतेच आहे मी…

 

अजित : बरं…

 

साधिका : शलाका, तुला तिची दुखरी अशी बाजू माहिती आहे का?

 

शलाका : असं मला ठोस काही सांगता येणार नाही पण माझ्या घरी आली की तिला वाटायचं की माझ्या आईने तिलाही प्रेमाने जवळ घ्यावं, तिचे लाड करावे…मला वाटतंय तिची आई ही तिची दुखरी बाजू असावी…

 

आरती : ती काही बोलली का तिच्या आईविषयी?

 

शलाका : तिच्या जन्मानंतर तिची आई वारली त्यामुळे तिला आईचं प्रेम मिळालं नाही…पण तिच्या वडिलांनी तिला खूप लाडाकोडात वाढवलं आहे…ती जे बोलले, मागेल ते सगळं तिला मिळतं…

 

अभिमन्यू : पण मग माझ्या मागे का लागली आहे…मी तर तिच्या एवढा श्रीमंत पण नाही…

 

शलाका : तिला तुम्ही आवडता हेच माहिती आहे मला…बाकी काही नाही..

 

साधिका : मला वाटतं शलाका तूही तिच्यापासून लांब राहावंसं…

 

शलाका : हो पण मी ठरवून पण राहू शकत नाही…

 

आरती : असं का बोलते आहेस बेटा?

 

शलाका : काकू, मी हा प्रयत्न करून पाहिला होता पण परत मी तिच्यासोबतच असायचे…त्यामुळे त्यानंतर मी असा प्रयत्न करणं सोडून दिलं आहे…

 

साधिका : शलाका, याच्यावर पण मार्ग आहेत…पण सध्या तुला संयमाने घ्यावं लागेल…

 

शलाका : हो…

 

साधिका : तू आता घरी जा…आणि आराम कर… ठीके…

 

साधिका शलाकाला विविध सूचना समजावून सांगताना तिचे डोळे चमकले आणि नेमकं हेच अभिमन्यूने पाहिलं. शलाका निघून गेल्यावर आरती श्रेयाला आणायला गेली तर साधिका सर्वांसाठी चहा बनवायला गेली.

 

अभिमन्यू : बाबा तुम्ही पाहिलं का ?

 

अजित : काय ?

 

अभिमन्यू : अहो, साधिका जेव्हा शलाकाला सूचना देत होती तेव्हा तिचे डोळे चमकले…म्हणजे तिने शलाकाला संमोहित केलं असणार…

 

अजित : एका अर्थी बरच झालं ना….नाही तर तिने आपल्याला सत्य सांगितलं आहे हे त्या मुलीला कळेल…आणि साधिका साधक वर्गातली आहे म्हणजे तिला गोष्टी येत असणार ना ?

 

अभिमन्यू : हो..पण साधिका मला कायम विशेष अशी वाटते…म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं तुम्ही? तिला भेटल्यावर प्रसन्न वाटतं…काहीतरी दैवी आहे तिच्यात…

 

अजित : हो हे मलाही जाणवतं… खूप वर्षांपूर्वी मी अशाच एका साधकाला भेटलो होतो…बर मी काय बोलत होतो… तू साधिकाकडे विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण घे…

 

अभिमन्यू : बाबा, तिच्याकडे यासाठी वेळ असेलच नाही पण तरी मी तिला याविषयी विचारेन…

 

अजित : हो…

 

तितक्यात श्रेया आणि आरती खाली येतात. श्रेया आणि अभिमन्यूची नजरानजर होताच दोघांच्याही हृदयात एक कळ येते. खरं तर त्या दोघांनाही त्यांच्या एकेमकांविषयीच्या भावना माहिती झालेल्या होत्या. पण तरी कुठेतरी त्यांच्यात अवघडलेपणा होता. ही गोष्ट आरतीच्या लक्षात आली होती.

 

आरती : बस बाळ आणि अजिबात घाबरु नकोस…आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत…

 

ती कावरी बावरी होऊन सगळ्यांकडे पाहते. तोच अभिमन्यू नजरेने तिला आश्वस्त करतो. तेवढ्यात तिथे साधिका चहा घेऊन येते आणि त्यासोबत एका प्लेटमध्ये लाडू पण ठेवते.

 

साधिका : श्रेया…आता जरा कणखर हो… आणि सगळ्यातून बाहेर यायचा प्रयत्न कर…तरच तू त्या विनिताशी दोन हात करू शकशील…

 

अभिमन्यू : म्हणजे? विनिताचा हिला त्रास देऊन झाला आहे ना? आणि तिच्यासाठी श्रेया तिच्या गावी गेली आहे ना ? मग

 

साधिका : विनिता इतक्या सहज हिला आणि तुला सोडणार नाही…काहीतरी आहे जे माझ्याकडून निसटत आहे…मी शोधून काढेन ते पण तोवर तुम्ही एकमेकांची काळजी घ्या…

 

अभिमन्यू : साधिका, तूच आम्हाला काही मंत्र किंवा इतर काही शिकवत नाहीस…

 

साधिका : माझ्या पेक्षा इथे अनुभवी आहेत…त्याच शिकवतील तुम्हाला…हो ना काकू?

 

अभिमन्यू : मला काही समजत नाही तू कुणाविषयी बोलते आहेस?

 

साधिका : तुझी आई, तीसुधा एक साधक आहे आणि माझा अंदाज चुकत नसेल तर तारक होण्याचं प्रशिक्षण पण त्यांनी घेतलं आहे…

 

अभिमन्यू : आई खरंच तू ?

 

आरती : हो राजा… पण तुझ्यामागे ही विनिता लागली हे समजण्यात मात्र मला अपयश आलं आहे…पण यापुढे मी तुम्हा तिघांना काही संरक्षक धडे देणार आहे…समजलं ना…

 

अजित : अग मला कशाला ?

 

आरती : आताच काही वेळापूर्वी तुम्ही अनुभव घेतला आहे… तरी का विचारताय?

 

अजित : बर मी तरी तयार आहे… श्रेया आणि अभिमन्यू?

 

श्रेया : मीपण तयार आहे…

 

अभिमन्यू : मीपण …

 

साधिका : मला आणखी एका विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे…

 

ती त्यांच्याशी पुढे बोलणार इतक्यात दारावरची बेल वाजते आणि आता कोण आलं या विचारात सर्व पडतात. साधिका श्रेयाला घेऊन आरतीच्या खोलीत जाताच अभिमन्यू दरवाजा उघडतो. दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून त्याला आश्चर्य वाटतं. सफेद शर्ट त्यावर कोट आणि भगव्या रंगाचा मफलर अशा वेशातील व्यक्ती उभा होता. त्याच्या कानात सोन्याची कुंडलं होती आणि कपाळावर चंद्रकोर आणि अजून काहीतरी नक्षी होती. अभिमन्यू त्याचं निरीक्षण करत होताच की दारावर उभ्या असलेल्या व्यक्तीने आत येण्याची परवानगी त्याच्याकडे मागितली.

 

ती व्यक्ती : नमस्कार, भावा जरा ते दार लोटून घेतोस का?

 

त्याने असं म्हणताच अभिमन्यू मुख्य दरवाजा बंद करतो.

 

ती व्यक्ती : नमस्कार, मी श्रीपाद…मला आंजनेय गुरूंनी पाठवलं आहे…एक निरोप घेऊन…साधिका तू खोलीतून बाहेर येऊ शकतेस मीच आहे…

 

साधिका लगेच श्रेयासोबत बाहेर येते. तिला इतक्या दिवसांनी समोर पाहून श्रीपादचं हृदय जोर जोराने धडधडू लागतं. त्याला पाहून साधिकाला आनंद होतो पण ती तो चेहऱ्यावर दाखवत नाही.

 

साधिका : गुरूंनी तुला इथे का पाठवलं आहे…

 

श्रीपाद : त्यांना एक संकेत मिळाला आहे…ते तुला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते… त्यात तुझा फोनही लागत नव्हता…म्हणून मग त्यांनी मला इथे पाठवलं आहे… तू यांना कल्पना दिलीस का?

 

साधिका : अजून तरी नाही…मी आता तेच बोलणार होते तितक्यात तू आलास…

 

श्रीपाद : बर सुरू कर…

 

आरती : साधिका काय झालंय नीट सांगशील का ?

 

साधिका : हो काकू…

 

—-------------------------------------------------

 

-प्रणाली प्रदीप