तो बाहेर सोफ्यावर बसून शूज घालत होता.
ती : "अहो हे घ्या."
ती त्याच्या समोर डब्बा पकडत म्हणाला.
तो : "ठेव बाजूला."
तसे तिने तो डब्बा त्याच्या बाजूला ठेवला.
तो : "आज यायला उशीर होईल...आजचे माझे जेवण करायची गरज नाहीये."
ती : "ठीक आहे." आणि तो निघून गेला.
आज लग्न होऊन एक महिना झाला होता. म्हणायला फक्त राजा राणीचा संसार. पण खरच राजा ह्या राणीचा होता का?
तिने सगळे तिची कामे आवरली आणि आता टिव्ही समोर बसली.
समोर लावलेली गाणी पाहत होती पण मनात एकच विचार...
"आज लग्न होऊन एक महिना झाला... पण हे जवळ कधी येत नाही.. आधी वाटल अरेंज मॅरेज आहे म्हणुन असेल... पण आज एक महिना झाला... प्रेमाने बोलणे तर दूर... प्रेमाने पाहत पण नाही."
ती म्हणजेच सखी अमन सबनीस. अनाथ होती. खुप गोड आणि निरागस अशी साधी सरळ मुलगी होती ती. नाकी डोळे नीट, गोरीपान, लांबसडक काळेभोर केस, गुलाबी ओठ, शरीराने बारीक पण सुंदर होती. स्वभावाने मनमिळावू, सगळ्यांशी अदबीने वागणे, खुप बोलणारी. कदाचित हे सगळे पाहून त्याच्या आई वडिलांना ती सून म्हणून आवडली असावी.
त्याचे आई वडील एके काळी अनाथ आश्रम मध्ये जात होते तेव्हा त्यांनी तिला पाहिले. तेव्हाच त्यांनी ठरवले आपल्या अमन साठी हिच मुलगी त्याची बायको म्हणुन योग्य आहे.
आणि आज ती त्याची बायको होती. लग्न झाले त्याच्या दोन दिवसांनी आता गावचे सगळे पाहायचे म्हणुन त्याचे आई वडिल गावी निघून गेले.
शिक्षण जरी जेमतेम बारावी होते. पण स्वयंपाकाची प्रचंड आवड होती तिला. जेवण खुप उत्तम बनवायची. शिवाय ती मेहेंदी आणि रांगोळी ही छान काढत होती. तिने पार्लरचा ही कोर्स केला होता.
आता वेळ जात नव्हता म्हणुन ती जॉब शोधत होती.
तो म्हणजे अमन संदीप सबनीस. मध्यम बांधा, मध्यम उंचीचा, सावळा रंग, दिसायला अगदी राजबिंडा होता.
त्याचे ग्रॅज्युएशन झाले होते. अमन एका मल्टीनेशनल कंपनी मध्ये मॅनेजर होता. स्वभाव तसा शांतच होता. कामाशी काम ठेवायचा.
बोलणे फार कमी असायचे.
रात्री 9 वाजता ती जेवली आणि सगळे आवरले. थोडा वेळ टिव्ही पहिला आणि मग बेडरूम मध्ये जाऊन झोपली.
तो रात्री एक वाजता आला. फ्रेश होऊन तिच्यापासून अंतर ठेवून तो झोपी गेला. हे रोजचेच झाले होते. तिनेही डोळ्यात आलेले अश्रू पुसले आणि दुसऱ्या बाजूला चेहरा करून झोपून गेली.
दुसरा दिवस रविवार होता. सकाळी तिला जाग आली तशी ती उठली. बाजूला तो झोपलेला दिसला. शांतपणे झोपून होता. पाच मिनिटे ती त्यालाच न्याहाळत होती. रोजचा तिचा असाच दिनक्रम असायचा त्याच्या आधी उठायची आणि अशीच त्याला पाच दहा मिनिटे पाहत बसायची.
थोड्या वेळाने उठली तिने तिचे आवरले. आज तिने मुद्दाम साडी नेसली. धुतलेले केस क्लिप मध्ये अडकवून ती चहा नाश्ता बनवायला गेली.
त्याला आवडतात म्हणुन तिने साबुदाण्याचे वडे बनवले. एके बाजूला चहा पण केला.
इतक्यात तो ही आवरून बाहेर आला. दरवाजाला लावलेले वर्तमानपत्र घेऊन डायनिंग टेबलवर बसत तो वाचू लागला.
तिने नाश्ता आणि चहा आणून त्याच्यासमोर ठेवले. त्याने लगेच खायची सुरवात ही केली. त्याने तिच्याकडे पाहण्याची तसदी हि घेतली नाही. तसा तिचाही हिरमोड झाला आणि ती किचन मध्ये येऊन तिथेच बसुन तिने नाश्ता आणि चहा घेतला.
आणि ती दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागली. इतक्यात त्याने आवाज दिला.
अमन : "माझे जेवण बनवू नकोस... मी बाहेर जात आहे."
असे म्हणुन तो आत बेडरूम मध्ये निघून गेला.
तिला हे आता नेहमीचे झाले होते. प्रत्येक रविवारी तो बाहेर जायचा कुठे जात आहे हे त्याने कधी सांगितले नाही... नाही तिने कधी विचारले.
तिने तिच्यापूर्ती खिचडी बनवली. दुपारी दोनच्या सुमारास तो तिच्यासमोरून घराबाहेर पडला. पण तो एका शब्दाने देखील बोलला नाही. निघतो म्हणुन.
तसा तो आजपर्यंत कधी बोलला होता जे तो आज म्हणणार होता.
आज नेमका तिच्या जिवाभावाच्या मैत्रिणीचा शिवन्याचा कॉल आला. लग्न होऊन महिना झाला तरी सखी तिला भेटायला तयार होत नव्हती. शेवटी तिच्या हट्टापुढे सखी तिला भेटण्यासाठी तयार झाली.
ती अजून किती टाळणार होती. कोणतीही मैत्रीण हा प्रश्न जरूर विचारते कशी आहे लग्नानंतरची लाईफ. आणि तिला ह्याचीच भीती होती. शिवाय तिची ती जवळची मैत्रीण असल्यामुळे ती हिला चांगलीच ओळखून होती.
जेवून भांडे आवरून ती तयार व्हायला खोलीत निघून गेली. छान असा अनारकली ड्रेस घालून, साधा सिंपल मेकअप करून ती घराबाहेर पडली.
शिवन्या भेटल्यावर दोघींनी ही एकमेकींना कडकडून मिठी मारली. लग्न झाल्यापासून ती तिला भेटली नव्हती म्हणुन आता थोडी भावनुक झाली. त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू आले.
शिवन्या : "काय ग... वेडे रडतेस काय... तुला काही त्रास तर नाही ना?"
तिला बाजूला करत ती म्हणाली.
सखी : "अग नाही आपण खुप दिवसांनी भेटत आहोत ना त्यामुळे हक्काची अशी तूच आहेस म्हणुन जरा."
शिवन्या : "ऑ... मी नेहमीच असणार तुझ्यासाठी... त्यामुळे नो रोना धोना." तिचे डोळे पुसत ती म्हणाली.
सखी : "हो ग... "
शिवन्या : "बाकी तुझी मॅरेज लाईफ कशी चाललीय."
सखी : "मस्तच..." ती उसने हसत म्हणाली.
दोघी ही आता डॉमिनोज मद्ये जाऊन बसल्या. खुप दिवसांनी आज पिझ्झा पार्टी करावी म्हणुन तिकडेच गेल्या.
दोघीही कोक पित मनभरून खाल्ल्यावर बाहेर पडल्या. जवळच एक गार्डन होते तिथेच निघुन गेल्या. गप्पा मारत एक राऊंड मारल्यावर त्या एका बेंच वर येऊन बसल्या. पाठच्या बेंच वर एक कपल लवी डवी गप्पा मारत होते. ते त्यांना ऐकु येत होते थोडेफार...
मुलगी : "बेबी तु माझ्यावर खूप प्रेम करतोस ना."
मुलगा : "हो..."
मुलगी : "बेबी मी काय म्हणते .... नेक्स्ट वीक माझा ग्रुप गोव्याला जात आहे."
मुलगा : "मग..."
मुलगी : "मग या वेळेला सुद्धा तु येशील ना माझ्यासोबत."
मुलगा : "बघु... सुट्टीच पाहावं लागेल."
मुलगी : "ते काही मला माहित नाही... तु माझ्यासोबत मला हवा आहेस... का तुला तुझ्या बायकोला सोडवत नाही आहे."
मुलगा : "स्टॉप इट लीना... आता ती आपल्यात कुठून आली... तिचं नावही नाही घ्यायचं... मी तिच्याशी साधं बोलत ही नाही...आणि तु आहेस की नको ते संबंध जुळवते आहेस."
हे संभाषण ऐकून दोघीही आता एकमेकींकडे आश्चर्याने पाहू लागल्या. दोघी ही तिथे न पाहता उठून गार्डन बाहेर निघाल्या.
शिवन्या : "कसला नालायक माणूस आहे... लग्न झालं तरी अफेअर करतोय."
सखी : "हो ना... आणि जर ह्याच्या आयुष्यात जर आधीच कोणी आहे तर बायको झालेल्या मुलीच आयुष्य तरी का उद्ध्वस्त केलं ह्याने... किती निर्लज्ज माणूस आहे."
हे बोलून तिलाही आठवले. "आपला नवरा तरी आपल्याशी कुठे नीट आहे.. ना बोलतो ना काही... कदाचित त्याचे असे काही नसेल ना... नाही नाही शक्यच नाही... पण जर असले तर... नाही नाही असे काही नसेल.... आजच विचारते... टेन्शनच नको."
शिवन्या : "जाऊदे सोड आजची दुनिया ही अशीच आहे....पैसेवाला मुलगा न बघता एखादा प्रामाणिक मुलगा शोधेन मी माझ्यासाठी."
सखी : "तुला कसं कळलं तो पैसेवाला आहे."
शिवन्या : "अग थोडीफार एके बाजूने त्याची झलक दिसली... आणि मुलगी अग कसली हाय फाय आहे... श्रीमंतांची कोणती मुलगी गरीब मुलाच्या प्रेमात पडेल."
सखी : "ते तर आहे ग... जाऊदे... चल आता भाजी घेऊन मार्केट मधुन."
दोघी ही भाजी घ्यायला मार्केट मद्ये गेल्या.