पापक्षालन भाग 4
तत्पूर्वी महाराज आणि आचार्य यांची भेट घेणे निकडीचे होते. सेवक वर्गाच्या ताफ्यातून कटूभिल्ल, महाराजांच्या सेवेतील राजनिष्ठ घराण्यांपैकी चंडवर्धन यांचे वंशज अशी नेमकी मंडळी घेऊन तेजदत्त थिरुकोट्टाला रवाना झाले. कटू भिल्लाला पाहताच महाराजांना दुःखावेग आवरेना.तेजदत्तांच्या कर्तृत्वाची साक्ष त्यांना पुरेपूर पटली. आचार्यांसमोर अधोवदन तेजादत्तांना महाराज म्हणाले, “दत्त! आचार्यांचे पदवंदन करा.” लज्जित झालेले तेजदत्त कापऱ्या स्वरात म्हणाले, “हा देह अपवित्र आहे महाराज... .. . . . .”
“वारांगनांचे बिभत्स कामोत्तेजक नेत्रांनी अवलोकिले आहेत. त्यांचे अपवित्र स्पर्श आणि मदिरा मांसाहाराने विटाळलेला आहे हा देह... . . . . देवतुल्य आचार्यांच्या मंगल चरणांना स्पर्श करण्याचे पावित्र्य आता माझ्याकडे उरले नाही, तात!” दत्तांचे कथन ऐकून आचार्य आसनावरुन उठले. दत्तांच्या मस्तकाचेअवघ्राण करुन ते म्हणाले, “कुमार . . . . सर्वसामान्यांच्या धर्मापेक्षा राजधर्म भिन्नअसतो. वर्ज्य गाष्टींच्या संदर्भातही धर्माने राजांसाठी खास मुभा दिली आहे.साक्षात जागन्मातेनेही असूर निर्दालनासाठी सिद्ध होण्यापूर्वी मदिरापान केले होते. इतकेच नव्हे तर असुरांचे रुधिरही तिनेप्राशिले. म्हणून तिची सात्विकता- मांगल्य तिळमात्रही उणे झाले नाही. ज्या वर्ज्यगोष्टी प्रत्यक्ष महाराजांच्या आदेशानेच तुम्ही केल्यात त्या कां मला ज्ञात नाहीत? तो राजधर्म आहे आणि राजनीतीचाही भाग होता. तुमच्या संकल्पित कार्यपूर्तीसाठी तुम्ही आचरिलेला तो शिष्टाचारच होता.”
“कुमार! तुमच्या कार्याचा संशय घेतला जाऊ नये यास्तव त्या निषिद्ध गोष्टीही तुम्ही करणे आवश्यक आहे. हा उपदेश थेट तुम्हाला करणे अनुचितवाटले म्हणून आम्ही तो तुमच्या पित्याच्यामुखे करविला. यातले मर्म तुम्ही लक्षात घ्यावे. दत्त! तुम्ही पवित्र आहात. आपल्या हातून योंजनेचा एक भाग म्हणून कां होईना अमंगल गोष्टी घडल्या याबद्दल जी खंत तुम्हाला वाटत आहे तेच तुमच्या पापक्षालनार्थ पुरेसे आहे. त्या निषिद्ध बाबी ही तर तुमच्या संकल्प सिद्धीतली अनिवार्य आन्हिके होती अन् ती केवळ कर्तव्यपूर्तीच्या भावनेने तुम्ही पार पाडलीत. विभवेवर कब्जा करुन राहिलेल्या दुष्ट अनाचारी सत्ताधारीना सत्ताभष्ट करुन तुम्ही शासन कराल आणि सत्याचे न्यायाचे राज्य प्रस्थापित होईल तेव्हा पूर्वी घडलेल्या अमंगल कृत्यांचे पूर्णांशाने परिमार्जन होईल!” आचार्यांचे कथन ऐकून निःशंक झालेल्या तेजदत्तांनी आचार्यांच्या चरणांना स्पर्श करुन साष्टांग प्रणिपात केला. आपल्या कामगिरीचा सविस्तर वृत्तांत कथन करुन विभवेचे राजसिंहासन काबिज करण्याचे सामर्थ्य प्राप्त केल्याचे आत्मविश्वासाने स्पष्ट केले.
महाराज आणि आचार्य दोघानाही दत्तांचे कथन ऐकून संतोष झाला. प्रसन्नचित्त आचार्य म्हणाले, “तेजदत्त! भविष्यात जो नृशंस नरसंहार तुम्ही करणार आहातत्याचा संकल्प आम्ही उच्चारणार आहोत. शेवटी सत्य आणि सत्धर्म यांची प्रतिष्ठापना या हेतूने प्रसंगी अशिष्ट अश्लाघ्यअसे मार्गही कदाचित तुम्हाला अवलंबावे लागतील. त्यावेळी कोणताही संदेह मनात येऊ देऊ नका. त्या विशिष्ट परिस्थितीत तसे अयोग्य-कुटिल वर्तन तुम्ही केलेत तरी ते धर्माचरणच ठरेल. तो तुमचा आपद्धर्म असेल. कारण त्यामागे असलेला तुमचा हेतू हा वैयक्तिक नसून पवित्र आर्य संस्कृतीचे पुनरुत्थापन हा आहे. त्यासाठीसाम-दाम-दंड-भेद नीतिचा अवलंब करुन तुम्हांला सत्ता काबिज करायची आहे,तीच तुमच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे.”
“तेजदत्त! महाभारत युद्ध सुरु असता कृष्णानी पांडवांना दिलेले-प्रसंगी क्षात्रधर्माची पायमल्ली करणारे आदेश सुद्धा धर्मसम्मत ठरतात तेयाच निकषांवर ! खड्गाचा घाव ढालीवर झेलावा असे सज्ज्न सांगतात. मात्र पापबुद्धीनेकेलेला असा घाव ढालीवर झेलल्यानंतर तो करु धजावणाऱ्या पातक्यांवर मर्मघाती प्रहार करुन त्याचा शिरच्छेद करून त्याने केलेल्या पापकृत्याचे परिमार्जन करणे हा सुद्धा धर्मच आहे..... तो श्रेष्ठ धर्म आहे !दुराचारी अधम सत्ताधिशांचे निखंदन करताना साधन-शुचिता, ईष्ट-अनिष्ट, योग्यायोग्यता यांचा संभ्रम तुमच्या मनी निर्माण झाला तरमात्र तुमचाच सर्वनाश ओढवेल. सत्यप्रस्थापनेसाठी कूट नीतीचे आचरण कसे करू? अशी भ्रांत तुम्हाला पडली तर ते तुमचे पापाचरण म्हणून मापिले जाईल. या गाष्टीचे सतत भान ठेवा. नीतिच्या प्रतिष्ठापनेसाठी अनितीचा अवलंब करणे हा श्रेष्ठ क्षात्रधर्म आहे !”
दीड तपाहूनही अधिक काळानंतर विभवेवर तेजादत्तांचे साम्राज्य प्रस्थापित होण्यासाठी संकल्पित कार्याचा मुहूर्त दिन आचार्यांनी निश्चित केला. नियोजित कार्यात निर्वेध यशप्राप्ती होण्यासाठी कोटी चंडीस्वाहाकार विधी योजण्यात आला. खुद्द आचार्यांच्या पौरोहित्याखाली संकल्प उच्चारणकरुन तेजदत्तांनी सर्व धर्मकृत्ये यथासांग पूर्ण केली. आचार्यांनी तेजदत्तांना आशिर्वाददिले. त्यांनी विभवेवरील अनाचारी सत्ताधिशाना राजसिंहासनावरुन दूर केल्यानंतर धर्माचे, न्यायाचेसाम्राज्य प्रतिष्ठापित करण्यासाठी तेजदत्ताना संकल्पित कार्यात निःसंशय यशप्राप्तीहोणार याचा जणू तो शुभसूचक संकेत वाटला. ते नि:शंक मनाने विभवेकडे मार्गस्थ झाले.विभवेतील विद्यमान सत्ताधिश पदभ्रष्ट झाल्याची वार्ता येईपर्यंत,दत्तांच्या कार्याला जगत्मातेचे आशिर्वाद लाभावे या हेतूनेदेवी सहस्त्र नाम पुरश्चरण महाराजानी सुरु केले. तेजदत्तानी विभवेत पोहोचल्यावरसातही व्यापार केंद्रांमध्ये भेट देऊन संभाव्य मोहिमेचा संकल्प आपल्या विश्वासू साथीदारांना कथन केला. योजना मूर्त स्वरुप घेऊ लागली.संकल्पित दिनी दोन सहस्त्र अश्वस्वारांची सशस्त्र तुकडी घेऊन स्वतः तेजदत्त राजधानीवर स्वारी करुन राजासिंहासन ताब्यात घेणार होते. त्याचवेळी सातही व्यापार केंद्रावरीलरक्षकांनी व्यापारी पेठा कब्जात घ्यायच्या होत्या. सत्ताधिशाना पूर्णपणे कोंडीतपकडून नामोहरम करीत विभवेवर कब्जा मिळवायची ही योजना ऐकून सर्वजण प्रभावित झाले.
तेजादत्तांच्या योजनेचे खरे यश राजधानीवरील हल्ल्याच्या यशावर अवलंबून होते. राजधानीमध्ये सहस्त्रावधी यवन सैनिक आणि राजसेवेतील अधिकारी वर्गाची रक्षक दले अशी कुमक एकवटलेली होती. यशाची खरी मदारआचार्यांनी सिद्ध केलेल्या लोहपट्टीकास्त्रावरच होती. विजयप्राप्ती किंवा आत्मसमर्पण अशा निर्धाराने विजोच्या लखलखाटा प्रमाणे हल्ला करुन राजसिंहासन कब्जात घ्यायचे होते. ते मुख्य केंद्र ताब्यात आल्यानंतर मग संपूर्ण विभवेवर वर्चस्व निर्माण करणे फारसे अवघड नव्हते. संकल्पित दिन जवळ येऊ लागला तसतसा एक एक वीर राजधानी लगतच्या व्यापारी पेढीवर रुजू होऊ लागला. संकल्पित दिनाच्या चार दिवस अगोदर तेजदत्तांची तुकडी सज्ज झाली. दत्ताना अभुतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. राजधानीत प्रवेश करणाऱ्या चार मुख्य मार्गानी दत्तांच्या फौजेच्या चार तुकड्या प्रवेश करणार होत्या.
तेजदत्तांचे आणि विभवेचे भवितव्य निश्चित करणारा दिवस उजाडला. शत्रू पूर्णतः गाफिल होता. सूर्योदयाला एक प्रहर राहिला असतादत्तांच्या सैन्याने रणशंग फुंकले. “जय महादुर्गामाता” “हर हर महादेव” या घोषात एकाच वेळी चार महामार्गांनी दत्तांच्या सेनेच्या चार तुकड्या राजधानीत शिरल्या. चौक्या पहारे काबीज करत सेना पुढे निघाली. (क्रमश:)