She is as desired! in Marathi Short Stories by vaishnavi books and stories PDF | हवीहवीशी ती!

Featured Books
Categories
Share

हवीहवीशी ती!

ती,

एका गरीब कुटुंबातील एक ती. जन्म होताच आई ला गमावले आणि काहीच दिवसात वडील देखील वारले.चार बहिणी एकमेकांना समजून उमजून राहू लागल्या. ती सर्वात लहान आणि तीन बहिणींची लाडकी. घरात जे काही आणले जात ते आधी तिला भेटत असे. तीन ही बहिणी अशिक्षित अडाणी पण तिला शिकवले अगदी चिकाटी ने आणि ती देखील अगदी जिद्दीने शिकली .

शाळेत म्हणा किंवा कॉलेजात अगदी लांब लांब पर्यंत चालून प्रवास करत. कधी नवीन पुस्तके नाही की नवीन शाळेचा गणवेश नाही जे काही असेल ते जुनेच, परंतु कधी तक्रार केली नाही. बऱ्याच वेळा खायला देखील शिळे अन्न असे. तरीही अगदी हुशार आणि चलाख. 

कमी आहे म्हणण्यापेक्षा जे आहे त्यात समाधानी राहणारी , ती.

शाळे बरोबरच आपल्या बहिणींना देखील मदत करत असे. घरोघरी धुणी भांडी किंवा कपडे धुणे असे काम करत.

अगदी जबाबदार मुलगी हां!

शिक्षण झाल्यावर लग्न झाले , वय तसं कमीच बरं का पण परिस्थिती समोर कुणाच काय चाललं!

आई वडिलांची कमी तशी लहानपणा पासूनच होती.पण लग्न झाल्यावर ती आपल्या सासू सासऱ्यामध्ये  आई वडिलांची कमी शोधू लागली.नवरा देखील चांगलाच म्हणायचा पण स्वभाव एकदम रागीट , जिद्दी आणि हेकेखोर. एवढे असूनही खंबीर आणि तिच्या पाठीशी असणारा.

लग्नाच्या दोन वर्षानंतर आणि प्रयत्नानंतर सरकारी नोकरी ची नोटीस आली आणि इतक्या कष्टाचे सार्थ झाल्यासारखे वाटले .नोकरी साठी बाहेर गावी जाऊन रहावे लागले . नवरा कमी शिकलेला म्हणून अशी चांगली नोकरी लागणे काही शक्य नव्हते तरीही तो तिच्या सोबत गेला आणि जे असेल ते काम करण्याची तयारी दाखवली आणि दोघे बाहेर पडले आणि आपल्या आपल्या कामाला आणि सुखी संसाराला लागले.  बरं पण हा संसार देखील सोपा नव्हता बरं तिच्यासाठी. सगळ अगदी व्यवस्थित चालू असलं तरी एका गोष्टीची कमी होतीच . आणि ती एक गोष्ट म्हणजे ...

त्या दोघांचा संसार पूर्ण करणारं, तीला पूर्णत्वास नेणार तीच बाळं.

लग्नाची पाच वर्षे झाली पण तिची कुस काही उजवत नव्हती.नवऱ्याकडच्या सगळ्यांनी तिला बोल लावले अगदी आई समान जपलेल्या सासू ने देखील. अगदी तिच्या नवऱ्याला दुसर लग्न करण्याचे सल्ले देखील दिले. पण समजून घेणार नवरा तिच्या पाठीशी होता.त्याने दुसर लग्न करण्याला साफ नकार दिला . डॉक्टर चे सल्ले आणि श्रद्धेने केलेलं नवस फळाला आले .तिला दिवस गेले .

परंतु हे देखील ऐकायला चांगले वाटते तेवढे सोपे आणि साधे नव्हतेच. 

काही कारणाने तिचे छातीचे ऑपरेशन करावे लागले आणि ऑपरेशन दरम्यान डॉक्टर ने सांगितले की ती तर गरोदर आहे .हे ऐकताच तिच्या नवऱ्याला कळेनासे झाले , हे ऐकून आनंदी व्हावं की अशा परिस्थितीत जीवाला धोका होईल याची चिंता करावी. 

परंतु देव तारी त्याला कोण मारी!

सगळ्यांनी सगळं काही व्यवस्थित होईल या आशेवर आणि देवावर विश्वास ठेवायचे ठरवले.दिवस भरत गेले आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसे अगदी सातव्या महिन्यात तिला कळा सुरू झाल्या. 

हो नाही म्हणता म्हणता त्यानं एक गोड गोंडस मुलगी झाली .अगदी नाजूक , हाताच्या कोपऱ्याएवढी बारीक , गोड आणि सगळ्यांची लाडकी!

बघता बघता दोन वर्षांनी आणखी एक मुलगी झाली.इथेही बोलण्याची कमी नव्हती बरं का, दोन्ही मुलीचं झाल्या एखादा मुलगा हवाच वंश वाढवायला असे शब्द सतत वार करत असतं, इथे देखील नवऱ्याने तिची बाजू घेतली आणि खाणकाऊन सांगितले या मुली आमच्या साठी मुलेच आहेत , कदाचित मुलांपेक्षा ही जास्तं.

संसार, मुलं आणि काम सगळ अगदी व्यवस्थित चालू होतं . मुलींचं शिक्षण देखील व्यवस्थित चालू होतं.

एक दिवस असा आला की अजून ही जीव अगदी हातात येतो. कामाला जाताना तिचा नवरा अगदी रोज न चुकता तिला सोडायला व आणायला जात असे परंतु त्या दिवशी तो काही कारणानिमित्त जाऊ शकला नाही आणि ती रिक्षा ने जायला निघाली आणि नेमका रिक्षाचा अपघात झाला, रिक्षा चालकाने दवाखान्यात नेण्याचा देखील प्रयत्न केला परंतु शहर फार काही सुधारीत नसल्याने बऱ्याच दवाखान्यात भरती करून घेण्यास नकार दिला. शेजारच्या दुसऱ्या शहरात नेणार तोपर्यंत तिने साथच दिली नाही आणि दुखणं सहन करत तिने श्वास सोडला.

परंतु तिच्या स्वभावाने आणि मनमिळाऊ वागणुकीमुळे ती आजही अगदी बारा तेरा वर्षाने देखील सगळ्याच्या मनात अगदी जशास तशी आहे. जणू ती प्रत छापली गेली आहे.

अशी होती ती, प्रेमळ, खंबीर , निस्वार्थी अगदी हवीहवीशी.