आज नऊ वर्ष झाली, तू शहरात शिकण्यासाठी म्हणून गेलास, पण अजूनही परतला नाहीस. कानावर गोष्टी आल्या,तुला तिथे चांगल्या पगाराची नोकरीं लागली आहे. कदाचित, आता तू तिथेच राहशील. मग खरच तू परतणार नाहीस का रे?... माझ्यासाठी.....
बिचारी अनु, सुमितच्या घराकडे टक लावून पाहत होती. मनात सगळ्या जुन्या आठवणी बेभान होऊन नाचत होत्या. सुमित, तिचा जिवलग सखा, बालपणीचा सोबती. शिकायला म्हणून शहरात गेला ते अजून परतलाच नाही. अनु, मात्र अजूनही त्याच्याच आठवणीत दिवस घालवत आहे.
अनु, अग तिथे का उभी आहेस? ये ना आत!... कुसुमने म्हणजेच सुमितच्या आईने अनुला घरात बोलवलं.
काय ग अशी तिथे का उभी होतीस?.. यायचं ना घरात बाहेर बघ किती पाऊस पडतोय?... कुसुम बाहेर डोकावत म्हणाल्या. पण, त्यांना काय माहिती अनुच्या मनात तर त्यांच्या सुमितच्या आठवणींचा पाऊस धो धो कोसळत आहे.
आवरलं का काकू सगळं?... तिने उगाच उसन हसू चेहऱ्यावर आणत त्यांना विचारलं. सुमितशिवाय हे घर तीला खायला उठायचं. लहानपणीच्या किती आठवणी होत्या या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात. सगळीकडे तिचा आणि सुमितचा नुसता दंगा दंगा सुरु असायचा.
आम्ही परवा जातोय सुमितकडे, काकू म्हणाल्या, आणि ती पटकन आठवणीतून बाहेर आली.
तो नाही का येणार इकडे?.... तीला विचारायचं होत, पण आवाजच फुटला नाही.फक्त एक निर्वीकार हसू होत तिच्या चेहऱ्यावर.
कुठली तरी मुलगी पसंत केलीय तिकडे म्हणे त्याने, सोबत असते त्याच्या ऑफिसमध्ये. पट्ट्याने आता आम्हाला सांगितलं. बघू जाऊन ठरवून येऊ. लग्न तरी इकडेच करू बाई त्याच.... कुसुम काकू बरच काही बोलत होत्या. आणि इकडे अनु दुःखाच्या खोल डोहात पूर्ण बुडाली होती. सुमितला कोणीतरी आवडत, त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे, ऐकूनच तीच हृदय तूटलं.
मी आलेच काकू.....
बोलून ती पळतच सुटली. खोलीत आल्या आल्या तोंडात ओढणीचा बोळा धरून हुंदके देत रडू लागली. किती प्रेम करायची ती सुमितवर आणि आज तोच तिच्यापासून दूर चालला होता.पूर्णपणे विसरून गेला होता तो तीला.
तो दुसऱ्या कुणाचा तरी होणार होता, कस सहन करणार होती ती सगळं.
अनु काय झालं राणी? डोळे का सुजलेत असे?.... अनुच्या आईने काळजीने विचारलं. त्या तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत म्हणाल्या.
काय नाही आई,मला झोप लागली नव्हती खूप वेळ म्हणून डोळे सुजलेत. तिने कसबस हसत सांगितलं. आईने पण तिच्यावर विश्वास ठेवला.
रात्री अंथरुणावर ती तडफडत होती. सुमितचे विचार तिच्या डोक्यातून काही केल्या जात नव्हते. लहान असताना किती काळजी घ्यायचा सुमित तिची. वेड्यासारखं एकमेकांना वचन देत राहायचे, कायम सोबत राहायच, मोठे झाल्यावर लग्न करायचं आणि बरच काही. लहानपाणीच भातुकलीचा खेळ त्यांचा. आणि त्या खेळातले ते राजा राणी.पण आता त्यांची ती कहाणी अधुरी राहणार होती. कारण तिचा राजा दुसऱ्या कुणासोबत तरी भातुकलीचा संसार मांडणार होता.मध्ये बरेच दिवस गेले आणि एक दिवस समजलं सुमितच लग्न ठरलं. किती रडली होती ती त्यादिवशी. कस आणी किती लपवलं होत तिने स्वतःला सगळ्यांपासून.
आई कुठे निघाली आहेस एवढ्या लवकर?, एक दिवस असच तीची आई लवकर आवरून बाहेर जात होती म्हणून विचारलं.
अग कुसुमताईने बोलवलय तांदूळ निवडायला, साखरपुडा आहे ना सुमितचा. नशीब लग्नासाठी का असेना गावाकडे आला, नाहीतर शिकायला म्हणून गेला ते तिकडचाच होऊन गेला..... आता काही तो परत येणार नाही बघ,.. तीची आई बडबडत हातातल उरलंसुरल काम आवरत होती.ती मात्र खिन्नमनाने ऐकत होती, पाहत होती.
बर चल!.. मी जाते तुझं आवरलं कि ये तू पण तिकडे... बाहेर जाता जाता मागे वळून बघत तिच्या आईने तीला सांगितलं. तिने फक्त मान हलवली.
आई गेल्यावर ती तिच्या खोलीत गेली. लहानपणीच्या आठवण म्हणून ठेवललेल्या सगळ्या वस्तू तिने बाहेर काढल्या. त्यावरून प्रेमाने हात फिरवला.डोळे भरून आले होते तिचे. हिम्मत करून तिने त्या वस्तू एका गाठोड्यात बांधल्या, मागच्या दरवाजातून बाहेर पडत, तिने जरा आजूबाजूला डोकावून पाहिलं. कोणीच नव्हतं. तिने दीर्घ श्वास घेतला, आणि पळतच पुढेही गेली. आजूबाजूचा सुका कचरा गोळा करून तिने ते गाठोड पेटवून दिल.तीची सगळी स्वप्न जळत होती,ती हतबल मनाने सगळं पाहत होती.
घरात येऊन तिने हातपाय तोंड धुतलं. कपडे बदलले, आणि तशीच ती सुमितच्या घराकडे गेली. दाराबाहेर बरेच पाहुणे जमले होते. आत सगळ्या बायका बसल्या होत्या. तांदूळ निवडण्याचं काम चालू होत.
अग बाई आलीस ये ये बस... ते ताट दया ग तीला.... कोणीतरी तीला पाहुन बोललं. ज्याच्यासोबत ती लग्नाची स्वप्न बघत होती, आज त्याच्याच लग्नात ती तांदूळ निवडत होती. बायकांच्या बऱ्याच गप्पा चालल्या होत्या.
तीच वेड मन मात्र तो कुठे दिसतो बघायला तळमळत होत. अजूनतरी तो काही तिच्या नजरेला दिसला नव्हता.