चकवा भाग 1
परटाची अनशी तिच्या पोराला सखारामाला घेवून माहेरी चवान वाडीला जायला बाहेर पडली. चार सालामागे तिचा घोव मेल्यापासून तिला भावांचा मोठा उपराळा होता. मळ्यात तिच्या निर्वाहापुरती जमिन होती. शेतीच्या टायमाला उखळदुरा करून पायली भात नी दोन शेर नाचण्याचापेरा ती मजुरीची जोतं लावून करून घेई. दाड(भाताची रोपे) वीत भर झाली की माहेराहून तिचे भाऊ चार जोतं नी गडी पैरी धाडीत. आलेले जोतये नी पैरी दोन तीन दिवस आगरेवाडीत थांबून तिची लावणी पुरी करून देत. भात कापणी झाल्यावर मळ्यात कुळीथ, चवळी, कडवे, वरणे अशी कडदणं (कडधान्यं) पेरीत त्या टायमालाही माहेरचे जोतये येवून दोन दिवसात उखळ काढून कडदणाची पेरणी करूनदेत. भातं कापून झाली तशी कडदण पेरायची वर्दी द्यायला अनशी माहेरी निघाली होती. माहेरी वीस बावीस माणसांच मोठं कुटुंब. अनशीच्या आठ कोंबड्या रोवणीवर बसलेल्या, त्यांची चार दिवसांची अंडी साठवून ती टोपलीत शाबूत रहाण्यासाठी प्रत्येक थराला भाताची करलं ( टरफलं) टाकून त्यावर दोन तोवशी ठेवून टोपली सख्याच्या डोईवर चढवून अनशी भिणभिणताना बाहेर पडली.
एक वाट अनभवणे वाडीतून मुळवसाच्या घुमटी जवळून टेंबाची घाटी चढून सड्यावर जाणारी. वाट एकवशी नी टेंबाचीघाटी पण उभी शूळ दमछाक करणारी . दुसरी वाट वडासखलातून बानघाटीने सड्यावर जाणारी जरा लांबची पण कायमरहदारी असणारी. सकाळीच जायचं म्हणून अनशी बान घाटीने निघाली. सडा गाठल्यावर मावळतच्या दिेशेने जितवण्या वरून दत्तवाडी डावी टाकून टेमकराच्या खरीतून खाली उतरणारी वाट तिच्या माहेरी चवानवाडीत जायची. चालसूर माणसाचा अडीच घंट्याचा पल्ला होता. मोठी मुलगी बायो नी धाकटा तुकाराम यांच्यावर घराची जबाबदारी टाकून सखरामाला घेवून अनशी बाहेर पडलेली असल्यामुळे दुपारी जेवणं झाल्यावर माहेरी न थांबता ती वापीस येणार होती. अनशी माहेरी पोचली नी भावाच्या पोरानी "मावळण ईली ...." म्हणत एकचगिल्ला केला. धाकटा भाचा आनंदाने नाचत "आये, आज सांजवान तोवसोळ्यो (काकडीचे घावन)करशी ना? " म्हणत आयशीला बिलगला. भावजीनी तोवशाना रशीची टांगणी बांधून ती ओटीवरच्यामंडपीला लटकावली. मजवेली भावजय बोलली, "आत्तेबाय, मागच्या हप्त्यात आमची सा कोंबडी बावलानी आनी कोल्यानी मारून खालानी...... आताज्ञफकस धा बारा बारकी पिली , चार तलंगी नी दोन बियान्यावाटे कोंबे ऱ्हवले हत. पोरा अंड्याचो रस्सो खावक नुस्ती पागाळली हत..... तुमी येवजून कवटां हानलास तां मतं ब्येस क्येलास.......पोराच कशान .... बापये दुकू कवटाचो रस्सो खावच्या आशेक इले हत......"
दुपारी जेवताना अनशी भावाना म्हणाली, " तुमची कोंबडी ढाकुची डालगी बदलूकझाली हत...... " त्यावर मोठा भाऊ आप्पा म्हणाला, " आमच्या गावात ही आयदणां करणारो कोण ऱ्हालो नाय......" त्यावर आनशी म्हणाली, " मी चार रोजात पांड्या कडसून आवती काटयेची चार डालगी मोडून घ्येतय....... तुमच्या येवड्या खटल्यात दोन तरी राकनीचे कुत्रे व्हयेच........ घाडी वाडीत दोन कुत्र्यो वियालेल्यो हत तेतूर दोन चोवीस नखी पिला सोदून ती पाटवून द्येतय. माज्याहारीनव कोंबे , आट रोवणीवयल्यो नी सा खुडूक तलंगी हत. रोजचे शेरभर नाचणे नी दोन शेर तांदळाच्योकणयो लागतत. उद्या मळ्यात "कुरी" सुरु झाल्यो काय म्हटल्या किमतीत माजे कोंबे उकालणारी गिरायकां हत. माज्या किराण्याची खर्ची कोंब्यात्सून भागतां हा...... लय थोडी आंडी मी आडगिरायकी ईकतंय नी बाकीची रोजच्या रोज नळेकर दुकानदाराक घालतय...... आता गाव हा थंय बावल नी कोल्हे हतच. पण माजे दोन कुत्रे राकणीक हत......."आप्पा म्हणाला, " बाय, आमका कुरी साटना चार कोंबे लागतत...... दोन आमच्याहारी हत, तू दोन कोंबे जोतयांबरोबर दी पाटवून....." जेवणं उरकल्यावर वेळेवारी बेताच्या टायमाला अनशी माघारी जायला निघाली. भावजयी भोपळा देत होत्या पण अनशीकडे गोठ्याच्या कोलव्यावर चौदा पंधरा भोपळे धरलेले असल्यामुळे ती नको म्हणाली.फक्त लाल तांदुळाची लुकटी तेवढी घेतली.
सखारामा सोबत अनशी चालसूर निघाली. भात कापणी, झोडणीची कामं जोराला आल्यामुळे सड्यावरचिटपाखरूही दिसत नव्हतं. माय लेक टेमकराच्या खरीतून पुढे झाल्यावर सख्या म्हणाला, "आये आता जाताना टेंबाच्या घाटयेन उतरॉयॉ सकाळीहउगाच लांबसून भोवाडो मारून येवक् लागला." अनशीलाही त्याचं म्हणणं पटलं. जितवण्याचा टापू माग़े पडत आला नी दोघही डावीकडे टेंबाच्या घाटीच्या दिशेने निघाली. सराईचे दिवस. ढोपरभर वाढलेली उंच गवतं पिकून आडवी पडल्यामुळे पायवाटा नीट उमगत नव्हत्या. तशात टेंबाच्याघाटीला वर्दळ फार कमी. त्यामुळे मळलेली वाट घड उमगत नव्हती. बरंच अंतर चालून गेल्यावरही घाटीच्या माथावळीवर असलेला खुणेचा वड दिसेना .तेव्हा अनशी म्हणाली, "सखारामा, आपून वाट चुकलंव सा वाटता. एवढ्यात घाटयेरचो वड दिसॉक व्हयो हुतो......."त्यावर जरााविचार करून सखाराम बोलला, " व्हय व्हय , माकाव तसाच वाटतां ......लय चल्लाव आपून. येवड्यात वड दिसॉक हवो हुतो......."थोडावेळ विचार करून अनशी म्हणाली, " गवता पिकॉन आडयी पडल्या गुणां सदीची वाट दिसली नाय बव्हतेक आमकां. आता उजव्या दिशेन फुडे जावया. म्हंजे निदान बानघाटीसर तरी जावक् होयत्..... "
मायलेक उजव्या अंगाने झप झप चालीला लागले. बराच वेळ चालल्यावर अनशी दम खायला म्हणून उभी राहिली नी एकदम चकित झाली. जिथे प्रथम वाट चुकल्याची शंका त्याना आली होती त्याच ठिकाणी ती फिरून आली होती. " अरे झिला मगाशी आपून चुकलाव असा म्हनून उजव्या दिशेन फुडे ग्येलाव पणआता पुना फिरॉन थयच इलाव सा वाटताहा माका. " आता सखारामही चपापला. " व्हय आये, ती काय उक्षीची झाळ नी सकेऱ्याची ढिगोळी..... मगाशी थय उबी ऱ्हवान आपून उजया दिशेन जावचा ठरवलंव....... ह्या मायझयान पुना भोवडोन थयच हानलान ......." आता उजवीकडे न जाता त्यानी डावी बाजू धरून चालायलासुरुवात केली. अनशी किती वेळा त्या वाटेने माहेरी जावून आलेली...... ती खाणाखुणा आठवायचा प्रयत्न करीत होती पण सगळ्या दिशानी एकच नजारा दिसे. थोडावेळ चालल्यावर दोघही पुन्हा फिरून फिरून उक्षीच्या झाळी जवळआली. आता मात्र सखाराम घबरा घुबरा झाला. " आये ह्या माका भुताटकी सारा कायतरी झाल्यासारखा वाटताहा. "
जरा दम खावून अनशीने अंदाज घेतला. दिवस मावळायची वेळ जवळ येत चाललेली. चारी दिशानी कुठेही ओळखीची खूण दिसेना की नजरेच्याटप्प्यात कोणी माणूस की ढोर वासरूही दिसेना.आता डाव्या उजव्या दिशाना न जाता सरळ मोहरा फिरवून माघारी जायचा निर्णय तिने घेतला.तिने हात जोडून नवलाईला सांगणं केलं. "बाई नवलाई..... आमी हय चकव्यात सापाडलंव.....ह्यो कोन आडमार्गी आमच्या पाटी लागलो हा तो आमका फिरवून फिरवून एक्याच जागेक भोवडवता हा ...... आमची राकाण आता तू कर...... सांजवासरआमका खयतरी मानसाच्या आसऱ्याक न्ही माज्ये बाये...... चार दिवसान तुजी होटी भरीन......"नवलाईला सांगण करून ती निर्धारपूर्वक उलट दिशेने चालायला लागली. घंटा भरात बांगर पाड्याच्या ढुरकण्याचा आवाज आला. नी तिच्या जीवात जीव आला. ती आवाजाच्या रोखाने निघाली. शंभरेकपावलं पुढे गेल्यावर गायरं नी बैल चरताना दिसले. कुठला भाग हे समजायला मार्ग नव्हतापण गुरं दिसताहेत म्हणजे चालण्याच्या टप्प्यात वसती असणार हे नक्की.