Gulamba? in Marathi Cooking Recipe by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | गुळांबा?

Featured Books
Categories
Share

गुळांबा?

गुळांबा..नुसते नाव जरी घेतले तरी तोंडाला पाणी सुटत ..😋आणि अनेक आठवणीं येतात एक पाउस पडला की  गुळांबा अथवा मुरांबा करण्या साठी बाजारात कैऱ्या येऊ लागतात.मग घरोघरी वर्षभराची “बेगमी “म्हणुन लोणची ,मुरांबे घातले जातात .जेणे करून पुढील उन्हाळ्या पर्यंत ची काळजी मिटेल .लहानपणी मी फार गोडखाऊ होते ,बटाटा ,भेंडी ,अशा एक दोन आवडीच्या भाज्या सोडता इतर कोणत्याच भाजीला मी हात लावत नसे ..मग तूप गुळ,तूप साखर ,गुळांबा साखरआंबा ,यांच्या बोली वरच मी जेवत असे . त्यावेळी.  गुळांबा हुकमी एक्का असे. आई लगेच मला गुळांबा वाढत असे आणि जेवण पार पडे.😀मी घरी एकुलती एक मुलगी होते त्यामुळे मला खेळायला भावंड नव्हते इतर सर्व नातेवाईक व माझी चुलत मावस भावंडे पुण्यात होती .माझी वार्षिक परीक्षा संपत आली की माझ्या मोठ्या काकांचे कोल्हापुरला पोस्ट कार्ड येत असे “जयुची परीक्षा झाली असेल तर तिला सुट्टीसाठी  पुण्यात पाठवून द्यावे .मागील वर्षीचा गुळांबा संपवायचा आहे .आजी वाट पहात आहे “असा मजकूर त्यात असे ..😀मग माझी रवानगी पुण्यात होत असे ,आणि जुना गुळांबा संपवुन नवीन गुळांबा आजीने घातल्यावरच अस्मादिकांची स्वारी कोल्हापुरला परत येत असे ..तेव्हाच पुढील वर्षीच्या शाळेची सुरवात होणार असे सोबत नवीन गुळांबा बरणीत भरून आजीने दिलेला असेच ..🙂🙂एक पाउस पडला की  गुळांबा अथवा मुरांबा करण्या साठी बाजारात कैऱ्या येऊ लागतात.मग घरोघरी वर्षभराची “बेगमी “म्हणुन लोणची ,मुरांबे घातले जातात .जेणे करून पुढील उन्हाळ्या पर्यंत ची काळजी मिटेल .    माझी आजी व काका काकू सर्व पुण्यात असत    गुळांबा करणे ही खास आजीच्या अखत्यारीतील बाब असे .फक्त तिचीच त्यामध्ये मक्तेदारी असे .या तयारी साठी प्रथम आजी घरच्या एखाद्या सुनेला घेवून बाजार करण्या साठी बाहेर पडत असे .मग बाजारात तिच्या ठरलेल्या माणसाकडून कैऱ्या घेतल्या जात .चांगल्या हिरव्या दडदडीत मोठ्या कैर्या घेतल्या वर त्या घासाघीस करून आजी त्या नेहेमीच्या माणसाला पैसे देत असे .     घरी आल्यावर एका मोठ्या पितळी पातेल्यात थोडे मीठ घालून या कैऱ्या भिजत घातल्या जात .जेणे करून कैऱ्याचा चिक निघून जाऊन त्या स्वच्छ होत असत .तसा गुळांबा करायचा कार्यक्रम दुपारी ठरलेला असे .जेवणे झाली सगळ्या पुरुष माणसांची घरातून माजघरात अथवा वरच्या खोलीत रवानगी झाली की मग आजी एक मोठे पातेले घेऊन त्यात गुळाचे खडे व थोडे पाणी घेऊन पाक करायला सुरु करीत असे. मग तिच्या सुना पैकी एकजण त्या कैऱ्या स्वच्छ फडक्याने पुसून देत असे आणि दुसऱ्या दोघी जणी दोन वेळ्या घेऊन कैरीच्या  आधी साली काढून मग त्याचे छोटे छोटे पातळ काप करायला सुरवात करीत असत .ही गुळांबा पाककृती चालु असताना स्वयंपाकघरात मोलकरीण अथवा इतर कुणालाच एन्ट्री नसे .अगदी आम्हा मुलाना पण येऊ दिले जात नसे.असे कोणीतरी आले की पदार्थाला “दृष्ट “लागते असे आजीचे ठाम मत असे .!!!आता इकडे गुळाचा पाक तयार होऊ लागे आणि सगळीकडे पाकाचा घमघमाट सुटत असे .आम्ही मुले स्वयंपाकघराच्या बाहेर अगदी अस्वस्थ होत असू .पाक चांगला दोनतारी झाला की आजी एका वाटीत पाणी घेवून त्यात दोन थेंब टाकत असे .त्याची चांगली घट्ट कडक गोळी झाली की मग त्या कैरीच्या पातळ फोडी ती हळू हळू पातेल्यात सोडत असे ,आता पाक पातळ होऊ लागे मग काही वेळ असेच उकळत ठेवल्या वर त्यातील एखादी फोड हलकेच बाहेर काढून आजी बोटाने दाबून पाहत असे ..एव्हाना पाक पण घट्ट झालेला असे फोड शिजलेली असेल तर आणखी पाच मिनिटात फडक्याच्या सहाय्याने ती पातेले खाली उतरवून ठेवत असे .त्यात वेलदोडा जायफळ पूड मिक्स करून हलक्या हाताने तो हलवला जात असेआता हे मोठे पातेले थंड करायला वर कट्ट्यावर ठेवले जात असे .तोपर्यंत आजीच्या सुना घरातला सर्व पसारा आवरून ठेवत असत आणि मग आम्हा मुलाना स्वयपाक घरात एन्ट्री मिळे.     एव्हाना आमची दुपारची भुकेची वेळ झालेली असे त्या काळी दुपारच्या भुकेलासुध्दा मुलाना पोळी च दिली जात असे 😀आम्ही पटापट आमच्या ताटल्या वाट्या घेवून गोलाकार बसत असू आणि हा कोमट, ताजा ,चविष्ट गुळांबा आम्हाला वाटीत मिळत असे .आंबट गोड असा गुळांबा खाताना अक्षरशः देहभान हरपत असे ..आणि आम्ही सर्व तृप्त होवून परत खेळायला जात असू ..आता हां गुळांबा स्वच्छ केलेल्या चीनी मातीच्या बरणीत भरून ठेवला जात असे बरणीला पातळ पांढर्या फडक्याचा दादरा बांधून बरणी आत फडताळात ठेवली जात असे .                 यानंतर वर्षभर अनेक वेळा ही बरणी काढली जात असे ..तोंडाला चव नसणे ,भाजी आवडीची नसणे ,अकस्मात कोणी पाहुणा येणे अशी त्याची कारणे असत 🙂                                           माझ्या लग्ना नंतर काही वर्षाने आजीचे निधन झाले ..माझ्या मुलाला पण गुळांबा आवडत असे ..मी त्याच्या साठी करीत असे ,पण आजीच्या त्या खास चवीची आठवण येतेच..                   काही वर्षानंतर माझ्या एका मैत्रिणीने मला हापूस आंब्याचा साखर आंबा शिकवला होता .हापूस च्या फोडी वाफवून त्यात केशर आणि साखर घालून मी करीत असे ,हा साखर अंबा तीन चार महिने बरा टिकत असे .मात्र त्यावर हक्क फक्त आणि फक्त माझ्या मुलाचा असे ..!😀कैरीचा गुळांबा.... काल थोडा गुळांबा केला 🥭लोणच्या साठी  कैऱ्या किसून झाल्यानंतर त्याच्या कोयीला जो भाग शिल्लक राहतोत्याच्या पातळ पातळ काचऱ्या काढून त्याचा गुळंबा केला🥭 या काचऱ्या प्रथम थोडया तुपावर वाफवून घेतल्या त्यानंरच्या त्यावर दीड वाटी काकवी घातली(माझ्याकडे काकवी नेहेमी असतेच)तुम्ही गुळ वापरू शकता,🥭मिश्रण उकळू लागल्यावर त्यात थोडे केशर व तीन चार लवंगा घातल्याकेशराने स्वाद चांगला येतो 🥭हे मिश्रण जरासे शिजून आळलेत्यानंतर त्यात वेलदोडे पावडर घातली मस्त गुळांबा झाला