राम नवमी आली की आजोळची आठवण येतेच..माझ्या आजोळी रामाचे देऊळ आहे आजोळ बावधन, तालुका वाई, जिल्हा सातारा.. त्या पंचक्रोशीत तेव्हा ते एकच रामाचे देऊळ त्या लहान खेड्यात होते .आमचा आजोळचा वाडा खुप मोठा व दोन मजली होता .मुख्य दरवाजातून आत गेले की दोन बाजूला दोन जोते नंतर मोठे आंगण मग पडवी ,मध्यभागी रामाचे देऊळ त्याच्या शेजारी रामाच्या पोथीची व पूजेच्या साहीत्याची एक छोटी खोली देवळाच्या डाव्या बाजूला एक बैठकीची खोली ..त्यानंतर मोठे स्वयंपाक घर ,त्यामध्ये एक मोठे जुन्या पठडीचे बाथरूम ,आतुन वरच्या मजल्यावर जायला लाकडी जीनापुढे एक माजघर जिथे पाणी तापवायची चूल व मोठा हंडा होता देवळाच्या उजव्या बाजूस एक आंब्याची आढी घालायची स्वतंत्र खोली कारण रानात असलेल्या आमच्या दोन झाडांचे असंख्य आंबे उन्हाळयात घरी येत खोली भरून जात असे 🙂मग झोपाळ्याची खोली ,त्याच्या शेजारी धान्याची खोली ,मागे मोठे परसदार अनेक फुलांची झाडे ,मध्ये मोठी विहीर ज्यात बारा महिने पाणी असे .विहिरीशेजारी धुण्याचा दगड आणि एक छोटी पाण्याची डोणी .. दुसऱ्या मजल्यावर दोन्ही बाजूस दोन दोन लांबलचक मोठ्या खोल्या ..सर्व घरातील सर्व खोल्यांना वरच्या बाजूला मोठमोठ्या लाकडी खिडक्या होत्या .आजी थोडीफार वाचन शिकलेली होती ती रोज दुपारी तीन वाजता रामाची पोथी वाचत असे .आजुबाजुच्या दहा बारा बायका ती पोथी ऐकायला जमत असत .आजीचे कथन रसाळ असे .बाया बापड्या ज्या काही शंका विचारत .त्या अनुषंगाने आजी सगळे उलगडून सांगत असे .त्यानंतर बायकांच्या थोड्या गप्पा होत असत .मग एकमेकींचे थोडे परसातील भाजीपाला देणे घेणेसुद्धा होत असे .चहा कॉफी ची पद्धत नव्हती .तशात आजोबा दहा वर्षे अंथरुणावर खिळून असल्याने प्रपंच भागवताना आजीच्या नाकी नऊ येत असत .मुले आपल्या संसारात गर्क ,उत्पन्नाचे साधन काहीच नाही थोडी शेती होती पण आजी एक "बाई माणुस" असल्याने आणि वाटेकरी योग्य वाटा देत नसत .रानातली दोन आंब्याची झाडे मात्र वाटेकऱ्यानी तिला सुपूर्द केली होती .मात्र स्वतःचे घर असल्याने त्यातील दोन खोल्यात भाडेकरूं होते त्याचे भाडे येत असे . त्या काळी ते फक्त पाच दहा रुपये असे. तीन चार भाडेकरू ..त्यातल्या काहीना दरमहा देणे जमतच नसे .काही उधारी ठेवत काही थोड्या दिवसांनी भाडे बुडवून निघून जात .नेमके उत्पन्न असे मिळत नसे .आजोबांच्या औषधांचा पण खर्च असेच .मुले थोडी मदत करीत पण ती पुरत नसे .तशात धाकटी मावशी दोन पोरी पदरात घेऊन कायमची माहेरी आलेली होती ..त्यामुळे खाणारी तोंड वाढलेली होती अशा परिस्थितीत कोंड्याचा मांडा करून आजी रहात असे.कधी कधी अर्धपोटी पण रहावे लागे . तिच्या रुपात एक अन्नपूर्णाच होती घरात ..त्यामुळे रोजचा दिवस तरी पार पडत होता .अशा स्थितीत पोथी ऐकायला आलेल्या बायकांना काही देणे तिच्या आटोक्यात नसे फक्त पोथी वाचन झाल्यावर गुळखोबरे , खडीसाखर, साखरफुटाणे असा प्रसाद .उन्हाळ्यात मात्र ती आवर्जून बायकांना घरच्या कैऱ्याचे पन्हे देत असे .दोन आंब्याची झाडे रानातल्या शेतात आमच्या मालकीची होती त्याच्या कैऱ्या येत कधी ताक पण देत असे ..बायका तिला मामी म्हणत जवळच्या गरीब गुरीब बायकांना त्यातही ती जमेल तशी अन्नाची मदत करीत असे .पैसे तर कुणाकडेच नसायचे तेव्हा पण गरीब बायांना खात्री असे मामी आपल्याला घासातला घास देतील रामनवमी मात्र मोठ्या प्रमाणावर असे .त्यावेळी आजीची तिन्ही मुले जमेल तशी आर्थिक मदत करीत .आम्ही सर्व भावंडे पण कमावती झाल्यावर मुद्दाम रामनवमी साठी पैसे देत असु.रामनवमीच्या आदल्या दिवशी कौसल्येचे डोहाळे जेवण केले जात असे .देवाच्या सामानाच्या खोलीत एक छोटा पाळणा असे .त्यात हिरवी साडी नेसलेल्या कौसल्येला बसवले जात असे .आजूबाजूच्या बायका तिची ओटी भरत .आलेल्या सुवासिनींना हळदीकुंकू सोबत कैरीचे पन्हे आणि आंब्याची डाळ दिली जायची .हे सगळे मात्र आम्ही घरच्या मुली आमच्या आया,मावशी ,मामी करीत असु . घराजवळची आणि आजुबाजूची असे जवळ जवळ पन्नास लोक त्या वेळेस उत्सवासाठी घरात जमत असत .शिवाय गावात असलेल्या चार पाच जवळच्या कुटुंबातील लोक आमच्या घरीच जेवाय खायला असत. रामनवमी दिवशी उपास असेदुसऱ्या दिवशी पारण्याचा गोड धोड स्वयंपाक..इतक्या सगळ्यांच्या स्वयंपाकासाठी मात्र तालुक्यावरून खास स्वयंपाक करायला बाई येत असत .सोबत त्यांची मदतनीस असे .त्या पण दोन तीन दिवस राहायलाच येत .वाड्यात जवळ जवळ पंधरा खोल्या होत्या त्यामुळे किती माणसे आली तरी काळजी नव्हती .रामनवमी दिवशी उपास असे त्यामुळे सगळ्यांसाठी उपासाचे पदार्थ केले जात सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा त्या संध्याकाळी आम्ही सर्वजण रात्री उशिरापर्यंत गप्पा करीत असु .दुसऱ्या दिवशी बारा वाजता जन्मकाळ असे त्यापूर्वी गावातली खंडोबा देवाला रामाची पालखी भेटायला जात असे .त्यानंतरच रामजन्म होत असे .त्या भर उन्हात पालखी खांद्यावर घेऊन आम्ही सर्व जात असु उन्हात सुद्धा चांदणे आहे असे वाटत असे तेव्हा !!!सुंठवडा घ्यायला आणि दर्शनाला अख्खे गाव लोटत असे.त्यानंतर समोर राहणारे कुलकर्णीसर कीर्तन करीत असत .देवळासमोरची पडवी आणि पुढचे मोठे आंगण कीर्तनाच्या वेळी पूर्ण भरून जात असे .दुपारी जेवणाचा बेत पुरणपोळी असे शिवाय ताटातले सर्व डावी उजवी कडचे पदार्थ असत .हळूहळू काही वर्षांनी आटोपता बेत म्हणजे शिरा अथवा लाडू असे सुरु झाले .जेवण झाल्यावर दुपारी थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी परत भजन असे .तिसऱ्या दिवशी मात्र सर्वांना आपापल्या गावाचे वेध लागत असत .मग आजीला घट्ट मिठी मारून रडत आम्ही आजीचा निरोप घेत असु. आणि ,"परत लवकर या बर का" अशा तिच्या आग्रहाला आम्ही मान डोलावत असु .सुट्टीत आम्ही मुले आजोळी नेहेमीच जात असु पण रामनवमीला जमलेले इतके लोक मात्र आता एकदम पुढील वर्षी भेटणार असत .आम्हा सर्वांना निरोप देताना आजीचा जीव चुटपूट होत असे .यानंतर हनुमान जयंती पण होत असे पण ती मात्र मोजक्या लोकांच्या उपस्थितीत .आमच्या या रामाच्या देवळाची खुप रसभरीत हकीकत आजी सांगत असे .आमच्या आजोबांचे सातारला एक घर होते .त्या घरात आजोबांची बहिण म्हणजे आजीची नणंद राहत होती .एकदा तिला स्वप्न पडले त्यात राम आला होता आणि म्हणाला तुझ्या मागच्या अंगणात मी पडून आहे .मला बाहेर काढ .दुसऱ्या दिवशी मागे खणुन पाहिले असता खरेच राम लक्ष्मण सीतेच्या मुर्ती सापडल्या .मग ती त्या मुर्ती घेऊन ती भावाकडे आली आणि तिथे हे देऊळ बांधायला काढले .मुर्ती प्रतिस्थापन केल्यावर त्यांची पूजा करायची ठरली .त्या दिवशी रात्री आजीच्या स्वप्नात हनुमान आला आणि म्हणाला मी अजुन मागे राहिलोय मला घेऊन जा .मी अंगणात डाव्या बाजूला आहे .परत जाऊन सातारच्या अंगणात खोदले असता डाव्या बाजूला खरेच हनुमान आणि गणपतीची मुर्ती मिळाली .मग त्या पण दोन मुर्ती या मंदिरात आल्या .हनुमाना शिवाय रामाचे देऊळ अपुरेच होते. ह्या गोष्टी कितीदा ऐकल्या तरी आमचे समाधान होत नसे .त्यातील उत्सुकता कायम असे .त्यावेळी "देव "या संकल्पने वर सर्वांचा विश्वास होता .प्रत्यक्ष देव तिच्या स्वप्नात येऊन तिला बोलावून गेला याचे अप्रूप वाटे.आजी खरेच खुप सोशिक व शांत होती .तिचा स्वभाव धार्मिक आणि श्रद्धाळू होता .अंगणातील भरपूर फुले घालून देवाची रोज पूजाअर्चा ,आरती अगदी मनापासून करीत असे .रामाला लक्ष्मणाला आणि सीतेला वेगवेगळे रंगीत कपडे तिने हातावर शिवले होते .ते सतत बदलत असण्याचा तिला छंद होता .तिच्या तोंडात काम करताना आणि इतर वेळी सुद्धा सतत रामनाम जप असे .आजोबा दहा वर्षे अर्धांगवायू ने अंथरुणात पडून होते .त्यांची सतत चिडचिड चालू असे ,ती सहन करणे आणि हा प्रपंच रेटणे हे खुप कठीण होते .पण तिने कधीही कोणालाच हे जाणवू दिले नाही .तिचा चेहेरा कायम हसतमुख व समाधानी असे .कालांतराने आजीचे निधन झाले .मावशीच्या मुली तालुक्याच्या गावात शिकून पदवीधर झाल्या .त्यांना त्यांचे नवरे लग्न करून घेऊन गेले .नवल म्हणजे इतक्या वर्षानंतर मावशीचा नवरा येऊन तिला आपल्यासोबत पुण्यास घेऊन गेला.आजोळचे घर रिकामे पडले .समोरच्या कुलकर्णी कुटुंबामुळे रामाच्या देवळात रोजची पूजाअर्चा मात्र नीट होत होती . देऊळ आता तेच बघु लागले .मामी जाऊन येऊन तिथे रहात होती पण नंतर तब्येती मुळे तिला एकटे राहायला जमेना .मामे भाऊ दोघे पुण्यात रहात होते ते तिला तिकडेच घेऊन गेले .आता देवळाची किल्ली कायमसाठी कुलकर्णींच्याकडे सुपूर्द केली गेली .त्यानंतर भावांनी आजोळचे ते घर हळूहळू निटनेटके करून घेतले .घरात सर्व सोयी करून घेतल्या .नोकरी मुळे कायम तेथे राहता येणे अशक्य होते .पण ते दोघेही आणि त्यांची मुले पण आलटून पालटून येऊन राहू लागली.त्यांची मित्र मंडळी पण हॉलिडे होम म्हणून आजोळी येऊलागली .😃जवळच महाबळेश्वर पण होतेच मजा करायला .रामनवमी पूर्वी ते दोघे भाऊ भाऊ आपल्या संपूर्ण कुटुंबां सोबत येत असत .घर इतर वेळी रिकामे असल्याने साफ सफाई तसेच उत्सवाची तयारी करायची असे .मग आम्ही भावंडे रामनवमी साठी जात असु .एक दिवसासाठी सगळी इकडून तिकडून गडबडीने येत असु .आता पूर्वी सारखी रामनवमीची गर्दी नव्हती .काही घरची मंडळी आम्ही तो उत्सव साजरा करू लागलो .भावाच्या बायका ,आम्ही बहिणी व आलेल्या पाहुण्या सर्व तो कार्यक्रम पार पाडू लागलो .यानंतर परत हनुमान जयंती साठी मामेभाऊ जात व ती साजरी करून येत .काही वर्षांपूर्वी मात्र “कोरोना” संकटामुळे रामनवमीला जाणेआणि उत्सव करणे शक्यच नव्हते .आता कसे बरे करायचे अशा विचारात असता..“उत्सव होणार नाही ,पूजा अर्चा थोडक्यातच कुलकर्णी कुटुंब पार पाडेल .”असे फोनवर बोलताना भावाचा कंठ दाटून आला .“ही पहिलीच वेळ आम्ही उत्सव करू शकत नाही खुप वाईट वाटते आहे ग ..”तो म्हणाला ..“परिस्थती पुढे आपण हतबल आहोत ..राम तर आपल्या मनात आहे त्याचे आशीर्वाद पण आहेतच ..पुढील वर्षी करू जोरदार ..”मी त्याची समजूत काढलीत्याला असे सांगताना माझा आवाज जड झाला होता आणि डोळे भरून आले होते ..अशा या रामनवमीच्या आठवणी ❤️
श्रीराम जयराम जयजय राम 🙏