भ्रमंती - सिंधुदुर्गाची
भाग१
लाल माती हिरवी पाती
जन्मांतरीची अतूट नाती
फेसाळत्या लाटा तश्या अवघड वळणवाटा
मालवणी माणूस त्याचा मालवणी तोरा
मोडेन पण वाकणार नाही,ह्याच खरा
रेवती नगर
रेवती नगर म्हणजे आजचे रेडी गाव. गेल्या पंधराशे वर्षांपासून
एक उत्कृष्ट बंदर म्हणून प्रसिद्ध असलेले हे गाव. जगभरातले व्यापारी इथे येत.पोर्तुगिज ,डच , फ्रेंच, अरब या ठिकाणची प्रवासी जहाजे इथे येत.मसाला ...सुगंधी द्रव्ये...मोती...मासे अश्या अनेक पदार्थांची खरेदी व विक्री इथे होत असे.
आज इथे बघण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. यशवंतगड...द्विभुज गणपती....किनाऱ्यालगत असलेले सिद्धेश्वर मंदिर....श्री माऊली मंदिर... भवानी मंदिर ...नवदुर्गा मंदिर....पांडवकालीन हनुमान मंदिर...हत्तीच्या सोंडेच्या आकाराचा खडक...किनाऱ्याला लागून असलेले घंगाळेश्वर देवस्थान....पांडवकालीन गुहा....इथून हाकेच्या अंतरावर असलेला तेरेखोल किल्ला अशी अनेक ऐतिहासिक व पौराणिक स्थळ इथे बघायला मिळतात.
यशवंतगड हा किल्ला पाचव्या शतकात बांधलेला आहे.
सहा ते सात वर्षांपूर्वी हा किल्ला अत्यंत वाईट स्थितीत होता.ते भग्नावशेष बघून मनाला यातना होत.पण आता पुरातत्व विभागाने किल्ल्याची डागडुजी करायला सुरुवात केली आहे.नव्याने उभारलेले प्रवेशद्वार...कमानी.... चिरेबंदी भिंती... तुम्हाला इतिहासकाळात घेऊन जातात.या किल्ल्याने अनेक राजवटी ... अनेक युध्दे... चकमकी बघितल्या आहेत.राष्ट्रकूट...चालुक्य... विजयनगर पोर्तुगीज...आदिलशाही... सावंतवाडी संस्थान...मराठे...अगदी शेवटी इंग्रजांकडे या किल्ल्याचा ताबा होता. आज या किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूचा संपूर्ण परीसर न्याहाळता येतो. संमोहित करणारे दृश्य दिसते.खाडी... निळाशार समुद्र ... मऊशार सोनेरी वाळू...उधाणणारा वारा.... खाडीतून समुद्राकडे जाणाऱ्या होड्या...मायनिंगच्या बार्जेस...दूर समुद्रात उभी असलेली जहाजे... किनार्यावरचे पर्यटक ...ही दृश्ये नजर खिळवून ठेवतात.
किल्ल्याच्या खालच्या परीसराला स्थानिक लोक समशेरखान म्हणतात.कुणीतरी तलवारबाजीत निष्णात सरदारावरून हे नाव पडले असावे. या परीसरात पूर्वी बाजार भरायचा. इथून मूळ रस्त्यावर आलो की उजवीकडे वळल्यावर साधारण दोनशे मीटरवर सिध्देश्वर मंदीर आहे.समोर फेसाळता समुद्र..लाटांचा आवाज...शरीराला स्पर्शून जाणारा खट्याळ वारा....सुरुची दोन तीन झाडे आहेत.त्याची सळसळ संगीतमय असते. मंदिराचा नव्याने जिर्णोध्दार केला आहे. देवळासमोरील तुळसीजवळ तीन भग्न मूर्त्या ठेवलेल्या दिसतात.या मूर्त्यांचा दगड व रचना ही हंम्पी इथल्या रचनांसारखी दिसते.इथे प्रसाद लावले जातात. मला स्वतःला हा परीसर खूप आवडतो.मी इथल्या बेंचवर तासनतास बसतो. कधीं कधीं चांदण्या रात्री सुध्दा मी इथे बसतो.एकदा मला इथे एक विलक्षण दैवी अनुभव आला होता.( त्याबद्दल नंतर कधीतरी लिहीन)इथून वेंगुर्ले दिपस्तंभावरील दिवा दिसतो. सकाळच्या वेळी इथून अनेक होड्या मच्छीमारीसाठी जातात. देवळाच्या वरच्या बाजूला एक जुनाट पिंपळ आहे.पिंपळाच्या डाव्या बाजूला...तुम्हाला दोन गुहा दिसतील.आश्चर्य म्हणजे या गुहांमध्ये जांभा दगड अगदी काटकोनात कापलेला दिसतो.त्यावर आडवा सपाट खडक ठेवलेला दिसतो.या ठिकाणी कदाचित नाथपंथीय साधू किंवा गोसावी साधना करत असावेत.या ठिकाणाला लागूनच गोसावी लोकांची वस्ती आहे.
इथून अरुंद खडकाळ वाटेवरून वर गेल्यावर मायनिंग डेपो लागतो.पण इथून फक्त पायी जातात येते.गाडीने जायचं असल्यास गणपतीमंदीराकडून जाता येते.या मायनिंग डेपोच्या गेटवर ' देवाक जावचा हा' असं सांगून घंगाळेश्वर ठिकाणाकडे जाता येते.हे ठिकाण माडांच्या बनात आहे .समुद्राला लागूनच आहे.झावळांची सावली ...बसण्यासाठी सिमेंटचे सोफे...छोटी देवळी तिथे लटकणार्या अनेक छोट्या घंटा..
बाजूला समुद्राच्या काठावर असलेली जुनी विहीर...समोर एक मोठा तुटलेला माड व झाडीने व्यापलेला डोंगरकडा दिसतो.हे जागृत देवस्थान आहे.माहेरवाशीनी इथे दरवर्षी कोंबडा मानवतात.
इथून थोडं मागे येऊन सरळ चालत गेलं की पाच मिनिटांनी सुप्रसिद्ध द्विभुज गणपती मंदिर येते. स्वप्नात दृष्टांत झाल्याने हा गणपती सापडला. भव्य व विलक्षण लोभसवाणी गणपतीची मूर्ती व समोर तेवढाच मोठा मूषक( मागाहून उत्खननात सापडला)आपल्याला दिसतो.मुळात मूर्ती जांभ्या दगडात आहे.नंतर ती रंगवण्यात आली.चित्रकाराने रंगकाम एवढं जबरदस्त केलंय की मूर्ती सजीव भासते.विशेषत: गणपतीचे डोळे...हे बोलके...हसरे व आश्वासक वाटतात. विध्वंसक आक्रमणापासून बचाव होण्यासाठी कधितरी ही मूर्ती
जमिनीखाली दडवून ठेवली असावी.सुरूवातीला इथं छोटेखानी देऊळ बांधले होते.आजूबाजूला मायनिंगचा परीसर होता.आज एक सुंदर देऊळ दिसते.आजूबाजला मोकळी जागा आहे.दर संकष्टीला इथे परीसरातून,तसेच गोवा, बेळगाव व कोल्हापूर येथून अनेक भाविक येतात.
गणपती मंदिराच्या डावीकडून खाली उतरलात तर समुद्रावर जाता येते.समुद्रात मामा- भाचे यांचे खडक दिसतात.अस सांगतात की एक मामा व त्याचा भाचा या दगडांजवळ मासेमारी करायला गेले होते.पण एका भल्या मोठ्या लाटेच्या तडाख्याने होडी फुटली व दोघे बुडाले.या घटनेनंतर त्या दोन खडकांना मामा भाचे म्हणतात.
गणपती मंदिराकडून सरळ पुढे आल्यावर ग्रामदेवता माऊली मंदीर दिसते.काही वर्षांपूर्वी नव्याने भव्य.... कलात्मकता असे सुंदर मंदिर बांधले गेले.या ठिकाणी वर्षभर अनेक उत्सव होतात .पण श्रावणात नागपंचमीच्या तिसर्या दिवसांपासून सुरू होणारा सप्ताह विशेष होय. या वेळी प्रत्येक वाडीचा चित्ररथ व त्या वाडीची दिंडी फिरवली जाते. चित्ररथात पौराणिक घटनेवर जिवंत देखावे असतात.रात्री नऊ वाजता रथ व दिंडी बाहेर पडते. सात दिवस भजन व रात्री करमणुकीचे कार्यक्रम असतात.सारी रेडी वापरकर्त्यांसाठी भक्तीरंगात रंगलेली असते.
माऊली मंदिर कडून डाव्या बाजूला गेलात की कानयाळ वाडी लागते.इथे नवदुर्गा मंदिर आहे.या मंदिराला तुम्हाला सुनील गावसकरने देणगी दिल्याचा उल्लेख सापडतो.इथून अरुंद पायवाटेने जात आपण पांडवकालीन मारुती मंदिरात जाऊ शकतो.इथेच जवळच हत्तीच्या सोंडेच्या आकाराचा खडक आहे.या परिसरात फिरताना तुम्हाला कोकणातल्या सुंदर अश्या खेडेगावाचा फील येतो. रेडीत गावातळेवाडीत सुंदर तळे आहे.उषा इस्पात व नंतर टाटा मेटालीकमुळे पूर्वी ही वाडी गजबजलेली असायची.मण आता निवांत व सुस्तावलेल्या सारखं इथे वाटते.
इथून पुन्हा हुडावाडीत आला तर जुन्या पोस्ट आॉफिसकडून सरळ दोन मिनीटात गाडीजवळ पोहचता येते .या ठिकाणी होड्या लावलेल्या दिसतील.इथे रेलींग व बसायला पायर्या आहेत.सूर्यास्तावेळी इथून सुंदर दृश्य नजरेत साठवता येत.
खाडीच्या पलिकडे मिठागर आहे.
गावात मोठा बाजार नाही. मायनिंगमुळे रस्त्यावर डम्परचे प्रमाण जास्त असते. पावसाळ्यात जोरदार वारा असल्याने घरे कमी उंचीची आहेत.इथून आरोंदा किरण पाणी किंवा तेरेखोल केली मार्गे पंधरा - वीस मिनिटात गोव्यात जाता येते.तर
शिरोडा मार्गे आरवली...मोचेमाड ..
उभादांडा...येथून वेंगुर्ले बंदरावर गाडीने अर्ध्या तासात जाता येते.
.( मी गेली ३० वर्षे सिंधुदुर्गातील अनेक गावे अनेक वेळा मोटरसायकलने फिरलोय.इथला निसर्ग....माणसं..डोंगर... नद्या..झाड...पक्षी....देवळे...चाली -रीती जवळून बघितल्या आहेत.सिंधुदुर्गासारखा सुंदर भूभाग महाराष्ट्रत एखादाच सापडेल.)
बाळकृष्ण सखाराम राणे
8605678026