खरे तर पडवळ ही फार कमी लोकांची आवडती भाजी माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर ही भाजी मी लग्ना आधी कधीच खाल्ली नव्हती माझ्या माहेरी वडलांना आवडत नसल्याने पडवळ कधीच आणले गेले नाही .सासरी मात्र पडवळ आणि इतर वेली फळभाज्या ,जसे की दोडका ,कारली ,दुधी भोपळा ,तोंडली या अहोंच्या अतिशय आवडत्या भाज्या
..माझ्या सासूबाई अतिशय सुगरण होत्या त्यांच्या हातचे पडवळा चे अनेक पदार्थ खाऊन मला ही हळू हळू पडवळ आवडू लागले .आणि मीही त्यांच्या कडून वेगवेगळे पदार्थ शिकुन घेतले पडवळाची भाजी मनापासून आवडते असं म्हणणारा खवय्या मिळणे कठीण आहे असे बरेच जण म्हणतात पण आमच्या अहोंच्या रुपात मी तो अनुभव घेतला आहे ..अगदी रोज पडवळ असले तरी चालेल असे ते म्हणतात .
पडवळाचे जरी तो लोकप्रिय नसला औषधी उपयोग आहेत. चवीला गोड व थंड असल्याने तो आपल्या शरिरातील तिन्ही दोष कमी करण्यास मदत करतो. शरीरातली विषारी द्रव्यं बाहेर टाकण्यास मदत करणारं एक नैसर्गिक अॅन्टिबायोटिक म्हणून पडवळ ओळखलं जातं. पडवळात पुरेशी पोषक द्रव्यं असून ते शरीराची उष्णता कमी करतं, वजन कमी करायला मदत करतं आणि हृदयाचं टॉनिक म्हणून काम करतं. उन्हाळ्यात तर तो भरपूर खावा.
💚असेच काही खास प्रकार #पडवळ खवैया लोका साठी देत आहे
💚 पडवळ भरीत .. पडवळ बारीक तुकडे करून थोड्या पाण्यात पातेल्यात वाफवून घेणे नंतर हाताने थोडे चुरून घेणे त्यात मीठ ,साखर, दाणे कुट ,कोथिंबीर ,खोवलेले खोबरे घालून त्यास हिरवी मिरची ची फोडणी देणे व थंड दह्यात कालवून खाणे
💚पडवळ रिंग भजी बटाट्याच्या भज्या सारखे पीठ भिजवून पडवळ गोल आकारात रिंग प्रमाणे कापून घेणे व भजी करणे ,सदर भजी मेदू वड्याप्रमाणे दिसतात
💚पडवळ पीठ पेरून भाजी पडवळ बारीक तुकडे करून फोडणीत वाफवणे लागल्यास शिजण्या साठी थोडे पाणी वापरणे .शिजले की हळद तिखट मीठ घालून त्यास थोडे भरड डाळीचे पीठ अथवा भाजणी पीठ लावणे व एक वाफ आणून कोथिंबीर खोबर यांनी सजवावे .
💚पडवळ डाळ भाजी यासाठी मुग अथवा हरबरा याची भिजवलेली डाळ घ्यावी .प्रथम फोडणीत हिरवी मिरची घालून ही डाळ परतून थोडी वाफवणे नंतर चिरलेले पडवळ घालून थोडे पाणी घालून शिजवणे व आपला आवडता गोडा मसाला ,गुळ आमसूल मीठ हळद घालून एका वाफे नंतर खाली काढणे व कोथिंबीर खोबरे घालणे .
💚वाल पडवळ भाजी यासाठी मोड आलेले वाल घ्यावे हे खुप चविष्ट असतात प्रथम फोडणीत वाल थोडे वाफवून मग पडवळ तुकडे घालणे व शिजवणे कोकणी मसाला शेवटी घालावा व गुळ,तिखट आमसूल हळद मीठ कढीपत्ता घालून झाकण ठेवून वाफवणे .
💚स्टफपडवळ भाजी पडवळ एक इंच तुकडे करणे मधल्या बिया काढून त्यात खोबरे कोथिंबीर ,गरम मसाला तिखट मीठ असे सारण अथवा उकडलेला बटाटा मसाला मीठ असे सारण करून या डमरू सारख्या भरून घेणे ,यानंतर त्याच्या दोन्ही बाजू कोर्न फ्लोवेर अथवा ओल्या मैदा पीठाने बंद करणे व या खालच्या बाजू एका तव्यात फ्राय करणे म्हणजे सारण बाहेर येत नाही यानंतर याच तव्यात फोडणी करीन हे पडवळ रोल ठेवणे आणि कमी पाण्यात वाफेवर कोरडे शिजवणे अथवा पाणी घालून खोबर्याचे वाटणलावून रस्सा भाजी करणे
💚पडवळ कढीसाजूक तुपाच्या फोडणीत जिरे हिग मिरची कढीपत्ता घालून पडवळ चे छोटे तुकडे वाफवून घ्यावे व त्यावर ताक फोडणीला टाकून नेहेमी प्रमाणे कढी करावी
💚पडवळ बियांची चटणी पडवळ बिया काढून थोड्या तेलात हिरवी मिरची सोबत वाफवाव्या बियांचा रंग बदलला की खाली काढावे💚प्रकार एक या बिया दाणे कुट,चिंच ,गुळ,कोथिंबीर जिरे घालून चटणी करावी 💚प्रकार दोन या बिया खोबरे कोथिंबीर साखर मीठ घालून चटणी करावी वरून लिंबू पिळावे व हिंग मोहरी हलकी हळद कढीपत्ता तुकडे घालून फोडणी ध्यावी .मस्त होते ही चटणीपरोठा पोळी सँडविच साठी अती उत्तम
💚पडवळ मिक्स भाजी पडवळ बारीक तुकडे करून घ्यावे एक कांदा एक टोमॅटो बारीक चिरून घ्यावे हिंग मोहरी फोडणीत आधी कांदा मऊ करून घ्यावा त्यानंतर टोमॅटो थोडा परतून पडवळ घालावे पाच मिनिटे परतून भाजी बुडेल इतके पाणी घालून झाकण ठेवावे दहा मिनिटात भाजी शिजून पाणी आटते तिखट मीठ हळद घालून आणखी एक वाफ आणावी वरती खोबरे कोथिंबीर
💚इति पडवळ पुराण सुफळ संपन्न .😊😊